शुक्रवार, २२ एप्रिल, २०११

मोबाईल आणि गेम्स -भाग २


     नमस्कार मित्रांनो,
आज बघूया गेमिंग कंपन्यांचं काम कसं चालतं ते!
गेमिंग कंपन्यांचं काम बरचसं आपल्या फिल्म इंडस्ट्रीसारखं आहे! कसं ते सांगतो.
चित्रपटाला प्रोड्यूसर असतो, गेमलाही असतो.
चित्रपटाला कथा असते, गेमलाही असते.
तिथे एका चित्रपटासाठी काम करणा-यांचा एक संघ असतो,(टीम असते, यात कलाकार आणि तंत्रज्ञ सगळेच आलेत.), इथेही तसंच असतं.
इतकंच नाही तर जिथे चित्रपट बनतो त्या जागेला स्टुडिओ म्हणतात, तसं इथेही स्टुडिओच म्हणतात, असे बरेचसे साम्यस्थळ आहेत.

        आधी एकजण गेमची संकल्पना घेऊन निर्मात्याकडे जातो. (चित्रपटाच्या बाबतीत कथालेखक जातो तसा!). त्या संकल्पना मांडणा-याला डिझायनर म्हणतात. तो गेम्स डिझाईन करतो. गेमिंग कंपनीत हे एक पूर्णवेळ पद असतं. निर्माता त्यावर विचार करतो आणि जर त्याला संकल्पना आवडली तर तो निर्मितीप्रमुखाला सांगतो.(जसा चित्रपटाचा कार्यकारी निर्माता...गेमची पूर्ण निर्मिती याच्या देख्रेखीखाली होते.) त्यानंतर त्या गेमवर दीर्घकाळ चर्चा होऊन हा गेम निर्माण करायचं की नाही ते ठरतं. या बाबीबर परिणाम करणारे घटक खालीलप्रमाणे आहेत.

१) सद्यपरिस्थितीत उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाने हा गेम बनवता येईल का?
२) जर तसं नसेल, तर नविन तंत्रज्ञान शिकून हा गेम बनवायला किती वेळ लागेल? तोपर्यंतच्या चालन खर्चाचं (ऑपरेशनल कॉस्ट )काय?
३) जर तसं केलंही, तरी हा नवीन बनलेला गेम आपल्याला तितकं उत्पन्न मिळवून देऊ शकतो का, की ज्याने किमान त्याचा निर्मितीखर्च तरी भरुन निघेल?
४) या गेमसाठी लागणारं तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आपल्याकडे उपलब्ध आहे का?
५) जास्तीत जास्त तीन महिन्यात हा गेम तयार होऊ शकतो का?
६) हा गेम बनवण्यासाठी जास्तीत जास्त किती लोकांची टीम बनवावी लागेल?
आणि सगळ्यात महत्त्वाचं,
७) आपण जो गेम बनवणार आहोत त्याला खरंच काही निर्मितीमूल्य आहे का? म्हणजे संकल्पना लोकांना आवडेल ना? तो गेम खेळतांना लोक त्यात गुंगून जातील ना? आणि असं बरंच काही...

       आता खरी गेम बनवायला सुरुवात होते. आधी या गेममध्ये कायकाय असणार आहे त्याचा तक्ता आणि प्रवाह आकृती बनवली जाते. ती टीममधल्या सर्वांना पाठवली जाते. सर्वांच्या शंका आणि सुचनांवर साधकबाधक चर्चा होते आणि या सगळ्या निकषांवर ती संकल्पना खरी उतरली तर गेम बनवणारे (डेव्हलपर्स) गेम बनवायला सुरुवात करतात.

        आधी फोनच्या कुठल्या चालनप्रणालीसाठी हा गेम बनणार आहे ते ठरतं. त्यानंतर एक आधारभूत फोन घेऊन त्यावर काम सुरु केलं जात. (बेसिक फोन). काही काही कंपन्यांमधे गेम्सचा सर्वसमावेशक आराखडा तयार असतो. (त्याला गेम इंजिन म्हणतात). त्याला हवं ते इनपुट दिलं की ते इंजिन ब-याचशा गोष्टी आपणहून करतं. तसं नसेल तर कामाच्या प्रत्येक भागाकारता (मॉडेल) नवीन कोड लिहावा लागतो. पण तो लिहितांना हे भान ठेवावं लागतं की हा कोड आपल्याला थोडासा बदल करुन दुस-या गेम्ससाठीही वापरता यायला हवा (पुनर्वापर संकल्पना (कोड रियुजॅबिलिटी)) आणि त्याने कमीत कमी जागा वापरावी (ऑप्टिमाईज्ड). कारण मोबाईलची मेमरी खूप कमी असते.

