सोमवार, २० डिसेंबर, २०१०

सप्त्या...


आमच्या गावाकडे ’सप्त्या’ हा एक खरंच छान कार्यक्रम असतो. ’सप्त्या’ म्हणजे ’भागवत सप्ताह’! त्याचा "सप्त्या" नेमका कधी झाला हे आमच्या आधीच्या तीन पिढ्यांनाही सांगता येणार नाही. पण झाला तो अपभ्रंश!

सर्वसाधारणपणे बरेच दिवसापासून गावात काही कार्यक्रम झालेला नसला,म्हणजे कुणाचं लग्न वगैरे, तेव्हा कुणाच्या तरी डोक्यातून सप्त्या बसवायची भन्नाट कल्पना निघते. किंवा ब-याचदा चातुर्मासात सप्त्या बसवला जातो. सप्त्या बसवायचा हेतू नि:संशय चांगला असतो की निदान त्यनिमित्ताने का होईना, पण देवाचं नामस्मरण व्हावं, चार चांगले शब्द कानावर पडावेत.. पण होतं काय, की सप्त्या शेवटी टिंगलीचा विषय ठरतो. आमच्या भागातले बहुतेक लोक वारकरी आहेत. दरवर्षी न चुकता वारीला जातात. कितीतरी ओव्या, अभंग त्यांना तोंडपाठ आहेत. त्यांचा सप्त्या बसवण्यात पुढाकार असतो.

सप्त्याची सुरुवात एकदम मजेदार असते. आधी सप्त्याबद्दल ठिकठिकाणी पोस्टर्स लागतात. त्यावर कोणता ’ब्वा’ बोलणार आहे त्यांचा मोठ्ठा फोटो असतो. खाली आयोजकांची नावं असतात. वेळ आणि पूर्ण कार्यक्रमपत्रिका दिलेली असते. ’ब्वा’ ही फार महत्वाची गोष्ट असते सप्त्यामधे! साधारणपणे आपण त्यांना महाराज वगैरे म्हणतो, पण आमच्याकडे सरळसरळ ’ब्वा’ म्हणतात! बरं ’ते ब्वा’ असं पण नाही, ’तो ब्वा’!

"कुढला व्बा हाय बे?"
"किशोर महाराज उचंदेकर!"
"आय ह्याय! येले कुढून पकडी आनला... तेले तं काहीबी बोलता नी येत! त्या तढी काय्बी बोली राहालता!"
"जाऊदेनं बे, लोकायले चाली राहाला ना, नं आपल्याले बी इतलंच परोडी राहालं. बाकीच्या ब्वाचे पैशे परोडतीन का आपल्याले?"
"हा भो ते बी बरोबरे!"
असले अगदी जनरल संवाद आहेत ’ब्वा’ च्या निवडीवर!
पहिल्या दिवशी मंडपात अगदी कुणीच नसतं. उगाच ब्वाला एकटं वाटू नाही म्हणून काही दोन-चार डोकी असतात तेव्हढीच! बाकीच्यांचं मत म्हणजे "जाऊनं बे, बारे पूरा हप्ता पडेले!".
मग दुस-या दिवसापासून ज्या ज्या घरात म्हातारी माणसं आहेत, त्यांना आंजारुन-गोंजारुन, समजवून, प्रसंगी त्यांच्या अंगावर खेकसून त्यांना ’सप्त्या’ला पाठवलं जातं. "आढी बशीसन काय करी राहाले, तढी जा सप्त्यात! तो ब्वा काय सांगी राहाला जरा ऐका! तितलंच देवाचं नाव घेनं व्हतं! आढी घरी बशीसन निस्ते डोकं खाता!" अशा ’प्रेमळ’ संवादांनी घरातल्या म्हाता-यांना मंडपात पाठवलं जातं. हजारात एखादा तरुण मंडपात दिसतो. बरेच जण तर शेवटच्या दिवसापर्यंत मंडपात फिरकत नाहीत.

’सप्त्या’ सेशन्समधे चालतो. सकाळी आधी भागवतग्रंथाची आरती होते. मग ’ब्वा’ निरुपणाला बसतात. भागवतातला एक श्लोक घेऊन ते त्याचा अर्थ सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत उलगडून सांगतात... ते बोलतांना कधीच हाय बाऊंसर शब्दांचा वापर करत नाहीत. लोकांमधले एक होऊन, त्यांना त्यांच्या भाषेत ते अर्थ सांगतात. करता करता जेवणाची वेळ होते. जेवण करुन आल्यावर परत संध्याकाळपर्यंत निरुपण चालतं. असं करत करत ’ब्वा’ बरोबर आठवडाभरात सगळा भागवत सांगून संपवतात.(शाळेचा पोर्शन पण इतक्या लवकर पूर्ण होत नाही! भागवत कसा काय संपतो तो देव जाणे!)

भागवत ऐकायला आलेल्या म्हाता-या बायका हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. कथेकडे त्यांचं लक्ष फक्त १ टक्का असतं. बाकी सर्व वेळ याच्यात्याच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यात जातो. "तुले काय सांगू माय, मह्यी वाहारी अशी करी राहाली"! "आय ह्याय वं माय! मह्या ल्योक बी तिचंच आयकतो!" "ते अमुक अमुकचा डोया काहाडला तिले पाह्याले जानंय बारे!" असे संवाद! ’ब्वां’ना मग त्यांना परत परत ओढून कथेकडे परत आणावं लागतं. "बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल!" असा जोरात जयघोष करून ’ब्वा’ त्यांना परत कथेत आणतात. पाच मिनिट झाले, की परत यांचं सुरुच!
भागवताबद्दल आणि सांगणा-या ’ब्वा’ बद्दल नितांत आदर हे या बायकांचं वैशिष्ट्य! रोज कथेला येतांना त्या वाटीभर का होईना, पण शिधा घेऊनच येतात. आरती झाली, की भागवताला शिधा वाहिला जातो आणि भक्तिभावाने ’ब्वा’ च्या पायावर डोकं टेकवलं जातं. खरंच सांगतो, इतका आदर आणि इतका सन्मान मी अजून कुणालाच मिळालेला बघितला नाहीये!

करता करता भागवताचा शेवटचा दिवस जवळ येतो. आधीच वर्गणीप्रमाणे कुणी तूरडाळ दिलेली असते तर कुणी तूप, कुणी गहू देतं, कुणी भाजी स्पॉन्सर करतं. ज्या दिवशी भागवताचं पारणं असेल, त्याच्या आदल्या दिवशी गल्लीतल्या चक्कीवाल्याकडे गहू नेऊन दिला जातो. तो रात्रभरात तो दळून ठेवतो. सकाळी खेड्यावरुन भरताच्या वांग्यांचे पोते, मिरचीचं आणि आल्याचं पोतं,कांद्याची पात आणि केळीच्या पानांचे गठ्ठे येतात. सकाळी दळून आणलेला गहू , म्हणजे कणीक लोटगाडीवर लादून आपल्या विभागातला प्रत्येक घरात अडीच-तीन किलो कणीक पोचवली जाते. सकाळी ११ वाजायच्या आत घराघरातल्या बायका त्याच्या पोळ्या लाटून ठरलेल्या ठिकाणी, म्हणजे सप्ताहाच्या मंडपाजवळ कुणाच्यातरी घरात पोचवून देतात. काही लोक कणीक वाटायला गेलेले असतात तोपर्यंत १०-१२ लोक वांगे चिरायला बसतात. १०-१२ पोते वांगे चिरून त्याची "घोटेल भाजी" (घोटलेली भाजी) बनवली जाते. तिच्यात आलं, लसूण टाकलं जातं. भाजी इतकी घोटलेली असते की तिच्यात वांग्याची एक फोडही शिल्लक राहत नाही. पूर्वी लोक कमी होते तेव्हा मोठ्या रवीने हातानी भाजी घोटली जायची, पण आता जी रस्ता फोडायची ड्रील असते (जेसीबी ड्रील) तिच्या टोकाला मोठी रवी बांधून त्याने भाजी घोटतात. तोवर दुसरीकडे चुलीवर (खरंतर रहाडीवर, रहाड म्हणजे जमिनीवर एक चर खोदून त्यात लाकडे टाकतात व त्यावर विटा ठेवून त्याचा उपयोग चुलीसारखा करतात.) वरण शिजत असतं. जेवणाचा मेनू एकदम साधा म्हणजे, वरण-पोळी आणि ही वांग्याची घोटलेली भाजी असा असतो. क्वचित शिरापण केला जातो.भागवताच्या शेवटच्या आरतीला मात्र सगळेजण उपस्थित असतात. आरती झाली रे झाली, की लगेच सगळे जेवायला बसतात. हे जेवण जेवण्याची पण एक विशेष पद्धत आहे. केळीच्या पानावर पोळी बारीक कुस्करुन तिचं आळं केलं जातं त्यात वरुन वरण ओततात, वरण एकदम पातळ असतं.घट्ट वरण केलं तर ते नीट मिक्स होऊ शकत नाही.म्हणून वरण पातळच करतात. त्यावर भरपूर तूप ओततात. आणि ते मधलं मधलं कालवून खाल्लं जातं. जेवण पूर्ण होईपर्यंत आळं मोडलं जात नाही. आळयाच्या बाजूबाजूचं आत घेत जाऊन जेवण केलं जातं. या जेवणाला आमच्याकडे मजेने "कॉंक्रिट जेवण" पण म्हणतात. कारण जेवण झाल्यावर ते पोटात कॉंक्रिटसारखं घट्ट बसतं.इथल्या जेवणाला जी चव असते ती मी छातीठोकपणे सांगू शकतो जी जगातल्या कुठल्याही जेवणाला नसेल! काय त्या भाजीची अप्रतिम चव! कायम जिभेवर रेंगाळत असते! दुपारी बारा वाजेपासून सुरु झालेल्या पंगती चार-पाच वाजेपर्यंत सुरु असतात.लोकवस्तीप्रमाणे सरासरी चार-पाच हजार लोक भागवताचं दर्शन घेऊन आणि जेवून जातात.नव्वद टक्के लोक भागवताला आणि ’व्बा’ ला नमस्कार केल्याखेरीज जात नाहीत. हळूहळू उन्हं कलायला लागतात. ’ब्वां’ची निघण्याची लगबग सुरु होते. बिदागी घेऊन आणि सगळ्यांचा निरोप घेऊन ’व्बा’ निघून जातात. हळूहळू लोकही कमी व्हायला लागतात. वाढून वाढून दमलेले हात मग जेवायला बसतात. त्यांची पंगत संपते तोवर बाकीचे भांड्याकुंड्यांची आवराआवर करण्यात मग्न होतात. सगळयांची जेवणं झाली की दोन-चार जण तुरखाट्यांचा (तुरीच्या झाडाच्या काड्या) खराटा बनवतात, आणि परिसर झाडायाला सुरुवात करतात. पाणी मारुन जेवण झालेली जागा लख्ख केली जाते. पुढच्या ’सप्त्या’ची वाट पाहत एक मोठ्ठा अध्याय संपतो.

