सोमवार, २९ ऑगस्ट, २०११

वडापाव       सध्या मस्त पाऊस चालू आहे,गरमागरम भजी खायची इच्छा होतेय,मस्त कॉफी पीत खिडकीत बसून पाऊस बघावासा वाटतोय! पण... ऑफिस! जाऊ दे!
       अशा वातावरणात मस्त गरमगरम वडापाव मिळाले तर काय मजा येईल! आहाहा...
आमच्या गावी एक वडापाववाला आहे, घाशीलाल त्याचं नाव! घाशीलालचा वडापाव आमच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. चार भाऊ मिळून ते दुकान चालवतात. प्रत्येक भाऊ महिन्याचा एक एक आठवडा दुकान चालवतो. त्या आठवड्याचा खर्चही त्याचा आणि येणारं सर्व उत्पन्नही त्याचंच! असे महिन्याचे चारही आठवडे त्यांनी वाटून घेतलेत. मस्त एक आठवडा बिझनेस करायचा आणि तीन आठवडे आराम, तरीही प्रत्येक भावाची गणना गावातल्या श्रीमंतांमधे होते, इतकं ते एका आठवड्यात कमवतात. त्या दुकानात कधीही जा, वडापाव घ्यायला रांग असते. आपला नंबर यायला किमान पंधरा मिनिट तरी लागतात इतकी गर्दी असते. घाशीलालच्या वडापावचं हेच वैशिष्ट्य आहे. त्याच्याकडचा वडा म्हणजे काही साधासुधा नसतो, तर आपण जनरली जेवढया साईजचा वडा बघतो, त्याच्या दुप्पट तरी त्याची साईज असते. आणि एकदम तिखट! दिवसाला दोनेक हजार वड्यांची तरी विक्री होतेच होते. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी हा आकडा अजून वाढतो.
      आम्ही शाळेत असतांना सकाळी सात वाजता टेक्निकल हायस्कूलला जायचो तेव्हा त्याच्या दुकानासमोरुन जावं लागायचं. तेव्हा त्याच्याकडच्या लोकांची वड्याचं मिश्रण बनवण्याची लगबग चालू असायची. एका मोठ्या काहीलीत बटाटे उकळत असायचे. दोन जण खाली बसून खलबत्यात मिरची आणि आलं कांडत बसलेले असायचे. त्यांच्या बाजूला मिरची आणि आल्याचं पोतं पडलेलं असायचं. एक जण पोतंभर कांदे चिरत बसलेला असायचा. शंभर किलोच्यावर तरी वड्याचं मिश्रण सकाळी आठ वाजेपर्यंत तयार असायचं. त्यानंतर मोठ्या चुलाणावर मोठ्ठी कढई चढवून आचारी वडे बनवायला बसायचे. तोपर्यंत तीस-चाळीस तरी गि-हाईकं दुकानात आलेलीच असायची. एका वेळेस ते साधारण शंभरेक वडे तळत असत. वडे काढले रे काढले, की दोन वेटर्स ते गरमागरम वडे लगेच बांधून गि-हाईकांच्या ऑर्डर्स पु-या करत असत.
       ह्या वड्यांचा सगळ्यात मोठा ग्राहकवर्ग म्हणजे हातावर पोट असलेला कामगारवर्ग! बांधकामावर काम करणारे मजूर, विटभट्ट्यांवर काम करणारे कामगार, बाहेरगावच्या ट्रकचे ड्रायव्हर्स हे नेहेमी हे वडे नेतात. त्या वड्याची साईजच इतकी मोठी असते की एक-दोन वड्यात एका वेळेचं पोट भरतं. ट्रक ड्रायव्हर्स आले की त्यांची ही वडे खाण्याची कॅपेसिटी बघावी, जिथे एक वडा खाता आपल्याला थोडं होतं तिथे हे ड्रायव्हर्स बिनधास्त आठ आठ वडे खातात. त्या वड्यांबरोबर मस्तपैकी लसनाची चटणीही असते, पण मुळात वडाच इतका तिखट असतो की सहसा चटणी खायच्या फंदात कुणी पडत नाही.
      आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निवासी वर्गांना जायचो तेव्हा दुस-या दिवशी निघतांना आमच्या सिनिअर्सकडून सगळ्यांना नाष्टा असायचा. आणि नाष्टा ठरलेला असायचा, तो म्हणजे घाशीलालचा वडापाव! इतका भरपेट नाष्टा झाल्यावर जेवणाचे बारा वाजणार हे ठरलेलंच असायचं. कुणाच्या घराचं बांधकाम चालू असेल तर तिथले मजूर मालकाला म्हणायचे, "साहेब जरा वडे आणि जिलबीचं बघा ना!". त्यांना घाशीलालचे वडे आणि थोडीशी जिलबी आणून दिली की ते पण खूष आणि आपणही!
      खरं तर ह्या वड्यांनी खूप लोकांचा एका वेळचा पोटाचा प्रश्न सोडवलाय! हमाल असू द्या, हातगाडीवाले असू द्या, मजूर असू द्या, क्लासच्या घाण्याला जुंपलेले विद्यार्थी असू द्या, किंवा कुणीही सामान्य मध्यमवर्गीय असू द्या, जिभेला चव आणि वेळोवेळी पोटाला आधार ह्या वड्यांनीच दिलाय, फक्त माझ्या गावातच नाही, सगळीकडेच! मुंबईकरांचा ’वडा’ हा एकदम जिव्हाळ्याच्या विषय आहे. कुणी त्याचा ’शिववडा’ करुदेत, नाहीतर आणखी काही, वडा आणि सामान्य माणूस एकमेकांना कधीच सोडणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे!

(चित्रे आंतरजालावरुन साभार)8 comments:

Unknown म्हणाले...

Ghashilal cha vada kadhich visaru shakat nahi.. Apratim asato.. Todach nahi... Joshi Vadevale kay aani Mumbai cha Goli Vadapav or Jumbo Vadapav.. konachich comparison hou shakat nahi Ghashilal barobar

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद गौरव! आज खूप दिवसांनी ब्लॉगवर आलास! आज सहज घाशीलालचा वडापाव आठवला म्हणून ही पोस्ट लिहिली. खरंच घाशीलालच्या वडापावला तोड नाहीये!

Mahesh Kulkarni म्हणाले...

सही !!!
खरोखर घाशिलाल चा वडापाव मिस करतोय..
पण एक गोष्ट आहे ती सुधारावायला हवी त्याने.. त्याचे हॉटेल जरा स्वच्छ ठेवायला हवे.
कमावतो एवढ मग थोडा खर्च करायला काय हरकत आहे???
काय म्हणतात????

अपर्णा म्हणाले...

पोस्ट वड्यासारखी चविष्ट झाली आहे...या घाशिलालच्या गावाचा उल्लेख राहिला का?

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

@महेश,तुमचा मुद्दा पटला, पण त्यामागे त्याचा एक विचार असा पण असू शकतो की लोक वडा इथे न खाता जर घरीच बांधून नेत असतील तर हॉटेल स्वच्छ ठेवलं न ठेवलं काय फरक पडतो. दुसरी गोष्ट अशी आहे की असंही बघण्यात आलेलं आहे की एखादं हॉटेल रिन्यू केलं की गि-हाईकांचा ओघ कमी होतो. अशीही त्याची समजूत असू शकते! प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! :)

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

धन्यवाद अपर्णा, गावाचं नाव भुसावळ, जिल्हा जळगाव! प्रतिकियेबद्दल धन्यवाद! :)

अनामित म्हणाले...

खरे आहे आपल्याकडील बरेच हॉटेल्स खूपच चांगले टेस्टी पदार्थ बनवतात परंतु स्वच्छतेच्या बाबतीत आनंदी आनंद असतो जसे कि लोकप्रिय होटेल जे मिसळ साठी किंवा कृष्णा भरीत , परंतु एखादं हॉटेल रिन्यू केलं की गि-हाईकांचा ओघ कमी होतो हे जोगळेकर कचोरी बाबत झाले आहे .

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

@अनामित,
ब्लॉगवर स्वागत!
खरं आहे, असं ब-याचदा घडतं. भुसावळच्या गणेश आणि जगन्नाथ हॉटेलच्या बाबतीत रिन्यूएशननंतर गि-हाईकांचा ओघ कमी झाल्याचा अनुभव आहे!

टिप्पणी पोस्ट करा