सोमवार, १९ जुलै, २०१०

एक लहान मुलगा हरवलाय...

एक लहान मुलगा हरवलाय.....
झाली असतील दहा-पंधरा वर्षं!
    तेव्हापासून शोधतोय त्याला..
   सापडतच नाही!
तो होता तेव्हा त्याचं आणि माझं विश्व किती छान होतं!
तो म्हणजे प्रचंड उर्जा! प्रचंड सळसळ! प्रचंड उत्साह! शून्य कपटीपणा, निर्व्याज वागणं! हरवला.......
मी त्याला कॉलेजला जाणा-या मुलांमध्ये शोधतो.
मी त्याला नोकरी शोधणा-या मुलांमध्ये शोधतो.
मी त्याला घरापासून दूर राहणा-या मुलांमध्ये शोधतो.
मी त्याला त्याची वाट बघणा-या आईबाबांच्या डोळ्यांमध्ये शोधतो.
मित्रांच्या घोळक्यात शोधतो,
नाक्यावरच्या टोळक्यात शोधतो.
बाजारात शोधतो,
मंदिरात शोधतो.
नोटा-नाण्यात शोधतो, तेलाच्या घाण्यात शोधतो.
उसाच्या चरकात शोधतो, घाण्याच्या बैलात शोधतो.
कॉर्पोरेट कंपन्यात शोधतो, रस्त्यावरच्या कामगारात शोधतो.
चेहे-यावरच्या मुखवट्यात शोधतो, व्यवहाराच्या कपट्यात शोधतो......
      आणि खूपदा स्वत:च्या आत शोधतो......
अजून सापडत नाहीये!
      -प्लीज कुणीतरी शोधा रे त्याला!

रविवार, ११ जुलै, २०१०

स्वामनिष्टेपि कुरुते परहानि खलो ध्रुवम...

        शीर्षक वाचून एकदम गोंधळात पडला असाल ना? नाही नाही.. माझा संस्कृतात लिहिण्याचा कुठलाही विचार नाहीये! इतकं संस्कृत मला नक्कीच येत नाही. आज दोन बैराग्यांची ही झेनकथा वाचली आणि शाळेत असतांना संस्कृतच्या पुस्तकातला एक धडा आठवला, खरं तर ती गोष्ट होती. या दोन्ही कथांमधे केवळ "दोन बैरागी" इतकंच साम्य आहे.
          "स्वामनिष्टेपि कुरुते परहानि खलो ध्रुवम... " चा अर्थ आहे "दुस-याचं वाईट करतांना आपलं पण थोडंफार नुकसान होतंच!"
         होतं काय, की एका आश्रमात दोन साधू रहात असतात, सुबुद्धी आणि दुर्बुद्धी! दोघांचं एकदम विळ्याभोपळ्याचं नातं असतं. एकदा ते तपश्चर्येला बसतात. दिवस, महिने, वर्ष निघून जातात तरी त्यांची तपश्चर्या सुरुच असते. शेवटी एकदाचे देव प्रसन्न होऊन त्यांना दर्शन देतात आणि वर मागायला सांगतात. (इथपर्यंत अशा सगळ्या गोष्टी कॉमनच असतात!)
      तर देव त्यांना तीन वर मागण्याचं वरदान देतात पण एक अट घालतात... "जो कोणी आधी जे मागेल ते दुस-याला न मागता दुप्पट मिळेल!" झालं... दोघंही विचार करतात काय मागावं? बरं जो आधी मागेल त्याला नंतर मागणा-यापेक्षा निम्मंच मिळणार असतं. असा बराच वेळ निघून जातो. देव म्हणतात "अरे मूर्खांनो मागा पटकन नाहीतर मी चाललो!"
         शेवटी दुर्बुद्धी म्हणतो,"देवा माझा एक पाय तोड,एक हात तोड आणि मला एका डोळ्याने आंधळा कर".
"तथास्तू!"
    आता दुर्बुद्धी एका डोळ्याने आंधळा होतो, त्याचा एक हात आणि एक पाय जातो.......... आणि सुबुद्धीचे दोन्ही हातपाय आणि दोन्ही डोळे जातात...
           म्हणजे काय तर सुबुद्धीला अपंग बनवण्यासाठी दुर्बुद्धी स्वत:च्या एका हातापायाचा आणि एका डोळ्याचा बळी देतो. हा या सुभाषिताचा सारांश आहे.