काही शब्दांचं स्पष्टीकरण:
आढी : इथे
तढी: तिथे
वाहारी : सून
डोया काहाडला : डोळ्याचं ऑपरेशन झालं.

सोमवार, २७ सप्टेंबर, २०१०

पॅच अप

(कथालेखनाचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे.
या कथेतील पात्रांचा कुठल्यातरी जिवंत अथवा मृत व्यक्तींशी संबंध आहे. तो योगायोग समजू नये!
)


      पहाट अंगावर घेतच आनंद बसमधून उतरला. पौषातली प्रचंड थंडी पडलेली होती. त्याने घड्याळात पाहिलं तर अजून पाचच वाजत होते. आता घरी जायला रिक्षा केली तर रिक्षात अजून थंडी वाजेल हा विचार करुन तो पायीच घराकडे जायला निघाला.
      आनंद निशाणदार, एक संगणक अभियंता. पुण्यातल्या एका संगणक प्रणाली बनवणा-या कंपनीत काम करत होता. आता त्याला नोकरीला लागून जवळपास तीन वर्षं होऊन गेले होते. जबाबदारी म्हटली तर तशी काहीच नव्हती. तेव्हा आई-बाबांनी विचार केला की करून टाकूया याचे आता दोनाचे चार! सगळ्या गोष्टी वेळेत झालेल्या ब-या! आनंदपण तसा नाकासमोर चालणारा मुलगा. कॉर्पोरेट क्षेत्रात असला तरी प्रेम वगैरे गोष्टींपासून चार हात लांबच होता.खरं तर आत्ताच्या मुली खूप स्वार्थी आहेत असा त्याचा मित्रांची प्रेमप्रकरणं पाहून ग्रह झाला होता. त्यामुळे त्या वाटेला न गेलेलंच बरं ,असा त्याने स्वत:पुरता एक नियम बनवून टाकला होता. त्यामुळे आईबाबा म्हणतील ती मुलगी बघायला तो तयार झाला होता.

           आई-बाबांनी त्याचं नाव गावातल्या वधूवर सूचक मंडळात नोंदलं होतं. ते नावनोंदणी करायला गेलेले असतानांच तिथे आलेल्या दोन बायकांनी त्याचे पत्रिका आईबाबांकडून मागून नेली होती. त्यांचाच फोन आला होता की पत्रिका उत्तम जुळते आहे, दाखवण्याचा कार्यक्रम कधी करायचा? त्यासाठीच आज आईबाबांनी त्याला बोलवून घेतलं होतं.
घरी पोचला तेव्हा आई बाबा चहाच घेत होते.
      "आलास! चल तोंड धू मी चहा ठेवते.आणि हा काय अवतार केलायेस? पुण्यात न्हाव्यांची दुकानं नाहीयेत का? आधी कटींग करून ये. दाढी किती वाढलीये! तुला दाढी करायला पण वेळ मिळत नाही का? अरे जरा व्यवस्थित रहावं, उद्या लग्न झालं म्हणजे असा चांगला वाटशील का? काय म्हणतील तुझ्या सासरचे लोक? ती मुलगी काय म्हणेल?" -आई.
"आई, अगं आधी चहा तर पिऊ दे, बाकी सगळं नंतर!"
चहा पिऊन तो न्हाव्याकडे जाऊन आला. आणि आंघोळ करून जे झोपला ते जेवायलाच उठला.
जेवण झाल्यावर आईने त्याला मुलीचा फोटो दाखवला. फोटोवरुन तर मुलगी ठीकठाक वाटतेय, बघूया उद्याचं उद्या! असा विचार करून तो परत झोपला.
संध्याकाळी चहा घेऊन तो मित्राकडे गेला.
"काय साहेब असे अचानक गावी? काही खास कारण? काय मुलगी वगैरे बघायला आलायेस की काय?"
"हो ना यार! उद्या आहे कार्यक्रम!"
अच्छा, कुठली आहे मुलगी?"
"इथलीच आहे, आपल्या गावातलीच!"
"कुठे राहते?"
आनंदने पत्ता सांगताच मित्र,संतोष म्हणाला, "अरे यार मी हिला ओळखत असलो पाहिजे. हिच्या घराजवळ माझी ताई राहते. ताईकडे शिवणकामाच्या क्लासला येणा-या मुलींपैकी एकीचं नावपण हेच आहे!"
आनंद लगेच म्हणाला,"चल आधी माझ्या घरी!".
दोघंही आनंदच्या घरी आले. आनंदने संतोषला तिचा फोटो दाखवला. संतोष जवळजवळ ओरडलाच,"अरे हीच ती मुलगी! एकदम शंभर नंबरी सोनं! आता हा चान्स कुठल्याही परिस्थितीत गमावू नकोस! आणि आत्ता लगेच चल माझ्याबरोबर!"
"कुठे?"
"मूर्खासारखे प्रश्न काय विचरतोयेस? ताईकडे!"
लगेच दोघेजण ताईकडे पोचले. संतोषने ताईला सांगितल्यावर ताई म्हणाली,"अरे आनंद संतोष अगदी बरोबर सांगतोय! अगदी लाखात एक मुलगी आहे." चला. म्हणजे एक बाजू तर क्लिअर झाली. बघूयात!
दुस-या दिवशी आनंदराजे उठले ते मुळी डोक्यात विचारांचं वादळ घेऊनच! आईबाबांनी त्याला ताबडतोब तयार व्ह्ययला सांगितलं. ते लोक दहा वाजेपर्यंत येणारच होते. बाबांनी आज खास या कार्यक्रमासाठी आबाकाकांना, म्हणजे त्यांच्या मोठ्या भावाला बोलवून घेतलं होतं. ते नऊ वाजता आले. आता आनंदराजे चकाचक तयार होऊन तिच्या येण्याची वाट बघत होते.
सव्वादहा वाजला मुलीच्या मामांचा फोन आला की आम्ही तुमच्या घराच्या जवळपासच आहोत, पण नेमकं घर सापडत नाहीये. मग बाबा त्यांना घ्यायला गेले. इकडे आनंदरावांचा श्वास पार समेवर येऊन पोचला होता.

      .......आणि सभेत महाराणींचा प्रवेश झाला. तिने आंबा कलरची साडी नेसलेली होती. चेहे-यावर टिपिकल स्त्रीसुलभ लज्जा. मान खाली.आनंदराव तर "वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली" अशा अवस्थेत होते. ती दारात असतांना आनंदने एकदा डोळ्याच्या कोप-यारून तिच्याकडे चोरुन बघून घेतलं. "आईशप्पथ! साला मी तर हिच्यापुढे काहीच नाहीये! काय बोलू राव! वाचाच बसलीये".आनंदरावांची मनातल्या मनात बडबड चालली होती. "यार, टिपिकल बायको मटेरिअल! आपण तर साला फर्स्ट बॉलमधे बोल्ड!". तिच्याबरोबर तिचे मामा , आई आणि लहान भाऊ आले होते. वडिलांचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे ते बेडवरून उठू शकत नव्हते. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. महाराणी खुर्चीत बसल्या तर ते पण आनंदच्या काटकोनात! म्हणजे आनंदला तिच्याकडे बघायचं असेल तर ते पण मान वळवूनच बघावं लागत होतं. आई तिच्या आईला आणि तिला घेऊन किचनमध्ये गेली. आता आनंद जरासा रिलॅक्स झाला. मग मुलीच्या मामांनी आनंदला काही प्रश्न विचारले. नोकरी कुठे, नक्की काय काम करतात वगैरे वगैरे! आनंदने नेहेमीच्या या रुक्ष प्रश्नांची तितकीच रुक्ष उत्तरं दिली. तेव्हड्यात आई तिला किचनमधून बाहेर घेऊन आली. हातात पोह्यांचा ट्रे! तिने सगळ्यांना डिशेश दिल्या आणि शेवटची डिश घेऊन ती आनंदजवळ आली. आनंदने जसं आपल्याला ह्या व्यक्तीशी काही कर्तव्यच नाहीये अशी तिच्या हातातून डिश घेतली. एकदम थंडपणे. जराशी मजा! ती तिच्या खुर्चीत जाऊन बसले तसं आनंदने तिच्याकडे एकदम मिश्किल नजरेने पाहीलं. तिने एकदम कृतककोपाने आनंदकडे बघितलं. आनंदराव एकदम अबाऊट टर्न!
मग आबाकाका म्हणाले,"तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला!"

     .............आणि याच आणि याच प्रश्नाची आनंद वाट बघत होता. त्यानं अपेक्षेने तिच्याकडे पाहिलं, तिनं अपेक्षेने तिच्या मामांकडे पाहिलं. मामांनी तिला आनंदने परवानगी दिली. दोघं किचनमधे गेले. आनंद आणि ती, दोघंही किती प्रचंड दडपणाखाली आहेत हे कुणीही न सांगता कळत होतं.
"रिलॅक्स! बी रिलॅक्स! हा काही इंटरव्ह्यू नाहीये! मुळीच दडपण घेऊ नका! तसं मी पण घेत नाहीये". आनंद तिला सांगत होता की स्वत:ची समजूत घालत होता कुणास ठावूक? "तुम्हाला वाचन आवडतं का?"
"हो."
"काय काय वाचलं आहे आतापर्यंत?" (च्यायला हा काय पुस्तकी किडा आहे की काय? -ती मनातल्या मनात )
"अभ्यासाची" (-बोंबला!)
"तुम्ही एम.ए.सायकॉलॉजी ना? मग त्यातले कुठले लेखक वेल-नोन आहेत?" (इथे माहितेये कुणाला? आणि याला काय करायचंय? आपापली कॉम्प्युटरची पुस्तकं वाच म्हणावं! की याला ते पण माहिती नाहीत.)
"डॉ. सो ऍण्ड सो,सो ऍण्ड सो,सो ऍण्ड सो," (आयला आपल्याला खरंच माहित नाहियेत हे हिला समजलं की काय?)
"डॉ. फिजॉफ काफ्फा, डॉ. दीपक चोप्रा!" (अरे, याला तर खरंच माहितीये!)
"ते पी.एच.डी साठी आहेत." (असेनाका!आपल्याला काय करायचंय?)
"ओके ओके"!(चला संपला इंटरव्ह्यू!)
"तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा!" (काय विचारू याला कप्पाळ!)
"तुमची पोस्ट काय आहे हो?" (काय सांगावं?)
"मी आमच्या कंपनीत सर्व्हर साईड डेव्हलपमेंट आणि युजर इंटरफेस डेव्हलपमेंटचं काम बघतो!"(मारला की नाही सिक्स!)
"अच्छा अच्छा!" (काय बोलला राम जाणे!)
आनंद पुण्यात परत आला. दोन-तीन दिवसांनी त्याच्या मित्राचा, रघूचा त्याला फोन आला. रघू त्याचा शाळेपासूनचा मित्र होता. सध्या तो मुंबईला नोकरी करत होता. मधून मधून दोघांचे एकमेकांना फोन होत असत.
"काय रे काय चाललंय सध्या?" -रघू.
"काही नाही यार! रुटिन लाईफ!"
"काय मुलगी वगैरे बघितलीस की नाही?"
"अरे आत्ताच बघून आलो, आपल्या गावातलीच आहे!".
आनंदला पुढे बोलू न देता रघूने त्याला काय काय घडलं ते सगळं सांगितलं! इकडे आनंद भुईसपाट!
"तुला कसं कळलं?"
"अरे साल्या ती माझी आतेबहिण आहे!"
"आयला रघ्या! सहीच ना!"
"अरे काय तू नुसता पुस्तकी किडा आहे असं तिला वाटतंय!"
"अरे यार एकतर मी प्रचंड टेन्शनखाली होतो. काय काय विचारलं देव जाणे!"
"जाऊ दे! मी बोलेन आत्याशी!"
त्यानंतर जवळजवळ एक आठवडा उलटला. त्यांचा फोन आलाच नाही. शेवटी मग आनंदच्या बाबांनीच त्यांना फोन केला.
"अहो आम्ही करणारच होतो फोन! अजून मुलीच्या काकांशी बोलणं झालेलं नाही. त्यांचाशी चर्चा करून तुम्हाला कळवतो."
"ठीक आहे" -बाबा.
त्यानंतर एका आठवड्यानंतर त्यांचा फोन आला. "आपले योग नाहीत!"
"धन्यवाद!" -बाबा.
बाबांनी आनंदला फोनवर हे सांगून टाकलं. त्यांना वाटलं आनंद हे मनाला लावून घेईल, म्हणून त्यांनी त्याची समजूतपण काढली.
"जाऊ द्या ना बाबा... त्यात काय विचार करायचा?" म्हणून आनंदने तो विषयच बंद करुन टाकला. त्याने रघूला याबद्दल विचारलं, रघूला पण हे सगळं चमत्कारिकच वाटलं. त्याने आत्याचा बरेच दिवस पिच्छा पुरवला, पण शेवटी आनंदच्या सांगण्यावरुनच तो गप्प बसला.


त्यानंतर सहा महिने उलटले. आनंदने त्या काळात बरीच स्थळं पाहिली. कुणी आनंदला रिजेक्ट केलं तर आनंदने कुणाला! आनंदच्या एक पुस्तकात मात्र तिची जन्मपत्रिका जपून ठेवलेली होती. प्रत्येक वेळेस पुस्तक उघडलं की ती पत्रिका बाहेर पडायची. आनंदला माहीती होतं की या पत्रिकेचा आता काहीच उपयोग नाहीये. पण ती फेकून द्यायची पण त्याच्या जीवावर यायचं. तो परत परत ते पत्रिका बघत बसायचा!काय झालं असावं, असा विचार परत परत त्याच्या मनात यायचा, तो परत परत तो विचार दूर ढकलायचा.
नंतर एकदा रघूने त्याला फोन केला.
"अरे आन्द्या माझं लग्न ठरलंय!"
"सहीच!"
मग दोन्ही बाजूंनी माहितीची देवाणघेवाण झाल्यावर रघूने आनंदला विचारलं,"तू कधी करतोयेस साल्या लग्न?"
"अबे काय जखमेवर मीठ चोळतो! तुझ्या बहिणीने नाही सांगितलं ना राव!"
"अरे यार अजून तिचं पण लग्न जमलेलं नाहीये!"
"मग मी काय करू?"
"अरे चिडतोस काय?"
"मग काय करू?"
"जाऊ दे! तुला काय वाटतं?"
"मला वाटून काय उपयोग?"
"मी तुला दहा मिनिटांनी फोन करतो" -रघू.
"ओक्के."
दहा मिनिटांनी रघूचा फोन आला तेव्हा त्याचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता.
"अबे आंद्या, मी आता डायरेक्ट तिला फोन लावला होता."
"काय सांगतोस? काय म्हणाली ती?"
"अबे ती म्हणे मी नाही म्हटलंच नव्हतं! घरचे नाही म्हणाले तर मी काय करू?"
"आयला रघ्या, हे नवीनच!"
"आन्द्या मी तुझी गॅरेंटी घेऊ का? बेटा जर का फेल गेला तर लक्षात ठेव. माझ्याहून वाईट कोणी नाही मग!"
"बिन्धास्त घे रे! ही घे दिली तुला गॅरेंटी!"
आनंदचा आवाज आता खूप खुलला होता.
"आन्द्या, आता सगळं माझ्याकडे लागलं!"
"पण रघ्या, अरे एक प्रॉब्लेम आहे."
"आत्ता काय झालं?"
"अरे यार आता आईबाबा तिच्याकडे परत विचारायला जाणार नाहीत.आणि ते पण परत येणार नाहीत. दोन्ही घरचे इगो आडवे येतील. साला आणि जीव जाईल आमचा!"
"अबे तू थांब, आणि मजा बघ!".
तीन दिवस उलटून गेले तरी रघूचा फोन नाही. इकडे आनंदचा जीव खालीवर! शेवटी एकदाचा रघूचा फोन आला.
"आन्द्या, तुला या रविवारी घरी यायला जमेल का?"
"जमवू! पण तुला तुझं काम जमलं का?"
"तू फक्त सांग, जमेल की नाही!"
"अरे येतो ना!"
"बस तर मग! मला शनिवारी कॉल कर".
"ठीक आहे."
ठरल्याप्रमाणे शनिवारीच आनंद घरी आला. आईबाबांना आश्चर्य वाटलं. हा असा अचानक घरी? त्याने सांगितलं सहज आलो.
शनिवारी संध्याकाळी रघू आनंदच्या घरी आला. आनंद आला आहे हे त्याने त्याला माहितच नव्हतं असं आनंदच्या आईबाबांना भासवलं.
"काका-काकू, उद्या माझ्या पुतण्याचा वाढदिवस आहे. तर तुम्ही दोघं आणि आनंद आमच्या घरी सकाळी जेवायला यायचंय." रघू म्हणाला.
"अरे पण...."
"पण नाही अन बीण नाही. यायचंच! आन्द्या ये रे!" - रघू साळसूदपणे सांगून निघून गेला.
"अहो, काय करायचं?" आई.
"जाऊयात ना!" -बाबा.
"अहो पण तिथे ती मुलगी पण असेल ना!"
"मग असू दे ना! आपण रघूकडे जातोय! त्यानं कुणाला बोलवायचं आणि कुणाला नाही हा त्याचा प्रश्न आहे. आपण काय त्या मुलीला भेटायला थोडीच जातोय!".
"ठीक आहे!"