        गेम बनवातांना तुम्ही जी चित्रे बघतात ती खरंतर तुम्हाला खिळवून ठेवत असतात. त्यानंतर त्या गेममध्ये असलेले स्पेशल इफेक्ट्स तुम्हाला अचंबित करतात. हे सगळं काम कंपनीतले चित्रकार करत असतात. त्यांना आपण ग्राफिक डिझायनर म्हणतो. गेममधली पात्रे एकदा निश्चित झाली की हे डिझायनर्स ती पात्रे बनवायला सुरुवात करतात. सर्वसाधारणपणे ही पात्रे "फोटोशॉप" मधे बनवली जातात. ही सर्व चित्रे एका पट्टीवर ठेवून डेव्हलपर्सला दाखवली जातात आणि त्याला हाच परिणाम गेममधेही दाखवायला डेव्हलपरला सांगितलं जातं. उदाहरणाने स्पष्ट करतो.    वरील चित्रात तुम्ही एका स्फोटाची पट्टी बघत आहात. यात एकाच स्फोटाच्या वेगवेगळ्या स्थिती दाखवल्या आहेत. गेमिंगमधे हाच स्फोट दाखवतांना प्रत्येक स्थिती एकदा दाखवली जाते. ती किती वेगात दाखवायची हे ग्राफिक डिझायनर सांगतो. त्यामुळे त्याला हवा तो अ‍ॅनिमेशन इफेक्ट मिळू शकतो. साधारणपणे याच पद्धतीने अ‍ॅनिमेशन केलं जातं. जेव्हा गेम्समधील पात्रे बनत असतात (गेमिंगच्या भाषेत त्यांना "स्प्राईट" म्हणतात) तेव्हा ती बनेपर्यंत डेव्हलपर्स आपल्यापुरती डमी पात्रे बनवून काम सुरु करतात. ही पात्रे अगदी ठोकळ्यापासून काहीही असू शकतात. गेमच्या मुख्य भागाला, जो तुम्ही खेळता त्याला इनगेम लॉजिक म्हणतात. त्यावर एकच जण काम करतो. दुसरा एखादा त्याचवेळी गेमच्या मेनूवर काम करत असतो. तिसरा कुणीतरी गेममधे झालेला स्कोअर साठवून ठेवण्याच्या पद्धतीवर काम करत असतो. एखाद्या गेममधे जर स्कोअर आंतरजालावरच्या एखाद्या संस्थळावर पाठवायचा असेल तर त्यावर काम करतो. प्रत्येकाचा कामाचा एक एक भाग संपला की तो भाग गुणवत्ता तपासणी विभागाकडे (क्वालिटी अ‍ॅशुरन्स टीम) जातो. त्या विभागाने सर्वकाही अपेक्षेप्रमाणे असल्याचं कळवलं की मगच पुढचा भाग तयार करतात. हे सगळं सुरु असतांना प्रोड्युसर या सर्व प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून असतो. कुठे कुणाला काही समस्या आल्यास ती सोडवण्याची तो व्यवस्था करतो. माहिती गुणवत्ता विभागाचं काम यात अतिशय महत्त्वाचं असतं. गेम तपासत असतांना जर त्यांनाच तो आवडला नाही तर ग्राहकांना आवडेल का, हा विचार पूर्ण टीमला कायम मनात ठेवून काम करावं लागतं. गुणवत्ता विभाग अगदी डोळ्यात तेल घालून एक एक भाग तपासतो. वरवर बघणा-याला वाटतं की काय मजा आहे यांची, एकतर गेम्स खेळायचे, वरुन त्याबद्दल पैसे पण मिळणार! पण खरं असं आहे की त्यात "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!"
       अशा पद्धतीने एकदाचा एक गेम तयार झाला की त्याचं पोर्टिंग केलं जातं. पोर्टिंग म्हणजे काय हे मी मागच्या भागांमधेच स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर तो गेम विकण्यासाठी पाठवला जातो. गेम तयार होत असतांना निर्माता आणि विपणन अधिकारी एकत्र येऊन तो विकण्याची व्यवस्था करत असतात. त्यामुळे वेळोवेळी ते गेम्सची आतील चित्रे (इनगेम इमेजेस) मागून घेऊन गेम्स खरेदी करणा-या कंपन्यांना पाठवत असतात. त्याचा लूक जर आवडला तर खरेदीदार गेम विकत घेण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ब-याचदा गेम तितकासा तयार नसेल तर ग्राफिक डिझायनरच त्या इमेजेस बनवून देतात. नंतर गेम त्या चित्रातल्या स्थितीला पोचतो. अर्थात हे करणं यात फसवणूकीचा प्रकार नसून आली वेळ साजरी करणं असतं.

