शनिवार, १९ फेब्रुवारी, २०११

ब्लॅक फ्रायडे (भाग ७ : अंतिम)

"तुला माहितीये मी काय आणि कशाबद्दल म्हणतोय ते!" राहुलने सुहासकडे रोखून पहात विचारलं. तसा सुहास सटपटलाच.
"तू कशाबद्दल म्हणतोयेस मला नाही कळत!" -सुहास नजर चुकवत बोलला.
"मग नजर चुकवत का बोलतोयेस?" -राहुल्याचा स्ट्रेट ड्राईव्ह!
"बघ राहुल, मी नजर चुकवत बोलायचा प्रश्न नाहीये! तू स्पष्ट बोलल्याशिवाय मला कसं कळेल की तू कशाच्या बाबतीत बोलतोयेस?" -सुहास.
"ऐकायचय! का कुणास ठाऊक, पण तुझ्याकडे इन्टर्नलचे पेपर्स आहेत अशी मला शंका आहे. मी कधीची स्वत:चीच समजूत काढत होतो की नाही, सुहाससारखा सरळमार्गी मुलगा असं करणं शक्यच नाही! तो स्वत:च्या अभ्यासाने पुढे जाणारा आहे. त्याला अशा कुबड्यांची गरजच नाही. सरळमार्ग सोडून जाणा-यांमधला सुहास नाही. पण तू गेल्या काही दिवसांपासून काहीतरी लपवतोयेस माझ्यापासून असं मला जाणवतंय! सांगायचं नसेल तर नको सांगूस! तू समजो अथवा न समजो, मी तुला एक चांगला मित्र समजतो, तुला समजण्यात बरेच जण चूक करतात. आपल्याला सिद्ध करायचंय की तू चूक नाहीयेस. तू मिळवत असलेले मार्क्स हे तू मेहनतीने मिळवलेले आहेत. त्याकरता तू कुठल्याही लांड्यालबाड्या केलेल्या नाहीयेस. बरोबर आहे ना? " -राहुल्या वरवर साधं वाटणारं, पण सुहासला डिवचणारं बोलला. एका परीने तो अंदाज घेत होता, सुहास काही सांगतो का याचा!
शेवटी अपेक्षित परिणाम झालाच. सुहासने एक क्षण राहुलकडे टक लावून पाहिलं आणि डोळे बारीक करत तो म्हणाला, "दोस्त, तुला अशी शंका येण्याचं कारणच काय?"
"काही नाही रे, माझं आणि सम्याचं याच विषयावरुन तर भांडण झालं. तो म्हणत होता सुहासकडे पेपर्स आहेत आणि मी म्हणत होतो शक्यच नाहीये! सुहाससारख्या मुलावर आरोप करतांना तुम्ही विचार करुनच बोला. त्यावर ते सगळे म्हणे तुला जर त्याच इतकाच पुळका आला असेल तर त्याच्याकडेच जा! आमच्याशी कॉन्टक्ट ठेवण्याची गरज नाहीये! मीही ठणकावून सांगितलं, मी तुमच्या नाही तर सत्याच्या बाजूने आहे, सुहासची बाजू सत्य आहे त्यामुळे मी त्याच्या बाजूला आहे. जळतात स्साले तुझ्यावर रे!" राहुलने अगदी वर्मावर बोट ठेवलं.
"काय सांगू यार, मलापण चुकीचं वाटत होतं पण...", सुहासने एक मोठ्ठा पॉज घेतला. क्या करे क्या ना करे अशी त्याची परिस्थिती झाली होती. राहुलला हाच पॉज हवा होता. "काय सुहास, थांबलास का? बोल ना!" -राहुलने अंदाज घेत विचारलं.
"पण यार माझ्याकडे खरंच क्ल्यू आहे क्वेश्चन पेपर्सचा!" सुहासने मान खाली घालत सांगीतलं.
"क्काय? सांगतोस काय? यार तू सुद्धा माझ्या विश्वासाला तडा दिलास! मला हे अपेक्षित नव्हतं!" राहुल्याने अगदी अविश्वास दाखवल्यासारखं म्हटलं. सुहास गप्पच होता.
"तुला अशी काय गरज पडली होती रे! तू शेवटी सिद्धच केलंस की सगळेच पाय मातीचे असतात. तुला काहीच कसं वाटत नाही रे!" राहुल्याचा आवाज आता चढलेला होता. सुहास खाली मान घालून ऐकत होता. त्याची सिट्टीपिट्टी गूल झाली होती.
"राहुल, माझ्याकडे क्वेश्चन पेपर्स नाहीयेत रे! कायकाय क्वेश्चन्स येऊ शकतात याची आयडिया आहे. राहुल, तू कुणाला सांगणार नसलास तर मी तुला सांगतो की हे कसंकाय जमून आलं."
"तुझी इच्छा!" राहुल मानभावीपणे बोलला.
"खरं सांगायचं तर मी काळेसरांना लाडीगोडी लावून ह्या टिप्स मिळवल्यात. त्याकरतापण मला पैसे मोजावे लागले आहेत. एका पेपरसाठी हजार रुपये घेतले त्यांनी! तुम्ही म्हणजे तुमचा ग्रुप सगळ्यात पुढे होता ना, मी जळायचो रे तुमच्यावर! मला कसंही करुन तुमच्या पुढे जायचं होतं, कुठल्याही प्रकारे! म्हणून मी हा मार्ग पत्करला. प्लीज कुणाला सांगू नकोस! नाहीतर मी उगाच गोत्यात येईन. काळे सरांना जर याबाबत काही कळलं ना, तर माझी काही खैर नाही. तू माझ्यावर इतका विश्वास दाखवलास म्हणून मी तुला सांगतोय. प्लीज प्लीज कुणाला सांगू नकोस! मी तुझ्याकडून पैसे घेणार नाही पण तुला हिंट्स देऊ शकतो!" सुहास बोलला. आता लपवालपवी करण्यात काही अर्थ नाही हे समजून तो बोलत होता. त्याचं सगळं लक्ष आता राहुल काय बोलतो याकडे लागलेलं होतं.
"जाऊ दे, मला क्वेश्चन पेपर्स नकोयेत. काय सांगता येतं की ते खरे असतील की नाही. काळे सर तुलाही बनवत असतील. ऐन परिक्षेच्या वेळेस वेगळेच क्वेश्चन्स येऊ शकतात आणि याबद्दल तू काळे सरांना जाबपण विचारु शकत नाहीस. सगळंच इल्लिगल आहे!" -राहुल्याने उगाच त्याच्या डोक्यात संशयाचं एक पिल्लू सोडून दिलं. सुहास खरंच विचारात पडला. "खरंच यार, खरंच असं असलं तर? आपण काहीही करु शकत नाही. गेले पैसे! कशाच्या नादात आपण काय करुन बसलो. पैसे तर गेलेच, अभ्यासाचा पण बट्याबोळ झाला. मागच्या दोन वेळेपासून सर बरोबर टिप्स देतायेत पण आतापण बरोबरच असतील कशावरुन?" विचार करकरुन सुहासचं डोकं फिरायची वेळ आली होती. राहुल मस्त माईंड गेम खेळत होता आणि सुहास त्यात बरोबर अडकत चालला होता. असं डोकं शांत ठेवून आपण सुहासला बरोब्बर लाईनवर आणू शकतो हे राहुलला पूरेपूर उमगलं होतं.
"राहुल, कॉलेजची लॅब..." इतकंच सुहास बोलला. राहुल मनातल्या मनात काय ते समजला. पण वरकरणी तसं न दाखवता तो म्हणाला, "काय लॅबचं?"
"काही नाही रे, असंच.. मी म्हणत होतो प्रॅक्टिकल्स आहेत ना आता आपले, तर लॅब अपडेट करतील बहुतेक!" -सुहासने वेळ मारुन नेली. पण राहुलला क्ल्यू मिळाला होता.

