शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०११

ब्लॅक फ्रायडे (भाग ४)

       ... लायब्ररीत नेहा त्याची वाटच पहात होती. पश्चात्तापाने तिचा चेहेरा झुकलेला होता, निदान राहुलला तरी असंच वाटत होतं. तिचा पश्चात्ताप कितपत खरा होता देव जाणे! त्याचं उत्तर तर काळाच्या पोटातच दडलेलं होतं.

"राहुल, मला असं वाटतं की मी कळत-नकळत तुझ्यावर अन्याय केला!" -नेहा.

"ते जाऊ दे, कुठला टॉपिक समजला नाहीये तुला?" - राहुल्याने तिला एकदम जमिनीवर आणत म्हटलं.
तिचा एकदम भ्रमनिरास झाला, पण ती काहीच बोलली नाही. पुढचे दिड-दोन तास राहुल्या तिला न समजलेला टॉपिक समजवण्यात दंग होता. मागच्या आठवणींचा मागमूसही त्यानं चेहे-यावर दाखवला नव्हता.लेक्चर्सची वेळ झाल्यावर तो सरळ रुमवर निघून आला. खूप मानसिक थकवा आला होता त्याला! मनावर इतकं ओझं घेऊन लेक्चर्सला बसणं शक्यच नव्हतं आज! रुमवर आल्यावर तो जरा आडवा झाला आणि दोन वर्षांपूर्वीचे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागले.

       ... तेव्हा कॉलेज नुकतंच सुरु झालेलं होतं. आत्ताचा ग्रुप पण बनलेला नव्हता. तेव्हा कॉलेजच्या ऑफिसमधे तिची अन त्याची ओळख झाली होती. त्यानंतर सगळं व्यवस्थित होतं पण ऐन परिक्षेच्या वेळेस ती आजारी पडली. तेव्हा तिचा बुडालेला अभ्यास भरुन काढायला तिला राहुलनेच मदत केली होती. खरं तर त्याच्यामुळेच ती त्या वर्षी पास झाली होती. नंतर जसा राहुलचा हा ग्रुप बनत गेला तशी तिच्यात आणि राहुलमधे दरी पडत गेली. तू कायम माझ्याचबरोबर असायला हवं असा तिचा हट्ट होता. राहुलने तिला बरंच समजवलं की असं कसं शक्य आहे? ते माझे रुमपार्टनर्स आहेत, माझे मित्र आहेत. मी तुझ्याशी बोलतोय ना? मग इतका पझेसिव्हनेस का? तिला पझेसिव्हनेस म्हटल्याचा खूप राग आला. त्यावरुन ती राहुलशी खूप भांडली. त्यानंतर तिने त्याला टाळणंच सुरु केलं. त्यात सुहास म्हणजे बोलबच्चन! राहुलला फारसं बोलणं नव्हतं. अर्थात त्याचं म्हणा, किंवा तिचं म्हणा वय हे स्तुतीला भुलणारंच होतं. त्यामुळे सुहासने केलेल्या स्तुतीला ती भुलली आणि कायम सुहासच्याच संपर्कात राहू लागली.करता करता दोन वर्ष कसे निघून गेले कुणालाच कळलं नाही. या दोन वर्षात ती राहुलशी बोटावर मोजण्याइतक्या वेळेस बोलली असेल. राहुलला मात्र मनातून ती आवडत होती. त्याने ही गोष्ट फक्त सम्याला सांगितली होती, खरं तर ही गोष्ट सम्यानेच त्याच्याकडून काढून घेतली होती. तेव्हाच सम्याने त्याला सल्ला दिला होता.

    "राहुल्या, हे कॉलेजमधलं प्रेमबिम आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी नसतं! तुझ्या किंवा माझ्या बापाचा काही मोठ्ठा बिझनेस नाहीये की संपलं कॉलेज की बसले लगेच खुर्चीत! अजून आपल्याला शून्यातून आपलं विश्व निर्माण करायचंय! करण्यासारखं बरंच काही आहे आपल्याला अजून आयुष्यात! मला नाही वाटत की शी इज सुटेबल फॉर यू! म्हणजे तुझा व्ह्यू कसा आदर्शवादी आहे ना, तिचा तसा नाहीये, शी इज परफेक्ट एक्झाम्पल ऑफ रिअलिस्टीक व्ह्यू! हवेनुसार दिशा बदलणारी आहे रे ती! तिला जेव्हा जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा तेव्हा तिला तू आठवायचास. काम संपलं की तू कोण आणि मी कोण! ती तुला एक मित्र म्हणून पण मानत नाही रे!तू उगाच तिच्या बाबतीत स्वप्न बघतोयेस! काढून टाक हा विषय डोक्यातून!"

"तू म्हणतो तसं असेलही सम्या, पण ती तशी वागत असेल तर आपणही तसंच वागलं पाहिजे असं कुठेय? असं असेल तर तिच्यात अन आपल्यात फरक काय राहीला?" - राहुल्याचा युक्तिवाद!

"काये राहुल्या, आपण सगळ्यांशी, अगदी आपल्याशी ठरवून वाईट वागणा-यांशीही कायम चांगलेच वागत राहीलो तर काय होतं माहीतीये? आपण चांगलंच वागायला हवं असं लोक गृहीत धरायला लागतात. आणि आपण कितीही वाईट वागलो तरी हा आपल्याशी चांगलाच वागेल असं जेव्हा कुणी गृहीत धरायला लागतं ना, तो आपला मोठ्ठा पराभव असतो. कुणाला आपली किंमत कळत नाही रे अशाने! मग अशा वेळी आपली किंमत दाखवून द्यावीच लागते!"
या उत्तरावर मात्र राहुल गप्प बसला.

      दुस-या दिवशी जेव्हा राहुल्या नेहाला भेटला तेव्हा त्यानं नेहाला सांगितलं,
"नेहा, मला माफ कर! मी तुझ्या मैत्रीला ओळखू शकलो नाही! आज मी सगळ्या रुमपार्टनर्सचा खरा चेहेरा पाहिलाय. सगळे फक्त कामापुरते गोड वागत होते माझ्याशी! केसाने गळा कापत होते माझा! अरे मी यांच्यासाठी काय काय केलं नाही, पैसे उधार देण्यापासून कर्जाला जामीन राहण्यापर्यंत केलं! पण... पण.. मी आज रुममधे येत होतो तेव्हाच सम्याला रव्याला सांगतांना ऐकलं की हा राहुल्या कसा पुढे जातो तेच मी बघतो. मीच त्याचा वेळ बरबाद करणार आहे, मग बघू, त्याला अभ्यासाला कसा वेळ मिळतो ते! मी खूप खूप साधा राहिलो गं! कळालंच नाही मला! तू बरोबर सांगत होतीस! तेव्हा तुझं ऐकलं नाही ना मी! मी एकदम रुममधे आलो तसं सगळे एकदम चिडिचूप! मी आल्यामुळेच ते एकदम शांत झालेत हे मला कळलं पण मी तसं दाखवलं नाही! मला आता त्यांच्यातच राहून सिद्ध करायचंय की ते माझं काहीही नुकसान करु शकत नाहीत! मी त्या सगळ्यांच्या पुढे जाऊन दाखविन! पण का गं असं? जर स्वत:ला पुढे जाता येत नसेल तर दुस-याचे पाय तरी का ओढावे माणसाने? का असे वागले असतील माझ्याशी?" - राहुल्याच्या चेहे-यावर राग आणि विश्वासघात केल्याची भावना स्पष्टपणे दिसून येत होती.

"जाऊ दे रे राहुल! कुणी कसं वागावं हे आपल्या हातात नाहीये ना! तू खरंच खरंच खूप खूप मोठ्या मनाचा आहेस! मी तुझ्याशी इतकी वाईट वागूनही तू माझ्याशी चांगलाच वागतोयेस! मी खरंच चुकले रे तेव्हा! मला कळालंच नाही तेव्हा रे!" -नेहा डायरेक्ट रडायलाच लागली.

"जाऊ दे नेहा, झालं गेलं सगळं विसरून जा!" - राहुल्याने आश्वासकपणे तिच्या खांद्यावर हात ठेवला.


      दुस-या दिवशी वर्गात कुजबुज सुरु झाली, राहुल्या सम्याच्या ग्रुपमधून बाहेर पडलाय... आणि ही बातमी एकशे एक टक्के खरी आहे! सगळा वर्गच बघत होता ना, की राहुल्या एकटाएकटाच राहतोय, कुणातच मिसळत नाहीये, आणि सम्याकडे तर तो ढूंकुनही बघत नाहीये! आता सुहासला चेव चढला. शेवटी हा ग्रुप फुटल्याचा त्याला आसुरी आनंद झाला होता. फक्त एका गोष्टीचं त्याला वाईट वाटत होतं की नेहा आता आपल्याला काहीच विचारत नाहीये, ती बोलली तर फक्त राहुल्याशी बोलते, नाहीतर बाकीच्या मुलींशीही नाही. आपण तिच्याशी स्वत:हून भांडलो होतो, त्यामुळे आपण जर तिला परत मनवायला गेलो आणि तिने भर वर्गासमोर आपल्या इज्जतीच पंचनामा करुन ठेवला तर काय घ्या, म्हणून तो गप्प बसला होता. तो आपला सहज गेल्यासारखा सम्याकडे गेला आणि म्हणाला,

"और दोस्ता, काय चाललंय, तुमच्यासारख्या भल्या माणसाशी लोक कसंही वागायला लागलेत! आपल्याच माणसानी धोका देण्यासारखं दु:ख नसतं रे! काय पण असं झालं काय की चक्क राहुल्या एकटाएकटा रहायला लागला! एकदम एकता ते एकटा! काय चांगलं नाय राव हे! आपण तर असं नसतं केलं. दोस्ती दुनियादारीत काय भांडणं होत नाहीत का? दोस्तीच्या खात्यावर जमा असतात ते! त्याचा काय इश्यू नसतो करायचा! तसा राहुल्या चांगलाय रे! सध्या कोणीतरी त्याला भडकवलंय! तुला कळू शकतं, नाही का?" - सूचकपणे सुहास बोलला!
       खरं म्हणजे सम्या आणि राहुल्यात कशामुळे बेबनाव झाला होता याबाबत कुणीच ठोस कारण देऊ शकत नव्हतं. असं असं हा हा बोलला, मग तसं तसं तो तो बोलला, असंच काहीसं मुलांमधे चाललेलं होतं. पण सगळ्यांना दिसत होतं की राहुल्या आणि सम्यामधे नक्कीच कशावरुन तरी जोरदार भांडण झालेलं आहे. इतकंच काय, राहुल्या ग्रुपमधल्या बाकीच्या मुलांशीही बोलत नाहीये!

सम्या सुहासकडे बघून फक्त छ्द्मी हसला.
"काये सुहास, तू म्हण की मी म्हण, एकाच नावेतले प्रवासी आहोत रे! तुलापण कुणी तुझ्याशी असं वागलं तेव्हा कसं वाटलं असेल हे मी समजू शकतो! मी सहानुभुती दाखवत नाहीये हं! ती सहवेदना मलाही जाणवतेय!"
सम्याचा रोख स्पष्ट होता.... नेहाकडे! नेहा आणि सुहासचं भांडण झालंय हे सम्याला माहीत होतं. पण त्यानं आपल्याला ही गोष्ट माहीतीये असं सुहासला अजिबात जाणवू दिलं नाही.

"चल यार मला जरा पुस्तकं घ्यायचीयेत सीटीतून! चल माझ्याबरोबर!" - सुहास म्हणाला.
याला पुस्तकंबिस्तकं काही घ्यायची नाहीयेत तर याला काहीतरी बोलायचंय हे सम्याच्या लक्षात आलं.

"चल."

सुहासने गाडीला किक मारली आणि ते गावाबाहेरच्या ढाब्याकडे वळाले.

"अरे इकडे कुठे? इकडे तर हायवे आहे!" -सम्या.

"अबे पुस्तकं कुणाला घ्यायचेत! मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी!" -सुहास.

       ...शेवटी.... आ गया उँट पहाड के नीचे! सम्या मनातच हसला. प्लॅन बरहुकुम चाललेला होता.


(क्रमश:)

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा