सोमवार, १८ जानेवारी, २०१०

पार्टनर





आज लंचब्रेककरता बाहेर पडलो आणि जरा वेगळ्या रस्त्याने गेलो. नेहेमीच्या हॉटेलमध्ये जायचा कंटाळा आला होता. फिरता फिरता मला पुस्तकांचं प्रदर्शन दिसलं. झालं....... मग कसली भूक! अलीबाबाचे डोळे चोरांची गुहा पाहून दिपले नसतील तितके तिथली पुस्तकं पाहून माझे डोळे दिपले. किती पुस्तकं...... बाप रे बाप! म्हटलं इथे नुस्ती पुस्तकं चाळायची म्हटली तरी तास दोन तास पुरणार नाहीत.
तेवढ्यात माझं लक्ष गेलं वपुंचं पुस्तक "पार्टनर" वर! जर एखाद्याने वपुंचं एकही पुस्तक वाचलं नसेल आणि त्याने पार्टनर जर वाचलं तर तो वपुंच्या लिखाणाच्या प्रेमाताच पडतो. वपुंची ही एक वादळी कादंबरी आहे. त्यातलं सत्य एकदम अंगावर येतं. सगळं पटतं पण ते मान्य करायला मन कुठेतरी तयार नसतं. जरासा वेळ लागतो स्वत:च्याच मनाला पटवण्यासाठी! कसं सुचत असावं वपुंनां? डोक्यातला गोंधळ नेमका शब्दात पकडणं त्यांनाच जमायचं. पार्टनर वाचल्यावर असं वाटतं की आतमध्ये काहीतरी प्रचंड उलथापालथ होतेय, काहीतरी खळबळ माजतेय. आपल्याला जे म्हणायचं होतं ते आपल्याला नेमकं शब्दात पकडता येत नव्हतं,तेच वपुंनी किती सुरेख चिमटीत पकडून दाखवलं.
प्रत्येकानं एकदातरी वाचायला हवंच असं पुस्तक आहे हे! जरूर वाचा! मी तर आज रात्रीतूनच वाचून संपवणार आहे हे!

गणपती बाप्पा मोरया!!

काल थेऊरला जाऊन आलो. ब-याच दिवसांपासून चाललं होतं जाऊ जाऊ म्हणून! म्हटलं चला, आजच जाऊ! तसं आमच्या मित्रमंडळीना थेऊरचं काही अप्रूप नाही. रविवार असल्याने सगळे जरा आळसावलेलेच होतो. शेवटी माझा एक मित्र प्रशांत आणि मी असे दोघेच निघालो. मी सकाळी लवकरच माझी सकाळची क्लासची बॅच आटोपून घेतली आणि मग निघालो. पी.एम.पी.एम.एल. ने स्वारगेट ते थेऊर बस बंद केलीय. कारण काय ते त्या चिंतामणीलाच ठाऊक! मग सांगवी ते स्वारगेट, स्वारगेट ते हडपसर आणि हडपसर थेऊर असे पोचलो. सव्वाअकराला मंदिरात पोचलो. वाटलं, आज रविवार आहे आणि त्यातून गणेश जयंती जवळच आली आहे, त्यामुळे मंदिरात ही... गर्दी असेल. पण सुदैवाने तसं काही नव्हतं.एक आजी काही लोकांना घेऊन सभामंडपात अथर्वशीर्ष म्हणत होत्या. गाभा-यात "श्रीं" ना अभिषेक चालू होता. अतिशय प्रसन्न वाटत होतं.
मी पण त्या लोकांमध्ये सामील होऊन अथर्वशीर्ष म्हणू लागलो. आणि खरंच सांगतो, इतकं शांत वाटलं ना, मनावरचा सगळा ताण, सगळं टेन्शन दूर होऊन गेलं. अथर्वशीर्षाच्या त्या धीरगंभीर पठणाने, मन अंतर्बाह्य ताजंतवानं झालं. तसं माझं आणि थेऊरच्या गणपतीबाप्पाचं जुनं सख्य आहे. का कोण जाणे, पण मला इथे येऊन माझा कुणीतरी जुना सुहृद भेटल्यासारखं वाटतं.माझं बाप्पाकडे काहीही मागणं नसतं, काही गा-हाणं नसतं. मनातले सगळे प्रश्न मनातच विरघळून जातात. काल वाटलं, बाप्पा विचारतोय, "काय रे, ब-याच दिवसात आला नाहीस?" मनातच म्हणालो, "बाप्पा, तुम्ही बोलवाल तेव्हाच येणं जमतं. इथून उर्जेचं च्यवनप्राश घेऊन जातो. ते मला कायम सोबत करतं." बाप्पा म्हणाले,"अरे यावं मधून मधून! पोरं घरी आली तर आईबापाला कोण आनंद होतो. तुला अजून काय कळणार म्हणा! " अर्थातच आमचा हा संवाद मनातल्या मनातच चालला होता. पण काल मला बाप्पा खूप आनंदी दिसले. कुणास ठाऊक!
मंदिरातून निघून आम्ही वॄंदावनात गेलो, जिथे रमाबाई पेशवे सती गेल्या. तिथे एक चिरंतन शांतता वसतेय. मी निव्वळ ती शांतता अनुभवण्यासाठी तिथे जाऊन बसतो.ती शांतता केवळ पिऊन टाकावीशी वाटते. तिथे मन आपोआप शांत होतं. बाप्पांचं मंदिर आणि वृंदावन, ही दोन ठिकाणं मला चैतन्य देतात.
तुम्हीही अनुभव घेऊन पहा!
गणपती बाप्पा मोरया!!