सोमवार, २५ एप्रिल, २०११

विकतचं सुख

परवा मी आणि बायको सहज म्हणून मॉलमधे गेलो होतो. घ्यायचं असं काहीच नव्हतं, पण जस्ट टाईमपास म्हणून! तिथे एक मुलगा आला, असेल वीसेक वर्षांचा! व्यवस्थित कपडे घातलेला, केस चांगले चापूनचोपून व्यवस्थित बसवलेला आणि चेहे-यावर ब-यापैकी आत्मविश्वास असलेला! आला तो सरळ माझ्याकडे!
"सर एक काम होतं." -तो.
"काय?" -मी.
"सर प्लीज हा फॉर्म भरुन देता का?"
"का?"
"सर मी अबक कंपनीकडून आलेलोय. आमची एक प्रमोशनल ऑफर आहे. त्याबद्दल आम्ही एक लकी ड्रॉ काढतोय. त्यासाठी तुमची माहीती हवी होती. फक्त नाव आणि मोबाईल नंबर द्या!"
"बरं मग मीच का?"
"तसं नाही सर, इथे येणा-या रॅन्डम लोकांकडून आम्ही फॉर्म भरुन घेत आहोत. यात जर तुमचा नंबर लागला तर आम्ही तुम्हाला तसं फोन करुन कळवू! यात तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे!"
"एक विचारु, हा डेटाबेस विकण्याचा तर प्लॅन नाही!" माझं डोकं आधीच्या आधीच निगेटीव्ह चालायला लागलं!
"नाही सर, विश्वास ठेवा!" त्याच्या चेहे-याकडे बघून हा तितका बनेल असेल असं काही मला वाटलं नाही. म्हटलं याला जरी माहिती दिली तर हा फार फार तर काय करेल, एखाद्या कंपनीला माहिती विकून पैसे कमवेल. ती कंपनी आपल्याला कॉल करेल, सर ही ऑफर आहे, ती ऑफर आहे, असं आणि तसं! आपण अशा ऑफर्सला नाही सांगू शकतो. असा विचार करुन मी त्याला फॉर्म भरुन दिला.
ही गोष्ट मी विसरुनही गेलो. रविवारी सकाळी त्यांचा फोन आला.
"सर मी अबक कंपनीमधून अमुक अमुक बोलतेय. काल तुम्ही अमुक अमुक मॉलमधे कूपन फॉर्म भरुन दिला होता का?" - एक नाजूक आणि मंजूळ आवाज.
"हो, का?"
"सर अभिनंदन! तुमच्या कुपनला बक्षिस लागलंय! आज तुम्ही आणि तुमच्या मिसेस बक्षिस घ्यायला येऊ शकता का? आज संध्याकाळी पाच वाजता अमुक अमुक ठिकाणी... मी तुम्हाला पत्ता एसएमएस करते. तुम्हाला एक बाऊल सेट आणि पंचवीस हजार रुपयांचं एक गिफ्ट हॅम्पर मिळालेलंय!"
मी अजून धक्क्यातून सावरतच नव्हतो! इतकं मोठं बक्षिस! मला... का पण? काही कळेचना! बायकोला सांगितलं. तिलाही खूप आनंद झाला! शेवटी विचार केला जाऊन तर बघू! हे प्रकरण काय आहे हे तिथे गेल्यावरच कळेल. तेव्हाच त्या नाजूक आवाजाला सांगून टाकलं की आम्ही येतोय. तरीही डोक्यात किडा वळवळतच होता की हे नक्की असं काही नाहीये! देव माझ्यावर इतका मेहेरबान नक्कीच नाहीये! काहीतरी वेगळंच आहे हे!
तिथे गेल्यावर बघितलं तर आमच्यासारखे अनेक कपल्स तिथे आले होते. सगळ्यांच्या चेहे-यावर उत्सुकता आणि आनंद दिसत होता. अनेक टायधारक इकडून तिकडे फिरत होते. त्यांच्या हातात ब-याचशा फाईल्स होत्या. आतमधे एक हॉलमधे बरेचसे टेबस मांडून ठेवलेले होते. वरवर पाहता ते एखाद्या रेस्टॉरंटसारखं वाटत होतं. आम्हाला एका टायवाल्याने आत नेलं आणि एका टेबलावर बसवलं. तोही आमच्यासमोर बसला.
"सर हे काय आहे तुम्हाला काही कल्पना आहे का? की आम्ही हे गिफ्ट का देत आहोत?" -टायवाला.
"हो. ही तुमची सेल्स प्रमोशनल ऑफर आहे!" -मी.
"बरोबर सर! तुम्ही आमच्या कंपनीचं नाव आधी कधी ऐकलं आहे का?"
"नाही!"
मग जवळजवळ अर्धा तास तो ही कंपनी कशी आंतरराष्ट्रीय आहे, जगभरात तिच्या किती शाखा आहेत हे गुणगान करत होता. त्याने आम्हाला बरेच प्रश्नही विचारले जसं तुम्हाला फिरायला आवडतं का? आतापर्यंत कुठेकुठे फिरला आहात? काय करता? वार्षिक उत्पन्न किती ?(इथे माझ्या भुवया मनातल्या मनात उंचवल्या गेल्या!) मग त्याने सांगितलं की ही कंपनी किती मोठी आहे, आम्ही तुम्हाला ह्या कंपनीची लाईफटाईम मेंबरशिप देऊ करतो आहोत. कालपर्यंत आम्ही दहा हजार कूपन्स वाटली आहेत. त्यातून आम्ही शंभर भाग्यवान विजेते निवडलेले आहेत. त्यात तुम्ही एक आहात. तर जर तुम्ही या क्लबचे मेंबर झालात तर आम्ही तुम्हाला ह्या ह्या सुविधा पुरवू. ह्या सुविधा जगभर आहेत. तुम्हाला आमच्याकडून सौना बाथ, जाकुझी आणि ब-याच काही सुविधा मोफत आहेत. असं बरंच बरंच काही त्याने सांगितलं. आणि अजून एक....
"यासाठी तुम्हाला इतके इतके पैसे भरावे लागतील. ते तुम्ही हप्त्यातही भरु शकता." ती रक्कम जवळजवळ दोनेक लाखांच्या घरात जात होती. आणि याच प्रश्नाची मी वाट बघत होतो की हा मुद्याचं कधी बोलतो!
मी त्याला म्हटलं,"एक प्रश्न विचारु?"
"विचारा."
"तुम्ही सौना बाथ घेतलाय कधी?"
"नाही. का?"
"त्यावाचून तुमचं काही अडलं का?"
"नाही!"
"मग माझं काय अडणार आहे? हे फक्त एक उदाहरण झालं. यातल्या किती गोष्टींचा आपल्याला खरंच गरज असते? आज मी जगभर, जगभर जाऊद्या भारतभर फिरायला कधी जाणार आहे, उद्या मी काय करणार आहे हेच मला माहीत नाही, तर मी या वर्षी, पुढच्या वर्षी कुठे फिरायला जाणार हे आत्ताच कसंकाय सांगू शकतो? मी रोज ऑफिसमधे येऊनजाऊन तीस किलोमीटर फिरतो. दर महिन्यातून एकदा माझ्या मूळ गावी जातो. ते इथून साडेचारशे किलोमीटर आहे, म्हणजे जाऊनयेऊन नऊशे किलोमीटर,अशा सरासरीने मी रोज जवळजवळ साठ किलोमीटर फिरतो. मग मला सांगा, इतकं रोज फिरल्यावर मी मला यावर्षी फिरायला अमुक अमुक ठिकाणी जायचंय असं ठरवू शकतो का? तुम्ही मला वर्षातून आठ वेळा समारंभासाठी हॉल फुकट वापरायला देऊ करताय, खरंच मी वर्षातून आठ समारंभ तिथे करणार आहे का? तुम्ही केले असते का? बरं त्या हॉलच्या व्यावसायिक वापराला तुमचा नकार आहे! मग मी हॉल घेऊन काय करु? पैसे म्हणाल तर तो प्रॉब्लेम मला नाहीचे! पण गरज वेगळी आणि हौस वेगळी!" यावर मात्र तो निरुत्तर झाला.
खरंच विकतच्या अशा सुखाची गरज असते का? मी जर उद्या अशा ट्रीपला गेलो आणि जर माझ्या डोक्यात हाच विषय असला की या महिन्याचा हप्ता मी कसा भरु, इतके पैसे तर आज माझ्याकडे नाहीयेत, तर मी त्या ट्रीपचा आनंद खरंच लूटू शकेन का? माझ्या उत्पन्नातला काही भाग मी मौजमजेवर जरुर खर्च करेन, पण किती, कुठे आणि केव्हा हे देखील मीच ठरवेन की नाही? आपण खूपदा गरजा विकत घेतो, त्याबदल्यात आपलं सुख, आपली मन:शांती आपण देऊन टाकत असतो. हा प्रसंग तर एक उदाहरण होता. असे अनेक मोह आयुष्यात येतच असतात. नि:संशय त्यांची स्कीम चांगली होती, पण मला तरी ती अनावश्यक वाटत होती. आज पैसे द्यायचे, ती स्कीम विकत घ्यायची, तिचा हप्ता मागे लावून घ्यायचा, कुणी सांगितली ही कटकट? मी क्रेडिट कार्ड वापरत नाही. त्याचे बरेच फायदे आहेत मला मान्य आहे, पण ते हातात आल्यावर आपलाच आपल्या खर्चावर लगाम राहील याची खात्री कुणी द्यावी?
आज संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर घरात जे घरपण जाणवतं ते मला बाहेर जाणवणार आहे का? मला ट्रीपला जायचं झालं तर मी जवळपास कुठेतरी दोनचार दिवसांकरता जाऊन येऊ शकतो. त्यासाठी मला ऋण काढून सण करण्याची अजिबात इच्छा नाही.
आपल्या गरजा आणि आपल्याला उपलब्ध होऊ शकणा-या सुविधा, यात कुठेतरी एक धूसर सीमारेषा असते. त्या सीमेवर आपला प्राधान्यक्रम लोंबकळत असतो. आपल्याला जर आपला प्राधान्यक्रम ठरवता आला तर जगण्यातले अर्धेअधिक प्रश्न सोपे होतील! तुम्हाला काय वाटतं?

