गुरुवार, १० डिसेंबर, २००९

माझी फ़ोटोग्राफ़ी१ मेगापिक्सेल कॅमे-याने काढलेला फोटो! (अर्थातच मोबाईलच्या!)

सोमवार, १६ नोव्हेंबर, २००९

हुश्श......... ! सुटलो एकदाचे!

हुश्श......... ! सुटलो एकदाचे!
कायम आपल्या देशाकडून आणि आपल्या राज्याच्या संघाकडून खेळणा-या खेळाडूला जर
एकदम नवीन अनोळखी ठिकाणी खेळायला पाठवलं, तर त्याला जसं वाटेल, तो जसा
आपल्या सहका-यांपासून दुरावेल, तसंच काहीसं मला गेल्या दोन वर्षांपासून वाटत होतं.
आणि त्याला परत home ground वर खेळायची संधी मिळाली तर तो ती जशी जिवाच्या
आकांताने मिळवण्याचा प्रयत्न करेल, तसाच मी केला.

आलो एकदाचा home ground वर! BACK TO PUNE FROM MUMBAI! हुSSSSर्रे!
आता वर स्वच्छ आभाळ आणि समोर स्पष्ट रस्ता आहे...
येणारा प्रत्येक दिवस आता माझा असेल...
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश!

मंगळवार, १० नोव्हेंबर, २००९

जय महाराष्ट्र!

मस्त! एकदम मस्त झालं काल विधानसभेत जे झालं! मराठीच्या मुद्द्यासाठी शांततामय मार्गाने निदर्शनं करण्याचा पर्याय आता संपला आहे. आता फक्त 'ऐकता की जाता?' हेच करावं लागणार आहे. -जय महाराष्ट्र

सोमवार, ९ नोव्हेंबर, २००९

चेंज

आज खूप दिवसांनी ब्लॉग अपडेट करतोय. जवळजवळ तीन महिन्यांपासून मी मॅक ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करत होतो, आणि कामही खूप होतं. त्यामुळे त्यावर मराठी टाईप कसं करायचं हे शोधायला पण वेळ मिळत नव्ह्ता. ....पण आत्ता...एक मोठ्ठा ,निदान माझापुरता तरी.. चेंज येतोय.... काय तो कळेल लवकरच! त्यानंतर मात्र मी नियमीत ब्लॉग अपडेट करणार आहे. 
... तेव्हा, यापुढे नियमीत भेटू!

शनिवार, ९ मे, २००९

मुंबईची सुरक्षा..... किती पक्की?

मी काल संध्याकाळी मुंबई सेंट्रल स्टेशनवर उतरून घरी चाललो होतो. तेव्हा मी जे दृश्य पाहिलं ते म्हणजे मुंबईची सुरक्षा व्यवस्था किती ढिसाळ आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण!
मुंबई सेंट्रलच्या प्रवेशद्वाराशी काही पोलिस स्टेनगन घेऊन बसलेले असतात. २६/११ च्या हल्ल्यानंतर ही सुरक्षा व्यवस्था सर्वच स्टेशनांमधे करण्यात आलीये.
तर झालं काय, की एक टेक्सी आली. तिच्या टपावर बरंच सामान होतं. तिथल्या पोलिसाने त्यांना थांबण्याचा इशारा केला. टेक्सीतल्या माणसाने "साब बहुत जल्दी है!" असं ओरडत दहाची नोट पुढं केली. आणि या पोलिसाने अक्षरश: धावत जाऊन ती नोट घेतली आणि त्यांना डायरेक्ट जाऊ दिलं. हे सगळं एका क्षणात घडलं. वा रे मुंबईची सुरक्षा! मग अतिरेकी मुंबईत घुसले त्यात नवल काय?

मंगळवार, ७ एप्रिल, २००९

सोनमोहोर.....

(खार (प.) इथल्या जैन मंदिराजवळ फुललेला सोनमोहोर)

आज सकाळी ऑफिसला निघालो होतो. एक ओळखीचा सुवास आला. कळेना कुठून येतोय. पण लहानपणी या वासाने मनात घर केलं होतं. वर पाहिलं..... सोनमोहोर घमघमत होता. त्याची इवलीइवली पिवळीजर्द फुलं पाहिली आणि लहानपणच्या आठवणी मनात फेर धरून नाचू लागल्या.
लहानपणी आम्ही ज्या घरात भाड्याने राहत होतो तो एक मोठा वाडा होता. वाड्यात अशोक, औदुंबर, कडूलिंब अशी भरपूर झाडं होती. त्यामुळे खान्देशातल्या भर उन्हाळ्यातही वाड्यात थंडावा राहत असे. उन्हाच्या झळा फारशा जाणवत नसत. आम्ही मुलं शाळेतून आलो की दिवसभर वाड्यात खेळत असू.
तेव्हा आमच्या घराला मोठं अंगण होतं. अंगणात भरपूर सावली असे. उन्हाळ्यात रात्री आम्ही घरातले सर्वजण अंगणात झोपत असू. रात्रभर छान हवा चालत असे. त्या झोपेचं सुख आता शब्दात पकडताच येणार नाही. मी एकटा (दिडशहाणा) सोनमोहोराच्या झाडाखाली खाट टाकून त्यावर झोपत असे. सकाळी खाटेवर आणि आजूबाजूला त्याच्या छोट्या छोट्या पिवळ्याशार फुलांचा इतका सडा पडत असे की जमिन पण दिसायची नाही. त्या फुलांचा एक मस्त घमघमाट सुटलेला असायचा. तो वास श्वासात भरून घेत, सकाळच्या थंडगार हवेत चादर अंगावर ओढून घेत लोळत पडण्यात जे सुख होतं, ते आज ए.सी. मधे नाहीये. ते क्षण परत जगायला आज मी वाट्टेल ती किंमत द्यायला तयार आहे. (पण गेलेले क्षण परत विकत घेता येण्याइतका अजून तरी कोणीच श्रीमंत नाहीए).
सकाळी आई उठवायला यायची. तेव्हा चादरीतून डोकं बाहेर काढून पाहिलं की आपण एकदम राजे आहोत आणि फुलांच्या सिंहासनावर बसलेलो आहोत असं वाटायचं. सर्व अंगणभर फुलंच फुलं! उठून घरात येताना फुलांवर पाय देणं जिवावर यायचं.
घरात आल्यावर (जबरदस्तीने.... आई ओरडल्यामुळे) आंघोळ, नाश्ता वगैरे आटोपून आम्ही परत वाड्यात खेळायला मोकळे ते पार जेवणाची वेळ टळून जाईपर्यंत! आई आम्हाला ओरडून ओरडून थकून जायची पण आम्ही काही ऐकायचो नाही. माझे मामेभाऊ वगैरे त्यांची परिक्षा झाल्यावर आले की मग काही विचारायलाच नको. आमचं दिवसभर लपाछपी खेळणं चालायचं.मी लपण्यासाठी एकदम खास जागा शोधून काढली होती. ती म्हणजे सोनमोहोराचं झाड! मी झाडावर चढून दाट फांद्यांआड लपून बसत असे आणि सर्वजण मला शोधत असत. ते झाड इतकं दाट होतं की अगदी बारकाईने बघितल्याशिवाय त्यावर काय आहे हे दिसत नसे.
त्या सोनमोहोराच्या शेंगा फोडून आम्ही त्यातल्या बिया काढायचो आणि जागा मिळेल तिथे पेरायचो. पावसाळ्यात इवली इवली रोपं वर आली की एकदम छान वाटायचं........
मी अकरावीत असताना आम्ही आमच्या स्वत:च्या घरात राहालया गेलो. कित्ती दिवस आम्हाला झाडांवाचून चैन पडत नव्हतं. पण हळूहळू नविन घरात रुळलो. माझ्या जिवलग मित्राची, सोनमोहोराची आठवण हळूहळू कमी होत गेली..... पण मी त्याला विसरलेलो नव्हतो.आजही माझ्या बालपणीच्या फुलपंखी आठवणींमधे त्याला हक्काचं स्थान आहे...
आज सकाळी पाहिलेल्या सोनमोहोराने मला त्या सोनेरी दिवसांमधे परत नेलं... त्याचा मी कायम ऋणी राहीन..

-आदित्य चंद्रशेखर.