शनिवार, १० जुलै, २०१०

बनवाबनवी

"बंडू, बाळ तू मोठेपणी कोण बनणार?"
"मी किनई हे... बनणार! मी किनई ते... बनणार!"..... यादी संपतच नाही! सगळे हीच उत्तरं देतात. स्थलकालपरत्वे थोडाफार फरक पडतही असेल, पण एकूण साचा तोच! माझाही प्रकार काही वेगळा नव्हता. मला त्या वयात पोलिस इन्स्पेक्टरचं भयंकर आकर्षण होतं. कदाचित अमिताभ इफेक्ट असावा. मला तेव्हा मोठेपणी पोलिस इन्स्पेक्टर बनायचं होतं. तेव्हाचे हिरो पोलिस असलेले पिक्चर मी अगदी मन लावून बघत असे. एकदा असाच एक पिक्चर बघून आलो आणि शाळेत मधल्या सुट्टीत चोर-पोलिस खेळत होतो. माझ्या अंगात एकदम काल पाहिलेला पोलिस इन्स्पेक्टर संचारला. झालं.... मी पोरांना मारायच्या ऐवेजी त्यांनीच मला बुकलून काढला! असो. थोडं विषयांतर होतयं.
तर आपण बनणार कोण हा प्रश्न आहे. म्हणजे कालही होता आणि उद्याही असणार आहे. त्या निरागस वयात आपण फार मोठीमोठी स्वप्न रचत असतो. आपण वाकवू तशी परिस्थिती वाकत नाही हे भान त्या भाबड्या वयात नसतं. होता होता शाळेचे दिवस मागे पडतात. करिअर निवडायची वेळ येते. मग खरा प्रश्न सुरू होतो, कि आपण नक्की कोण बनणार? बनवाबनवीला तिथूनच सुरुवात होते.
आधी कागदपत्रांसाठी संबंधित यंत्रणा आपल्याला ’बनवते’. आपणही सगळं माहीत असूनही ’बनतो’. कारण "अडला नारायण...."! मग ऍडमिशन (सध्या लष्कराच्या एखाद्या मिशनसारखं झालंय!) तिथे कॉलेज आणि विद्यापीठ जसेजसे बनवत जातील तसेतसे आपण बनत जातो. नंतर नोकरीसाठी परत बनवाबनवी. कधी आपण करतो तर कधी संस्था! आयुष्याचा प्रत्येक पायरीवर ही बनवाबनवी आपल्या बरोबरीनं चालत असते. कुणाला कवी बनायचं असतं, तो कविता विसरून रात्री गस्त घालत फिरत असतो. एखादा चांगला गायक बिल्डिंगला सिमेंट किती लागेल, विटा किती लागतील याचा हिशोब मांडत बसलेला असतो. एखादा फक्त नशिबाला दोष देत फिरतो.
पण आपण आयुष्यात काहीतरी ’बनतो’ ती आपल्याला कुणीतरी काहीतरी ’बनवल्यामुळेच’!

मंगळवार, ६ जुलै, २०१०

जखम मांडीला अन मलम शेंडीला

कालचा "भारत बंद" म्हणजे जखम मांडीला अन मलम शेंडीला अशी गत आहे! इंधन दरवाढीचा निषेध म्हणून जरी हा बंद पुकारलेला असला तरी हे काही मूळ समस्येवरचं उत्तर होऊ शकत नाही. या बंदने सरकारला जाग येऊन ते दरवाढ मागे घेतील ही स्वत:चीच फसवणूक आहे.आणि सरकारला जाग यायला सरकार काही झोपलेलं नाहीये! ते जागं आहे आणि सामान्य जनतेला अजून कसं मूर्ख बनवता येईल याचा प्लॅन बनवतंय. त्याने कान बंद करून घेतलेले आहेत. त्यामुळे कितीही आरडाओरडा करा, त्याला काहीही फरक पडणार नाहीये! यात शेवटी नुकसान सामान्य जनतेचच झालंय.
      काल बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बुडाला. आज कित्येक घरात आज कमाई झाली नाही तर जेवणार काय अशी परिस्थिती आहे. त्यांचं काय? अत्यावश्यक सेवा जसं हॉस्पिटल, टिफिन या पूर्णपणे कोलमडल्या. सार्वजनिक मालमत्ता जसं एस.टी., तिचं किती नुकसान झालंय! देश चालवायला प्रत्येक मिनिटाला किती रुपयांचा खर्च येतो हे जर यांनी बघितलं तर यांचे डोळे पांढरे होतील. तब्बल १३००० कोटींचा चुराडा झालाय काल! हा पैसा सरकार कुठून वसूल करणार आहे? तुमच्या-आमच्या खिशातूनच ना! सामान्य माणसाला चलनवाढ, फुगवटा वगैरे तांत्रिक शब्दांशी काहीही घेणंदेणं नाहीये! त्याला त्याचा राहणीमानाचा स्तर कसा उंचावता येईल हे हवंय. की आयुष्यभर त्यानं ठिगळं लावत बसायचं? अरे बंद हा काय वाढत्या महागाईवर सरकारला कृती करायला भाग पाडायचा उपाय आहे का? इतके दिवस निषेधाच्या गुळण्या केल्या, आता बंदची उलटी! काय उपयोग?

शनिवार, ३ जुलै, २०१०

एक उनाड दिवस

परवा सकाळी नेहेमीप्रमाणे ऑफिसला गेलो. एक प्रॉब्लेम फिक्स करत असतानांच बॉसचा फोन आला.
"काय रे आज तुझा वाढदिवस आहे?"
"हो" - मी.
"मग काल बोलला नाहीस तू!"
"त्यात काय सांगायचं!"
"आत्ता सुट्टी घे,घरी जा! आज तुझा दिवस आहे! एन्जॉय!"
"खरंच?"
"अरे अगदी खरं! कामाचं आपण नंतर पाहू! जा तू!"
       स्तंभित, आश्चर्यचकित वगैरे वगैरे सगळी विशेषणं वापरून संपली माझी! अचानक सुट्टी? आत्ता प्रश्न पडला की या अंगावर आलेल्या सुट्टीचं काय करायचं? वीकएंडसाठी राखून ठेवलेली कामं आठवायला लागली. हे करू की ते करू! तस पाहिलं तर कुठल्याच कामाला वेळ पुरणार नव्हता! १२ वाजलेले होते, अर्धा दिवस तर असाच गेला! मग विचार केला, मरूदेत ती कामं, आज जगावा एक उनाड दिवस, आपलाच वाढदिवस...! किती दिवसात स्वत:करता जगलोच नाही आपण!
      सरळ घरी आलो. मित्रांना फोन करून उपयोग नव्हता. सगळे ऑफिसमधे! मग घरी असणा-या काही मित्रांना सोबत घेतलं आणि सरळ पुणे सेंट्रल गाठलं. म्हटलं चला विंडो शॉपिंग करुयात. चकचकीत मॉलमधल्या भपकेबाज वस्तू पहात हिंडत होतो. परवा १ तारीख होती! त्यामुळे मॉलमध्ये ही गर्दी! किती अनावश्यक वस्तू खरेदी करून घराचं गोडाऊन करून टाकतात लोक! मी विचार केला, यातल्या किती वस्तू घरात असायलाच हव्यात? उत्तर आलं, पन्नास टक्क्यापेक्षा नाही! काही अडत नाही या वस्तू घरात नसल्या तरी!
      तिथून परत आलो आणि घरी येऊन शांत बसून राहिलो. काहीही न करता, मनात कुठलाही विचार न आणता फक्त शांत बसून होतो. आजूबाजूची शांतता कानांनी टिपून घेत होतो. शांततेलाही स्वत:चा एक नाद असतो. आपण कधी ऐकतच नाही. योगी व्यक्ती ज्या समाधीबद्दल बोलतात ती बहुतेक हीच असावी. खडकातून झिरपणा-या पाण्यासारखी शांतता आत झिरपत होती. किती अद्भूत अनुभूती असते ती! कितीतरी वेळ मी त्याच अवस्थेत बसून होतो. मन निर्विचार होत होतं. खरंच खूप हलकं वाटलं. एकूण दिवस लक्षात राहण्यासारखा गेला.