शनिवार, २९ जानेवारी, २०११

ट्रॅव्हल्स

           पुण्यातून घरी जाण्यासाठी मला ट्रॅव्हल्स हाच एकमेव सोयीचा मार्ग आहे. कारण चारशे किलोमीटरचा प्रवास मी बसने तर नक्कीच नाही करु शकत! ऐनवेळी जाणं होत असल्याने ट्रेनचा प्रवासही शक्य नाहीये. शेवटचा पर्याय म्हणजे ट्रॅव्हल्स!

              तर गेल्या शुक्रवारी मी ट्रॅव्हल्सने घरी यायला निघालो आणि मला या ट्रॅव्हल्सवाल्यांच्या मनमानी कारभाराचा चांगलाच अनुभव आला.

             झालं काय की एकतर गाडी पाऊण तास उशिराने आली. बर ड्रायव्हर महाशयांनी वाकडेवाडीला एक तास उभी करुन ठेवली. जवळजवळ अकरा वाजता गाडी पुण्याबाहेर पडली. संध्याकाळी मला ऑफिसमधून यायला वेळ झाला होता म्हणून मी ढाब्यावर जेवण करायचं ठरवलं होतं. तर या ड्रायव्हर साहेबांनी साडेबारा वाजता ढाब्यावर गाडी उभी केली. तोपर्यंत भुकेने प्रचंड कासावीस झालो होतो. जळगावला पोचलो तेव्हा सकाळचे साडेसात वाजले होते. सकाळी सहाच्या आधी जळगावात पोचणारी गाडी इतक्या उशिराने पोचलेली पाहून ड्रायव्हर साहेबांच्या कूर्मगती ड्रायव्हिंगची कल्पना आलीच! जळगावला जवळजवळ सर्वच गाडी खाली झाली. आम्ही भुसावळला जाणारे फक्त नऊ जण उरलो होतो. सर्वांनी चला चलाचा गलका केल्यावर गाडी निघाली. तरी जळगावमध्ये एक तास मोडलाच!

              खरी कमाल तर यापुढेच झाली. जळगावच्या बाहेर गाडी आली न आली तोच आमच्या "सामर्थ्यशाली सारथ्याने" परत एकदा थांबवली! का म्हणून विचारलं तर म्हणे क्लिनर (यांच्या भाषेत किन्नर, आणि हा यक्ष!) गावात गेलाय, येईल पाच मिनिटात! पंधरा मिनिट झाले तरी त्याचा काही पत्ता नाही! लोक आरडाओरडा करायला लागले तर हा सरकारी कर्मचा-यांसारखा ढिम्म! अजून पाच मिनिटांनी एक ओम्नी येऊन थांबली. त्यातून "किन्नर" आणि त्या ओम्नीचा सारथी उतरले.(हा सारथी बहुतेक गंधर्व असावा! आमचे किन्नर साहेब त्याला आणायला गेले होते!).

’किन्नर’ साहेब म्हणाले,"चला सगळ्यांनी या गाडीत बसून घ्या!".
काही लोक लगेच बॅगा वगैरे घेऊन उतरायला लागले.
आता मात्र माझा संयम संपला! आणि त्या यक्ष आणि किन्नर जमातीबरोबर जरासा ’प्रेमळ’ संवाद घडला! तो असा:

मी: का? या ओम्नीने का जायचं?
किन्नर: साहेब नऊच लोक आहेत, त्यामुळे...
मी: मग काय झालं? आमच्याकडे भरपूर सामान आहे, त्याचं कसं करायचं? माझ्याकडेच पाच बॅग्स आहेत.
किन्नर: मी बसवतो ना बरोबर! तुम्ही काळजी करू नका साहेब!
मी: एका ओम्नीत नऊ लोक! सामानासुमानासकट! कसं शक्यय?
किन्नर: खरं सांगू का साहेब, आमच्या मालकांना एक लग्नाची ट्रीप मिळालीये जळगाव ते भुसावळ अशी! त्यामुळे...
मी: म्हणजे आम्ही इतके स्लीपरने येणारे मूर्ख आहोत का? आम्ही इतके पैसे का भरतो? प्रवास नीट व्हावा म्हणून ना? की तुमच्या मालकाला फक्त पैशाशी घेणंदेणं आहे! मला नंबर द्या त्यांचा! मी बोलतो त्यांच्याशी! (बाकीच्या प्रवाशांना) कुणीच जायचं नाही ओम्नीतून!
गंधर्व (ओम्नीचालक): साहेब नवी गाडीये आपली!
मी: एक मिनिट, तुम्ही मधे बोलू नका! नवी असो की जुनी, आम्हाला काहीही कर्तव्य नाहीये!
(आमच्या किन्नरला)हे बघा, तुमच्या मालकाला औरंगाबादहून ट्रीप मिळाली असती तर तिथून आम्हाला ओम्नीतून पाठवलं असतं का? आम्हाला काय मूर्ख समजलात का? तुम्ही आम्हाला भुसावळपर्यंत स्लीपरने पोचवण्यासाठी कमीटेड आहात. एकतर दुसरी ट्रॅव्हल्स आणा नाहीतर हीच गाडी भुसावळ पर्यंत घेऊन चला! नऊच प्रवासी आहेत तर त्याला आम्ही काय करणार! एकतर सकाळी सकाळी डोकं फिरवू नका! मला नंबर द्या मालकांचा!
किन्नर: जाऊ द्या साहेब, चला! (त्या ओम्नीवाल्याला) तू जा आता, तुझ्याशी नंतर बोलतो!
ओम्नीवाला: xxxxx xxxxxxxxx xxxxxxxx xxx
              गपगुमान त्याने गाडी भुसावळपर्यंत आणली!

3 comments:

Unknown म्हणाले...

खुप छान लिहिलं आहे तुम्ही. आवडलं या ट्रॅव्हलवाल्यांनी मला एकदा असंच सोलापुर ते पुणे प्रवासात, पुलगेट्च्या मागेच कुठेतरी उतरवलं होतं पहाटे पहाटे. बरं केलंत तुम्ही ठाम राहिलात ते बरं केलंत.

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

यांना असंच हवं, त्यांना माहितेय की यांना आपल्याशिवाय पर्याय नाही. मग मस्त मनमानी कारभार चालतो. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!

Unknown म्हणाले...

Good one.. He travels vale Majale aahet..

टिप्पणी पोस्ट करा