आहे-नाही असा पाऊस, ओली कातर संध्याकाळ,
क्षितिजादूर तारेवर, आठवणींची मोहनमाळ!
जवळचेही जग दूर, असा एक-एकटा क्षण,
वणव्यामध्ये व्यवहाराच्या, तगमगणारे द्विधा मन..
अशा वेळी आधाराचा एक हात अलगद येतो,
घसरणा-या वाटेवरती, अगदी सहज सावरुन घेतो,
पुन्हा समोर येते शाळा..... खडू, फळा, पुस्तक, वही.
कठोर कधी, कधी मृदु, समासातली तुमची सही..
केव्हा वत्सल शाबासकी, तर कधी कडक उठाबशा,
हातावरच्या वळांनी तर, हाती दिल्या नव्या दिशा.
पुस्तकाची खिडकी उघडून, पंख दिलेत आकाशाचे,
अक्षराच्या मुळात तुम्ही, बळ दिलेत आयुष्याचे.
कधी आई, कधी ताई, कधी चक्क मित्र झालात,
जेव्हा काळोख धाक घाली, तेव्हा प्रेमळ ज्योत झालात.
त्याच प्रकाशात बाई, चालतो आहे पाऊलवाट,
आठवणींच्या जगामधून, सोबत दावी तुमचा हात.
वादळवारा, काटेकुटे, कुठले म्हणून भय नाही.
जपून ठेवली आहे मनात, ती वही, ती सही........!
- प्रविण दवणे
1 comments:
masta aahe t kavitaa! gr8!
sandhya
टिप्पणी पोस्ट करा