रात्री राहुलने ग्रुपला पूर्ण हकिकत कथन केली. बरीच चर्चा झाली. सम्या म्हणाला,
"राहुल्या, त्या सुहासचा विषय सोड आता! आपल्याला लॅब हा क्ल्यू तर मिळालेला आहे! आता शुक्रवारच्या प्रॅक्टिकलला काय काय करायचं ते ठरवू. रव्या, तू आणि पश्याने सरांना बोलण्यात गुंतवायचं. निल्या, तू एका कॉम्प्युटरवर बसून लॅनमधून सगळे कॉम्प्युटर्स स्कॅन करायचे. पेपर्स सापडले की तू ते फोल्डर मिनिमाईज करुन ठेवायचं आणि तिथून उठून जायचं. उठताना मला खूण करायची. मी पासवर्ड्स असतील तर तोडून ठेवेल आणि एका ठिकाणी कॉपी करुन ठेवेल. त्या कॉम्प्युटरवर प्रॅक्टिकलची फाईल ओपन करुन ठेवायची, म्हणजे कुणाला काही शंका येणार नाही. मग राहुल्या, मी तुला माझा एक प्रॉब्लेम सोडवायला बोलवेन, तू फ्लॉपी ड्राईव्हमधे फ्लॉपी टाकून ठेवायची आणि मला तुझ्या सिस्टिमवर बोलवायचं, सांगायचं की तिकडे ये मी तिकडे सांगतो. निल्या, मग तू त्या सिस्टिमवर बसायचं आणि सगळे क्वेश्चन पेपर्स फ्लॉपीमधे कॉपी करायचे. लक्षात ठेव,हे काम एकदम बिनबोभाट व्हायला हवं. सापडलो तर आपली खैर नाही हे लक्षात ठेवा. एकही चूक खूप महागात पडू शकते. तेव्हा बी अलर्ट! आता...मिशन फ्रायडे! "


शुक्रवार... शुक्रवार ठरला होता. साळसूदपणे सगळे त्यादिवशी प्रॅक्टिकलला आले. शांतपणे सरांकडून स्लिप्स घेऊन सोडवायला लागले. आणि एका बाजूला शांतपणे मिशनपण सुरु होतं. सहाचे सहा पेपर्स कॉपी झाले होते, फक्त फ्लॉपी बाहेर काढायची होती, पण पाटील सरांचं कसंकाय लक्ष गेलं कुणास ठाऊक, त्यांनी निल्याला फ्लॉपी घेऊन बोलवलं आणि सगळं कामच आटोपलं. त्याक्षणी सगळ्यांना आपल्याला धरणी पोटात घेईल तर बरं असं वाटत होतं. सर्वजण माना खाली घालून लॅबच्या बाहेर निघाले. रव्या म्हणाला, "यार मिशन फ्रायडे तर आपल्यासाठी ’ब्लॅक फ्रायडे’ ठरला यार! आत्ता काय करायचं?"
"गप बे! प्रत्येक वेळी बोललंच पाहिजे का? शांत बैस जरा. विचार करु दे ना!" -मन्या बोलला.
"चला आधी एक एक कटिंग मारु! त्याशिवाय डोकं चालणार नाही !" विज्या बोलला आणि सगळेच शिवाच्या चहाच्या टपरीकडे चालायला लागले.
चहा घेता घेता राहुल्या म्हणाला, "साले पेपर्सपण गेले आणि इज्जतपण! बरं हे पण माहीत नाही की ते खरे की खोटे! सगळंच संपलं सालं! नशिबच ख्रराब आहे यार!"
"नशिबाला दोष नको देऊ! प्लॅन फसलाय फक्त! आणि महत्वाचं म्हणजे घाबरु नका. पाटील सरांनी जरी तक्रार केली तरी आपण कॉपी करत होतो याचं त्यांच्याकडे काहीच प्रूफ नाहीये. होतं ते त्यांनी त्यांच्याच हाताने मिटवलंय. फ्लॉपीच फॉरमॅट केलीये! आणि मला नाही वाटत हे प्रकरण काळे सरांकडे जाईल! गेलं तरी काळे सर विश्वासच ठेवणार नाहीत. आपली आधीची पुण्याई कधी कामास येणार मग?" -सम्या गालातल्या गालात हसत बोलला. हा विचार येताच सगळे रिलॅक्स झाले.
"आता इंटर्नल एक्झाम तर पुढच्या आठवड्यात आहे. अभ्यास तर बोंबललेलाच आहे! काय करायचं काय आता?" -निल्या.
"चिल मार यार! उगाच टेन्शन घेतलं तर आपण काहीच करु शकणार नाही! चिल मार!" -रव्या.

...अचानक काहीतरी सुचून निल्या म्हणाला "राहुल्या, अरे तुझा भाऊ एम.ई. करतोय ना पुण्याला?"
"आता माझा भाऊ कुठे आला मधेच?" -राहुल्या.
"अबे ऐक तर खरं, तुला माहीतीये का ’सी’ लॅन्ग्वेजमधे गेलेला डेटा परत मिळवायचा प्रोग्राम लिहिता येतो."-निल्या.
"मग? त्याचाही काय संबंध?" -राहुल्या.
"अरे मठ्ठ माणसा, फ्लॉपी कुठेय? त्यातला डेटा परत आणता येईल ना!" -निल्या चित्कारलाच!
"हा यार! हे कुणाच्या डोक्यातच आलं नव्हतं!" -सम्या.
"सो गाईज..... काय करायचं?" सम्या म्हणाला सगळेच हसायला लागले.

(समाप्त)गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

ब्लॅक फ्रायडे (भाग ६)

दुस-या दिवसापासून राहुल्या आणि सम्या एकमेकांना पाठीमागे शिव्या द्यायला लागले. कुणालाच कळत नव्हतं की हा ग्रुप असा का वागतोय, कालपरवापर्यंत गळ्यात गळे घालून फिरणारे आज एकदम एकमेकांचं तोंडही बघायला तयार नाहीयेत... हे काय गौडबंगाल आहे? पण असं चाललं होतं खरं! आता सम्या आणि सुहास, राहुल्या आणि नेहा अन बाकीची मुलं असे सरळसरळ तीन ग्रुप पडले होते.
      .. पण रोज रात्री सम्या, राहुल्या आणि मंडळी भेटतच होती आणि आज काय काय घडलं त्याचे अपडेट्स घेत होती आणि दुस-या दिवशीचे प्लॅन्स ठरवत होती.
असाच आठवडा गेला. रोज मिळणा-या माहीतीचं विश्लेषण करुन,सगळ्या शक्यता आणि गॄहितकं लक्षात घेऊन ते या निष्कर्षापर्यंत आले की हे इंटर्नलचे क्वेश्चन पेपर्स फुटले आहेत आणि वर्गातल्या मोजक्या मंडळींकडे ते आहेत. ते आपल्याला हवेत की नको हा मुद्दाच आतापर्यंत चर्चेत आला नव्हता!
पण त्या दिवशी रात्री रव्या म्हणाला,

"राहुल्या, ते पेपर्स आपल्याला हवेत!"

"का? आपल्याला कन्फर्म माहीत आहे का की तेच पेपर्स आहेत? अरे आपल्याला जर अशी खात्री झाली ना की तेच पेपर्स आहेत तर आपण फक्त त्याचाच अभ्यास करु, बाकीचा काहीच अभ्यास करणार नाही! कशावरुन आपल्याला कुणकुण लागली आहे ते सुहासने काळे सरांना सांगितलं नसेल? कशावरुन काळे सर शेवटच्या क्षणी पेपर्स बदलणार नाहीत? आता हे नको सांगूस की सुहास मागच्या वेळीही तसाच टॉपर आला. आणि समजा मागच्या वेळी असाच किस्सा असला तरी आपल्याला कुणकुण नव्हती. अरे बाकीच्या पब्लिकला धूर दिसतोय म्हणजे आग असणारच कुठेतरी! यावेळेस ऐनवेळी क्वेश्चन पेपर्स बदलण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तुला काय वाटतं, काळे सरांना काहीच कल्पना नसेल? अरे, महा पाताळयंत्री माणूस आहे तो! कुठलंही खोटं कारण काढून ते आपलं करिअर बरबाद करु शकतात. केली खोटी कॉपी केस आपल्या सगळ्यांवर मग? त्यांच्या उपद्व्यापामुळं समजा आपल्याला भरारी पथकानं डिबार केलं, काय करशील? झाला ना एका मोहापायी आयुष्याचा सत्यानाश? आपल्याला काय सिद्ध करायचंय? आम्ही यांच्या पुढे जाऊ शकतो हे? ही स्पर्धा डबक्यातल्या बेडकांची स्पर्धा आहे असं नाही वाटत तुला? मला दुस-यापेक्षा एखादा मार्क जास्त मिळाला तर मी यशस्वी ठरतो का? ही स्पर्धा मार्कांची न होता इगोंची आहे! अरे शेवटच्या क्षणी आपण ते पेपर्स मिळवण्याच्या मागे आपली शक्ती वाया घालवू नये असं मला वाटतं. आतापर्यंत अभ्यास करुन आपल्याला कमी मार्क्स मिळाले आहेत का? सांग ना आपलं काय नुकसान झालं आहे ते? आतापर्यंत आपल्याला कधीच गरज पडली नव्हती ती आज का पडतेय?" -राहुल्या.

       दूरवर बघत सम्या बोलला,

"राहुल्या, एका सिच्युएशनचा विचार कर, तुला माहीतीये की एखाद्याने, सुहासच घे ना, समज त्याने कॉपी करुन मार्क्स मिळवले आणि त्याला फर्स्टक्लास मिळाला आणि तुझा फर्स्टक्लास एका मार्काने गेला, आणि आपल्या कॉलेजला कँपसला एक चांगली कंपनी आली, तिने फक्त फर्स्टक्लास असलेल्यांना अ‍ॅप्टिट्यूड एक्झामला बसायची परवानगी दिली, कसं वाटेल तुला? सालं आपण इतका प्रामाणिकपणा करुन शेवटी हेच फळ मिळालं ना असंच वाटेल ना? त्या क्षणापुरतं तरी हा प्रामाणिकपणा काहीच कामाचा नाहीये असंच वाटेल ना तुला? मी अप्रामाणिकपणाचं समर्थन करत नाहीये, पण एक परिस्थिती तुझ्यासमोर मांडतोय! विचार कर, खरंच असं झालं तर? त्या क्षणी तुला वैताग येणार नाही? भाई, बाहेर तुला हे कुणीच विचारणार नाही की तू मार्क्स कसे मिळवलेत, किती मिळवलेत हेच विचारतील.अरे आपल्या फिल्डमधे एन्ट्री महत्त्वाची असते रे! तुला कितीही येत असलं, तू आपल्या फिल्डमधे कितीही मास्टर्स असलास तरी जोपर्यंत तुला प्रवेश मिळत नाही तोपर्यंत तू स्वत:ला सिध्द करु शकत नाहीस! तुला फक्त एन्ट्री करायचीये आणि ती कशीही झाली तरी चालेल. ऐक, जब घी सीधी उंगलीसे नही निकलता तो फिर डब्बाही उल्टा करना पडता है! आणि आपल्याला तो करायचाच आहे! मी असं नाही म्हणत की आपण त्यावरच विसंबून राहू, पण क्वेश्चन्स खरे असले तर हातातून जायला नको असं मला वाटतं. शेवटी येनकेनप्रकारेण आपल्याला मार्क्स हवे आहेत. बाय हूक ऑर बाय क्रूक! काय वाटतं?"

     सम्याच्या या युक्तिवादावर सगळेच विचार करत होते. युक्तिवाद तर बिनतोड होता. जर मार्क्स हवे असतील तर पटो अथवा न पटो, भलेबुरे सगळे मार्ग तर अबलंबावेच लागणार होते. कुणाचंही नुकसान न करता जे जे करणं शक्य आहे ते ते करायलाच हवं असं सम्याचं मत होतं. आत्ता प्रश्न होता ते क्वेश्चन पेपर्स मिळवण्याचा!
...सम्याच्या डोक्यात त्याचीही योजना आकार घेत होती.


    एक दिवस राहुल्याने सुहासला सांगितलं," सुहास, तुला एक गोष्ट सांगायचीये! तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव , तो तुझा प्रश्न आहे, पण सम्या आणि त्याची गॅंग तुझ्या वाईटावर टपलेले आहेत! तुला कुठेकुठे आणि कसंकसं गोत्यात आणता येईल याच्यावर त्यांचा विचार चाललेलाय. मला एक मित्र म्हणून असं वाटतं की तू कुठल्याही प्रॉब्लेममधे येऊ नये! आणि हो... फोकसमधेही!"

राहुल्याने "फोकसमधे" अशा स्टाईलमधे आणि पॉज घेऊन म्हटलं की क्षणभर का होईना, पण सुहासच्या काळजात कळ उठली. त्याला वाटायला लागलं की हा तर असं सांगतोय की जसं याला सगळं माहितीये! याला खरंच तर माहीत नसेल? तो इतका घाबरला की राहुल्याच्या म्हणण्याची सत्यासत्यता तपासून बघण्याचंही त्याला सुचलं नाही. माणूस घाबरला की चुकांवर चुका करायला लागतो. त्याकरता त्याने त्याची शांतपणे विचार करण्याची शक्ती घालवायची असते. घाबरल्यावर जर ही शक्ती घालवली, तर माणूस नक्की चुका करतो. आणि या क्षणी राहुलला नेमकं हेच हवं होतं. राहुल्याच्या जाळ्यात तो अलगद सापडत होता.

      "तुला...काय म्हणायचंय काय राहुल?" -सुहासने सावधपणे विचारलं. सावधपणापेक्षा त्याच्या चेहे-यावर भीती स्पष्ट दिसत होती. राहुलच्या ते लक्षात येत होतं, पण तो तसं दाखवत नव्हता. तो आपण अगदी अनभिज्ञ असल्याचं दाखवत होता. नाहीतरी त्याला सुहासला हळूहळूच रिंगणात घ्यायचं होतं.


(क्रमश:)

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०११

ब्लॅक फ्रायडे (भाग ५)

     ढाब्यावर येऊन ते बसले. चहा येईपर्यंत कुणीच एकमेकांशी बोललं नाही. नाहीतरी सम्याला घाई करायचीच नव्हती. तो अगदी शांत बसला होता,वरुन अगदी नॉर्मल असल्यासारखा दाखवत असला तरी त्याच्या मनात आत्ता प्रचंड उलथापालथ चाललेली होती. सुहासच्या प्रत्येक प्रश्नाला कसं उत्तर द्यायचं याची जुळवाजुळव तो कॉलेजमधून निघाल्यापासून करत होता.

     सुहासच्या मनातही चलबिचल होत होती. "सांगावं का याला? बरं सांगावं तरी का सांगावं? आणि काय सांगावं? हा बाकीच्यांना सांगणार नाही कशावरुन? आणि याने जर का सांगितलं तर आपण जमवून आणलेली सगळी भट्टी बिघडून जाईल. तसा चांगलाय हा! आपली आणि त्याची अशी काही दुष्मनीपण नाहीये! याला जर आपण आपल्या बाजूला ओढलं तर आपला फायदाच फायदा आहे! ते क्वेश्चन खरेच आहेत कशावरुन? एक गोष्ट आहे, स्वार्थ दिसायला लागला की माणूस आंधळा होतो. हा काही देव नाहीये! याचा फायदा होत असेल तर दोस्ती गेली अक्कलखाती! फक्त ही गोष्ट याला पटवून द्यायला हवी! आत्ताच... हीच वेळ आहे सम्याला राहुल्यापासून दूर करण्याची. राहुल्यावर सूड उगवण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. साला नेहाला माझ्यापासून दूर करतो काय? बघ राहुल्या मी तुझं कसं नुकसान करणार आहे! तुला कळणार पण नाही की तू गेलायेस! हीच वेळ आहे एका दगडात दोन पक्षी मारण्याची! नेहाबद्दल पण सम्याचं मत तसं चांगलं नाहीये! आता मरा, नेहा अन राहुल्या!" सुहास स्वत:वरच खुष झाला.

त्याला गालातल्या गालात हसतांना पाहून सम्या म्हणाला,
"काय रे एकटाच हसतोयेस? काय झालं?" अर्थात सम्याला अंदाज होताच की हा काय विचार करत असेल!

"कशी गम्मत असते ना दोस्त! आता बघ ना, तू त्या राहुल्याला इतकं समजावलं, पण ऐकलं का त्याने तुझं? तुझ्या दोस्तीची काही कदर आहे का त्याला? साला हा राहुल्या आधीच कुठूनतरी क्वेश्चन पेपर्स मिळवत असेल! आपण आपलं घासतोय! गेला ना तुम्हाला सोडून! त्याला काय गरज नाही आता आपल्या सगळ्यांची!" -सुहास.

रागाने सम्याच्या मुठी आवळल्या जात होत्या. सुहाससारख्या हलकटाने राहुल्याबद्दल असं बोलावं हे ऐकूनच त्याच्या डोक्यात तिडिक गेली होती. आणि "आपण"? हा कधी "आपल्यात" होता? साला स्वत: क्वेश्चन पेपर्स काढतोय आणि राहुल्याचं नाव बदनाम करतोय! पण आपल्याला आत्ता राग आलाय हे दाखवून चालणार नव्हतं. प्लॅन पार फिसकटला असता.

"जाऊ दे यार सुहास, होत असतं असं आयुष्यात! चालूच असतं! सोड!" - सम्या समजावणीच्या सुरात बोलला.
पण सुहास भडकला. सम्यालाही हेच हवं होतं. रागाच्या भरात माणसाच्या तोंडून ब-याचदा खरं निघूनही जातं.

"अरे काय जाऊदे! काही वाटतं का त्या राहुल्याला? साला खुशाल दोस्तीचा गळा घोटतो! ती नेहा पण तशीच! आज एकदम कसाकाय राहुल्या आठवला काय माहीत! तुला सांगतो सम्या, हा राहुल्या एकदम नीच आहे रे! नेहा माझ्याशी बोलायची ना तर किती जळायचा तो! जाऊ दे, ती पण तशीच निघाली, हलकट!" -सुहासचा संताप संताप होत होता. सम्याला जाणवलं, गाडी रुळावर यायला सुरुवात झालीये!

     "पण झालं काय रे तुमचं भांडण व्ह्यायला?" - सम्याने पाचर टाकली. आता तो अपेक्षीत परिणामाची वाट बघत होता... आणि... परिणाम झाला! ज्या बेसावध क्षणाची सम्या वाट बघत होता तो क्षण येऊन ठेपला होता.

    

.... रात्री अकरा वाजता "साकी" मधे सगळे जमलेले होते. सम्या, रव्या, निल्या, मन्या, पश्या आणि.... राहुल्याही!
"राहुल्या, आपला पहिला पार्ट तर एकदम सक्सेसफूल! थ्री चिअर्स!" - सम्या चित्कारला! "पण साला तुला शिव्या घालत होता रे! माझा संताप होत होता, त्याला विश्वास बसावा म्हणून मी पण घातल्या दोन-चार शिव्या तुला! सॉरी यार!"

"जाउ दे रे! तुझ्या काय शिव्या लागणार आहेत का? साल्या सॉरीबिरी जाऊ दे, काय झालं ते सांग!" -राहुल्या.

सम्या सरसावून बसला.
"काय सांगू यार, आपल्याला जे हवं होतं ते मिळालंय!" -सम्या.

"अबे झालं काय होतं, सांग ना पटकन!" सम्या सोडून उरलेले वीस कान जीव गोळा करुन ऐकू लागले.

सम्या बोलू लागला,

"अरे, हा सुहास आधी बोलतच नव्हता, पण मी त्याला विश्वास पटवून दिला की मी राहुल्याचा किती तिरस्कार करतो! मन पोपटासारखं बोलायला लागलं बेणं! अरे त्याला काळे सरांनी काही टिप्स दिल्या आहेत, हेच क्वेश्वन इंटर्नल एक्झाममधे येतील म्हणून! साला आधी सांगतच नव्ह्ता. पण मग म्हणे यार तू तुझा फायदा बघ! मी देतो तुला क्वेश्चन्स! फक्त एक अट आहे, कुणालाच कळू देऊ नकोस! मी म्हणालो, बिलकूल नाही! साला माझ्या ग्रुपने माझ्या जीवावर आतापर्यंत उड्या मारल्या, आता लै झालं. साले कॉलेज संपल्यावर मला विचारणार पण नाहीत! जाऊ दे सगळ्यांना खड्ड्यात! मला काहीच कुणाशी घेणंदेणं नाहीये! अन तुला कुठून मिळाल्या विचारलं तर म्हणे यार तुला माहीत नाही का, पैसा फार मोठी चीज आहे! काळे सर पण माणूसच आहेत. राग,लोभ,हाव सगळं त्यांनाही लागू आहेच ना! बस, पैसा फेको, इस दुनिया मे सब कुछ मिल जाता है! मग मी विचारलं की नेहाशी तुझं भांडण का झालं? तर म्हणे तिला कुठूनतरी वास लागला की माझ्याकडे क्वेश्चन प्र्पर्स आहेत, तिने कदाचित माझी बॅग चेक केली असेल! मी लगेच त्याला उचकवला, साल्या तू इतका जवळ का येऊ देतोस कुणाल की ती व्यक्ती तुझी बॅगही चेक करू शकते! तर म्हणे की यार मी तिला चांगली दोस्त समजत होतो. अन मी तिला सांगितलं की असं काही नाहीये, तर डायरेक्ट भांडायलाच लागली. मला म्हणे मी सगळ्यांना सांगेन, तिला म्हटलं सांग, कुणी कसा विश्वास ठेवेल तेच बघतो मी! मी तिच्याबद्दल असं काही सगळ्या मुलामुलींमधे पसरवलं आहे की कुणीच तिच्याशी साधं बोलतही नाही! माझ्याविरुद्ध जाणं म्हणजे काय असतं ते तिला आता कळालंच असेल. बरं ती काळे सरांकडे पण जाऊ शकत नाही, हे तर चोराकडेच चोरीची तक्रार करण्यासारखं झालं! काळे सर तर तिला उभं पण करणार नाहीत! गेली ना आता दोन्ही बाजूंनी!"

       ... इतकं सगळं एकाच दमात बोलून सम्याला धाप लागली होती. त्याने पाण्याचा घोट घेतला आणि म्हणाला,"इंटर्नलचे पेपर्स फुटताहेत ही बातमी तर खरी आहे! आता आपण काय करायचं यावर परत विचार करावा लागणार आहे!"

सगळ्यांच्या डोळ्यात सुहासबद्दल घृणा दाटली होती. माणूस इतका खालच्या पातळीला जाऊ शकतो? आपण जर बलवान नसू तर एखाद्या बलवानाचं नुकसान पाहुन आनंद होऊ शकण्याइतका? अर्थात या ग्रुपचं काहीही नुकसान झालं नव्हतं. आणि काळे सर? एच.ओ.डींनीच असं केलं तर दाद कुणाकडे मागायची? हातात पूर्ण पुरावा असल्याशिवाय प्रिन्सीपॉल सरांकडे जाऊन पण उपयोग नव्हता! बरं ते काही अ‍ॅक्शन घेतीलच याची खात्री काय? आपल्या कॉलेजची नाचक्की होऊ नये म्हणून त्यांचा कल हे प्रकरण दाबून टाकण्याकडेच राहील ना? आणि एच.ओ.डींना कळालं की आपण त्यांची तक्रार केली आहे तर आपलं कॉलेज काय, पण करिअरही बरबाद होऊ शकतं! काय करावं बरं? सगळेच विचार करत होते.

एकदम सम्या म्हणाला, "अरे राहुल्या ती नेहा काय म्हणाली आज? तिथून काय अपडेट्स?"

"हाँ... अरे हीच गोष्ट तिने मला पण सांगितली की तिला अशी अशी शंका आहे! म्हणत होती, सुहास मला म्हणायचा की तू माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस, मग त्याने का केलं असेल रे असं? आणि नेहेमीप्रमाणे रडायला लागली!"

"डन इट! काय चालू आहे ते तर कळालं! पण सगळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला हे नाटक हे सेमीस्टर संपेपर्यंत असंच चालू द्यावं लागणार आहे. आता याचा पूर्ण सोक्षमोक्ष लावावाच लागेल. सुहासला म्हणा किंवा नेहाला म्हणा, अजिबात सुगावा लागता कामा नये! आणि मन्या, तू जास्त काळजी घे! साल्या तू ऑलरेडी सेंटी आयटम आहेस! लगेच विरघळतो!" -सम्या.

"नाही बे, साल्या तुमची साथ सोडेन का मी?" -मन्या.
...अर्धी लढाई तर जिंकलेली होती.(क्रमश:)

ब्लॅक फ्रायडे (भाग ४)

       ... लायब्ररीत नेहा त्याची वाटच पहात होती. पश्चात्तापाने तिचा चेहेरा झुकलेला होता, निदान राहुलला तरी असंच वाटत होतं. तिचा पश्चात्ताप कितपत खरा होता देव जाणे! त्याचं उत्तर तर काळाच्या पोटातच दडलेलं होतं.

"राहुल, मला असं वाटतं की मी कळत-नकळत तुझ्यावर अन्याय केला!" -नेहा.

"ते जाऊ दे, कुठला टॉपिक समजला नाहीये तुला?" - राहुल्याने तिला एकदम जमिनीवर आणत म्हटलं.
तिचा एकदम भ्रमनिरास झाला, पण ती काहीच बोलली नाही. पुढचे दिड-दोन तास राहुल्या तिला न समजलेला टॉपिक समजवण्यात दंग होता. मागच्या आठवणींचा मागमूसही त्यानं चेहे-यावर दाखवला नव्हता.लेक्चर्सची वेळ झाल्यावर तो सरळ रुमवर निघून आला. खूप मानसिक थकवा आला होता त्याला! मनावर इतकं ओझं घेऊन लेक्चर्सला बसणं शक्यच नव्हतं आज! रुमवर आल्यावर तो जरा आडवा झाला आणि दोन वर्षांपूर्वीचे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागले.

       ... तेव्हा कॉलेज नुकतंच सुरु झालेलं होतं. आत्ताचा ग्रुप पण बनलेला नव्हता. तेव्हा कॉलेजच्या ऑफिसमधे तिची अन त्याची ओळख झाली होती. त्यानंतर सगळं व्यवस्थित होतं पण ऐन परिक्षेच्या वेळेस ती आजारी पडली. तेव्हा तिचा बुडालेला अभ्यास भरुन काढायला तिला राहुलनेच मदत केली होती. खरं तर त्याच्यामुळेच ती त्या वर्षी पास झाली होती. नंतर जसा राहुलचा हा ग्रुप बनत गेला तशी तिच्यात आणि राहुलमधे दरी पडत गेली. तू कायम माझ्याचबरोबर असायला हवं असा तिचा हट्ट होता. राहुलने तिला बरंच समजवलं की असं कसं शक्य आहे? ते माझे रुमपार्टनर्स आहेत, माझे मित्र आहेत. मी तुझ्याशी बोलतोय ना? मग इतका पझेसिव्हनेस का? तिला पझेसिव्हनेस म्हटल्याचा खूप राग आला. त्यावरुन ती राहुलशी खूप भांडली. त्यानंतर तिने त्याला टाळणंच सुरु केलं. त्यात सुहास म्हणजे बोलबच्चन! राहुलला फारसं बोलणं नव्हतं. अर्थात त्याचं म्हणा, किंवा तिचं म्हणा वय हे स्तुतीला भुलणारंच होतं. त्यामुळे सुहासने केलेल्या स्तुतीला ती भुलली आणि कायम सुहासच्याच संपर्कात राहू लागली.करता करता दोन वर्ष कसे निघून गेले कुणालाच कळलं नाही. या दोन वर्षात ती राहुलशी बोटावर मोजण्याइतक्या वेळेस बोलली असेल. राहुलला मात्र मनातून ती आवडत होती. त्याने ही गोष्ट फक्त सम्याला सांगितली होती, खरं तर ही गोष्ट सम्यानेच त्याच्याकडून काढून घेतली होती. तेव्हाच सम्याने त्याला सल्ला दिला होता.

    "राहुल्या, हे कॉलेजमधलं प्रेमबिम आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी नसतं! तुझ्या किंवा माझ्या बापाचा काही मोठ्ठा बिझनेस नाहीये की संपलं कॉलेज की बसले लगेच खुर्चीत! अजून आपल्याला शून्यातून आपलं विश्व निर्माण करायचंय! करण्यासारखं बरंच काही आहे आपल्याला अजून आयुष्यात! मला नाही वाटत की शी इज सुटेबल फॉर यू! म्हणजे तुझा व्ह्यू कसा आदर्शवादी आहे ना, तिचा तसा नाहीये, शी इज परफेक्ट एक्झाम्पल ऑफ रिअलिस्टीक व्ह्यू! हवेनुसार दिशा बदलणारी आहे रे ती! तिला जेव्हा जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा तेव्हा तिला तू आठवायचास. काम संपलं की तू कोण आणि मी कोण! ती तुला एक मित्र म्हणून पण मानत नाही रे!तू उगाच तिच्या बाबतीत स्वप्न बघतोयेस! काढून टाक हा विषय डोक्यातून!"

"तू म्हणतो तसं असेलही सम्या, पण ती तशी वागत असेल तर आपणही तसंच वागलं पाहिजे असं कुठेय? असं असेल तर तिच्यात अन आपल्यात फरक काय राहीला?" - राहुल्याचा युक्तिवाद!

"काये राहुल्या, आपण सगळ्यांशी, अगदी आपल्याशी ठरवून वाईट वागणा-यांशीही कायम चांगलेच वागत राहीलो तर काय होतं माहीतीये? आपण चांगलंच वागायला हवं असं लोक गृहीत धरायला लागतात. आणि आपण कितीही वाईट वागलो तरी हा आपल्याशी चांगलाच वागेल असं जेव्हा कुणी गृहीत धरायला लागतं ना, तो आपला मोठ्ठा पराभव असतो. कुणाला आपली किंमत कळत नाही रे अशाने! मग अशा वेळी आपली किंमत दाखवून द्यावीच लागते!"
या उत्तरावर मात्र राहुल गप्प बसला.

      दुस-या दिवशी जेव्हा राहुल्या नेहाला भेटला तेव्हा त्यानं नेहाला सांगितलं,
"नेहा, मला माफ कर! मी तुझ्या मैत्रीला ओळखू शकलो नाही! आज मी सगळ्या रुमपार्टनर्सचा खरा चेहेरा पाहिलाय. सगळे फक्त कामापुरते गोड वागत होते माझ्याशी! केसाने गळा कापत होते माझा! अरे मी यांच्यासाठी काय काय केलं नाही, पैसे उधार देण्यापासून कर्जाला जामीन राहण्यापर्यंत केलं! पण... पण.. मी आज रुममधे येत होतो तेव्हाच सम्याला रव्याला सांगतांना ऐकलं की हा राहुल्या कसा पुढे जातो तेच मी बघतो. मीच त्याचा वेळ बरबाद करणार आहे, मग बघू, त्याला अभ्यासाला कसा वेळ मिळतो ते! मी खूप खूप साधा राहिलो गं! कळालंच नाही मला! तू बरोबर सांगत होतीस! तेव्हा तुझं ऐकलं नाही ना मी! मी एकदम रुममधे आलो तसं सगळे एकदम चिडिचूप! मी आल्यामुळेच ते एकदम शांत झालेत हे मला कळलं पण मी तसं दाखवलं नाही! मला आता त्यांच्यातच राहून सिद्ध करायचंय की ते माझं काहीही नुकसान करु शकत नाहीत! मी त्या सगळ्यांच्या पुढे जाऊन दाखविन! पण का गं असं? जर स्वत:ला पुढे जाता येत नसेल तर दुस-याचे पाय तरी का ओढावे माणसाने? का असे वागले असतील माझ्याशी?" - राहुल्याच्या चेहे-यावर राग आणि विश्वासघात केल्याची भावना स्पष्टपणे दिसून येत होती.

"जाऊ दे रे राहुल! कुणी कसं वागावं हे आपल्या हातात नाहीये ना! तू खरंच खरंच खूप खूप मोठ्या मनाचा आहेस! मी तुझ्याशी इतकी वाईट वागूनही तू माझ्याशी चांगलाच वागतोयेस! मी खरंच चुकले रे तेव्हा! मला कळालंच नाही तेव्हा रे!" -नेहा डायरेक्ट रडायलाच लागली.

"जाऊ दे नेहा, झालं गेलं सगळं विसरून जा!" - राहुल्याने आश्वासकपणे तिच्या खांद्यावर हात ठेवला.


      दुस-या दिवशी वर्गात कुजबुज सुरु झाली, राहुल्या सम्याच्या ग्रुपमधून बाहेर पडलाय... आणि ही बातमी एकशे एक टक्के खरी आहे! सगळा वर्गच बघत होता ना, की राहुल्या एकटाएकटाच राहतोय, कुणातच मिसळत नाहीये, आणि सम्याकडे तर तो ढूंकुनही बघत नाहीये! आता सुहासला चेव चढला. शेवटी हा ग्रुप फुटल्याचा त्याला आसुरी आनंद झाला होता. फक्त एका गोष्टीचं त्याला वाईट वाटत होतं की नेहा आता आपल्याला काहीच विचारत नाहीये, ती बोलली तर फक्त राहुल्याशी बोलते, नाहीतर बाकीच्या मुलींशीही नाही. आपण तिच्याशी स्वत:हून भांडलो होतो, त्यामुळे आपण जर तिला परत मनवायला गेलो आणि तिने भर वर्गासमोर आपल्या इज्जतीच पंचनामा करुन ठेवला तर काय घ्या, म्हणून तो गप्प बसला होता. तो आपला सहज गेल्यासारखा सम्याकडे गेला आणि म्हणाला,

"और दोस्ता, काय चाललंय, तुमच्यासारख्या भल्या माणसाशी लोक कसंही वागायला लागलेत! आपल्याच माणसानी धोका देण्यासारखं दु:ख नसतं रे! काय पण असं झालं काय की चक्क राहुल्या एकटाएकटा रहायला लागला! एकदम एकता ते एकटा! काय चांगलं नाय राव हे! आपण तर असं नसतं केलं. दोस्ती दुनियादारीत काय भांडणं होत नाहीत का? दोस्तीच्या खात्यावर जमा असतात ते! त्याचा काय इश्यू नसतो करायचा! तसा राहुल्या चांगलाय रे! सध्या कोणीतरी त्याला भडकवलंय! तुला कळू शकतं, नाही का?" - सूचकपणे सुहास बोलला!
       खरं म्हणजे सम्या आणि राहुल्यात कशामुळे बेबनाव झाला होता याबाबत कुणीच ठोस कारण देऊ शकत नव्हतं. असं असं हा हा बोलला, मग तसं तसं तो तो बोलला, असंच काहीसं मुलांमधे चाललेलं होतं. पण सगळ्यांना दिसत होतं की राहुल्या आणि सम्यामधे नक्कीच कशावरुन तरी जोरदार भांडण झालेलं आहे. इतकंच काय, राहुल्या ग्रुपमधल्या बाकीच्या मुलांशीही बोलत नाहीये!

सम्या सुहासकडे बघून फक्त छ्द्मी हसला.
"काये सुहास, तू म्हण की मी म्हण, एकाच नावेतले प्रवासी आहोत रे! तुलापण कुणी तुझ्याशी असं वागलं तेव्हा कसं वाटलं असेल हे मी समजू शकतो! मी सहानुभुती दाखवत नाहीये हं! ती सहवेदना मलाही जाणवतेय!"
सम्याचा रोख स्पष्ट होता.... नेहाकडे! नेहा आणि सुहासचं भांडण झालंय हे सम्याला माहीत होतं. पण त्यानं आपल्याला ही गोष्ट माहीतीये असं सुहासला अजिबात जाणवू दिलं नाही.

"चल यार मला जरा पुस्तकं घ्यायचीयेत सीटीतून! चल माझ्याबरोबर!" - सुहास म्हणाला.
याला पुस्तकंबिस्तकं काही घ्यायची नाहीयेत तर याला काहीतरी बोलायचंय हे सम्याच्या लक्षात आलं.

"चल."

सुहासने गाडीला किक मारली आणि ते गावाबाहेरच्या ढाब्याकडे वळाले.

"अरे इकडे कुठे? इकडे तर हायवे आहे!" -सम्या.

"अबे पुस्तकं कुणाला घ्यायचेत! मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी!" -सुहास.

       ...शेवटी.... आ गया उँट पहाड के नीचे! सम्या मनातच हसला. प्लॅन बरहुकुम चाललेला होता.


(क्रमश:)

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११

ब्लॅक फ्रायडे (भाग ३)

सकाळी परत सगळे प्रॅक्टिकलला गेले. काल घडलेल्या प्रकाराचा मात्र कुठेही मागमूस नव्हता. आज देशमुख सरांचं डेटाबेसचं प्रॅक्टिकल होतं. प्रॅक्टिकल चालू असतांनाच एच.ओ.डी.काळे सर लॅबमधे आले, आणि सगळ्यांचं धाबं दणाणलं. पण सरांना यांच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि ते निघून गेले. हुश्श... सगळ्यांनी एक मोठा सुस्कारा टाकला. प्रॅक्टिकल संपवून सगळे बाहेर आले.
      "आज कुणीच कॉलेजला जायचं नाही का? उगाच काळे सरांनी बोलवलं तर काय घ्या?" -रव्या.
"नाही! आपण जर गेलो नाही तर उगाच सरांचा संशय बळावेल. त्यापेक्षा जाऊच! असं दाखवू की आम्हाला काही माहीतीच नाहीये!" -राहुल्या.
त्यादिवशी सगळ्यांनी मात्र इमान इतबारे सगळे लेक्चर्स केले, पण सगळ्यांचं लक्ष कॉलेजमधे काही अनपेक्षित घडामोडी होताहेत का याकडे लागलेलं होतं. संध्याकाळपर्यंत तर काहीच घडलं नाही. सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
      रात्री परत सगळे निल्याच्या रुमवर जमले.

"राहुल्या, आज नेहा कॉलेजला आली होती. तू बघितलंस का?" - सम्या.
"मी कशाला बघतोय?"

"बरोबर आहे, तू बघणारच नाहीस! तीच फक्त तुझ्याकडे बघत राहणार! काही रिस्पॉन्सच देत नाही हा साला तिला!" -रव्या.

"अबे काय रिस्पॉन्स द्यायचाय?" -राहुल्या.

"तसं नाही रे, पण तिला या प्रकरणातलं काहीतरी नक्की माहीत आहे. तिला तू जरासा घोळात घेऊन काढून घेऊ शकतोस!" -सम्या.

"अबे यार, तुला तर माहीतीये, मुलींशी बोलतांना माझी काय कंडिशन होते! साल्यांनो, आणि तिच्या भावनांना आपण न्याय देऊ शकत नसलो तर तिच्या भावना दुखवायचा आपल्याला काहीही अधिकार नाहीये!" राहुल्या सम्याची नजर चुकवत बोलला.

आता मात्र सम्या भडकला,"राहुल्या, हे प्रेमाचं तत्त्वज्ञान पुस्तकांपुरतं ठीक आहे, साल्या जेव्हा तुला तिच्याबद्दल वाटत होतं तेव्हा तुला तिने काय वागणूक दिली ते विसरलास का? तुला काय वाटतं ते तिने कधी विचारात घेतलं का? साल्या, इथे माझ्या खांद्यावर डोकं ठेवून कोण रडलं होतं? मी? हा रव्या? कोण रडलं होतं? आँ? साल्या, हे उद्दात्त प्रेम वगैरे ठीक आहे, पण जी व्यक्ती तुला काही किंमतच देत नाहीये, फक्त आपला स्वार्थ बघतेय तिच्यासाठी तू इथे झुरतोय! सालं हे प्रेमबिम आम्हाला काही माहीत नाही! कधी प्रेमातच पडलो नाही ना! समज आली तेव्हापासून कायम वास्तवाचे चटकेच खातोय! तू, मी, आपण सगळेच सारख्याच परिस्थितीतून इथपर्यंत पोचलो आहोत. अरे, तुझं प्रेम काय आम्हाला समजत नाहीये का? काय उपयोग? तू चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलायेस असं आम्हाला, निदान मला तरी वाटतं. एकदातरी तिच्या डोळ्यात तुला तुझ्यासाठी काही भावना दिसली का? ती सुहासबरोबर होती तेव्हा तुला काय वाटत होतं हे मला कळत नव्हतं का? पण तुझं लक्ष अभ्यासावरुन उडू नये म्हणून आम्ही कुणीच तुला ओळखही दाखवली नाही. या सगळयांना माहीतीये तुझा किस्सा! अशा गोष्टी लपून राहत नाहीत! तू डिस्टींक्शन मिळवणारा मुलगा, मागच्या सेमीस्टरमधे जेमतेम फर्स्टक्लासमधे पास झाला होतास! कारण काय होतं हे आम्हाला कळत नव्हतं का? या सेमीस्टरला तुझा तूच झटून अभ्यासाला लागलास आणि आता जरासा अभ्यास कव्हर होतोय तुझा! लक्षात ठेव, तू जर कॅंपसमधे सिलेक्ट झाला नाहीस तर ही नेहा तुझ्याकडे ढूंकूनपण बघणार नाही! मार्क माय वर्डस! साल्या, आधी करियर बघ! नंतर ह्या गोष्टी! मला आत्ताच काय, कधीच हा विषय काढून तुला दुखवायचं नव्हतं! पण विषयातून विषय निघाला म्हणून बोललो मी! राहुल्या, तुला वाईट वाटेल, पण ती पक्की स्वार्थी आहे! कधी बोलायची तुझ्याशी ती? नोट्स, जर्नल्स लागले तरच ना! मग तर तुला एकदम हरभ-याच्या झाडावर चढवायची! तुही आपला चढतोय! केव्हढं मोठं विचारांचं वादळ तू आत्ता मनात वागवतोयेस याची मला जाणीव आहे! पण राहुल्या, विचार कर, इज इट रिअली वर्थ? काही उपयोग आहे का? फायदा बघ स्वत:चा आणि आपला सगळ्यांचा! मला माहितीये तुझी सद्सद्विवेकबुद्धी तुला या गोष्टीसाठी कधीच परवानगी देणार नाही, खरं तर मला पण पटत नाहीये, पण हे आपल्याला करावंच लागणार आहे. नाहीतर आपण मेहनत करुनही मागेच राहू! काय चाललंय ते आपल्याला कळायलाच हवं!"
...शांतता.... एक भयाण शांतता पसरली होती रुममधे! सगळेच राहुल्याकडे बघत होते, आता हा काय बोलतो.

"सम्या, मला पण पटतंय तुझं बोलणं, पण यार, तुला माहितीये मला तिच्याबद्दल काय वाटतं ते! तुझं म्हणणं खरं असलं तरी मला हे कितपत जमेल ही शंकाच आहे!" - राहुल्या.

"अबे काय शंका काढून रायला बे! कर ना काहीतरी! गेली का दोस्ती-दुनियादारी पोरीच्या खात्यात?" - मन्या.

"नाही यार तसं नाही, पण माझं आत्ता तरी डोकंच चालत नाहीये!" -राहुल्या.

"ठीक आहे, तू बैस असाच आठवणी कुरवाळत, आम्हीच करतो काय करायचं ते!" - सम्याने आपलं शेवटचं अस्त्र बाहेर काढलं.

"नाही यार, असं मी होऊ देणार नाही, ती काही मला तुमच्यापुढे महत्त्वाची नाहीये!" - राहुल्याने एकदम सम्याच्या गळ्यात पडून अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

"रडू काय रायला बे पोरींसारखा!" मन्याने राहुल्याच्या पाठीत धपका घातला तसे सगळेच हसायला लागले. ताण एकदम हलका झाला होता...

      .. आता, मिशन गौडबंगाल!

सोमवारी सकाळी नेहा क्लासला आली होती. निघतांना एक अशी गोष्ट घडली की ती राहुल्याच्या पथ्यावरच पडली. तिने राहुल्याला एका बाजूला बोलवलं आणि विचारलं, "राहुल, आय अ‍ॅम सॉरी, मी जे तुझ्याशी वागले त्यानंतर मला विचारायलाही बरोबर वाटत नाहीये, पण प्लीज मला मदत करशील का? मी गेले आठ दिवस आजारी होते,मला ह्या बुडालेल्या लेक्चर्समधलं समजावून सांगशील का प्लीज? आय रिक्वेस्ट यू! प्लीज! बाकीच्या सगळ्यांनीही माझ्यावर बहिष्कार टाकलाय असं मला वाटतं! कुणी धड बोलतच नाहीये माझ्याशी! माझं असं काय चुकलं रे?" -घळघळ रडायलाच लागली ती!

राहुल्या फक्त समजुतदारपणे हसला. "रडू नकोस, मुलं बघतायेत! मी सांगेन तुला!"

"थॅंक्स अ लॉट राहुल! तू माझा खरा मित्र आहेस!" ती डोळे पुसत बोलली. राहुल्याला हजार इंगळ्या डसल्याचा भास झाला.

"आज कॉलेजमधे लेक्चर्स सुरु व्हायच्या तासभर आधी सांगशील?" -नेहा.

"नक्कीच!"

"चल भेटूया कॉलेजच्या लायब्ररीत!"
"चल देन,बाय!".

      -घरी आल्यावर राहुल्याचं डोकं भणाणून गेलं होतं. तिला फसवायचं, का? मित्रांसाठी, का? स्वत:ला पटतयं का हे? मित्र आधी की ती? डोक्यात घणाचे घाव बसताहेत असं त्याला वाटायला लागलं.

      कसल्याशा निर्धाराने तो उठला आणि कॉलेजची वाट तुडवायला लागला...
(क्रमश:)

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११

ब्लॅक फ्रायडे (भाग २)

"अबे यार ते क्वेश्चन पेपर्स असतील!" -निल्या.
"असतील काय, आहेतच! पण प्रश्न असा आहे की याला हे मिळाले कसे? काळे सरांना याने पटवलं कसं?" -मन्या.
"एक मिनिट, त्याच्याकडे असलेले डॉक्युमेंट्स क्वेश्चन पेपर्सच आहेत याबद्दल आपल्याला खात्री नाहीये. असा फारतर आपण अंदाज बांधू शकतो." -सम्या.
"पण हा अचानक असा बदलला कसा? काहीतरी तर शिजतच असेल ना?" - रव्या.
"ते काही नाही, आत्ताच्या आत्ता त्याच्या घरी जाऊ आणि त्याच्या घरच्यांसमोरच त्याला विचारू! साला एक घाव अन दोन तुकडे!" - मन्या.
"अहो भडकेश, शांत व्हा जरा! त्याला सुगावाही लागायला नको की आपल्याला काही शंकाही आली आहे! आणि मन्या, भडकूपणा कमी कर जरा! एक दिवस गोत्यात येशील!" -सम्या.
मन्या गप्प बसला. असंही सम्यापुढे कोणीच काही बोलायचं नाही. तो या टीमचा अलिखित ’कॅप्टन कूल’ होता. कितीही अवघड परिस्थिती कशी शांतपणे हाताळायची याचं त्याला चांगलंच भान होतं. त्यामुळे प्रत्येक प्रसंगात त्याच्याकडे आपोआप नेतृत्व चालत यायचं. आताही तो घडलेल्या सगळ्या प्रसंगांची मनातल्या मनात जुळवणी करत होता.
"आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं! आपण समजत होतो की सुहास त्याच्या अभ्यासाने पुढे चाललाय, पण काहीतरी वेगळाच वास यायला लागलाय! याला आपण सगळ्यांनी काय थोडी मदत केली होती का? प्रोजेक्ट्स हा उचलणार आणि आपल्याकडे येऊन समजवून घेणार! इथे आपण सगळे दिवसा अभ्यास करुन करुन रात्री प्रोजेक्ट्स बनवतोय, अन रिझल्ट लागला की याला आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त मार्क्स! का? काय करतो काय हा? कसे काय मिळतात याला इतके मार्क्स? आपण मेहनतीत कुठे कमी पडतोय का? तसं असतं तर आपलंच आपल्याला जाणवलं असतं! आपण बरं काही कॉपी वगैरे पण करत नाहीयेत! कॉपी तर यालापण करतांना आपण कुणीच बघितलं नाहीये! परीक्षा हॉलमधे आला की सगळा पेपर आधीच पाठ असल्यासारखा लिहून मोकळा होतो हा! काय आहे काय हे? बरं वर्गात किंवा क्लासला शिकवतांना पण हा नॉर्मल असतो. जे प्रश्न आपल्याला पडतात ते यालापण पडतात... की हा दाखवतोय असं? याला आधीच माहीत असतं का सगळं? तसं असेल तर याचा सोर्स काय? कोण मदत करत असेल याला? का? आपला ग्रुप सगळ्यात पुढे असतो हे कुणाला बघवत नाहीये का? आपण तर सगळे मेहनत करुन पुढे जातोय ना? मग? असं काय घडलं की सुहासने आपल्या सगळ्यांशी अशी गेम खेळावी? काय कारण असावं.... हे तर नक्की आहे की तो आपल्याशी गेम खेळतोय! पण मोटीव्ह? त्याचं काय?"
विचार करुन करुन सम्याचं डोकं पार भंजाळून गेलं होतं.

अचानक रव्या ओरडला, "अबे त्या नेहाला पाहिलंय का कुणी गेल्या आठवड्यात कॉलेजमधे?"
या गोष्टीवर कुणीच विचार केला नव्हता! मुळात नेहा, सुहास आणि हे प्रकरण यांचा काही परस्परसंबंध असू शकतो हेच कुणाच्या डोक्यात आलं नव्हतं!
"गप बे, च्यायला इथे चाललंय काय आणि तुला एकदम ती कशीकाय आठवली?" -मन्या.
"अबे मागच्याच्या मागच्या शनिवारी ती सुहासशी जोरजोरात भांडत होती. मी कॅन्टीनमधे तुम्हाला शोधायला गेलो होतो तेव्हा पाहिलं मी!" -रव्या.
"एक मिनिट एक मिनिट, नक्की कशावरुन भांडत होते ते दोघं?" -सम्या.
"नक्की नाही माहीत यार, पण ती म्हणत होती की मी तुझी इतकी जवळची मैत्रीण आहे पण इतकी साधी गोष्ट तू मला सांगीतली नाहीस! मला वाटलं हे यांचं नेहेमीचंच!"
"मग सुहास काय म्हणाला?" -सम्या. त्याच्या डोक्यात आता चक्र फिरायला लागली होती. इथेच काहीतरी ग्यानबाची मेख आहे.
"बरं मग पुढे काय झालं?" -सम्या.
"काही नाही, सुहासने तिला डोळे पुसायला आपला रुमाल दिला!" -रव्या.
"रव्या, अक्कल नसणं ही चूक असूच शकत नाही! साल्या, ते नाही विचारत की तो कितीदा खोकला, तिने कोणत्या रंगाचा ड्रेस घातला होता, त्याचा रुमाल कॉटनचा होता की टेरिकॉटचा! मुद्द्याचं बोल! नेमके कुठल्या विषयावर भांडत होते ते?"
"अबे मी कशाला लक्ष देऊ? दर आठवड्याला सात तरी मुली सुहासशी भांडतात! अन तो पण दुस-या दिवशी अगदी सगळ्या पोरींना खांदा देतो...... रडायला!" -रव्या.
"सुहास,सॉरी ना रे! काल मी उगाच भांडले तुझ्याशी! मलाच इतकं वाईट वाटलं ना नंतर! प्लीज सुहास! आय अ‍ॅम सॉरी ना!" - विज्याने लगेच मुलींची नक्कल करुन दाखवली. सगळेच हसले, ताण थोडासा मोकळा झाला.
"अबे म्हणून मला वाटलं की हे नेहेमीचंच! म्हणून मी सरळ तिथून कल्टी मारली! काळं कुत्रं पण बघत नव्हतं त्यांच्या भांडणाकडे!" -रव्या.
"अबे त्यानंतर ती गेला पूर्ण आठवडा नव्हती यावर विचार करा ना!" -सम्या.
"अबे गेली असेल गावाला, नाहीतर असेल काही प्रॉब्लेम, तिला काय, कॉलेजला आली नाही तरी तिच्या वह्या आणि नोट्स सुहास पूर्ण करेलच!" -निल्या.
"नाही यार, मला वाटतंय की काहीतरी गोंधळ घातलाय या बेण्यानं!" - मन्या.
"गप बे, जास्तीचे अकलेचे तारे तोडू नको! सुहासला वेळ तर मिळाला पाहिजे तिच्याकडे परत बघायला! सध्या या आठवड्यात सुवर्णाच्या गळ्यात गळे घालून फिरतोय तो! अगदी यात्रेत हरवलेले भाऊ बहिण वाटतात ना दोघं! ही ही ही ही!" -रव्या. सगळे परत हसायला लागले!
"गॉसिपिंग काय करताय? काय करायचं त्यावर विचार करा! " -सम्या. हा अजून विचारातच होता.
"रव्या, सुहासचे नेमके एक्प्रेशन्स काय होते ते भांडत होते तेव्हा?" - सम्याने विचारलं.
"अम्म्म... ती काहीतरी खाजगी बाब सार्वजनिक करतेय असा चेहेरा झाला होता त्याचा!" - रव्या.
"ओ मालक, आम्हालाबी कळेल असं बोला की!" -मन्या.
"गप रे मन्या! कळेल तुला पण!" -सम्या.
बराच वेळ असाच शांततेत गेला.

"राहुल्या!" सम्याने हाक मारली. इतका वेळ एका कोप-यात शांत बसलेल्या राहुलकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. मात्र आपण जो विचार करतोय तो विचार राहुल्याही करत असेल असं सम्याला वाटतंच होतं. राहुलने सम्याकडे असं पाहिलं की सम्याला काय म्हणायचंय हे त्याला बरोबर कळलंय!
घड्याळात पाहिलं तर चार वाजत होते. बाहेर नीरव शांतता होती.
"चल, शिवनेरीवाल्याची टपरी उघडली असेल, एक एक कटींग मारुन येऊ!" -सम्या. आजूबाजूची प्रजा बसल्या जागीच झोपून गेली होती. फक्त सम्या अन राहुल्या तेवढे जागे होते. शांतपणे उठून राहुल्याने पायात चपला सरकवल्या, दार पुढे ओढून घेतलं आणि तो आणि तो आणि सम्या ’शिवनेरी टी स्टॉल’ कडे निघाले.
अजून ना पहाट होती ना पूर्ण रात्र! एक संधिकाल असतो अशा वेळी, रात्रीच्या गर्भातून एक नवीन दिवस जन्माला येणार असतो. एक पूर्ण नवा दिवस! अगदी कोरा करकरीत! येताना तो आपलं प्राक्तनही बरोबर घेऊन आलेला असतो. त्याच्या नशिबात काय लपलेलं आहे हे तो दिवस पूर्ण गेल्याशिवाय कळत नसतं.
"सम्या, तुला काय वाटतं?" -राहुल्या.
"काय वाटणारे? असं वाटतंय की सगळीकडे एक मळभ दाटून आलंय! पण यात एक काहीतरी चांगलं लपलेलं आहे! काहीतरी चांगलं होणार आहे हे नक्की! मला या गोष्टीचा संताप येतोय की सुहाससारख्या मुलाने, ज्याला आपण एक चांगला मित्र समजत होतो, त्याने आपल्याबरोबर असं करावं!"
"तरी मी तुला सांगत होतो, की त्याला प्रोजेक्टमधे मदत करायची काहीही गरज नाहीये! उलटलाच तो शेवटी!" - राहुल्या.
"तसं नाहीये रे, जरासा भटकलाय तो, आणि मदतीचं म्हणशील तर आपण कुणीच असा विचार करत नाही मदत करतांना की ही व्यक्ती पुढेमागे आपल्याला मदत करेल की नाही! फक्त हेच बघायचं की या व्यक्तीला मदत केल्याने आपण तर कुठे विनाकारण गोत्यात येत नाहीये ना! सुहासच्या बाबतीत आपला सगळयांचाच अंदाज चुकलाय यार!" -सम्या.
एक एक कटींगचा ग्लास घेऊन ते शांत बसून राहीले. कुणाचीच बोलायची इच्छा होत नव्हती. बराच वेळ असाच निघून गेला.
"चल यार, आज परत प्रॅक्टिकल आहे... जाऊ परत रुमवर!" - राहुल्या.
तेव्हढ्यात सम्याने पाहिलं, सूर्योदय होत होता. अचानक सम्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडलं...


"राहुल्या, तो बघ सूर्य! कशी प्रसन्न पहाट होतेय! अशी पहाट आपणही आणणार आहोत... आणूच!".

(क्रमश:)

ब्लॅक फ़्रायडे (भाग १)

         "पवार, आण ती फ्लॉपी इकडे!" - करड्या आवाजात पाटील सरांनी पवारला फर्मावलं. पवारने गुमान ती फ्लॉपी सरांच्या हातात दिली. सर ती मोडणार इतक्यात सगळ्यांनीच कोरसमध्ये गलका केला,"प्लीज सर, मोडू नका ना ती फ्लॉपी! महाग येते हो! आता तर पैसेपण नाहीयेत!".
          "लाज नाही वाटत! तुम्हाला काय वाटलं, तुम्ही कॉपी करताय हे माझ्या लक्षात येणार नाही? हरामखोर आहात सगळे! आता बघतोच एकेकाकडे! नाहीतरी तुमचे बरेच मार्क्स आहेत माझ्या हातात!". पाटील सर काळेनिळे होत बोलले.
           अकराच्या अकरा मुलांच्या माना खाली गेल्या होत्या. दुस-या कुठल्याही सरांनी पकडलं तरी चाललं असतं पण पाटील सर! बिलकूल नको! कारण पूर्ण कॉलेजमधे पाटील सरच असे होते की जे अगदी प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य करत होते. बाकीचे सर, अगदी विभागप्रमुखही धुतल्या तांदुळाचे नव्हते. बाकीचे सर मुलांना कायकाय मदत करतात ते सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं. फक्त पाटील सर चिखलात उतरण्यापासून स्वत:ला वाचवू शकले होते. अगदी अगतिकतेने एक मोठ्ठा सुस्कारा सोडून त्यांनी ती फ्लॉपी फॉरमॅट केली आणि मुलांना परत दिली.
      "निघा आता! तुमची तक्रार तर एच.ओ.डींकडे जाणारच आहे, पण आता मी तुमच्या सर्वांचे पेपर्स तीन तीन वेळा चेक करणार आहे! नशिब तुमचं, तुमचं आतापर्यंतचं रेकॉर्ड चांगलं आहे म्हणून निदान परिक्षेला तरी बसू देतोय! नाहीतर या परिक्षेचे मार्क्स गेलेच तुमचे! चला निघा आता!"
         खाली मान घालून मुलं लॅबबाहेर पडली. आज कधी नाही ती या ग्रुपवर ही नामुष्की ओढवली होती. गेल्या तीन सेमीस्टरपासून अभ्या, विज्या, सम्या बघत होते की सुहास अचानक इतका पुढे कसाकाय आला? याला पास व्हायचे फाके पडत होते तो चक्क टॉपर! बरं त्याच्या दिनक्रमात तर काहीच फरक पडलेला नव्हता! तेच ते दिवसभर बगलेत पोरी मिरवत कॉलेजभर हुंदडायचं! साली तब्येत पण अशी की कुणी हातही लावणार नाही! एकाच फटक्यात उगाच मेला तर काय घ्या! सकाळी कॉलेजमध्ये यायचं, मित्रांना फक्त हात दाखवला, की चालू याचं सर्च इंजिन! चालला लगेच पोरींच्या मागेमागे! याला विज्याने, अभ्याने कितीकदा समजवून पाहिलं की अरे या पोरी कुठल्याच प्रसंगात तुला कसलीच मदत करणार नाहीयेत, उलट तुझे पायच खेचतील, पण ऐकेल तो सुहास कसला! पोरांनीही नाद सोडला.
हा अकरा जणांचा ग्रुप म्हणजे टी.वाय.च्या वर्गाची शान होती. सगळ्या गोष्टीत हा ग्रुप पुढे असायचा! संघटीतपणा तर असा की सगळ्यांनी उदाहरण द्यावं! वर्गाचे टॉपर्स कायम या ग्रुपमधूनच असायचे. कॉलेजच्या क्रिकेट टीममधेही ही पोरं असायचीच! पण सध्या कॉलेजमधलं वातावरण पार बिघडलं होतं. किशनकन्हैया सुहास पोरींचे जर्नलच भरून दे, वह्याच पूर्ण करून दे असल्या कामात लागलेला होता. याला अभ्यासाला वेळ केव्हा मिळतो याचा सगळेजण विचार करत होते. काही कळेना झालं होतं.

          प्रसंग: महिनाभरापूर्वीचा...

        एक दिवस सगळे निल्याच्या रुमवर बसलेले असतांनाचा राहुल्या पळतपळत आला!
"अबे... तो.... सुहास!"
"काय झालं बे? धापा का टाकतोयेस! बस आधी खाली! दम खा जरा, मग बोल!" - रव्या
पाचेक मिनिटांनी राहुल्या जरा नॉर्मल झाला.
"अबे तो सुहास मला आत्ता काळे सरांच्या केबिनबाहेर भेटला! साला घाईघाईने कसलंस डॉक्युमेंट दप्तरात कोंबत होता! मी विचारलं तर काही नाही काही नाही म्हणत पळून गेला!"
"च्यायला ह्या सुहासच्या!" -मन्याच्या तोंडातून एक झणझणीत शिवी बाहेर पडली.
"साला करतोय काय हा? अन काळे सरांच्या केबिनमधून बाहेर आला? मन्या, काहीतरी झोल दिसतोय यार!" -रव्या.
"नक्कीच मोठ्ठा झोल आहे! बघू साल्याकडे! च्यायला आम्ही इथे इतकी घासायची, आणि मलिदा याने खायचा! उद्या लेक्चरला आला की बघूच!" -विज्या.
"विज्या, चील मार! उगाच डोकं गरम करुन काहीच होणार नाहीये! काहीतरी शिजतयं हे नक्की, पण काय हे त्यांच्याच पद्धतीने त्यांच्याकडून काढून घ्यायला हवं! डोकं कूल ठेवलं तर आपल्याला हे शोधून काढणं कठिण नाहीये! साले आपले डोके काय फक्त पुस्तकापुरते चालवायचे का? बघ तू आपण कसं कसं आणि काय काय करतो ते!" -सम्या.

            आणि त्या दिवशी रात्री अकराचे अकरा डोके हे प्रकरण काय असावं आणि आता आपण काय करायला हवं याच्या चर्चेत गुंतून गेले...

(क्रमश:)