          रविवारी सकाळी आनंद आणि आईबाबा रघूच्या घरी पोचले. ते बसताहेत न बसताहेत तोच आतल्या खोलीतून ती मुलगी आणि तिचे आईबाबा बाहेर आले. दोन्ही कुटुंब एकमेकांकडे चित्राकडे बघावं तशी बघू लागली. अक्षरश: विचारशक्ती गोठली होती सर्वांची! कुणालाच कळेना आता काय प्रतिक्रिया द्यावी! या अवघड परिस्थितीतून रघूच्या आईने सुटका केली.
अचानक रघूची आई तिथे आली. तिने सगळ्यांना बसायला सांगितलं. आणि म्हणाली,
"तुमचा परिचय तर आहेच. पण तो नात्यात बदलला नाही. तो बदलावा असं मला वाटतं. तुम्ही आनंदला नकार देण्याची काही कारणं असतील, त्यांचं निराकरण करता येईल....कुणाबद्दल काहीही सांगणारे विघ्नसंतोषी लोक या जगात असतातच. त्याचा अर्थ असा नाही की त्यांच्या बोलण्यावर आपण शंभर टक्के विश्वास ठेवावा! सांगणा-याची विश्वासार्हता आपणच तपासून पहायला हवी. या सगळ्यात आनंदला आणि तिला काय वाटत होतं किंवा अजूनही वाटतंय याचा कुणी विचार केला की नाही मला माहीत नाही. पण आपल्या मुलांचं सुख कशात आहे हे त्यांना विचारलेलं बरं असतं. मला नाही वाटत हा निर्णय देतांना तुम्ही तुमच्या मुलीला विश्वासात घेतलं असेल! आणि तुमच्या काही शंका असतील तर हा सूर्य आणि हा जयद्रथ! विचारा काय विचारायचं ते! आनंदने तिला प्रश्न विचारण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता.तेव्हा समोरासमोर बसून या शंकाचं निरसन का नाही केलंत?"
          सगळेजण नुस्ते दिग्मूढ होऊन बसून होते. कुणालाच काहीच सुचत नव्हतं. तेव्हढ्यात रघू बोलला,"मला या दोघांशी बोलायचंय,एकत्र आणि आम्ही तिघंच असू!" दोघांच्याही आईवडिलांनी एकमेकांकडे पाहिलं आणि.............. परवानगी दिली.
रघू, आनंद आणि ती जवळजवळ तासभर एका बंद खोलीत चर्चा करत होते आणि बाकी सगळ्यांचं लक्ष ऑपरेशन थिएटरबाहेर वाट बघणा-या नातेवाईकांसारखं बंद दारावर लागलं होतं. तासाभराने तिघं बाहेर आले तेव्हा आनंद आणि तिचे हातात हात गुंफलेले होते. आता............. दोघांच्याही आईवडिलांनी जल्लोष केला. आत त्यांचा आणि बाहेर आईवडिलांचा पॅच अप झाला होता.




सोमवार, २० सप्टेंबर, २०१०

पुस्तकं



या विकांताला जरा निवांत होतो. म्हणजे ऑफिसमध्ये काही काम नव्हतं.(नाहीतर दर शनिवारी-रविवारी अस्मादिक ऑफिसमधे!). म्हटलं चला जरा आपल्या ब्लॉगबाळाकडे लक्ष देऊयात. खरंच माझं त्याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होतंय. (असं माझ्या मुलांच्या बाबतीत मी भविष्यात केलं नाही म्हणजे मिळवली! नाहीतर आहेच, दमलेल्या बाबाची कहाणी!) मग जरा ब्लॉगच्या सजावटीकडे बघितलं. बरेच दिवस एखादं घर बंद असावं, आणि जर आपण त्या घरात आलो, तर त्या घराची जी अवस्था दिसते तसा माझा ब्लॉग दिसत होता. बरेच दिवस धूळ झटकायलाही वेळ मिळला नव्हता. मग काय, आंतरजालावर आधी आवडीची पुस्तकं शोधली. मला रसिक.कॉम ची साईट मिळाली. मग सुटलो सुसाट! एक एक करुन वाचलेली पुस्तकं आठवायला लागलो. जस आठवलं, तशी त्यासाठीची लिंक शोधली. ब-याच पुस्तकांची माहिती गोळा केली. त्यातली जी खरंच वाचनीय होती ती "मला भावलेली पुस्तकं" या सदरात लिहून टाकली.

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०

पुन्हा मिशी.....

        काल गौरवची ही पोस्ट वाचली. म्हटलं चला आपण पण आपले मिशीचे किस्से शेअर करावेत.
मी फार पूर्वीपासून मिशी ठेवतो. अकरावी-बारावीत असतांना माझ्या मित्रांमधले बरेच जण मिशीची कोवळी रेघ ठेवायचे. (कारण त्या वयात तेवढीच यायची!) नंतर एकेकाच्या मिशा गायब व्हायला लागल्या. मी मात्र हट्टाने मोठी मिशी वाढवायचं ठरवलं होतं, माझ्या एका मामेभावाच्या मिशा त्याला कारणीभूत होत्या. त्याच्या मिशा इतक्या मोठ्या होत्या की आम्ही गमतीने म्हणत असू की तू दोन लेअरमधे आहेस, आधी मिशीचा लेअर आणि मग तुझा!तो चहा पीत असला की लिटरली चहा गाळला जायचा! तो न्हाव्याकडे दाढी करायला गेला की दोन लोकांच्या कटिंगला जितका वेळ लागेल त्याच्यापेक्षा जास्त वेळ याच्या मिशा सेट करण्याकरता न्हाव्याला लागायचा, अजूनही लागतो.
          मी सिनिअर कॉलेजला गेलो तेव्हा जवळजवळ सगळे मित्र बिनामिशीचे! माझ्याही सगळे खूप मागे लागले की काढून टाक मिशी! पण मी कसला ऐकतोय! मग मित्रांनी मला भरीला पाडण्यासाठी बरेच प्रकार करून पाहिले, निरनिराळी आमिषं दाखवली, पण मी ढीम्म! मला म्हणे अरे तू मिशी ठेवली तर कुठलीही मुलगी तुझ्याशी लग्न करणार नाही! मी सांगितलं, मला अशा ’कुठल्याही’ मुलीशी लग्न करायचंच नाहीये. जिला मी मिशी ठेवलेली चालेल त्याच मुलीशी मी लग्न करेन. तिने जर आक्षेप घेतलाच तर सांगेन, की बाई गं, मी तुझ्याआधी माझ्या मिशीला ओळखतो. तुझी माझी ओळख तर आत्ता झाली!
एकदा तर कमालच झाली. कॉलेज सुटल्यावर आम्ही सगळे मित्र गप्पा करत उभे होतो. एकाच्या खिशात आगपेटी होती.(कशासाठी ते विचारू नका! सूज्ञास सांगणे न लगे!) त्याने आगपेटी काढली, काडी पेटवली, आम्हाला वाटलं नेहेमीसारखं, पण त्याने काय करावं, त्याने ती जळती काडी माझ्या मिशीवर ठेवून दिली! चर्रर्रर्ररर.... आवाज झाला. मला माझी मिशी जळेपर्यंत खरंच कळलं नाही. आणि कळेपर्यंत माझी एका बाजूची मिशी साफ जळून गेली होती. हाय रे दैवा! मग काय, मला उरलेलीही काढून टाकावी लागली! सगळे मित्र मला कितीतरी दिवस चिडवत होते, काढून दाखवली की नाही तुझी मिशी! तेव्हा मी पहिल्यांदाच मिशी काढली होती.
      माझा एक मित्र पण मिशी वाढवायच्या मागे लागला. त्याने मिशी वाढवली पण! पण त्यची मिशी म्हणजे ओठावर टाचण्या टोचल्यासारखी दिसायची! सगळे केस एकदम सरळ आणि एकदम दूरदूर! त्याला आम्ही ’लॉबस्टर’ म्हणायचो! शेवटी त्याने मिशीचा नाद सोडला!
      मी मोबाईल गेमिंगमध्ये असतांना एकदा एक मोठा प्रोजेक्ट आला होता. काम खूप होतं. तेव्हा मी जवळपास तीन महिने कटिंग आणि शेविंग केलं नव्हतं.केसांचा पार मकरंद देशपांडे झाला होता. प्रोजेक्ट संपवून गावी गेलो तर घरच्यांनी फक्त चहा घेण्यापुरतं मला घरात घेतलं आणि तसंच परत न्हाव्याकडे पिटाळलं! न्हाव्याने त्यादिवशी तीन लोकांची कटींग माझ्या एकट्याच्याच डोक्यावर केली! त्याला सांगितलं, "मिशीला हात लावायचा नाही! मी ती स्वत: घरी सेट करेन!". घरी आलो आणि मिशी सेट करण्यापूर्वी एक फोटो काढून घेतला! तोच हा फोटो!


सोमवार, १९ जुलै, २०१०

एक लहान मुलगा हरवलाय...

एक लहान मुलगा हरवलाय.....
झाली असतील दहा-पंधरा वर्षं!
    तेव्हापासून शोधतोय त्याला..
   सापडतच नाही!
तो होता तेव्हा त्याचं आणि माझं विश्व किती छान होतं!
तो म्हणजे प्रचंड उर्जा! प्रचंड सळसळ! प्रचंड उत्साह! शून्य कपटीपणा, निर्व्याज वागणं! हरवला.......
मी त्याला कॉलेजला जाणा-या मुलांमध्ये शोधतो.
मी त्याला नोकरी शोधणा-या मुलांमध्ये शोधतो.
मी त्याला घरापासून दूर राहणा-या मुलांमध्ये शोधतो.
मी त्याला त्याची वाट बघणा-या आईबाबांच्या डोळ्यांमध्ये शोधतो.
मित्रांच्या घोळक्यात शोधतो,
नाक्यावरच्या टोळक्यात शोधतो.
बाजारात शोधतो,
मंदिरात शोधतो.
नोटा-नाण्यात शोधतो, तेलाच्या घाण्यात शोधतो.
उसाच्या चरकात शोधतो, घाण्याच्या बैलात शोधतो.
कॉर्पोरेट कंपन्यात शोधतो, रस्त्यावरच्या कामगारात शोधतो.
चेहे-यावरच्या मुखवट्यात शोधतो, व्यवहाराच्या कपट्यात शोधतो......
      आणि खूपदा स्वत:च्या आत शोधतो......
अजून सापडत नाहीये!
      -प्लीज कुणीतरी शोधा रे त्याला!

रविवार, ११ जुलै, २०१०

स्वामनिष्टेपि कुरुते परहानि खलो ध्रुवम...

        शीर्षक वाचून एकदम गोंधळात पडला असाल ना? नाही नाही.. माझा संस्कृतात लिहिण्याचा कुठलाही विचार नाहीये! इतकं संस्कृत मला नक्कीच येत नाही. आज दोन बैराग्यांची ही झेनकथा वाचली आणि शाळेत असतांना संस्कृतच्या पुस्तकातला एक धडा आठवला, खरं तर ती गोष्ट होती. या दोन्ही कथांमधे केवळ "दोन बैरागी" इतकंच साम्य आहे.
          "स्वामनिष्टेपि कुरुते परहानि खलो ध्रुवम... " चा अर्थ आहे "दुस-याचं वाईट करतांना आपलं पण थोडंफार नुकसान होतंच!"
         होतं काय, की एका आश्रमात दोन साधू रहात असतात, सुबुद्धी आणि दुर्बुद्धी! दोघांचं एकदम विळ्याभोपळ्याचं नातं असतं. एकदा ते तपश्चर्येला बसतात. दिवस, महिने, वर्ष निघून जातात तरी त्यांची तपश्चर्या सुरुच असते. शेवटी एकदाचे देव प्रसन्न होऊन त्यांना दर्शन देतात आणि वर मागायला सांगतात. (इथपर्यंत अशा सगळ्या गोष्टी कॉमनच असतात!)
      तर देव त्यांना तीन वर मागण्याचं वरदान देतात पण एक अट घालतात... "जो कोणी आधी जे मागेल ते दुस-याला न मागता दुप्पट मिळेल!" झालं... दोघंही विचार करतात काय मागावं? बरं जो आधी मागेल त्याला नंतर मागणा-यापेक्षा निम्मंच मिळणार असतं. असा बराच वेळ निघून जातो. देव म्हणतात "अरे मूर्खांनो मागा पटकन नाहीतर मी चाललो!"
         शेवटी दुर्बुद्धी म्हणतो,"देवा माझा एक पाय तोड,एक हात तोड आणि मला एका डोळ्याने आंधळा कर".
"तथास्तू!"
    आता दुर्बुद्धी एका डोळ्याने आंधळा होतो, त्याचा एक हात आणि एक पाय जातो.......... आणि सुबुद्धीचे दोन्ही हातपाय आणि दोन्ही डोळे जातात...
           म्हणजे काय तर सुबुद्धीला अपंग बनवण्यासाठी दुर्बुद्धी स्वत:च्या एका हातापायाचा आणि एका डोळ्याचा बळी देतो. हा या सुभाषिताचा सारांश आहे.

शनिवार, १० जुलै, २०१०

बनवाबनवी

"बंडू, बाळ तू मोठेपणी कोण बनणार?"
"मी किनई हे... बनणार! मी किनई ते... बनणार!"..... यादी संपतच नाही! सगळे हीच उत्तरं देतात. स्थलकालपरत्वे थोडाफार फरक पडतही असेल, पण एकूण साचा तोच! माझाही प्रकार काही वेगळा नव्हता. मला त्या वयात पोलिस इन्स्पेक्टरचं भयंकर आकर्षण होतं. कदाचित अमिताभ इफेक्ट असावा. मला तेव्हा मोठेपणी पोलिस इन्स्पेक्टर बनायचं होतं. तेव्हाचे हिरो पोलिस असलेले पिक्चर मी अगदी मन लावून बघत असे. एकदा असाच एक पिक्चर बघून आलो आणि शाळेत मधल्या सुट्टीत चोर-पोलिस खेळत होतो. माझ्या अंगात एकदम काल पाहिलेला पोलिस इन्स्पेक्टर संचारला. झालं.... मी पोरांना मारायच्या ऐवेजी त्यांनीच मला बुकलून काढला! असो. थोडं विषयांतर होतयं.
तर आपण बनणार कोण हा प्रश्न आहे. म्हणजे कालही होता आणि उद्याही असणार आहे. त्या निरागस वयात आपण फार मोठीमोठी स्वप्न रचत असतो. आपण वाकवू तशी परिस्थिती वाकत नाही हे भान त्या भाबड्या वयात नसतं. होता होता शाळेचे दिवस मागे पडतात. करिअर निवडायची वेळ येते. मग खरा प्रश्न सुरू होतो, कि आपण नक्की कोण बनणार? बनवाबनवीला तिथूनच सुरुवात होते.
आधी कागदपत्रांसाठी संबंधित यंत्रणा आपल्याला ’बनवते’. आपणही सगळं माहीत असूनही ’बनतो’. कारण "अडला नारायण...."! मग ऍडमिशन (सध्या लष्कराच्या एखाद्या मिशनसारखं झालंय!) तिथे कॉलेज आणि विद्यापीठ जसेजसे बनवत जातील तसेतसे आपण बनत जातो. नंतर नोकरीसाठी परत बनवाबनवी. कधी आपण करतो तर कधी संस्था! आयुष्याचा प्रत्येक पायरीवर ही बनवाबनवी आपल्या बरोबरीनं चालत असते. कुणाला कवी बनायचं असतं, तो कविता विसरून रात्री गस्त घालत फिरत असतो. एखादा चांगला गायक बिल्डिंगला सिमेंट किती लागेल, विटा किती लागतील याचा हिशोब मांडत बसलेला असतो. एखादा फक्त नशिबाला दोष देत फिरतो.
पण आपण आयुष्यात काहीतरी ’बनतो’ ती आपल्याला कुणीतरी काहीतरी ’बनवल्यामुळेच’!

मंगळवार, ६ जुलै, २०१०

जखम मांडीला अन मलम शेंडीला

कालचा "भारत बंद" म्हणजे जखम मांडीला अन मलम शेंडीला अशी गत आहे! इंधन दरवाढीचा निषेध म्हणून जरी हा बंद पुकारलेला असला तरी हे काही मूळ समस्येवरचं उत्तर होऊ शकत नाही. या बंदने सरकारला जाग येऊन ते दरवाढ मागे घेतील ही स्वत:चीच फसवणूक आहे.आणि सरकारला जाग यायला सरकार काही झोपलेलं नाहीये! ते जागं आहे आणि सामान्य जनतेला अजून कसं मूर्ख बनवता येईल याचा प्लॅन बनवतंय. त्याने कान बंद करून घेतलेले आहेत. त्यामुळे कितीही आरडाओरडा करा, त्याला काहीही फरक पडणार नाहीये! यात शेवटी नुकसान सामान्य जनतेचच झालंय.
      काल बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बुडाला. आज कित्येक घरात आज कमाई झाली नाही तर जेवणार काय अशी परिस्थिती आहे. त्यांचं काय? अत्यावश्यक सेवा जसं हॉस्पिटल, टिफिन या पूर्णपणे कोलमडल्या. सार्वजनिक मालमत्ता जसं एस.टी., तिचं किती नुकसान झालंय! देश चालवायला प्रत्येक मिनिटाला किती रुपयांचा खर्च येतो हे जर यांनी बघितलं तर यांचे डोळे पांढरे होतील. तब्बल १३००० कोटींचा चुराडा झालाय काल! हा पैसा सरकार कुठून वसूल करणार आहे? तुमच्या-आमच्या खिशातूनच ना! सामान्य माणसाला चलनवाढ, फुगवटा वगैरे तांत्रिक शब्दांशी काहीही घेणंदेणं नाहीये! त्याला त्याचा राहणीमानाचा स्तर कसा उंचावता येईल हे हवंय. की आयुष्यभर त्यानं ठिगळं लावत बसायचं? अरे बंद हा काय वाढत्या महागाईवर सरकारला कृती करायला भाग पाडायचा उपाय आहे का? इतके दिवस निषेधाच्या गुळण्या केल्या, आता बंदची उलटी! काय उपयोग?

शनिवार, ३ जुलै, २०१०

एक उनाड दिवस

परवा सकाळी नेहेमीप्रमाणे ऑफिसला गेलो. एक प्रॉब्लेम फिक्स करत असतानांच बॉसचा फोन आला.
"काय रे आज तुझा वाढदिवस आहे?"
"हो" - मी.
"मग काल बोलला नाहीस तू!"
"त्यात काय सांगायचं!"
"आत्ता सुट्टी घे,घरी जा! आज तुझा दिवस आहे! एन्जॉय!"
"खरंच?"
"अरे अगदी खरं! कामाचं आपण नंतर पाहू! जा तू!"
       स्तंभित, आश्चर्यचकित वगैरे वगैरे सगळी विशेषणं वापरून संपली माझी! अचानक सुट्टी? आत्ता प्रश्न पडला की या अंगावर आलेल्या सुट्टीचं काय करायचं? वीकएंडसाठी राखून ठेवलेली कामं आठवायला लागली. हे करू की ते करू! तस पाहिलं तर कुठल्याच कामाला वेळ पुरणार नव्हता! १२ वाजलेले होते, अर्धा दिवस तर असाच गेला! मग विचार केला, मरूदेत ती कामं, आज जगावा एक उनाड दिवस, आपलाच वाढदिवस...! किती दिवसात स्वत:करता जगलोच नाही आपण!
      सरळ घरी आलो. मित्रांना फोन करून उपयोग नव्हता. सगळे ऑफिसमधे! मग घरी असणा-या काही मित्रांना सोबत घेतलं आणि सरळ पुणे सेंट्रल गाठलं. म्हटलं चला विंडो शॉपिंग करुयात. चकचकीत मॉलमधल्या भपकेबाज वस्तू पहात हिंडत होतो. परवा १ तारीख होती! त्यामुळे मॉलमध्ये ही गर्दी! किती अनावश्यक वस्तू खरेदी करून घराचं गोडाऊन करून टाकतात लोक! मी विचार केला, यातल्या किती वस्तू घरात असायलाच हव्यात? उत्तर आलं, पन्नास टक्क्यापेक्षा नाही! काही अडत नाही या वस्तू घरात नसल्या तरी!
      तिथून परत आलो आणि घरी येऊन शांत बसून राहिलो. काहीही न करता, मनात कुठलाही विचार न आणता फक्त शांत बसून होतो. आजूबाजूची शांतता कानांनी टिपून घेत होतो. शांततेलाही स्वत:चा एक नाद असतो. आपण कधी ऐकतच नाही. योगी व्यक्ती ज्या समाधीबद्दल बोलतात ती बहुतेक हीच असावी. खडकातून झिरपणा-या पाण्यासारखी शांतता आत झिरपत होती. किती अद्भूत अनुभूती असते ती! कितीतरी वेळ मी त्याच अवस्थेत बसून होतो. मन निर्विचार होत होतं. खरंच खूप हलकं वाटलं. एकूण दिवस लक्षात राहण्यासारखा गेला.

गुरुवार, २४ जून, २०१०

मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं?

"तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं?, मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं? "
संदिपचं हे गाणं त्यानं कुठल्या पोटतिडिकेने लिहिलंय हे तो आणि त्यात वर्णन केलेल्या प्रसंगाला तोंड देणारे समस्त बाबालोकच समजू शकतात. उगाच नाही प्रत्येक वेळेस ते गाणं ऐकलं की प्रत्येकाच्या पोटात तुटतं! पण त्या गाण्यातली परिस्थिती म्हणजे बापाची विवशता आहे, पिल्लाला वेळ देऊ शकत नसल्याची हूरहूर आहे,खंत आहे. आणि त्या बापाला वाटणारी भीतीसुद्धा रास्तच आहे. लहान मुलांना जर आईबापाचा सहवास मिळाला नाही तर ती त्यांच्यापासून मनाने दुरावतात. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पण बापाला ही भीती वाटण्याचं अजून काही कारण असू शकतं का? हो! ही दुसरी बाजू मी पाहिली आहे.
           आमच्या ओळखीचं एक कुटुंब आहे. तसं सर्वार्थाने सुखी, सुस्थापित, चौकोनी वगैरे वगैरे! त्यांना एक मुलगा एक मुलगी. तीन-चार वर्षांपूर्वी मुलीचं लग्न झालं. तिचा नवरा रेल्वेत नोकरीला आहे. सरकारी नोकरी म्हणजे आईवडिलांच्या भाषेत "मुलगी सुस्थळी पडली!". ती आणि तिचा नवरा नोकरीनिमित्त घरापासून लांब रहात होते. लग्नाच्या पहिल्या वर्षी सण-उत्सवांच्या निमित्ताने दोन्हीकडच्या आईवडिलांचं येणं-जाणं सुरु झालं. नंतर नंतर मात्र मुलीचे आईवडिल स्वत:चं घर सोडून मुलीकडे महिना महिना मुक्काम ठोकू लागले. आणि मग हळूहळू आईमधली सासू जागी झाली. छानपैकी मुलीचे कान भरणं चालू झालं."त्याचा पगार आधी ताब्यात घे! सासूसास-यांशी फटकून वाग! सासरच्या माणसांना जास्त येऊ देत जाऊ नकोस," वगैरे वगैरे! आणि मग वादाची ठिणगी पडली. थोडक्यात मुलीच्या संसारातला आईचा हस्तक्षेप वाढायला लागला.
           तिच्या नव-याला जरी कमी पगार असला तरी तो घर चालवण्यापुरते पैसे कमवतोय ना! तर आता त्यांना तो पगार कमी वाटायला लागला. मग पगारावरून जावयाचा पाण उतारा वगैरे वगैरे चालू झालं. यथावकाश त्यांना मुलगी झाली. ती दोन वर्षाची होईतो दुस-या मुलीचा जन्म झाला. मग काय, मुलीला दोन्ही मुलींना एकाच वेळेस सांभाळणं जमणार नाही म्हणून मुलीचे आईवडिल मोठया नातीला आपल्याकडे घेऊन आले. ती काय लहानच होती, त्यामुळे ती पटकन रुळली. नंतर नंतर तिला आईबापाची आठवण येईनाशी झाली. तिचे वडिल तिला भेटायला आले की ती त्यांच्याकडे अनोळखी नजरेनं पहायची. बापाचं काळीज तुटायचं. पण सासूसासरे "आमच्या मुलीची खूप धावपळ होईल", या सबबीखाली नातीला सोडायला तयार नव्हते! शेवटी तिचे वडिल भांडून भांडून तिला घेऊन गेले. कारण तिचा बापच तिच्यासाठी अनोळखी बनत चालला होता.
           त्यानं केलं ते बरोबर की चूक हा प्रश्नच आता उरत नाही! तो सर्वस्वी बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं?

बुधवार, ९ जून, २०१०

देशमुख गुरुजी

                देशमुख गुरुजी म्हणजे एक अवलिया व्यक्तिमत्व होतं. पाच फुटांच्या आतबाहेर उंची, गोल गरगरीत अंगकाठी, आणि कायम पांढराशुभ्र शर्ट-पायजमा! चेहेरा कायम हसतमुख! गुरुजी आणि त्यांच्या मिसेस नगरपालिकेच्या शाळेत शिक्षक होते. त्यामुळे गुरुजी सगळ्या गल्लीचेच गुरुजी होते, आणि त्यांच्या मिसेस बाई!
                गुरुजींचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते गल्लीतल्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेत असत, मग ते कुणाचं लग्न असो, मृत्यु असो, गणपती असोत की नवरात्र, प्रत्येक ठिकाणी गुरुजी पुढे! अशा वेळी त्यांच्यातला शिक्षक जागा होत असे. मग सगळी गल्ली विद्यार्थी! कुणी विचारो ना विचारो, आपण आपली देशमुखी सुरु ठेवायची हा त्यांचा खाक्या! नवरात्र असलं की बाप रे बाप! आम्ही सगळी लहान मुलं कंटाळून जात असू. कारण गुरुजींच्या एकापाठोपाठ एक अशा ज्या आरत्या सुरु होत, त्या तास दोन तास तरी थांबत नसत. हातात आरत्यांचं पुस्तक आणि वर्गात शिकवत असल्यासारखं आरत्या चालूच! आम्हाला तर असं वाटायचं की ते देवीला आरत्या शिकवताय. आम्ही आपले आता आरत्या संपतील, तेव्हा संपतील याची वाट पाहत टाळ्या वाजवतोय, पण आरत्या काही थांबायचं नाव नाही. आमचं म्हणजे सगळ्या चिल्लर पार्टीचं सगळ्यात जास्त लक्ष असायचं ते आरतीनंतर मिळणा-या प्रसादावर! म्हणून आम्ही आपले टाळ्या वाजवतोय,वाजवतोय! शेवटी अगदी हात लालेलाल झाले आणि गुरुजींचं आरत्यांचं लेक्चर संपलं की मोठ्ठी मंत्रपुष्पांजली, मग अजून काय काय श्लोक म्हणून आरतीपर्वाचा शेवट व्हायचा!
आमच्या गल्लीच्या टोकाला एक दूध केंद्र होतं. गल्लीतले बरेचसे लोक सकाळी तिथून दूध आणत असत. देशमुख गुरुजींचं घर त्या रस्त्यावरच होतं. सकाळी गुरुजींची शाळेत जायची तयारी चाललेली असायची. गुरुजी इतके तल्लीन होऊन दात घासत असायचे की विचारता सोय नाही. त्यांचा घसा साफ करण्याचा आवाज अर्ध्या गल्लीला ऐकू यायचा. त्यांच्या घराजवळून येणारा जाणारा प्रत्येक जण कानावर हात ठेवूनच पुढे जात असे. सकाळी सकाळी तो किळसवाणा आवाज नकोसा वाटे. बरं तेही अगदी तालासुरात चांगला अर्धा तास घसा साफ करत असत.अशा वेळी खरं तर कुत्री इमानदारीने भुंकतात, पण हा आवाज त्यांच्याही अंगवळणी पडला होता. ती पण सारी गुरुजींचं संगीत नाटक आटोपेपर्यंत सुस्तावून बसून राहत. गुरुजींचा हा आवाज म्हणजे गल्लीला "वेक अप कॉल" असायचा.
                काळ उलटला तसे गुरुजी आणि बाई नोकरीतून निवृत्त झाले. एक एक करून तिन्ही मुलींची लग्न झाली. मुलगा नव्हताच. त्यांनी जाणिवपूर्वक मुलींकडे राहायला जाणं टाळलं होतं. ते म्हणायचे, आमचं म्हातारा म्हातारीचं काय व्हायचं ते इथेच होईल. आणि दुर्दैवाने तसंच झालं. बाई हार्ट ऍटॅकने वारल्या.गुरुजी एकटे पडले. मुलींच्या आग्रहावरून काही दिवस त्यांच्याकडे राहायला गेले पण एकतर तिथे मिळणा-या वागणुकीमुळे किंवा इतक्या वर्षांच्या सवयीमुळे ते गावी परत आले. तेव्हा ते सांगायचे, गड्या आपला गावच बरा! बाई गेल्या आणि गुरुजींचं घर भकास झालं. आधी गुरुजी स्वत: स्वयंपाक करत. मग त्यांनी डबा लावला. हळूहळू गुरुजी घराबाहेर पडेनासे झाले. आठवड्यातून एखादे वेळेस दिसत. कपड्यांना पिवळी झाक चढली. आजा-यासारखे दिसू लागले. मुली मात्र वर्षाकाठी एकदा यायच्या आणि बापाला यथेच्य लुबाडून जायच्या. मात्र त्या भेटल्याच्या आनंदात गुरुजींचे चार दिवस अगदी दिवाळीसारखे निघून जात. पण तितकेच दिवस! नंतर परत गुरुजींची परिस्थिती जैसे थे! ज्यांनी आयुष्यभर मुलांवर संस्कार केले, त्यांना चांगले गुण शिकवले, त्यांच्यावरच उतारवयात स्वत:च्या मुलांचे धक्के खायची वेळ आली!
                नंतर आम्हीपण त्या गल्लीतलं घर सोडून नवीन घरात रहायला गेलो. गल्लीतल्या लोकांशी हळूहळू संपर्क कमी झाला. अधेमधे भेटणा-या कुणाकुणाकडून गुरुजींची माहिती कळत होती. एकदा कळालं की गुरुजी भ्रमिष्ट झालेत. त्यांच्या मुलीने त्यांना फसवून त्यांचे पी.एफ.चे पैसे काढून घेतले आणि आता ती म्हाता-याला विचारायला तयार नाही. गुरुजी ज्याला त्याला "माझे पैसे मिळतील का हो?" असं विचारत असत.सगळे लोक हळहळण्यापलिकडे काहीच करू शकत नव्हते.
                आणि एक दिवस गुरुजी रस्त्यातच बेवारस मेलेले सापडले.

शुक्रवार, ४ जून, २०१०

हर फिक्र को धूए मे उडाता चला गया....

"मैं जिन्दगीका साथ निभाता चला गया, हर फ़िक्र को धुए मे उडाता चला गया...."
हे गाणं आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं आहे. पण यातल्या नायकाचं अनुकरण आपण करायचं का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सिगरेट पिणा-यांना ती कशी आणि कधी संपली आणि दुसरी कधी पेटवली हे लक्षातसुद्धा येत नाही. ती एक प्रतिक्षिप्त क्रिया बनते जसं की गाडी चालवतांना आपण गिअर बदलणे, ब्रेक लावणे हे लक्षात न ठेवता करतो.
पण यात शरीराची किती हानी होते हे त्यांना कळत नाही. कितीही कानीकपाळी ओरडा, परत जैसे थे...
मला एक व्हिडिओ मिळालाय.. त्याचा दुवा इथे जोडतोय. बघूया सिगरेट पिणा-यांवर याचा काही विधायक परिणाम होतो का!
हा तो दुवा...

गुरुवार, १८ मार्च, २०१०

अप्सरा आली..... "शोरूम" मधून खाली!

आली...आली...एकदाची आली. कध्धीपासून जिची वाट पहात होतो, ती अखेर या गुढीपाडव्याच्या सुमुहुर्तावर अंगणात अवतरली. "ती" म्हणजे माझी बाईक! पार कधीपासून माझं बाईक घ्यायचं चाललेलं होतं. शेवटी या गुढीपाडव्याला घ्यायचीच असं ठरवून टाकलं. आणि मग घरी जाऊन घेतलीच! आता पुण्यात ती चालवतांना खरी कसोटी लागणार आहे.



बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

प्रेम म्हणजे काय?

आजच्या सकाळ मध्ये सीमा शेख यांचा एक खूप सुंदर कॉलम आलेला आहे.
प्रेम म्हणजे काय?
"कॅथरिन पिअर्स यांनी लिहिलेल्या हेलन केलर यांच्या चरित्राचा शांता शेळके यांनी "आंधळी" या पुस्तकात अनुवाद केला आहे. अंध-बधिर असलेली हेलन प्रेम म्हणजे काय हे शिक्षिकेला विचारते. शिक्षिका सांगते, "हेलन, तू आभाळातल्या ढगांनाही स्पर्श करू शकत नाहीस, पण ढगातून पडणारा पाऊस तुला जाणवतो. एखाद्या उकाड्याच्या दिवशी तर तापलेली जमीन कशी निवते,फुलं कशी उल्हासित होतात हेही तुला कळतं.प्रेमही तसंच आहे. हेलन, ते तुला स्पर्शाने चाचपून पाहता येत नाही. पण ते वस्तुमात्रात जो आनंद,जे समाधान ओतीत असतं ते तुला सहज जाणवतं. प्रेम नसेल तर तुझं सारं सुख हरपून जाईल. तुझा खेळकरपणा नाहीसा होईल."

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०

धर्म करा अन चावडी चढा !

"धर्म करा अन चावडी चढा" अशी मराठीमधे एक म्हण आहे. थोडक्यात "आ बैल मुझे मार!".
माझ्या एका मावसभावाची भाची, म्हणजे वहिनींच्या बहिणीची मुलगी मुंबईत एका चांगल्या नावाजलेल्या चित्रकला महाविद्यालयात शिकते आहे. एकदा त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा तिची आई,म्हणजे वहिनींची बहिण म्हणाली की हिच्यासाठी वेब डिझायनिंगचं काही फ़्रीलान्स काम असेल तर सांगा. ती करून देईल. मी तिने काढलेले चित्र बघितले. खरंच अफलातून होते. म्हटलं ठीक आहे. मी बघतो.

दोन-चार दिवसांनी माझ्या एका मित्राचा फोन आला. त्याने एक सॉफ्टवेअर कंपनी सुरु केलेली आहे. त्याला क्लायंटला एक डेमो द्यायचा होता. त्याने विचारलं की तुझ्या ओळखीचा कुणी फ्रीलान्स वेब डिझायनर आहे का? मी म्हटलं एक मुलगी आहे, तिला विचारून तुला सांगतो. मग मी या बाईसाहेबांना फोन केला. या काम करून द्यायला तयार झाल्या. मित्राने मला तिचे वर्क सँपल्स पाठवायला सांगितले. पुन्हा तिला फोन, पुन्हा याला फोन. माझा नुसता शटलकॉक झाला होता. बरं या मॅडमचा मोबईल नंबर त्याला द्यायला या नाखुष होत्या. त्यामुळे सगळं कम्युनिकेशन माझ्यामार्फत चाललं होतं. म्हटलं हेही ठीक सही! एकीकडे मित्र तर एकीकडे नातेवाईक! कुणालाच काही बोलू शकत नाही.नाहीतरी व.पुं.नी एका ठिकाणी म्हटलंच आहे,"त-हेवाईक या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे नातेवाईक!" मित्र रोज फोन करून विचारत होता की झालं का काम! या मॅडमचं काम ढिम्म हलायला तयार नाही. वरून त्यांच्या आईसाहेब आम्हाला विचारतात,"ते काम मेल करण्यासाठी तिला सायबर कॅफेमधे जावं लागतं, त्यात पैसे जातात. ते तुमचा मित्र देईल का ?" अरे! आम्ही जॉब शोधायचा असतो तेव्हा सायबर कॅफेमधे जातो ते पैसे काय आम्ही आमच्या कंपनीकडून वसूल करतो का? कमाल आहे! तरी मी मित्राला त्यासाठी तयार केलं.
शेवटी डेडलाईन अगदी जवळ आली आणि मित्र अन मी गॅसवर! मी बाईसाहेबांना फोन केला तर त्या फोन घ्यायला तयार नाहीत. नंतर तर फोन कट करताय. असला संताप झाला माझा! झेपत नसेल तर आधीच नाही सांगायचं, नाहीतर कुठल्याही परिस्थितीत काम पूर्ण करून द्यायचं हा साधा नियम यांना माहीत नाही का? मित्रासमोर तरी माझी सगळी विश्वासार्हता धुळीत मिळाली की नाही!
मग मी मित्राला सांगितलं की असं असं झालं. शेवटी त्याने ते काम एका दुस-या बॅक अप कडून पूर्ण करून घेतलं. नंतर नेहेमीच्या कामात मी ही घटना विसरून गेलो. नंतर एका दिवशी तिच्या आईचा मला फोन आला. "अहो आमचा कॉम्प्युटर बिघडला आहे. तुम्हाला वेळ असेल तर जरा येऊन बघता का? किंवा तुमच्या एखाद्या मित्राला तरी पाठवा!" म्हटलं हीच वेळ आहे सव्याज परतफेड करण्याची! हान सावळ्या! त्यांना म्हटलं, "अहो मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मला आणि माझ्या कुठल्याच मित्राला हार्डवेअर मधलं काहीच कळत नाही. मुंबईत लाखाने हार्डवेअर इंजिनिअर्स पडलेत. त्यांना विचारा! आणि आता मी तुमचा फोन कट करू शकतो किंवा मी उचलला नसता तर! माझ्यात सौजन्य अजूनही बाकी आहे आणि त्याचा तुम्ही गैरफायदा घेताहात! तुमचं काम वेळेत न पोचल्याने क्लायंटने मला पाचशे रुपये फाईन केला! ते कोण भरणार? तुम्ही नेटच्या खर्चाची गोष्ट करत होतात आणि इथे मला विनाकारण भुर्दंड बसला तो वेगळाच! परत त्या क्लायंटशी माझे व्यावसायिक संबंध खराब झाले ते वेगळंच! इतकं होऊनही तुम्ही माझ्याकडून मदतीची अपेक्षा कशी करू शकता? मला गेलेल्या पैशांचं दु:ख नाही, पण मनस्ताप किती झाला! निव्वळ तुम्ही वहिनींची बहिण आहात म्हणून मी काही बोललो नाही!"
इतकं फायरिंग ऐकल्यावर बाईसाहेब गुपचुप! मुळात त्यांनी माझ्याकडून असल्या फायरिंगची अपेक्षाच केली नसावी! अरे! तुम्ही मला गृहीत कसं काय धरता? तुमचा मुलगासुद्धा तुम्हाला त्याला गृहीत धरू देत नाही, मग माझाकडून ही अपेक्षा का?
त्यांनी गुपचुप फोन बंद केला! मग मी भावाला फोन करून सगळं सांगितलं. तो म्हणाला बरं झालं तू बोललास ते! आता कुणाबरोबरही असं वागतांना ते दहादा विचार करतील.

शेवट काय, तर "धर्म करा अन चावडी चढा !"

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१०

युअर आयडी इज हॅक्ड!

परवा ऑफिसमध्ये माझी असली तंतरली....
झालं असं की मी ऑफिसला आलो, नेहेमीप्रमाणे पी.सी. ऑन केला आणि जी-टॉकला लॉगिन झालो..........
....आणि माझ्या मेलबॉक्स मध्ये एक स्टार केलेला मेल होता.

"युअर आयडी इज हॅक्ड! "
सो, सून चेंज युअर आयडी .......
प्लीज नोट आय़ हॅव ऑल युअर कॉन्टॅक्ट्स!

थॅंक यू फ़ॉर युवर हेल्प.

हॅकर, सॅन फ्रान्सिस्को.


मी तो मेल परत परत वाचला. तो माझ्याच मेल आयडी वरून मलाच पाठवलेला होता. काही कळेना. क्षणभर डोकं बधीर झालं. नुसता सुन्न झालो.मला काही कळेचना असं काय झालं. काल तर लॉगआउट व्यवस्थित करून गेलो होतो. तेवढ्यात कलिग आला. त्याला संगितलं. तो पण विचार करायला लागला. त्याने त्याचा मेलबॉक्स उघडून बघितला तर त्याला माझ्या आयडीवरून मेल आला होता की हा मेल आयडी हॅक झाला आहे. एक एक करत ऑफिसचा प्रत्येक जण हेच सांगू लागला. मग मात्र माझं धाबं दणाणलं. प्रत्येक जण आपापल्या पध्दतीने उपाय सुचवत होता. शेवटी मी पासवर्ड चेंज केला, सेटींग्समधे जाऊन आणखी काही काही चेंजेस केलेत.आणि परत ऑफिसच्या कामाला सुरुवात केली. पण काही मन लागेना. म्हटलं सगळे कॉन्टॅक्ट्स याच्या हाती लागले तर हा काहीही गोंधळ माजवू शकेल. कुणाकुणाला कसले कसले मेल पाठवू शकेल. काय करावं बरं? विचार करकरून वैतागून गेलो. शेवटी कामावर लक्ष केंद्रीत केलं. पण धाकधुक होतीच.
संध्याकाळी आठवणीने लॉगआउट केलं आणि जायला निघालो, तितक्यात एक कलीग बॉसला म्हणाला की याचा मेल आयडी आज हॅक झाला म्हणून! बॉसला पण आश्चर्य वाटलं. मग बॉस मला हळूच म्हणतो, "आता कधी लॉगआऊट न करता जाशील का?" आणि तो हसायला लागला. एक एक करत सगळेच हसायला लागले.
..........तेव्हा माझ्या लक्षात आलं की घोळ इथेच आहे.मी एकदम बावळट चेहेरा करुन सगळ्यांकडे बघू लागलो. तेव्हा माझ्या कलिगने सांगितलं की नेमकं काय झालं.
मी आदल्या दिवशी निघतांना बॉसशी बोलत होतो. तेव्हा बराच वेळ मी माझ्या पी.सी. वर नव्हतो. त्यामुळे थोडया वेळानं मॉनिटर आपोआप बंद झाला. मी बॉसशी बोलून परत आलो तर मला वाटलं की मी पी.सी. बंद केला आहे. आणी मी सरळ निघून आलो. पण थोडया वेळाने माझ्या मित्राने मला पिंग केलं होतं, आणि कुणाचा तरी धक्का मॉनिटरला लागला आणि स्क्रीन चालू झाली. ते माझ्या कलिगच्या लक्षात आलं. मग त्यानंच तो मेल बनवून मला आणि सगळ्यांना पाठवला. हुश्श........!कसला घाबरलो होतो मी! वाचलो!

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१०

भन्नाट आर्टीस्ट

माझा एक मित्र ग्राफिक्स आर्टिस्ट आहे. कसली भन्नाट कला आहे त्याच्या हातात! एकदम रापचिक, एकदम चाबूक, एकदम फंडू. त्याच्या पेंटींगचा हा नमुना बघा!





त्याचा ब्लॉग आहे: http://yogeshron.blogspot.com/

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१०

मी काय करायला हवं?

वॉरेन बफेट माहीत नाही असा संगणकक्षेत्राशी संबंधित माणूस विरळाच! हा माणूस म्हणजे एक चमत्कार आहे. त्यांनी २००८ साली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मह्णून बिल गेट्सची जागा पटकावली. जगातील एक सर्वात यशस्वी इन्व्हेस्टमेंट बँकर, यशस्वी अमेरिकन उद्योगपती, आणि जगातील एक अत्यंत दानशूर, अब्जावधी डॊलर्सची संपत्ती गरजूंवर खर्च करणारी महान परोपकारी व्यक्ती असलेल्या बफेट यांची सीएनबीसी वाहिनीने एक मुलाखत घेतली होती.या मुलाखतीतून या माणसाच्या व्यक्तिमत्वाचे उलगडलेले काही पैलू.....















संदर्भ: आंतरजालावरुन फिरत फिरत आलेले एक इ-पत्र.

सोमवार, १८ जानेवारी, २०१०

पार्टनर





आज लंचब्रेककरता बाहेर पडलो आणि जरा वेगळ्या रस्त्याने गेलो. नेहेमीच्या हॉटेलमध्ये जायचा कंटाळा आला होता. फिरता फिरता मला पुस्तकांचं प्रदर्शन दिसलं. झालं....... मग कसली भूक! अलीबाबाचे डोळे चोरांची गुहा पाहून दिपले नसतील तितके तिथली पुस्तकं पाहून माझे डोळे दिपले. किती पुस्तकं...... बाप रे बाप! म्हटलं इथे नुस्ती पुस्तकं चाळायची म्हटली तरी तास दोन तास पुरणार नाहीत.
तेवढ्यात माझं लक्ष गेलं वपुंचं पुस्तक "पार्टनर" वर! जर एखाद्याने वपुंचं एकही पुस्तक वाचलं नसेल आणि त्याने पार्टनर जर वाचलं तर तो वपुंच्या लिखाणाच्या प्रेमाताच पडतो. वपुंची ही एक वादळी कादंबरी आहे. त्यातलं सत्य एकदम अंगावर येतं. सगळं पटतं पण ते मान्य करायला मन कुठेतरी तयार नसतं. जरासा वेळ लागतो स्वत:च्याच मनाला पटवण्यासाठी! कसं सुचत असावं वपुंनां? डोक्यातला गोंधळ नेमका शब्दात पकडणं त्यांनाच जमायचं. पार्टनर वाचल्यावर असं वाटतं की आतमध्ये काहीतरी प्रचंड उलथापालथ होतेय, काहीतरी खळबळ माजतेय. आपल्याला जे म्हणायचं होतं ते आपल्याला नेमकं शब्दात पकडता येत नव्हतं,तेच वपुंनी किती सुरेख चिमटीत पकडून दाखवलं.
प्रत्येकानं एकदातरी वाचायला हवंच असं पुस्तक आहे हे! जरूर वाचा! मी तर आज रात्रीतूनच वाचून संपवणार आहे हे!

गणपती बाप्पा मोरया!!

काल थेऊरला जाऊन आलो. ब-याच दिवसांपासून चाललं होतं जाऊ जाऊ म्हणून! म्हटलं चला, आजच जाऊ! तसं आमच्या मित्रमंडळीना थेऊरचं काही अप्रूप नाही. रविवार असल्याने सगळे जरा आळसावलेलेच होतो. शेवटी माझा एक मित्र प्रशांत आणि मी असे दोघेच निघालो. मी सकाळी लवकरच माझी सकाळची क्लासची बॅच आटोपून घेतली आणि मग निघालो. पी.एम.पी.एम.एल. ने स्वारगेट ते थेऊर बस बंद केलीय. कारण काय ते त्या चिंतामणीलाच ठाऊक! मग सांगवी ते स्वारगेट, स्वारगेट ते हडपसर आणि हडपसर थेऊर असे पोचलो. सव्वाअकराला मंदिरात पोचलो. वाटलं, आज रविवार आहे आणि त्यातून गणेश जयंती जवळच आली आहे, त्यामुळे मंदिरात ही... गर्दी असेल. पण सुदैवाने तसं काही नव्हतं.एक आजी काही लोकांना घेऊन सभामंडपात अथर्वशीर्ष म्हणत होत्या. गाभा-यात "श्रीं" ना अभिषेक चालू होता. अतिशय प्रसन्न वाटत होतं.
मी पण त्या लोकांमध्ये सामील होऊन अथर्वशीर्ष म्हणू लागलो. आणि खरंच सांगतो, इतकं शांत वाटलं ना, मनावरचा सगळा ताण, सगळं टेन्शन दूर होऊन गेलं. अथर्वशीर्षाच्या त्या धीरगंभीर पठणाने, मन अंतर्बाह्य ताजंतवानं झालं. तसं माझं आणि थेऊरच्या गणपतीबाप्पाचं जुनं सख्य आहे. का कोण जाणे, पण मला इथे येऊन माझा कुणीतरी जुना सुहृद भेटल्यासारखं वाटतं.माझं बाप्पाकडे काहीही मागणं नसतं, काही गा-हाणं नसतं. मनातले सगळे प्रश्न मनातच विरघळून जातात. काल वाटलं, बाप्पा विचारतोय, "काय रे, ब-याच दिवसात आला नाहीस?" मनातच म्हणालो, "बाप्पा, तुम्ही बोलवाल तेव्हाच येणं जमतं. इथून उर्जेचं च्यवनप्राश घेऊन जातो. ते मला कायम सोबत करतं." बाप्पा म्हणाले,"अरे यावं मधून मधून! पोरं घरी आली तर आईबापाला कोण आनंद होतो. तुला अजून काय कळणार म्हणा! " अर्थातच आमचा हा संवाद मनातल्या मनातच चालला होता. पण काल मला बाप्पा खूप आनंदी दिसले. कुणास ठाऊक!
मंदिरातून निघून आम्ही वॄंदावनात गेलो, जिथे रमाबाई पेशवे सती गेल्या. तिथे एक चिरंतन शांतता वसतेय. मी निव्वळ ती शांतता अनुभवण्यासाठी तिथे जाऊन बसतो.ती शांतता केवळ पिऊन टाकावीशी वाटते. तिथे मन आपोआप शांत होतं. बाप्पांचं मंदिर आणि वृंदावन, ही दोन ठिकाणं मला चैतन्य देतात.
तुम्हीही अनुभव घेऊन पहा!
गणपती बाप्पा मोरया!!