गुरुवार, २४ जून, २०१०

मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं?

"तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं?, मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं? "
संदिपचं हे गाणं त्यानं कुठल्या पोटतिडिकेने लिहिलंय हे तो आणि त्यात वर्णन केलेल्या प्रसंगाला तोंड देणारे समस्त बाबालोकच समजू शकतात. उगाच नाही प्रत्येक वेळेस ते गाणं ऐकलं की प्रत्येकाच्या पोटात तुटतं! पण त्या गाण्यातली परिस्थिती म्हणजे बापाची विवशता आहे, पिल्लाला वेळ देऊ शकत नसल्याची हूरहूर आहे,खंत आहे. आणि त्या बापाला वाटणारी भीतीसुद्धा रास्तच आहे. लहान मुलांना जर आईबापाचा सहवास मिळाला नाही तर ती त्यांच्यापासून मनाने दुरावतात. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पण बापाला ही भीती वाटण्याचं अजून काही कारण असू शकतं का? हो! ही दुसरी बाजू मी पाहिली आहे.
           आमच्या ओळखीचं एक कुटुंब आहे. तसं सर्वार्थाने सुखी, सुस्थापित, चौकोनी वगैरे वगैरे! त्यांना एक मुलगा एक मुलगी. तीन-चार वर्षांपूर्वी मुलीचं लग्न झालं. तिचा नवरा रेल्वेत नोकरीला आहे. सरकारी नोकरी म्हणजे आईवडिलांच्या भाषेत "मुलगी सुस्थळी पडली!". ती आणि तिचा नवरा नोकरीनिमित्त घरापासून लांब रहात होते. लग्नाच्या पहिल्या वर्षी सण-उत्सवांच्या निमित्ताने दोन्हीकडच्या आईवडिलांचं येणं-जाणं सुरु झालं. नंतर नंतर मात्र मुलीचे आईवडिल स्वत:चं घर सोडून मुलीकडे महिना महिना मुक्काम ठोकू लागले. आणि मग हळूहळू आईमधली सासू जागी झाली. छानपैकी मुलीचे कान भरणं चालू झालं."त्याचा पगार आधी ताब्यात घे! सासूसास-यांशी फटकून वाग! सासरच्या माणसांना जास्त येऊ देत जाऊ नकोस," वगैरे वगैरे! आणि मग वादाची ठिणगी पडली. थोडक्यात मुलीच्या संसारातला आईचा हस्तक्षेप वाढायला लागला.
           तिच्या नव-याला जरी कमी पगार असला तरी तो घर चालवण्यापुरते पैसे कमवतोय ना! तर आता त्यांना तो पगार कमी वाटायला लागला. मग पगारावरून जावयाचा पाण उतारा वगैरे वगैरे चालू झालं. यथावकाश त्यांना मुलगी झाली. ती दोन वर्षाची होईतो दुस-या मुलीचा जन्म झाला. मग काय, मुलीला दोन्ही मुलींना एकाच वेळेस सांभाळणं जमणार नाही म्हणून मुलीचे आईवडिल मोठया नातीला आपल्याकडे घेऊन आले. ती काय लहानच होती, त्यामुळे ती पटकन रुळली. नंतर नंतर तिला आईबापाची आठवण येईनाशी झाली. तिचे वडिल तिला भेटायला आले की ती त्यांच्याकडे अनोळखी नजरेनं पहायची. बापाचं काळीज तुटायचं. पण सासूसासरे "आमच्या मुलीची खूप धावपळ होईल", या सबबीखाली नातीला सोडायला तयार नव्हते! शेवटी तिचे वडिल भांडून भांडून तिला घेऊन गेले. कारण तिचा बापच तिच्यासाठी अनोळखी बनत चालला होता.
           त्यानं केलं ते बरोबर की चूक हा प्रश्नच आता उरत नाही! तो सर्वस्वी बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं?

5 comments:

केदार म्हणाले...

त्यान केलं ते अगदि बरोबर केलं मुलीच अणि बापाच नातच तस असत, जर सासरे आपल्या मुलीपासून लग्न झाल्यावर सुध्दा दूर राहु शकत नाहित तर मग बापावर हा अन्यायच ना.

अनामित म्हणाले...

बापाचं आणि मुलीचंच का? बापाचं आणि मुलाचं नातंही इतकंच घटत असू शकतं. हे दोन जीवांमधलं नातं आहे. बाप, आई, स्त्री, पुरुष वगैरे च्या पलीकडे. सोल टू सोल..

जमलं तर वाचा

http://gnachiket.wordpress.com/2009/09/09/%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%aa%e0%a4%b0/

आणि


http://gnachiket.wordpress.com/2010/06/15/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%ad%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be/

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

@केदार, "जावे त्याच्या वंशा" हे म्हणसुद्धा या मुलीच्या वडिलांनी (पक्षी: सास-यांनी) खोटी ठरवलीय! आपल्याला जशी आपली मुलगी जवळची आहे तशी आपली नातही तिच्या वडिलांना जवळची आहेच ना!

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

अनिकेत मी अगदी सहमत आहे! तू दिलेल्या दोन्ही लिंक्स मी वाचल्या. मला लहानपणी शाळेत सोडतांना माझ्या वडिलांना काय वाटलं असेल त्याचं चित्र शब्दबद्ध केलंस तू! इतकंच काय, पण मला बाहेर शिक्षणासाठी सोडतांना त्यांची मनस्थिती काय असेल हे मी समजू शकतो. ती सहवेदना मला जाणवते.

अनामित म्हणाले...

मुली कितीही मोठ्या झाल्या आणि बाबापासून दूर गेल्या असं वाटू लागल, तरी मनात तर बाबा बरोबरचे क्षण अन् क्षण आठवलेले असतात.
फक्त ते बाबाला शब्दात सांगण जमत नाही.
जमल तर अवश्य हे वाचा, एका मुलीचं मनोगत :)
http://manatun.wordpress.com/2010/06/15/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8/

टिप्पणी पोस्ट करा