शुक्रवार, २९ जुलै, २०११

"बाळा हळूच रे!"


"बाळा हळूच रे!"
      सध्या हाच घोष सगळीकडे ऐकू येतोय! आपल्याला आपल्या लहानपणी जे हाल सोसावे लागले ते आपल्या मुलांना सोसावे लागू नयेत ही प्रत्येक आईबापाची इच्छा असते. त्यात वावगं काहीच नाही, पण ही काळजी घेतांना आपलं मूल किती पंगू आणि परावलंबी होतंय हे त्यांच्या कधी लक्षात येणार?
निमित्त होतं एका लग्नाचं. मी जवळच्याच नात्यातल्या एका लग्नाला गेलो होतो. माझे दोन-चार वर्षांपूर्वी लग्न झालेले भाऊ-बहिणही लग्नाला आले होते. प्रत्येकाच्या कड्यावर किमान एक तरी कॅलेंडर होतं. घरचंच लग्न म्हटल्यावर दोन-चार दिवस आधीच सगळे आलेले होते. सगळे भाऊ-बहिण आपल्या इथल्याच मातीत वाढून गेलेले, एकत्र खेळलेले, गुढगे फोडून घेतलेले, मनसोक्त मातीत लोळलेले! पण त्यांचं पिल्लू कडेवरुन खाली उतरलं रे उतरलं की,"बाळा तिकडे मातीत नको जाऊस! तुझ्या पायाला माती लागेल! छी: छी: असते माती!"
       अरे! माती छी: छी: कधीपासून झाली? ज्या मातीत तुम्ही लहानाचे मोठे झालात ती माती छी: छी:? तुम्ही, किंबहुना आपण सगळे लहानपणी मातीत, चिखलात जो धुडगूस घालायचो तो विसरलात? मातीला विसरलात? तेव्हा आपले आईवडिल बघायचेही नाहीत की मुलं काय करताहेत आणि कुठे खेळताहेत? अंगाला माती लागल्याशिवाय मोठं होता येतं? आम्ही तरी नाही झालो. तुम्हाला असं कसं वाटतं की मातीशिवाय तुम्ही मोठं होऊ शकता! शक्यच नाही!
      मुलांना जपणं हा वेगळा विषय आहे आणि अति जपणूक हा वेगळा विषय आहे. आज तुम्ही मुलांना मातीपासून दूर ठेवत आहात आणि जर उद्या मुलं मातीला विसरलीत, नव्हे ती विसरतीलच, तर तो दोष त्यांचा नाही, तुमचा आहे! खडे बोचल्याशिवाय त्यांना बोचणं म्हणजे काय हे कळणारही नाही. अशी कचकड्याची खेळणी उद्या जगाच्या बाजारात किती टिकाव धरू शकतील? त्यांचा पायाच कमकुवत राहतोय! एक गोष्ट नक्की की तुम्ही तुमच्या मुलांना जगातल्या सर्वोत्तम सुखसुविधा देऊ शकता, पण त्यांचं स्वत:चं असं आकाश? ते तर त्यांनाच निर्माण करावं लागणार आहे ना? की ते बापाच्या खिशातून पैसे घेतले आणि आणलं विकत इतकं सोपं आहे? तुम्ही आज ज्या ठिकाणी पोचला आहात तिथपर्यंत पोचण्यासाठी तुम्ही अपार मेहनत केली आहे, प्रचंड कष्ट केलेले आहेत, पण याचा अर्थ तुमच्या मुलांना तुम्ही सगळं काही रेडीमेड द्यावं असा मुळीच होतं नाही. बोचू द्या ना त्यांनाही एखादा काटा, एखादा दगड! फुलं फक्त तोडण्यासाठी नसतात हेही दाखवा त्यांना जमल्यास! झाडावर फूल येण्याची प्रक्रिया कशी घडते हेही कळूदेत त्यांना! त्यासाठी आधी तुम्ही निसर्गात जायला हवं! पण तिथेही माती आहेच ना! छी: छी:! मग कसं जाणार तुम्ही? निसर्गात जायचं म्हणजे तुमची कशी एक वन-डे ट्रीप असते. स्वत:च्या, मित्राच्या कारने किंवा एखादी भाड्याची गाडी करुन जवळपासच्या एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जायचं, मस्त धिंगाणा घालायचा, भरपूर फोटो काढायचे आणि घरी आल्यावर किंवा जमल्यास तिथूनच फेसबुकवर अपलोड करायचे! झालं तुमचं निसर्गदर्शन!
कुठल्या एकत्र यायच्या ठिकाणीही, जसं लग्नात, सगळ्या ताया, वहिन्या आपापल्या मुलांना कड्यावर गॅसबत्तीसारखं घेऊन फिरणार! "काय करू रे तो/ती ऐकतच नाही ना!" त्या लहान पोरांचंही सारखं आपलं "अ‍ॅ अ‍ॅ अ‍ॅ" चालूच! त्यांचंही काही चुकत नाही! तुम्ही जर त्यांना माणसंच दाखवली नाहीत तर अशा ठिकाणी ती बावरणारच! त्यांना आंजारुन-गोंजारुन, वेळप्रसंगी रागावून तुम्ही मोकळं खेळायला लावू शकत नाही? आजच्या नव्वद टक्के आयांना आपल्या मुलांना रागवणं आवडत नाही! त्या स्वत: तर रागवत नाहीतच पण कुणी रागावलं की आधीच यांना राग येतो! आधीच ते एकटं मूल असल्याने लाडाने वेडं करुन ठेवलेलं असतं, आणि वरुन तुम्हीची त्याचे फालतू लाड करा हे यजमानांना सांगणं! तो बिचारा यजमान आधीच आपल्याकडच्या कार्याने वैतागून गेलेला असतो, त्यात आणखी ही भर! बरं ही उपद्यापी कार्टी बरोब्बर घरातलं किमती सामान हेरतात आणि त्याची नासधूस सुरु करतात! बरं त्यांना रागावलं की त्यांच्या आधीच त्यांच्या आया घर डोक्यावर घेतात. एखादं पोरगं चुकुन रडलंच तर कसा प्रलय झाल्यासारखी भीती त्याच्या आईबापांना वाटते, ते तरी रडल्याशिवाय मोठे झालेले असतात का? आपण जेव्हा लहान होतो तेव्हा किती वेळा धडपडलोय, पडलोय आणि म्हणून जगात अजूनही टिकून आहोत!
       मुलांना मोकळं खेळू द्या! पडू द्या! मातीत लोळू द्या! आणि महत्वाचं म्हणजे ते या समाजाचेही भाग आहेत हे त्यांच्या मनावर बिंबवायलाच हवं! त्याकरता तुम्ही जरा सोशल व्हा! त्यांना सांगा, तू हरलास तर मी तुझ्या पाठीशी आहे, पण मी तुला रेडीमेड काहीच देणार नाही! लढ बाप्पू लढ!

    बाय द वे, तुम्हाला काय वाटतं?


    --चित्रे आंतरजालावरुन साभार