       बाजारात तुमच्या कंपनीचं नाव होईपर्यंतचा काळ कंपनीसाठी आणि अर्थातच सर्व कर्मचा-यांसाठी कसोटीचाच असतो. मात्र एकदा तुमचा एखादा गेम लोकांना खूप आवडला तर लोक तुमच्या कंपनीच्या पुढच्या गेमची आतुरतेने वाट बघत असतात. परत एकदा चित्रपट आणि गेमिंगमधलं साम्य सांगतो. तुम्हाला आत्ता आलेला एखादा चित्रपट आवडला तर तुम्ही तोच तो चित्रपट वर्षानुवर्ष बघत बसत नाही. गेम्सचं पण तसंच आहे. एखादा गेम खूपदा खेळल्यानंतर लोकांचा त्यातला रस कमी होतो. त्यांना पुन्हा काहीतरी नवीन हवं असतं, ते जर तुम्ही देऊ शकलात तर ठीक आहे अन्यथा तुमचा व्यवसायच बंद पडायची भीती असते. जसं एखाद्या दिग्दर्शकाचा एखादा चित्रपट लोकांना खूप आवडतो. लोक त्याला रातोरात स्टार बनवून टाकतात, त्याच्या पुढच्या चित्रपटाची आवर्जून वाट बघितली जाते आणि पुढच्या चित्रपटात जर तो लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करायला कमी पडला तर लोक त्याची पद्धतशीरपणे "वाट" लावतात. गेम्सचंही तसंच! थोडक्यात गेम्सचं आयुष्य मर्यादित असतं.
जेव्हा गेम्ससाठी जेटूएमई ही भाषा जास्त वापरात होती तेव्हा गेम्सची पायरसी ही एक मोठीच डोकेदुखी होती. जेटूएमई भाषेत बनवलेल्या गेम्सची पायरसी अतिशय सोपी होती, आहे. लोक एकदा विकत घेतलेला गेम दुस-या कुणालाही फॉरवर्ड करत असत,अजूनही करतात, त्यामुळे गेमिंग कंपन्यांचा महसूल बुडतो. प्रत्येक कंपनी आपल्या स्वत:च्या संस्थळावर हे गेम्स आपल्या मोबाईलमधे उतरवून घेण्यासाठी दुवा (लिंक) द्यायची आणि त्याबद्दल पैसे आकारायची. कुणी असा गेम उतरवून घेतला तरच कंपनीला पैसे मिळायचे. पण ज्याने तो गेम उतरवून घेतलेला आहे तो तो गेम इतर दहा जणांनाही वाटू शकत होता. गेम्सच्या वितरणासाठी कुठलीही केंद्रीत पद्धत नव्हती. आताच्या पद्धतींबद्दल सविस्तर लिहीनच.

      आपला चित्रपट धो धो चालतोय, असं बघितल्यावर त्यात काम करणा-या कलाकारांना, तंत्रज्ञांना जो अवर्णनीय आनंद होतो, तोच आनंद गेमिंग कंपनीतल्या कर्मचा-यांनाही त्यांचा गेम बाजारात चालल्यावर होत असतो.

     हे सर्व झालं आपला गेम आपणच बनवून विकणा-या कंपन्यांच्या कार्यपद्धतीबद्दल! काही कंपन्या गेम्स बनवून द्यायची ऑर्डर स्वीकारतात आणि ग्राहकाला जसा हवा तसा गेम बनवून देतात. त्यांना ’हा गेम बाजारात चालेल का?’ याचा विचार करण्याची गरज नसते. त्यांना डिझाईनही करावं लागत नाही. हे काम सोडलं तर बाकी पद्धत सारखीच असते.

साधारणपणे या प्रकारे मोबाईल गेमिंग कंपन्यांचं काम चालत असतं.
        उर्वरीत भागांवर नंतर स्वतंत्र पोस्ट टाकेनच. अचानक आलेल्या कार्यबाहुल्यामुळे ही पोस्ट टाकण्यात खूपच दिरंगाई झाली, त्याबद्दल क्षमस्व!
आपल्या सूचना आणि प्रश्नांचं स्वागतच आहे!

(सर्व चित्रे आंतरजालवरुन साभार)

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा