शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०

पुन्हा मिशी.....

        काल गौरवची ही पोस्ट वाचली. म्हटलं चला आपण पण आपले मिशीचे किस्से शेअर करावेत.
मी फार पूर्वीपासून मिशी ठेवतो. अकरावी-बारावीत असतांना माझ्या मित्रांमधले बरेच जण मिशीची कोवळी रेघ ठेवायचे. (कारण त्या वयात तेवढीच यायची!) नंतर एकेकाच्या मिशा गायब व्हायला लागल्या. मी मात्र हट्टाने मोठी मिशी वाढवायचं ठरवलं होतं, माझ्या एका मामेभावाच्या मिशा त्याला कारणीभूत होत्या. त्याच्या मिशा इतक्या मोठ्या होत्या की आम्ही गमतीने म्हणत असू की तू दोन लेअरमधे आहेस, आधी मिशीचा लेअर आणि मग तुझा!तो चहा पीत असला की लिटरली चहा गाळला जायचा! तो न्हाव्याकडे दाढी करायला गेला की दोन लोकांच्या कटिंगला जितका वेळ लागेल त्याच्यापेक्षा जास्त वेळ याच्या मिशा सेट करण्याकरता न्हाव्याला लागायचा, अजूनही लागतो.
          मी सिनिअर कॉलेजला गेलो तेव्हा जवळजवळ सगळे मित्र बिनामिशीचे! माझ्याही सगळे खूप मागे लागले की काढून टाक मिशी! पण मी कसला ऐकतोय! मग मित्रांनी मला भरीला पाडण्यासाठी बरेच प्रकार करून पाहिले, निरनिराळी आमिषं दाखवली, पण मी ढीम्म! मला म्हणे अरे तू मिशी ठेवली तर कुठलीही मुलगी तुझ्याशी लग्न करणार नाही! मी सांगितलं, मला अशा ’कुठल्याही’ मुलीशी लग्न करायचंच नाहीये. जिला मी मिशी ठेवलेली चालेल त्याच मुलीशी मी लग्न करेन. तिने जर आक्षेप घेतलाच तर सांगेन, की बाई गं, मी तुझ्याआधी माझ्या मिशीला ओळखतो. तुझी माझी ओळख तर आत्ता झाली!
एकदा तर कमालच झाली. कॉलेज सुटल्यावर आम्ही सगळे मित्र गप्पा करत उभे होतो. एकाच्या खिशात आगपेटी होती.(कशासाठी ते विचारू नका! सूज्ञास सांगणे न लगे!) त्याने आगपेटी काढली, काडी पेटवली, आम्हाला वाटलं नेहेमीसारखं, पण त्याने काय करावं, त्याने ती जळती काडी माझ्या मिशीवर ठेवून दिली! चर्रर्रर्ररर.... आवाज झाला. मला माझी मिशी जळेपर्यंत खरंच कळलं नाही. आणि कळेपर्यंत माझी एका बाजूची मिशी साफ जळून गेली होती. हाय रे दैवा! मग काय, मला उरलेलीही काढून टाकावी लागली! सगळे मित्र मला कितीतरी दिवस चिडवत होते, काढून दाखवली की नाही तुझी मिशी! तेव्हा मी पहिल्यांदाच मिशी काढली होती.
      माझा एक मित्र पण मिशी वाढवायच्या मागे लागला. त्याने मिशी वाढवली पण! पण त्यची मिशी म्हणजे ओठावर टाचण्या टोचल्यासारखी दिसायची! सगळे केस एकदम सरळ आणि एकदम दूरदूर! त्याला आम्ही ’लॉबस्टर’ म्हणायचो! शेवटी त्याने मिशीचा नाद सोडला!
      मी मोबाईल गेमिंगमध्ये असतांना एकदा एक मोठा प्रोजेक्ट आला होता. काम खूप होतं. तेव्हा मी जवळपास तीन महिने कटिंग आणि शेविंग केलं नव्हतं.केसांचा पार मकरंद देशपांडे झाला होता. प्रोजेक्ट संपवून गावी गेलो तर घरच्यांनी फक्त चहा घेण्यापुरतं मला घरात घेतलं आणि तसंच परत न्हाव्याकडे पिटाळलं! न्हाव्याने त्यादिवशी तीन लोकांची कटींग माझ्या एकट्याच्याच डोक्यावर केली! त्याला सांगितलं, "मिशीला हात लावायचा नाही! मी ती स्वत: घरी सेट करेन!". घरी आलो आणि मिशी सेट करण्यापूर्वी एक फोटो काढून घेतला! तोच हा फोटो!


7 comments:

Unknown म्हणाले...

एक नंबर मिशी आहे.. आवडली, मिशी असावी तर अशीच..मस्त मेंटेन केली आहे.. आणि मिशी जाळणे हा प्रकार मला वाटायच की फक्त रामायणातच होता.. खरच मिशी जाळली त्याने??.. आयला भारीच आहेत तुमचे मित्र..

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

धन्यवाद गौरव! मी आता इतकी मोठी मिशी ठेवत नाही! आणि मिशी खरंच जाळली होती....

अनामित म्हणाले...

राजे! काय मिशी वाढवलीत. सही!

विजयकुमार देशपांडे म्हणाले...

mishi puran awadale.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

नमस्कार!
आपला ब्लॉग मोगरा फुललाच्या ब्लॉगर्स यादीत समाविष्ट केला आहे. धन्यवाद.

Vishal Karnik म्हणाले...

Pankaj .. khup sahi lihila ahes Mishi Puran :)Ani mishi tar kay ... kharya arthan "Aitihasik" zali ti ata ;)

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

@विदेश,Vishi,धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा