शुक्रवार, १४ जानेवारी, २०११

असा तोल जाता कुणी सावरावे?

ठिकाण: आमची रोजचं चहाचं दुकान
वेळ: संध्याकाळची

तर हे दुकान म्हणजे एक कट्टाच आहे. तिथे नुसतं उभं राहिलं तरी अर्ध्या तासात किमान एक डझन मित्र भेटून जातात. संध्याकाळी तर दुकानासमोर गाडी लावायला जागा नसते. दुकानाचा मालक पोरगेलासाच आहे. राजस्थानी आहे. त्याने त्याच्या हाताखाली काम करायला काही मुलांना पण त्याच्या गावाकडून आणलेलं आहे.
... हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे मी त्या दुकानात पाहत असलेला प्रसंग!
तर झालं काय, की काल संध्याकाळी तो एका कामगाराला मारत होता. जोरजोरात राजस्थानीत शिव्या देऊन तो त्याला नुस्ता जोरजोरात हाणत होता... आणि बाकीचं पब्लिक नुस्तं बघत होतं. दुरुन बघणा-याला वाटेल की किती या बिच्या-या कामगाराचे हाल आहेत! इतक्या लोकांसमोर मालक त्याला मारतोय! कुणी विचारलं तर त्याला म्हणत होता की तुम्ही मधे बोलू नका. तो कामगार बिचारा खाली मान घालून गप मार खात होता. शेवटी मालक मारुन मारुन थकला, बसला आणि म्हणाला, "काय सांगू साहेब, हे इथे बिड्या ओढतंय! मी इथे चहाबरोबर इतक्या सिगरेटी विकतो, पण कुणी माझ्या कुठल्या कामगाराला सिगारेट फुंकताना पाहिलंय का? कधी मला तरी पाहिलंय का? ह्या पोरांना त्यांचा आईबापांनी हे काहीतरी पुढे जातील, मोठे होतील म्हणून इथे इतक्या लांब माझ्या भरवश्यावर पाठवलंय! अन हे इथे येऊन हे धंदे करतायेत! यांच्या आईबापाला कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल? मी यांच्या पोराला बिघडवलं असं म्हणतील ते! माझं जाऊ द्या हो, त्याबद्दल पण काही नाही, पण हे चांगलंय का? आज बिड्या ओढतोय, उद्या दारूही पिईल! मग झालं ना आयुष्याचं मातेरं!"

त्याचा त्रागा ऐकून काही सज्जनांनी जनाची नाही पण मनाची बाळगून आपल्या हातातल्या धूम्रकांड्या पायाखाली चिरडल्या!

माझ्या मनात एक चित्र उभं राहील... डेव्हलपर सिगारेट पिऊन आला म्हणून पी.एम. त्याला मारतोय!.. क्षणभर हसूच आलं! कितीही विचार केला ना तरी असं शक्यचं नाहीये! त्या कामगाराला वाटलं नसेल का की एकदातरी विरोध करावा! पण त्याच्याजवळ काही कारणच नव्हतं! आपल्यासारख्या पांढरपेशांना जर कुणी हटकलं तर आपण म्हणणार.. "तुझ्या पैशाने पितो का? तू तुझं बघं! हा माझा पर्सनल प्रश्न आहे!" खरचं.. आपण जितके ग्लोबल होत जातो तितके संकुचितही होत जातो. कधी कधी वाटतं आपलं जर चुकलं तर आपल्यालाही असंच कुणीतरी मारावं... आईनंच! आपण जितके जितके मोठे होत जातोय ना तितके तितके एकटे होत जातोय. तो पोरगा सावरेलही, कुणी सांगावं? आपल्याला कोण सावरणार?

7 comments:

नागेश देशपांडे म्हणाले...

माझ्या मनात एक चित्र उभं राहील... डेव्हलपर सिगारेट पिऊन आला म्हणून पी.एम. त्याला मारतोय!.. क्षणभर हसूच आलं!


Too Good.

Nice Post

हेरंब म्हणाले...

लाखातलं लिहिलंत आदित्यराव !!

अनामित म्हणाले...

>>>आपण जितके जितके मोठे होत जातोय ना तितके तितके एकटे होत जातोय. तो पोरगा सावरेलही, कुणी सांगावं? आपल्याला कोण सावरणार?

सुंदर पोस्ट आहे...

विनायक पंडित म्हणाले...

खूपच छान पोस्ट आहे आदित्य.छोट्याश्या गोष्टीतून तुम्हाला जे म्हणायचंय ते नेमकं मांडलंत.छान!

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

@नागेश,हेरंब,sahajach, vinayakaji, धन्यवाद!

Sagar Kokne म्हणाले...

छान विचार आहेत...छोटी पण अर्थपूर्ण पोस्ट

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

धन्यवाद सागर!

टिप्पणी पोस्ट करा