12 comments:

साधक म्हणाले...

मार्केटिंगचं एक चांगलं उदाहरण. काही लोक याला बळी पडले असतील, हे त्यांचं यश आणि आपण बळी पडलो नाही हे आपलं यश.

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

नक्कीच साधक! सेल्स प्रमोशन करणं त्यांचं काम आणि न्ते निवडायचं की नाही ते आपलं! कोणाच्या बहकवण्यात येऊन आपण आपला आनंद आणि सुख कशात आहे ते कसंकाय ठरवू शकतो?
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!

Unsui म्हणाले...

सुंदर विषय आणि सुंदर लेखन, अभिनंदन.
आपला लेख वाचला आणि खालील लेखाची आठवण झाली

http://zenhabits.net/free/

sharayu म्हणाले...

यात अधिक वाईट बाब म्हणजे गरज नसताना घेतल्या गेलेल्या या वस्तू आपल्या मूर्खपणाचा बोभाटा होऊ नये म्हणून वापरण्यात आपला दिवसातील बराच वेळ खर्ची पडतो.

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

@Unsai, धन्यवाद, तुम्ही दिलेली लिंक वाचली. अगदी शब्दश: खरं आहे!

शरयू, १०१% अनुमोदन!ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! :)

Chetan DK म्हणाले...

चांगला विषय अणि छान लिखाण पंकज!

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

धन्यवाद चेतन! :)

Tushar Abhyankar म्हणाले...

Aaditya tu phar chaan lihila aahes... tu jo mudda mandala tyala apun "consumerism" mhanto.. 48 inch flat screen tv bazaarat miltat.. tyachi aplyala garaj aahe ka? buy 2 get 1 free sarkhya schemes mhanje garaj 1 vastu chi pun apun ghenar teen.. lokahchya savaee badlun tyana garaje peksha adhik ghayala lavaiche aani svatacha jastach jasta phaida karaicha ha vyapari vichar aahe...

अनामित म्हणाले...

Hello,
Please give some link to translate these pages to other languages so non marathi use can also get your views.

Sumit Khinchi

shubhangee म्हणाले...

आजकाल सगळ्य़ांनाच यातुन जावे लागत आहे, कुठे गेले तरी आपले बकरे करायला ह्या कंपन्या टपलेल्या आहेत, मात्र तुमचे विचार अगदी योग्य आहेत आणि ते तुम्ही मांडलेत पण चांगले!

मी मराठी .... म्हणाले...

चांगला विषय .... लोकांना स्वतः पेक्षा पण जगाला दाखवण्यासाठी तरी कर्ज काढून असे सोहळे करणे आवडते . याची गरज किती हे त्यांचे त्यांनाच ठाऊक....

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

धन्यवाद शुभांगी आणि मी मराठी!

टिप्पणी पोस्ट करा