सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

तळेगाव गणपती-शिरगाव-देहू

               आठ दिवसांपूर्वी सहज ’चेहेरापुस्तिका’ (फेसबुक) चाळत बसलो होतो. एका मित्राने त्याचा एका मोठ्ठ्या गणपतीजवळचा फोटो डकवला होता. मस्त ठिकाण वाटत होतं, म्हणून त्याला विचारलं की हे ठिकाण कुठलं आहे? त्याने सांगितलं, हा तळेगावजवळचा ’उघडा गणपती’! रस्त्यावरच आहे! झालं! ठरवून टाकलं, हा शनिवार या सत्कारणी लावायचाच! हा गणपती पुण्याहून मुंबईला जाताना रस्त्यावरुन दिसतो, रेल्वेमधूनही आणि रस्त्याने जातानाही!


                शनिवारी सकाळी लवकरच पुण्याहून निघालो. मुंबई-पुणे हायवेला लागलो आणि अर्ध्या तासातच सोमाटणे फाटा पार करुन गणपतीच्या पायथ्याशी पोचलो. शनिवार असल्याने मुंबई-पुणे हायवेला फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे अगदी रमतगमत गाडी चालवूनही अर्ध्या तासात पोचता आलं. पायथ्याशी गाडी पार्क करुन पाय-या चढून वर आलो. सकाळचे पावणेदहा- दहा वाजत होते, त्यामुळे तिथेही गर्दी नव्हतीच. आरामशीर दर्शन झालं. दोन-चार लोक दर्शनाला आले होते. सकाळ असली तरी पितृपक्षाचं ऊन पायाला चटके देत होतं. तिथल्या सिक्युरिटी गार्डकडूनच आमचे फोटो काढून घेतले. वरुन अवतीभवतीचा परिसर खूप छान दिसत होता. नुकताच पावसाळा संपल्याने सगळीकडे हिरवंगार गवत उगवलेलं होतं. त्या गवतात काही छोटी छोटी फुलंही उलमलेली होती. एकंदर मस्त मूड बनवणारं वातावरण होतं. खूप दिवसांनी असं मस्त "फ्रिक आऊट" वाटत होतं. रोजरोजच्या त्याच त्या कामाला उबगून गेल्यावर अशा ठिकाणी मस्त एनर्जी मिळते. आज हा एकदम स्वत: बाहेर जायला कसा तयार झाला या विचाराने बायकोही आश्चर्यचकित झाली होती!

                      (रस्त्यावरुन दिसणारा हिरवागार डोंगर)

                               तिथल्या सिक्युरिटी गार्डला विचारलं की इथून शिरगाव, ज्याला प्रतिशिर्डी म्हणतात ते किती लांब आहे? तिथून शिरगाव फक्त दोनच किलोमिटर होतं. मग काय! चलो शिरगाव! शिरगावला पोचलो. साईमंदिरात फार गर्दी नव्हती. छान दर्शन झालं. तितक्यात बायकोला चिंचांची कॅंडी विकणारा माणूस दिसला! मग काय! "अहो....!!!" कँडी घेतल्या. तिथून परतीच्या प्रवासाला लागलो.




               गणपतीला जाताजाता रस्त्याच्या उजव्या बाजूला आधीच देहू फाटा बघितला होता. बायकोला म्हटलं, काय जायचं का देहूला? ती म्हणे चला! मग तिथून देहू! देहूमधे शिरल्याशिरल्या तिथलं वातावरण बघून आपोआप अंगात वारकरी शिरला! आहाहा... काय मस्त वाटतं सांगू! विठ्ठल मंदिरात दर्शनाला गेलो तो हातातली फुलं आणि तुळशी तिथल्या पुजा-याच्या हातात दिली. पुजारी म्हणाला, "अहो वाहा ना तुम्हीच!" खरंच छान वाटलं. आपण नेहेमी जेव्हा इतर मंदिरात जातो तेव्हा पुजारी आपल्या हातातून खसकन पूजासाहित्य ओढून घेतात आणि एक प्रसादाचा दाणा हातावर टेकवून पुढे ढकलून देतात. मी इथेही हीच अपेक्षा केली होती. पण इथे आम्हाला स्वत:च्या हाताने विठ्ठलाची पूजा करायला मिळाली. नेमकं कसं वाटलं नाही सांगता येणार, पण खूप अंतर्मुख झाल्यासारखं वाटलं. योगायोगाने त्या दिवशी एकादशी होती. ठरवूनही एकादशीच्या दिवशी मंदिरात न जाणारा मी, त्या दिवशी कसाकाय देहूत पोचलो देव जाणे!
                देहूवरुन निघालो तो न थांबता सरळ घरी! फक्त तीन तासात आम्ही तीन ठिकाणी फिरुन आलो. आता ही एनर्जी बरेच दिवस पुरेल! परत डाऊन वाटायला लागलं की परत असंच एखादं ठिकाण एनर्जीसाठी!

बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

अ‍ॅन्ड्रॉईड



      अ‍ॅन्ड्रॉईड ही मोबाईल्ससाठी असलेली चालनप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) आहे. ती खास करुन स्मार्टफोन्स आणि टॅब्लेट पीसींसाठी बनवलेली आहे. तिचा विकास ’ओपन हॅन्डसेट अलायन्स’ ने गुगलच्या नेतृत्वाखाली केला. अ‍ॅन्ड्रॉईड नावाची मूळ कंपनी गुगलने ५ नोव्हेंबर २००७ ला खरेदी केली आणि नंतर वाढवली. अ‍ॅन्ड्रॉईड ही ’ओपन सोर्स सिस्टीम’ आहे. ओपन सोर्स म्हणजे तिचा सोर्स कोड सर्वांना उपलब्ध आहे. त्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. मायक्रोसॉफ्टची विंडोज जशी आपल्याला विकत घ्यावी लागते आणि आपल्याला तिचा फक्त सेट अप मिळतो तशी अ‍ॅन्ड्रॉईड नाही. त्यामुळे अ‍ॅन्ड्रॉईड वाढवण्यासाठी कुणीही त्यात भर घालू शकतं.अ‍ॅन्ड्रॉईड ही लिनक्स कर्नेल वर चालते. कर्नेल म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरचं हार्डवेअर आणि तुम्ही स्थापित (इंन्स्टॉल) केलेले प्रोग्राम्स यातील दुवा.
आज बाजारात अनेक प्रकारचे अ‍ॅन्ड्रॉईड फोन्स उपलब्ध आहेत. ते सर्व मुख्यत: बिझनेस फोन्स किंवा टॅब्लेट पीसी आहेत. त्यावर आपण स्वत: बनवलेले अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन्स टाकू शकतो.

      अ‍ॅन्ड्रॉईडची वैशिष्ट्ये:
      १) हॅन्डसेट लेआऊट्स:
      अ‍ॅन्ड्रॉईड फोन्सची स्क्रीन साईज ब-यापैकी मोठी असते. त्यावर आपण टू डी, थ्री डी अ‍ॅप्लिकेशन्स आरामात वापरु शकतो. (जसे थ्री डी गेम्स.)
      २) स्टोरेज:
      अ‍ॅन्ड्रॉईडमधे स्वत:चा डेटाबेस आहे. त्याला एस्क्युलाईट म्हणतात.
      ३) कनेक्टिव्हीटी:
      अ‍ॅन्ड्रॉईड विविध पद्धतींनी कनेक्ट होऊ शकतो जसं GSM/EDGE, IDEN, CDMA, EV-DO, UMTS, Bluetooth, Wi-Fi, LTE, NFC आणि WiMAX
      ४) भाषा सहाय्य:
      अ‍ॅन्ड्रॉईड वेगवेगळ्या मानवी भाषांमधे काम करु शकतो.
      ५) वेब ब्राऊजर:
      अ‍ॅन्ड्रॉईडकडे चांगला वेब ब्राऊजर आहे.
      ६) जास्तीचा (अ‍ॅडिशनल) हार्डवेअर सपोर्ट
     अ‍ॅन्ड्रॉईड व्हिडिओ/स्टील कॅमेरा वापरु शकतो तसेच टचस्क्रीन, जीपीएस, अ‍ॅक्सिलरोमीटर, गायरोस्कोप,मॅग्नेटोमीटर, डेडिकेटेट गेमिंग कन्सोल, प्रेशर सेन्सर तसेच थर्मोमीटर अशी वैशिष्ट्ये त्यात आहेत.
           याव्यतिरिक्त जावा सपोर्ट, सर्व प्रकारचा मिडिया सपोर्ट (एमपीथ्री/फोर फाईल्स आणि इतर), स्ट्रिमिंग मिडिया सपोर्ट, मल्टिटच, ब्ल्युटूथ, व्हिडिओ कॉलिंग, मल्टिटास्किंग, व्हॉईस इनपुट, टिथरिंग,स्क्रीन कॅप्चर अशी अनेक वैशिष्ट्ये अ‍ॅन्ड्रॉईडची आहेत.

अ‍ॅन्ड्रॉईडवर बाजारात कायकाय उपकरणे उपलब्ध आहेत बघा जरा:

      वापर:
      अ‍ॅन्ड्रॉईडचा वापर प्रामुख्याने स्मार्टफोन्स, नेटबुक, टॅब्लेट कॉम्प्युटर्स, गुगल टीव्ही इत्यादीत होतो. गुगल टीव्ही प्रामुख्याने अ‍ॅन्ड्रॉईडची एक्स८६ ही आवृती वापरते.

अ‍ॅन्ड्रॉईड आवृतींचा इतिहास:

ऑक्टोबर २००३: अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातल्या पाउलो अल्टो येथे अ‍ॅन्डी रबिन, रिक मायनर, निक सिअर्स आणि ख्रिस व्हाईट यांनी अ‍ॅन्ड्रॉईडची मुहुर्तमेढ रोवली.

ऑगस्ट २००५: गुगलने अ‍ॅन्ड्रॉईड कंपनी विकत घेतली.

५ नोव्हेंबर २००७: ’ओपन हॅन्डसेट अलायन्स’ ची स्थापना झाली.

१२ नोव्हेंबर २००७: अ‍ॅन्ड्रॉईडची बीटा आवृती बाजारात आली.

२३ सप्टेंबर २००८: पहिला अ‍ॅन्ड्रॉईड फोन, एच.टी.सी. ड्रीम अ‍ॅन्ड्रॉईडच्या पहिल्या(१.०) आवृतीसह बाजारात आला.यात खालील वैशिष्ट्ये होती.
१) गुगलच्या विविध सेवांबरोबर आदानप्रदान
२) एचटीएमएल, एक्सएचटीएमएल, अनेक एचटीएमएल पेजेसला सहाय्य करणारा वेब ब्राऊजर.
३) अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट वरुन अ‍ॅप्लिकेशन्स उतरवून घेणे (डाऊनलोड करणे) आणि अद्ययावत (अपग्रेड) करणे.
४) मल्टीटास्किंग, इन्स्टंट मॅसेजिंग, वाय-फाय आणि ब्लुटूथ सहाय्य.

९ फेब्रुवारी २००९: फक्त टी-मोबाईल जी१ साठी अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती १.१ बाजारात आली.

३० एप्रिल २००९: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती १.५ बाजारात आली, जी कपकेक या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) अधिक वेगवान कॅमेरा, आणि वेगवान फोटो कॅप्चर
२) अधिक वेगवान जी.पी.एस. यंत्रणा
३) स्क्रीनवरचा की-बोर्ड
४) यातून व्हिडिओ सरळ तूनळी (यूट्यूब) आणि पिकासावर चढवता (अपलोड करता) येत होते.

१५ सप्टेंबर २००९: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती १.६ बाजारात आली, जी डोनट या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) वेगवान शोध यंत्रणा, व्हॉईस सर्च
२) एका क्लिकवर व्हिडीओ आणि फोटो मोडमधे चेंज करता येऊ शकणारा कॅमेरा
३) बॅटरी वापर दर्शक
४) CDMA सपोर्ट
५) अनेक भाषांमधील टेक्स्ट टू स्पीच


२६ ऑक्टोबर २००९: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती २.० बाजारात आली, जी इक्लेअर या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) अनेक ईमेल अकांऊंट्स
२) ईमेल अकांऊंट्ससाठी मायक्रोसॉफ्ट एक्स्चेंजचं सहाय्य
३) ब्ल्युटूथ २.१ सहाय्य
४) नविन ब्राऊजर जो एच.टी.एम.एल. ५ ला सहाय्य करतो.
५) नविन कॅलेंडर

३ डिसेंबर २००९: अ‍ॅन्ड्रॉईडची एस.डी.के आवृती २.०.१ बाजारात आली.

१२ जानेवारी २०१०: अ‍ॅन्ड्रॉईडची एस.डी.के आवृती २.१ बाजारात आली.

२० मे २०१०: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती २.२ बाजारात आली, जी फ्रोयो या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) विजेट्स सहाय्य: विजेट्स म्हणजे छोटे छोटे प्रोग्राम्स असतात जे होमस्क्रीनवर डकवता येतात. उदा: आजपासून ख्रिसमसला किती दिवस बाकी आहेत याचा प्रोग्राम, तापमान दर्शक, येण्या-या महिन्यात तुमच्या फोनबुकमधे असलेल्या कुणाचा वाढदिवस आहे हे सांगणारा छोटासा प्रोग्राम इत्यादी.
२) सुधारीत आदानाप्रदान सहाय्य.
३) हॉटस्पॉट सहाय्य.
४) अनेकविध भाषांमधील की-बोर्ड.
५) अ‍ॅडोब फ्लॅश आवृत्ती १०.१ सहाय्य.

६ डिसेंबर २०१०: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती २.३ बाजारात आली, जी जिंजरब्रेड या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) सुधारित युजर इंटरफेस.
२) जलदगतीने टाईप करता यावं म्हणून सुधारीत की-बोर्ड.
३) एका क्लिकवर सिलेक्ट करता येण्याजोगं टेक्स्ट आणि कॉपी/पेस्ट.
४) जवळील क्षेत्रातील आदानप्रदान (निअर फिल्ड कम्युनिकेशन).
५) इंटरनेट कॉलिंग.

२२ फेब्रुवारी २०११: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती २.३.३ बाजारात आली, तसेच टॅब्लेट पीसींसाठीची अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती ३.० बाजारात आली, जी हनिकोंब या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) ही आवृत्ती खासकरुन टॅब्लेट पीसींसाठी आणि मोठ्या स्क्रीनच्या फोन्ससाठी बनवली गेली.
२) सुधारीत मल्टीटास्किंग, बदलता येण्याजोगी होमस्क्रीन आणि विजेट्स.
३) ब्लुटूथ टिथरींग
४) चित्रे/व्हिडीओ पाठवण्याची अंतर्गत सोय.

१०-११ मे २०११: गुगलने अ‍ॅन्ड्रॉईडच्या ’आईस्क्रीम सॅंडविच’ आवृत्तीची घोषणा केली.

१८ जुलै २०११: अ‍ॅन्ड्रॉईडची एस.डी.के आवृती ३.२ बाजारात आली.

असा अ‍ॅन्ड्रॉईडचा इथपर्यंत प्रवास झाला. आता आपण अ‍ॅन्ड्रॉईडचा बाजारपेठेतला हिस्सा पाहूया.

बाजारपेठेतला हिस्सा:
१२ नोव्हेंबर २००७: अर्धा टक्का.
३ डिसेंबर २००९: ३.९ टक्के.
२० मे २०१०: १७.७ टक्के.
१०-११ मे २०११: २२.२ टक्के.

ही अ‍ॅंन्ड्रॉईडची फक्त तोंडओळख आहे.

संदर्भ: http://www.xcubelabs.com/

रविवार, ११ सप्टेंबर, २०११

मीमराठी.नेट कविता स्पर्धा (द्वितीय क्रमांक) कविता

        १ एप्रिल २०११ ते १५ मे २०११ या कालावधीत मी मराठी.नेट ने कविता स्पर्धा २०११ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल १५७ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
       काल दिनांक १०/९/२०११ रोजी जाहीर झालेल्या निकालात माझ्या खालील कवितेला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

       कधीतरी लहर लागली म्हणून चार ओळी खरडणा-या, साहित्याचा आणि व्यवसायाचा दुरान्वयेही संबंध नसलेल्या माझ्यासारख्या एका साध्या माणसाला या निकालाने एक नविन आत्मविश्वास दिला आहे, त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी मीमराठी.नेटचे संचालक श्री. राज जैन, माझा उत्साह वाढवणारे मायबाप वाचक आणि परिक्षक श्री. प्रदीपजी निफाडकर यांचा मनापासून आभारी आहे.

               खूप झालं!

मी चंद्र-तारे आणायच्या गोष्टी करत नाही,
डाळ-तांदूळ आणता आले, खूप झालं!
                तू नाही दिसत ऐश्वर्यासारखी! हरकत नाही,
                पण एकदम आवडलीस, खूप झालं!
काचेचं शमादान मी नाही लावू शकत छताला,
पावलापुरता प्रकाश येतोय,खूप झालं!
                नको करूस पक्वान्न पंचतारांकीत हॉटेलमधली,
                दोन वेळचं रांधता येतं तुला? खूप झालं!
मला नाही जमणार तुला न्यायला लॉंग ड्राईव्हला,
ऑफिसपर्यंत सोडता आलं, खूप झालं!
                तुला नाही समजली माझी कविता? चालेल!
                हिशोब समजतोय ना? खूप झालं!
नसू आपण रोमिओ-ज्युलिएट, वा नसू शिरी-फरहाद,
दोन श्वास, एक प्राण? खूप झालं!
                -आदित्य चंद्रशेखर

-पूर्वप्रकाशित: http://mimarathi.net/node/6228

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०११

गणपती... एक पाहणे

"अहो, आपण गणपती बघायला जाऊयात ना!" इति सौ. उवाच.
"जाऊ ना, आपल्या एरियात खूप सारे गणपती आहेत. चालत चालत बघितले तरी तासाभरात आटोपतील".
"इथले नाही काही, पुण्यातले! आपल्या सांगवीत असून असून किती गणपती असणारेत?"
     "पुण्यातले? शक्य आहे का?"
     "का, काय झालं? पुण्यात गणपती नाहीयेत का?"
     "आहेत ना, पण मरणाची गर्दी आहे!"
     "मग काय झालं? आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी गाडी पार्क करु आणि बघू गणपती!"
     "थांब मला विचार करु दे!"
     "तुम्ही नंतर विचार करत बसा, आधी जायचं की नाही ते सांगा!"
     "बरं जाऊ!"
             मला आठवायला लागलं आम्ही लहानपणी गणपती बघायला जायचो ते. बाबांना ते सकाळी ऑफिसला निघाले असतील तेव्हाच आठवण करुन द्यायची,"बाबा, संध्याकाळी लवकर याल ना? आपल्याला गणपती बघायला जायचंय!" बाबांचा चेहेरा क्षणभर विचारमग्न व्ह्यायचा! पण लगेच ते म्हणायचे,"चालेल, मी येतो लवकर, पण तयार रहा हं, लगेच निघूयात!" इतका आनंद व्हायचा सांगू! तेव्हा वाटायचं की बाबा इतका कसला विचार करतात हो म्हणायला, आता कळतंय, की आज जर लवकर यायचं तर ऑफिसमधल्या कामाची संगती कशी लावायची याचा ते विचार करत असायचे. बिचारे अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी दुस-या दिवशी लवकरच ऑफिसला जायचे. आमच्या चेहे-यावरचा आनंद लोपू नाही म्हणून ते काहीही करायला तयार असायचे.
             संध्याकाळी पाच-साडेपाचला आम्ही शाळेतून आलो की आई म्हणायची, "लवकर आटपा रे, आत्ता बाबा येतील!" आम्ही पटापट हातपाय धुवून मस्तपैकी नवे कपडे घालून पटकन तयार व्हायचो. आमची तयारी झाल्याझाल्या बाबा आले नाहीत तर लगेच आमची टकळी चालू, "आई.... बाबा केव्हा येतील? आम्हाला तयारी करुन ठेवायला सांगीतली आणि अजून स्वत:च आले नाहीत!"
आई सांगायची, "येतील रे पाच मिनिटात, काही काम आलं असेल!"
"नाही काही, त्यांनी लगेच यायला हवं!"
"अरे काम असतं ना ऑफिसात, येतीलच इतक्यात!"
             तेवढ्यात बाबा पोचायचेच! आम्ही लगेच, "बाबा चलायचं ना!"
"अरे हो, बाबांना हातपाय तर धुवू देशील!" आम्ही नाखूषीनेच बाबांच्या तयारीची वाट बघत बसायचो.
लगेच आम्ही घराला कुलूप लावून निघायचो! निघतांना चेहे-यावर असा आनंद असायचा की जसं आम्ही वर्ल्डकप जिंकून आणलाय!
             "बाबा, आज साता-यातले बघू ना! (सातारा हे आमच्या गावातल्या एका भागाचं नाव आहे) जामनेर रोडचे उद्या बघू!" बाबांचे कितीही पाय दुखत असले तरी त्याची पर्वा न करता आम्ही दोघं भाऊ आपले त्यांना ओढतच साता-यात घेऊन जायचो. रस्ताभर नुसते गणपती बघणारे लोक सांडलेले असायचे. कुणी गाडीवरुन अख्ख्या फॅमिलीला फिरवत असायचे,(मी विचार करायचो, इथे इतक्या गर्दीत चालता येत नाहीये, आणि हे लोक गाडीवरुन कसे काय फिरु शकतात? चालवणा-याचीही कमाल आहे. गावातले रस्ते असून असून किती रुंद असणारेत?)कुणी पायीच फिरत असायचे. आमच्यासारख्या पोराटोरांचा आनंद तर गगनात मावत नसायचा! हा गणपती बघू की तो, असं व्हायचं. ब-याच ठिकाणी कापडी गुहा केलेली असायची. त्यात आत जाऊन गणपतीचं दर्शन घ्यावं लागायचं. तिथेही रांग असायची. आतलं डेकोरेशन मात्र खरंच डोळ्याचं पारणं फेडणारं असायचं. काही ठिकाणी ट्रीक सीन्स असायचे, जसं एखाद्या मुलाचं फक्त मुंडकच दिसायच, बाकी शरीर गायब! नळातून जोरात पाणी वाहतांना दिसायचं पण फक्त नळ दिसायचा, बाकी जोडणी दिसायचीच नाही! पूजेच्या ताटातून फक्त पंजापर्यंतचा हात वर यायचा, ते ताट एखाद्या स्टूलावर ठेवलेलं असायचं, पण तो हात कुणाचाय हे दिसायचंच नाही! असे अनेक ट्रीक सीन्स असायचे. आम्ही ते बघतांना अगदी दंग होऊन जायचो. काही ठिकाणी कठपुतळ्यांचा खेळ असायचा. त्यांचा नाच बघून खूप खूप हसू यायचं. जिथे आम्हाला काही दिसायचं नाही तिथे बाबा आम्हाला कड्यावर घेऊन डेकोरेशन दाखवायचे. सगळीकडे अगदी जत्रेसारखं वातावरण असायचं. बाबांच्या मागे लागून एखादा फुगा, बासरी असं काहीबाही आम्ही विकत घ्यायचोच! बासरी म्हणजे माझा जीव की प्राण होती. लहानपणी किती बास-या घेतल्यात त्याची गणतीच नाही. कालच विकत घेतलेली बासरी दुस-या दिवशी माझाच पाय पडून चकनाचूर व्हायची, आणि मी पायात काच घुसल्यासारखा भोंगा ताणायचो!
             गणपती बघून आम्ही रात्री साडेनऊ-दहाच्या आसपास घरी पोचायचो. येताना पूर्ण रस्ताभर कुठला गणपती छान होता आणि कुठलं डेकोरेशन मस्त होतं यावर चर्चा चालत असे. घरी आल्यावरही तेच. आई जबरदस्तीने आम्हाला जेवायला उठवायची. जेवण करुन आम्ही गणपतीबद्दल गप्पा करत झोपून जायचो.
             सकाळी शाळेत मुलं एकमेकांना फुशारक्या मारत सांगत आम्ही काल असा गणपती पाहिला आणि तसा गणपती पाहिला. एखादा भारी वर्णन करु लागला तर बाकीचे त्याच्याकडे कौतुकमिश्रित आश्चर्याने बघायचे. मग सांगणा-यालाही चेव चढायचा. तोही असं अतिरंजित करुन वर्णन करायचा. पूर्ण दहा दिवस शाळेत मुलांना गप्पांना दुसरा विषय नसायचा.
             लहानपणी गणपती बघायला जाताना जो आनंद असायचा तो हळूहळू कमी होत गेला, पण जेव्हा केव्हा काही वर्षांनी माझी मुलं मला म्हणतील,"बाबा, आज लवकर याल ना? आपल्याला गणपती बघायला जायचंय!", तेव्हा मीसुद्धा मनाने माझ्या बालपणात जाऊन येईन आणि परत एकदा "गणपती बघायला" जाऊन येईन!

सोमवार, ५ सप्टेंबर, २०११

सुफी गीते...

               सुफी हा इस्लाम धर्मातला एक पंथ आहे. त्यांची तत्वे परंपरागत इस्लाम धर्मापेक्षा खूप वेगळी आहेत. त्यामुळे हा पंथ मूळ इस्लाम धर्मापासून थोडासा तुटलेला आहे. सुफी पंथात ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींसारखे अनेक महान संत होऊन गेले.आजही अजमेरला त्यांच्या दर्ग्यावर सर्वधर्मींयांची रीघ लागलेली दिसून येते.
                          या सर्व संतांनी समाजाला दिलेली अनमोल देणगी म्हणजे त्यांच्या गीतरचना! ईश्वराला आळवण्यासाठी त्यांनी अनेक चांगल्या चांगल्या रचना रचल्या, जसे आपल्या हिंदू संतांनी अभंग रचलेत. आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाण्यांमधे त्यांच्या गीतांचा वापर केला गेलेला आहे. काहीही असो, कुणीही लिहिलेली असोत,पण ही गीते कानाला खूप सुमधुर वाटतात. ही गीते ऐकतांना मनावर एक धुंदी चढते आणि गाणं संपल्यावरही ही धुंदी कित्येक तास मनावर असते. उदाहरणादाखल खालील गीते बघा... नक्कीच ही तुमची आवडती गीते असतील.
१) मौला मेरे मौला
२) ख्वाजा मेरे ख्वाजा दिल मे समा जा
३) पिया हाजी अली
४) तेरी दिवानी
५) आफ़्रीन आफ़्रीन
६) दमा दम मस्त कलंदर
७) धागे तोड लाओ चांदनी से नूर के
८) बुल्ला की जाना मै कोन
९) मै जहाँ रहू... मै कहीभी हूँ
१०) अल्ला के बंदे हस दे
११) ओ रे पिया
१२) लागी तुमसे मन की लगन...
१३) जिया धडक धडक जाये
१४) रूठे यार नु मना ले
१५) छन से जो टूटे कोई सपना
१६) झुले झुले लाल
१७) किन्ना सोना तेनु रब ने बनाया
१८) आज मेरा जी करदा
१९) लंबी जुदाई
                          अजूनही बरीच गाणी आहेत. मला कधीकधी खूप उदास वाटत असलं की मी ही गाणी ऐकतो, मन अगदी प्रसन्न होऊन जातं. तुम्हीही अनुभव घेऊन बघा!

गुरुवार, १ सप्टेंबर, २०११

गणपती बाप्पा मोरया!



बाप्पा, आज तुम्ही आलात. मागच्या वर्षी तुम्हाला "पुनरागमनायच" म्हटल्यापासून या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पहात होतो. दरवर्षी आम्ही आनंदाने तुम्हाला घरी आणतो, दहा दिवस तुमची बडदास्त ठेवण्यात कसे निघून जातात हेसुध्दा कळत नाही. या दहा दिवसात तुम्हाला आम्ही आमच्यातलं प्रेम, माणुसकी, हेवेदावे कसे आहेत ते सगळं सगळं दाखवतो आणि साकडं घालतो की हे गणराया, आम्हाला सुबुद्धी दे, हे दे, ते दे आणि काय काय दे. पण परत तुम्ही पुढच्या वर्षी बघता की आमच्यात तसूभरही फरक पडलेला नसतो. देवा, आम्हाला माहीतीये की आम्ही सुधारायचं मनावर घेतल्याशिवाय परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही. पण बाप्पा, ’कळतं पण वळत नाही’ अशी आमच्या सर्वांची अवस्था आहे. तेव्हा बाप्पा, यंदा तरी आम्हाला कळालेलं वळायची बुध्दी दे हेच मागणं आहे!

गणपती बाप्पा मोरया!



(चित्र आंतरजालावरुन साभार)

सोमवार, २९ ऑगस्ट, २०११

वडापाव



       सध्या मस्त पाऊस चालू आहे,गरमागरम भजी खायची इच्छा होतेय,मस्त कॉफी पीत खिडकीत बसून पाऊस बघावासा वाटतोय! पण... ऑफिस! जाऊ दे!
       अशा वातावरणात मस्त गरमगरम वडापाव मिळाले तर काय मजा येईल! आहाहा...
आमच्या गावी एक वडापाववाला आहे, घाशीलाल त्याचं नाव! घाशीलालचा वडापाव आमच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. चार भाऊ मिळून ते दुकान चालवतात. प्रत्येक भाऊ महिन्याचा एक एक आठवडा दुकान चालवतो. त्या आठवड्याचा खर्चही त्याचा आणि येणारं सर्व उत्पन्नही त्याचंच! असे महिन्याचे चारही आठवडे त्यांनी वाटून घेतलेत. मस्त एक आठवडा बिझनेस करायचा आणि तीन आठवडे आराम, तरीही प्रत्येक भावाची गणना गावातल्या श्रीमंतांमधे होते, इतकं ते एका आठवड्यात कमवतात. त्या दुकानात कधीही जा, वडापाव घ्यायला रांग असते. आपला नंबर यायला किमान पंधरा मिनिट तरी लागतात इतकी गर्दी असते. घाशीलालच्या वडापावचं हेच वैशिष्ट्य आहे. त्याच्याकडचा वडा म्हणजे काही साधासुधा नसतो, तर आपण जनरली जेवढया साईजचा वडा बघतो, त्याच्या दुप्पट तरी त्याची साईज असते. आणि एकदम तिखट! दिवसाला दोनेक हजार वड्यांची तरी विक्री होतेच होते. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी हा आकडा अजून वाढतो.
      आम्ही शाळेत असतांना सकाळी सात वाजता टेक्निकल हायस्कूलला जायचो तेव्हा त्याच्या दुकानासमोरुन जावं लागायचं. तेव्हा त्याच्याकडच्या लोकांची वड्याचं मिश्रण बनवण्याची लगबग चालू असायची. एका मोठ्या काहीलीत बटाटे उकळत असायचे. दोन जण खाली बसून खलबत्यात मिरची आणि आलं कांडत बसलेले असायचे. त्यांच्या बाजूला मिरची आणि आल्याचं पोतं पडलेलं असायचं. एक जण पोतंभर कांदे चिरत बसलेला असायचा. शंभर किलोच्यावर तरी वड्याचं मिश्रण सकाळी आठ वाजेपर्यंत तयार असायचं. त्यानंतर मोठ्या चुलाणावर मोठ्ठी कढई चढवून आचारी वडे बनवायला बसायचे. तोपर्यंत तीस-चाळीस तरी गि-हाईकं दुकानात आलेलीच असायची. एका वेळेस ते साधारण शंभरेक वडे तळत असत. वडे काढले रे काढले, की दोन वेटर्स ते गरमागरम वडे लगेच बांधून गि-हाईकांच्या ऑर्डर्स पु-या करत असत.
       ह्या वड्यांचा सगळ्यात मोठा ग्राहकवर्ग म्हणजे हातावर पोट असलेला कामगारवर्ग! बांधकामावर काम करणारे मजूर, विटभट्ट्यांवर काम करणारे कामगार, बाहेरगावच्या ट्रकचे ड्रायव्हर्स हे नेहेमी हे वडे नेतात. त्या वड्याची साईजच इतकी मोठी असते की एक-दोन वड्यात एका वेळेचं पोट भरतं. ट्रक ड्रायव्हर्स आले की त्यांची ही वडे खाण्याची कॅपेसिटी बघावी, जिथे एक वडा खाता आपल्याला थोडं होतं तिथे हे ड्रायव्हर्स बिनधास्त आठ आठ वडे खातात. त्या वड्यांबरोबर मस्तपैकी लसनाची चटणीही असते, पण मुळात वडाच इतका तिखट असतो की सहसा चटणी खायच्या फंदात कुणी पडत नाही.
      आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निवासी वर्गांना जायचो तेव्हा दुस-या दिवशी निघतांना आमच्या सिनिअर्सकडून सगळ्यांना नाष्टा असायचा. आणि नाष्टा ठरलेला असायचा, तो म्हणजे घाशीलालचा वडापाव! इतका भरपेट नाष्टा झाल्यावर जेवणाचे बारा वाजणार हे ठरलेलंच असायचं. कुणाच्या घराचं बांधकाम चालू असेल तर तिथले मजूर मालकाला म्हणायचे, "साहेब जरा वडे आणि जिलबीचं बघा ना!". त्यांना घाशीलालचे वडे आणि थोडीशी जिलबी आणून दिली की ते पण खूष आणि आपणही!
      खरं तर ह्या वड्यांनी खूप लोकांचा एका वेळचा पोटाचा प्रश्न सोडवलाय! हमाल असू द्या, हातगाडीवाले असू द्या, मजूर असू द्या, क्लासच्या घाण्याला जुंपलेले विद्यार्थी असू द्या, किंवा कुणीही सामान्य मध्यमवर्गीय असू द्या, जिभेला चव आणि वेळोवेळी पोटाला आधार ह्या वड्यांनीच दिलाय, फक्त माझ्या गावातच नाही, सगळीकडेच! मुंबईकरांचा ’वडा’ हा एकदम जिव्हाळ्याच्या विषय आहे. कुणी त्याचा ’शिववडा’ करुदेत, नाहीतर आणखी काही, वडा आणि सामान्य माणूस एकमेकांना कधीच सोडणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे!

(चित्रे आंतरजालावरुन साभार)



शुक्रवार, २९ जुलै, २०११

"बाळा हळूच रे!"


"बाळा हळूच रे!"
      सध्या हाच घोष सगळीकडे ऐकू येतोय! आपल्याला आपल्या लहानपणी जे हाल सोसावे लागले ते आपल्या मुलांना सोसावे लागू नयेत ही प्रत्येक आईबापाची इच्छा असते. त्यात वावगं काहीच नाही, पण ही काळजी घेतांना आपलं मूल किती पंगू आणि परावलंबी होतंय हे त्यांच्या कधी लक्षात येणार?
निमित्त होतं एका लग्नाचं. मी जवळच्याच नात्यातल्या एका लग्नाला गेलो होतो. माझे दोन-चार वर्षांपूर्वी लग्न झालेले भाऊ-बहिणही लग्नाला आले होते. प्रत्येकाच्या कड्यावर किमान एक तरी कॅलेंडर होतं. घरचंच लग्न म्हटल्यावर दोन-चार दिवस आधीच सगळे आलेले होते. सगळे भाऊ-बहिण आपल्या इथल्याच मातीत वाढून गेलेले, एकत्र खेळलेले, गुढगे फोडून घेतलेले, मनसोक्त मातीत लोळलेले! पण त्यांचं पिल्लू कडेवरुन खाली उतरलं रे उतरलं की,"बाळा तिकडे मातीत नको जाऊस! तुझ्या पायाला माती लागेल! छी: छी: असते माती!"
       अरे! माती छी: छी: कधीपासून झाली? ज्या मातीत तुम्ही लहानाचे मोठे झालात ती माती छी: छी:? तुम्ही, किंबहुना आपण सगळे लहानपणी मातीत, चिखलात जो धुडगूस घालायचो तो विसरलात? मातीला विसरलात? तेव्हा आपले आईवडिल बघायचेही नाहीत की मुलं काय करताहेत आणि कुठे खेळताहेत? अंगाला माती लागल्याशिवाय मोठं होता येतं? आम्ही तरी नाही झालो. तुम्हाला असं कसं वाटतं की मातीशिवाय तुम्ही मोठं होऊ शकता! शक्यच नाही!
      मुलांना जपणं हा वेगळा विषय आहे आणि अति जपणूक हा वेगळा विषय आहे. आज तुम्ही मुलांना मातीपासून दूर ठेवत आहात आणि जर उद्या मुलं मातीला विसरलीत, नव्हे ती विसरतीलच, तर तो दोष त्यांचा नाही, तुमचा आहे! खडे बोचल्याशिवाय त्यांना बोचणं म्हणजे काय हे कळणारही नाही. अशी कचकड्याची खेळणी उद्या जगाच्या बाजारात किती टिकाव धरू शकतील? त्यांचा पायाच कमकुवत राहतोय! एक गोष्ट नक्की की तुम्ही तुमच्या मुलांना जगातल्या सर्वोत्तम सुखसुविधा देऊ शकता, पण त्यांचं स्वत:चं असं आकाश? ते तर त्यांनाच निर्माण करावं लागणार आहे ना? की ते बापाच्या खिशातून पैसे घेतले आणि आणलं विकत इतकं सोपं आहे? तुम्ही आज ज्या ठिकाणी पोचला आहात तिथपर्यंत पोचण्यासाठी तुम्ही अपार मेहनत केली आहे, प्रचंड कष्ट केलेले आहेत, पण याचा अर्थ तुमच्या मुलांना तुम्ही सगळं काही रेडीमेड द्यावं असा मुळीच होतं नाही. बोचू द्या ना त्यांनाही एखादा काटा, एखादा दगड! फुलं फक्त तोडण्यासाठी नसतात हेही दाखवा त्यांना जमल्यास! झाडावर फूल येण्याची प्रक्रिया कशी घडते हेही कळूदेत त्यांना! त्यासाठी आधी तुम्ही निसर्गात जायला हवं! पण तिथेही माती आहेच ना! छी: छी:! मग कसं जाणार तुम्ही? निसर्गात जायचं म्हणजे तुमची कशी एक वन-डे ट्रीप असते. स्वत:च्या, मित्राच्या कारने किंवा एखादी भाड्याची गाडी करुन जवळपासच्या एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जायचं, मस्त धिंगाणा घालायचा, भरपूर फोटो काढायचे आणि घरी आल्यावर किंवा जमल्यास तिथूनच फेसबुकवर अपलोड करायचे! झालं तुमचं निसर्गदर्शन!
कुठल्या एकत्र यायच्या ठिकाणीही, जसं लग्नात, सगळ्या ताया, वहिन्या आपापल्या मुलांना कड्यावर गॅसबत्तीसारखं घेऊन फिरणार! "काय करू रे तो/ती ऐकतच नाही ना!" त्या लहान पोरांचंही सारखं आपलं "अ‍ॅ अ‍ॅ अ‍ॅ" चालूच! त्यांचंही काही चुकत नाही! तुम्ही जर त्यांना माणसंच दाखवली नाहीत तर अशा ठिकाणी ती बावरणारच! त्यांना आंजारुन-गोंजारुन, वेळप्रसंगी रागावून तुम्ही मोकळं खेळायला लावू शकत नाही? आजच्या नव्वद टक्के आयांना आपल्या मुलांना रागवणं आवडत नाही! त्या स्वत: तर रागवत नाहीतच पण कुणी रागावलं की आधीच यांना राग येतो! आधीच ते एकटं मूल असल्याने लाडाने वेडं करुन ठेवलेलं असतं, आणि वरुन तुम्हीची त्याचे फालतू लाड करा हे यजमानांना सांगणं! तो बिचारा यजमान आधीच आपल्याकडच्या कार्याने वैतागून गेलेला असतो, त्यात आणखी ही भर! बरं ही उपद्यापी कार्टी बरोब्बर घरातलं किमती सामान हेरतात आणि त्याची नासधूस सुरु करतात! बरं त्यांना रागावलं की त्यांच्या आधीच त्यांच्या आया घर डोक्यावर घेतात. एखादं पोरगं चुकुन रडलंच तर कसा प्रलय झाल्यासारखी भीती त्याच्या आईबापांना वाटते, ते तरी रडल्याशिवाय मोठे झालेले असतात का? आपण जेव्हा लहान होतो तेव्हा किती वेळा धडपडलोय, पडलोय आणि म्हणून जगात अजूनही टिकून आहोत!
       मुलांना मोकळं खेळू द्या! पडू द्या! मातीत लोळू द्या! आणि महत्वाचं म्हणजे ते या समाजाचेही भाग आहेत हे त्यांच्या मनावर बिंबवायलाच हवं! त्याकरता तुम्ही जरा सोशल व्हा! त्यांना सांगा, तू हरलास तर मी तुझ्या पाठीशी आहे, पण मी तुला रेडीमेड काहीच देणार नाही! लढ बाप्पू लढ!

    बाय द वे, तुम्हाला काय वाटतं?


    --चित्रे आंतरजालावरुन साभार


सोमवार, २५ एप्रिल, २०११

विकतचं सुख

परवा मी आणि बायको सहज म्हणून मॉलमधे गेलो होतो. घ्यायचं असं काहीच नव्हतं, पण जस्ट टाईमपास म्हणून! तिथे एक मुलगा आला, असेल वीसेक वर्षांचा! व्यवस्थित कपडे घातलेला, केस चांगले चापूनचोपून व्यवस्थित बसवलेला आणि चेहे-यावर ब-यापैकी आत्मविश्वास असलेला! आला तो सरळ माझ्याकडे!
"सर एक काम होतं." -तो.
"काय?" -मी.
"सर प्लीज हा फॉर्म भरुन देता का?"
"का?"
"सर मी अबक कंपनीकडून आलेलोय. आमची एक प्रमोशनल ऑफर आहे. त्याबद्दल आम्ही एक लकी ड्रॉ काढतोय. त्यासाठी तुमची माहीती हवी होती. फक्त नाव आणि मोबाईल नंबर द्या!"
"बरं मग मीच का?"
"तसं नाही सर, इथे येणा-या रॅन्डम लोकांकडून आम्ही फॉर्म भरुन घेत आहोत. यात जर तुमचा नंबर लागला तर आम्ही तुम्हाला तसं फोन करुन कळवू! यात तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे!"
"एक विचारु, हा डेटाबेस विकण्याचा तर प्लॅन नाही!" माझं डोकं आधीच्या आधीच निगेटीव्ह चालायला लागलं!
"नाही सर, विश्वास ठेवा!" त्याच्या चेहे-याकडे बघून हा तितका बनेल असेल असं काही मला वाटलं नाही. म्हटलं याला जरी माहिती दिली तर हा फार फार तर काय करेल, एखाद्या कंपनीला माहिती विकून पैसे कमवेल. ती कंपनी आपल्याला कॉल करेल, सर ही ऑफर आहे, ती ऑफर आहे, असं आणि तसं! आपण अशा ऑफर्सला नाही सांगू शकतो. असा विचार करुन मी त्याला फॉर्म भरुन दिला.
ही गोष्ट मी विसरुनही गेलो. रविवारी सकाळी त्यांचा फोन आला.
"सर मी अबक कंपनीमधून अमुक अमुक बोलतेय. काल तुम्ही अमुक अमुक मॉलमधे कूपन फॉर्म भरुन दिला होता का?" - एक नाजूक आणि मंजूळ आवाज.
"हो, का?"
"सर अभिनंदन! तुमच्या कुपनला बक्षिस लागलंय! आज तुम्ही आणि तुमच्या मिसेस बक्षिस घ्यायला येऊ शकता का? आज संध्याकाळी पाच वाजता अमुक अमुक ठिकाणी... मी तुम्हाला पत्ता एसएमएस करते. तुम्हाला एक बाऊल सेट आणि पंचवीस हजार रुपयांचं एक गिफ्ट हॅम्पर मिळालेलंय!"
मी अजून धक्क्यातून सावरतच नव्हतो! इतकं मोठं बक्षिस! मला... का पण? काही कळेचना! बायकोला सांगितलं. तिलाही खूप आनंद झाला! शेवटी विचार केला जाऊन तर बघू! हे प्रकरण काय आहे हे तिथे गेल्यावरच कळेल. तेव्हाच त्या नाजूक आवाजाला सांगून टाकलं की आम्ही येतोय. तरीही डोक्यात किडा वळवळतच होता की हे नक्की असं काही नाहीये! देव माझ्यावर इतका मेहेरबान नक्कीच नाहीये! काहीतरी वेगळंच आहे हे!
तिथे गेल्यावर बघितलं तर आमच्यासारखे अनेक कपल्स तिथे आले होते. सगळ्यांच्या चेहे-यावर उत्सुकता आणि आनंद दिसत होता. अनेक टायधारक इकडून तिकडे फिरत होते. त्यांच्या हातात ब-याचशा फाईल्स होत्या. आतमधे एक हॉलमधे बरेचसे टेबस मांडून ठेवलेले होते. वरवर पाहता ते एखाद्या रेस्टॉरंटसारखं वाटत होतं. आम्हाला एका टायवाल्याने आत नेलं आणि एका टेबलावर बसवलं. तोही आमच्यासमोर बसला.
"सर हे काय आहे तुम्हाला काही कल्पना आहे का? की आम्ही हे गिफ्ट का देत आहोत?" -टायवाला.
"हो. ही तुमची सेल्स प्रमोशनल ऑफर आहे!" -मी.
"बरोबर सर! तुम्ही आमच्या कंपनीचं नाव आधी कधी ऐकलं आहे का?"
"नाही!"
मग जवळजवळ अर्धा तास तो ही कंपनी कशी आंतरराष्ट्रीय आहे, जगभरात तिच्या किती शाखा आहेत हे गुणगान करत होता. त्याने आम्हाला बरेच प्रश्नही विचारले जसं तुम्हाला फिरायला आवडतं का? आतापर्यंत कुठेकुठे फिरला आहात? काय करता? वार्षिक उत्पन्न किती ?(इथे माझ्या भुवया मनातल्या मनात उंचवल्या गेल्या!) मग त्याने सांगितलं की ही कंपनी किती मोठी आहे, आम्ही तुम्हाला ह्या कंपनीची लाईफटाईम मेंबरशिप देऊ करतो आहोत. कालपर्यंत आम्ही दहा हजार कूपन्स वाटली आहेत. त्यातून आम्ही शंभर भाग्यवान विजेते निवडलेले आहेत. त्यात तुम्ही एक आहात. तर जर तुम्ही या क्लबचे मेंबर झालात तर आम्ही तुम्हाला ह्या ह्या सुविधा पुरवू. ह्या सुविधा जगभर आहेत. तुम्हाला आमच्याकडून सौना बाथ, जाकुझी आणि ब-याच काही सुविधा मोफत आहेत. असं बरंच बरंच काही त्याने सांगितलं. आणि अजून एक....
"यासाठी तुम्हाला इतके इतके पैसे भरावे लागतील. ते तुम्ही हप्त्यातही भरु शकता." ती रक्कम जवळजवळ दोनेक लाखांच्या घरात जात होती. आणि याच प्रश्नाची मी वाट बघत होतो की हा मुद्याचं कधी बोलतो!
मी त्याला म्हटलं,"एक प्रश्न विचारु?"
"विचारा."
"तुम्ही सौना बाथ घेतलाय कधी?"
"नाही. का?"
"त्यावाचून तुमचं काही अडलं का?"
"नाही!"
"मग माझं काय अडणार आहे? हे फक्त एक उदाहरण झालं. यातल्या किती गोष्टींचा आपल्याला खरंच गरज असते? आज मी जगभर, जगभर जाऊद्या भारतभर फिरायला कधी जाणार आहे, उद्या मी काय करणार आहे हेच मला माहीत नाही, तर मी या वर्षी, पुढच्या वर्षी कुठे फिरायला जाणार हे आत्ताच कसंकाय सांगू शकतो? मी रोज ऑफिसमधे येऊनजाऊन तीस किलोमीटर फिरतो. दर महिन्यातून एकदा माझ्या मूळ गावी जातो. ते इथून साडेचारशे किलोमीटर आहे, म्हणजे जाऊनयेऊन नऊशे किलोमीटर,अशा सरासरीने मी रोज जवळजवळ साठ किलोमीटर फिरतो. मग मला सांगा, इतकं रोज फिरल्यावर मी मला यावर्षी फिरायला अमुक अमुक ठिकाणी जायचंय असं ठरवू शकतो का? तुम्ही मला वर्षातून आठ वेळा समारंभासाठी हॉल फुकट वापरायला देऊ करताय, खरंच मी वर्षातून आठ समारंभ तिथे करणार आहे का? तुम्ही केले असते का? बरं त्या हॉलच्या व्यावसायिक वापराला तुमचा नकार आहे! मग मी हॉल घेऊन काय करु? पैसे म्हणाल तर तो प्रॉब्लेम मला नाहीचे! पण गरज वेगळी आणि हौस वेगळी!" यावर मात्र तो निरुत्तर झाला.
खरंच विकतच्या अशा सुखाची गरज असते का? मी जर उद्या अशा ट्रीपला गेलो आणि जर माझ्या डोक्यात हाच विषय असला की या महिन्याचा हप्ता मी कसा भरु, इतके पैसे तर आज माझ्याकडे नाहीयेत, तर मी त्या ट्रीपचा आनंद खरंच लूटू शकेन का? माझ्या उत्पन्नातला काही भाग मी मौजमजेवर जरुर खर्च करेन, पण किती, कुठे आणि केव्हा हे देखील मीच ठरवेन की नाही? आपण खूपदा गरजा विकत घेतो, त्याबदल्यात आपलं सुख, आपली मन:शांती आपण देऊन टाकत असतो. हा प्रसंग तर एक उदाहरण होता. असे अनेक मोह आयुष्यात येतच असतात. नि:संशय त्यांची स्कीम चांगली होती, पण मला तरी ती अनावश्यक वाटत होती. आज पैसे द्यायचे, ती स्कीम विकत घ्यायची, तिचा हप्ता मागे लावून घ्यायचा, कुणी सांगितली ही कटकट? मी क्रेडिट कार्ड वापरत नाही. त्याचे बरेच फायदे आहेत मला मान्य आहे, पण ते हातात आल्यावर आपलाच आपल्या खर्चावर लगाम राहील याची खात्री कुणी द्यावी?
आज संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर घरात जे घरपण जाणवतं ते मला बाहेर जाणवणार आहे का? मला ट्रीपला जायचं झालं तर मी जवळपास कुठेतरी दोनचार दिवसांकरता जाऊन येऊ शकतो. त्यासाठी मला ऋण काढून सण करण्याची अजिबात इच्छा नाही.
आपल्या गरजा आणि आपल्याला उपलब्ध होऊ शकणा-या सुविधा, यात कुठेतरी एक धूसर सीमारेषा असते. त्या सीमेवर आपला प्राधान्यक्रम लोंबकळत असतो. आपल्याला जर आपला प्राधान्यक्रम ठरवता आला तर जगण्यातले अर्धेअधिक प्रश्न सोपे होतील! तुम्हाला काय वाटतं?

शुक्रवार, २२ एप्रिल, २०११

मोबाईल आणि गेम्स -भाग २


     नमस्कार मित्रांनो,
आज बघूया गेमिंग कंपन्यांचं काम कसं चालतं ते!
गेमिंग कंपन्यांचं काम बरचसं आपल्या फिल्म इंडस्ट्रीसारखं आहे! कसं ते सांगतो.
चित्रपटाला प्रोड्यूसर असतो, गेमलाही असतो.
चित्रपटाला कथा असते, गेमलाही असते.
तिथे एका चित्रपटासाठी काम करणा-यांचा एक संघ असतो,(टीम असते, यात कलाकार आणि तंत्रज्ञ सगळेच आलेत.), इथेही तसंच असतं.
इतकंच नाही तर जिथे चित्रपट बनतो त्या जागेला स्टुडिओ म्हणतात, तसं इथेही स्टुडिओच म्हणतात, असे बरेचसे साम्यस्थळ आहेत.

        आधी एकजण गेमची संकल्पना घेऊन निर्मात्याकडे जातो. (चित्रपटाच्या बाबतीत कथालेखक जातो तसा!). त्या संकल्पना मांडणा-याला डिझायनर म्हणतात. तो गेम्स डिझाईन करतो. गेमिंग कंपनीत हे एक पूर्णवेळ पद असतं. निर्माता त्यावर विचार करतो आणि जर त्याला संकल्पना आवडली तर तो निर्मितीप्रमुखाला सांगतो.(जसा चित्रपटाचा कार्यकारी निर्माता...गेमची पूर्ण निर्मिती याच्या देख्रेखीखाली होते.) त्यानंतर त्या गेमवर दीर्घकाळ चर्चा होऊन हा गेम निर्माण करायचं की नाही ते ठरतं. या बाबीबर परिणाम करणारे घटक खालीलप्रमाणे आहेत.

१) सद्यपरिस्थितीत उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाने हा गेम बनवता येईल का?
२) जर तसं नसेल, तर नविन तंत्रज्ञान शिकून हा गेम बनवायला किती वेळ लागेल? तोपर्यंतच्या चालन खर्चाचं (ऑपरेशनल कॉस्ट )काय?
३) जर तसं केलंही, तरी हा नवीन बनलेला गेम आपल्याला तितकं उत्पन्न मिळवून देऊ शकतो का, की ज्याने किमान त्याचा निर्मितीखर्च तरी भरुन निघेल?
४) या गेमसाठी लागणारं तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आपल्याकडे उपलब्ध आहे का?
५) जास्तीत जास्त तीन महिन्यात हा गेम तयार होऊ शकतो का?
६) हा गेम बनवण्यासाठी जास्तीत जास्त किती लोकांची टीम बनवावी लागेल?
आणि सगळ्यात महत्त्वाचं,
७) आपण जो गेम बनवणार आहोत त्याला खरंच काही निर्मितीमूल्य आहे का? म्हणजे संकल्पना लोकांना आवडेल ना? तो गेम खेळतांना लोक त्यात गुंगून जातील ना? आणि असं बरंच काही...

       आता खरी गेम बनवायला सुरुवात होते. आधी या गेममध्ये कायकाय असणार आहे त्याचा तक्ता आणि प्रवाह आकृती बनवली जाते. ती टीममधल्या सर्वांना पाठवली जाते. सर्वांच्या शंका आणि सुचनांवर साधकबाधक चर्चा होते आणि या सगळ्या निकषांवर ती संकल्पना खरी उतरली तर गेम बनवणारे (डेव्हलपर्स) गेम बनवायला सुरुवात करतात.

        आधी फोनच्या कुठल्या चालनप्रणालीसाठी हा गेम बनणार आहे ते ठरतं. त्यानंतर एक आधारभूत फोन घेऊन त्यावर काम सुरु केलं जात. (बेसिक फोन). काही काही कंपन्यांमधे गेम्सचा सर्वसमावेशक आराखडा तयार असतो. (त्याला गेम इंजिन म्हणतात). त्याला हवं ते इनपुट दिलं की ते इंजिन ब-याचशा गोष्टी आपणहून करतं. तसं नसेल तर कामाच्या प्रत्येक भागाकारता (मॉडेल) नवीन कोड लिहावा लागतो. पण तो लिहितांना हे भान ठेवावं लागतं की हा कोड आपल्याला थोडासा बदल करुन दुस-या गेम्ससाठीही वापरता यायला हवा (पुनर्वापर संकल्पना (कोड रियुजॅबिलिटी)) आणि त्याने कमीत कमी जागा वापरावी (ऑप्टिमाईज्ड). कारण मोबाईलची मेमरी खूप कमी असते.

        गेम बनवातांना तुम्ही जी चित्रे बघतात ती खरंतर तुम्हाला खिळवून ठेवत असतात. त्यानंतर त्या गेममध्ये असलेले स्पेशल इफेक्ट्स तुम्हाला अचंबित करतात. हे सगळं काम कंपनीतले चित्रकार करत असतात. त्यांना आपण ग्राफिक डिझायनर म्हणतो. गेममधली पात्रे एकदा निश्चित झाली की हे डिझायनर्स ती पात्रे बनवायला सुरुवात करतात. सर्वसाधारणपणे ही पात्रे "फोटोशॉप" मधे बनवली जातात. ही सर्व चित्रे एका पट्टीवर ठेवून डेव्हलपर्सला दाखवली जातात आणि त्याला हाच परिणाम गेममधेही दाखवायला डेव्हलपरला सांगितलं जातं. उदाहरणाने स्पष्ट करतो.



    वरील चित्रात तुम्ही एका स्फोटाची पट्टी बघत आहात. यात एकाच स्फोटाच्या वेगवेगळ्या स्थिती दाखवल्या आहेत. गेमिंगमधे हाच स्फोट दाखवतांना प्रत्येक स्थिती एकदा दाखवली जाते. ती किती वेगात दाखवायची हे ग्राफिक डिझायनर सांगतो. त्यामुळे त्याला हवा तो अ‍ॅनिमेशन इफेक्ट मिळू शकतो. साधारणपणे याच पद्धतीने अ‍ॅनिमेशन केलं जातं. जेव्हा गेम्समधील पात्रे बनत असतात (गेमिंगच्या भाषेत त्यांना "स्प्राईट" म्हणतात) तेव्हा ती बनेपर्यंत डेव्हलपर्स आपल्यापुरती डमी पात्रे बनवून काम सुरु करतात. ही पात्रे अगदी ठोकळ्यापासून काहीही असू शकतात. गेमच्या मुख्य भागाला, जो तुम्ही खेळता त्याला इनगेम लॉजिक म्हणतात. त्यावर एकच जण काम करतो. दुसरा एखादा त्याचवेळी गेमच्या मेनूवर काम करत असतो. तिसरा कुणीतरी गेममधे झालेला स्कोअर साठवून ठेवण्याच्या पद्धतीवर काम करत असतो. एखाद्या गेममधे जर स्कोअर आंतरजालावरच्या एखाद्या संस्थळावर पाठवायचा असेल तर त्यावर काम करतो. प्रत्येकाचा कामाचा एक एक भाग संपला की तो भाग गुणवत्ता तपासणी विभागाकडे (क्वालिटी अ‍ॅशुरन्स टीम) जातो. त्या विभागाने सर्वकाही अपेक्षेप्रमाणे असल्याचं कळवलं की मगच पुढचा भाग तयार करतात. हे सगळं सुरु असतांना प्रोड्युसर या सर्व प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून असतो. कुठे कुणाला काही समस्या आल्यास ती सोडवण्याची तो व्यवस्था करतो. माहिती गुणवत्ता विभागाचं काम यात अतिशय महत्त्वाचं असतं. गेम तपासत असतांना जर त्यांनाच तो आवडला नाही तर ग्राहकांना आवडेल का, हा विचार पूर्ण टीमला कायम मनात ठेवून काम करावं लागतं. गुणवत्ता विभाग अगदी डोळ्यात तेल घालून एक एक भाग तपासतो. वरवर बघणा-याला वाटतं की काय मजा आहे यांची, एकतर गेम्स खेळायचे, वरुन त्याबद्दल पैसे पण मिळणार! पण खरं असं आहे की त्यात "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!"
       अशा पद्धतीने एकदाचा एक गेम तयार झाला की त्याचं पोर्टिंग केलं जातं. पोर्टिंग म्हणजे काय हे मी मागच्या भागांमधेच स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर तो गेम विकण्यासाठी पाठवला जातो. गेम तयार होत असतांना निर्माता आणि विपणन अधिकारी एकत्र येऊन तो विकण्याची व्यवस्था करत असतात. त्यामुळे वेळोवेळी ते गेम्सची आतील चित्रे (इनगेम इमेजेस) मागून घेऊन गेम्स खरेदी करणा-या कंपन्यांना पाठवत असतात. त्याचा लूक जर आवडला तर खरेदीदार गेम विकत घेण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ब-याचदा गेम तितकासा तयार नसेल तर ग्राफिक डिझायनरच त्या इमेजेस बनवून देतात. नंतर गेम त्या चित्रातल्या स्थितीला पोचतो. अर्थात हे करणं यात फसवणूकीचा प्रकार नसून आली वेळ साजरी करणं असतं.

       बाजारात तुमच्या कंपनीचं नाव होईपर्यंतचा काळ कंपनीसाठी आणि अर्थातच सर्व कर्मचा-यांसाठी कसोटीचाच असतो. मात्र एकदा तुमचा एखादा गेम लोकांना खूप आवडला तर लोक तुमच्या कंपनीच्या पुढच्या गेमची आतुरतेने वाट बघत असतात. परत एकदा चित्रपट आणि गेमिंगमधलं साम्य सांगतो. तुम्हाला आत्ता आलेला एखादा चित्रपट आवडला तर तुम्ही तोच तो चित्रपट वर्षानुवर्ष बघत बसत नाही. गेम्सचं पण तसंच आहे. एखादा गेम खूपदा खेळल्यानंतर लोकांचा त्यातला रस कमी होतो. त्यांना पुन्हा काहीतरी नवीन हवं असतं, ते जर तुम्ही देऊ शकलात तर ठीक आहे अन्यथा तुमचा व्यवसायच बंद पडायची भीती असते. जसं एखाद्या दिग्दर्शकाचा एखादा चित्रपट लोकांना खूप आवडतो. लोक त्याला रातोरात स्टार बनवून टाकतात, त्याच्या पुढच्या चित्रपटाची आवर्जून वाट बघितली जाते आणि पुढच्या चित्रपटात जर तो लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करायला कमी पडला तर लोक त्याची पद्धतशीरपणे "वाट" लावतात. गेम्सचंही तसंच! थोडक्यात गेम्सचं आयुष्य मर्यादित असतं.
जेव्हा गेम्ससाठी जेटूएमई ही भाषा जास्त वापरात होती तेव्हा गेम्सची पायरसी ही एक मोठीच डोकेदुखी होती. जेटूएमई भाषेत बनवलेल्या गेम्सची पायरसी अतिशय सोपी होती, आहे. लोक एकदा विकत घेतलेला गेम दुस-या कुणालाही फॉरवर्ड करत असत,अजूनही करतात, त्यामुळे गेमिंग कंपन्यांचा महसूल बुडतो. प्रत्येक कंपनी आपल्या स्वत:च्या संस्थळावर हे गेम्स आपल्या मोबाईलमधे उतरवून घेण्यासाठी दुवा (लिंक) द्यायची आणि त्याबद्दल पैसे आकारायची. कुणी असा गेम उतरवून घेतला तरच कंपनीला पैसे मिळायचे. पण ज्याने तो गेम उतरवून घेतलेला आहे तो तो गेम इतर दहा जणांनाही वाटू शकत होता. गेम्सच्या वितरणासाठी कुठलीही केंद्रीत पद्धत नव्हती. आताच्या पद्धतींबद्दल सविस्तर लिहीनच.

      आपला चित्रपट धो धो चालतोय, असं बघितल्यावर त्यात काम करणा-या कलाकारांना, तंत्रज्ञांना जो अवर्णनीय आनंद होतो, तोच आनंद गेमिंग कंपनीतल्या कर्मचा-यांनाही त्यांचा गेम बाजारात चालल्यावर होत असतो.

     हे सर्व झालं आपला गेम आपणच बनवून विकणा-या कंपन्यांच्या कार्यपद्धतीबद्दल! काही कंपन्या गेम्स बनवून द्यायची ऑर्डर स्वीकारतात आणि ग्राहकाला जसा हवा तसा गेम बनवून देतात. त्यांना ’हा गेम बाजारात चालेल का?’ याचा विचार करण्याची गरज नसते. त्यांना डिझाईनही करावं लागत नाही. हे काम सोडलं तर बाकी पद्धत सारखीच असते.

साधारणपणे या प्रकारे मोबाईल गेमिंग कंपन्यांचं काम चालत असतं.
        उर्वरीत भागांवर नंतर स्वतंत्र पोस्ट टाकेनच. अचानक आलेल्या कार्यबाहुल्यामुळे ही पोस्ट टाकण्यात खूपच दिरंगाई झाली, त्याबद्दल क्षमस्व!
आपल्या सूचना आणि प्रश्नांचं स्वागतच आहे!

(सर्व चित्रे आंतरजालवरुन साभार)

शुक्रवार, १५ एप्रिल, २०११

जिसने हमको हसना सिखाया!

        असं म्हणतात की मासा आणि विदुषक हे जगातले सगळ्यात दु:खी जीव आहेत. कारण पाण्यात असल्यामुळे माशाचे अश्रू कुणाला दिसू शकत नाहीत. विदुषकाचं पण तसंच! आत कितीही आक्रंदणारं मन असलं तरीही मुखवटा कायम हसरा ठेवावा लागतो. आपण सगळे सर्कशीतल्या विदुषकावर हसतो. त्याच्या एन्ट्रीलाच हसू फुटतं. ९९% वेळेस ते हसू त्याच्या व्यंगावर असतं. स्वत:च्या व्यंगाची अशी जाहीर खिल्ली उडू देणं याला तितकंच मोठं मन लागतं. त्याला प्रत्येक वेळेस जे पिंच होत असतं ते तो मनातच ठेवून प्रेक्षकांना हसवण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात थोडंसं आनंदाचं कारंज निर्माण करण्यासाठी धडपडतो.

आज अशाच एका महान व्यक्तिमत्वाचा जन्मदिवस आहे, ज्याने आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी हसवलेलंच आहे. त्याचं नाव आहे... चार्ली चॅप्लीन!




         प्रचंड आईवेडा होता तो! तुमच्याआमच्यासारखाच! त्याला मानाचा मुजरा! चार्ली, खरंच तू आम्हाला हसायला शिकवलंस! व्हेरी थॅंक्स टू यू! अ‍ॅंड विश यू अ व्हेरी हॅप्पी बर्थडे!


चार्लीबद्दलची अजून माहीती इथे वाचा:

बुधवार, ३० मार्च, २०११

मोबाईल आणि गेम्स -भाग १



           साधारणपणे मोबाईल फोन्स सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले तेव्हा मोबाईल गेम्स पाळण्यात होते.(२००० ते २००५ च्या सुमारास) तेव्हा ब-याच लोकांकडे नोकिया ११०० वगैरे फोन असायचे, त्यातला सगळ्यात जास्त प्रसिद्ध झालेला गेम म्हणजे ’स्नेक’. पाहिलं तर अतिशय साधा, कुठलेही डोळे दिपवणारे ग्राफिक्स नाहीत, कुठलंही संगीत नाही, फक्त व्हायब्रेशन असायचं. तेसुद्धा बंद करता यायचं. लोक आपले तासनतास तो गेम खेळत बसायचे. ख-या अर्थाने त्या गेमने लोकांना गुंगवून ठेवलं. लोक इतके फटाफट बटन्स दाबायचे की जसं पियानोच वाजवताहेत. प्रवासात तर तासनतास तो गेम खेळण्यात निघून जायचे. बरं तेव्हा नोकियाच्या विद्युतघटांची (बॅटरीची) कार्यक्षमता आजच्यापेक्षा नक्कीच बरी होती. त्यामुळे तासनतास फोन वापरला तरी विद्युतघट चालत असे.

"आग लागो त्या मोबाईलला... मी काय सांगते याचं लक्षच नसतं! अभ्यास गेला उडत!" - आईचा त्रागा.

"हे काय रे, मी तुझ्याशी बोलतेय आणि तू गेम काय खेळतोयेस? मी फेकून देईन हं तुझा मोबाईल! " गर्लफ्रेंड संतापून!
असे संवाद तेव्हा कायम झडत असत, इतकं त्या गेमने लोकांना वेड लावलं होतं.

         नंतर नोकियाचे ३१००, ३३१५ असे फोन आले. त्यातही तो गेम होताच. ३३१५ तर निव्वळ दगड होता. गर्लफ्रेंडने खरंच फेकून दिला तरी भीती नव्हती. कसाही आपटला तरी तो व्यवस्थित चालायचा. तेव्हाची मोबाईलची स्क्रीनसाईज १२८ बाय १२८ असायची. त्या आधीही त्यापेक्षा लहान स्क्रीन असलेले फोन्स होते. (उदा. ९६ बाय ६५ पिक्सेल्स.आठवा रिलायन्सचे पाचशे रुपयातले फोन). पण त्यावर गेम्सची ती मजा नव्हती जी १२८ बाय १२८ स्क्रीनवर होती.


       त्यावेळचे गेम्स साधारणपणे पूर्वस्थापित (प्री-इन्स्टॉल्ड) आणि दुस-या फोन वर कॉपी न करता येणाजोगे होते. ते फोन घेतेवेळेसच त्यात असत. ते काढूनही टाकता येत नसत.

मोबाईल फोन नादुरुस्त झाला की आपण त्याला त्याच्या डॉक्टरकडे घेऊन जायचो.

"साहेब सॉफ्टवेअर उडालंय! नवीन टाकावं लागेल."

"चालेल, कधी मिळेल?"

"दोन-तीन दिवस लागतील साहेब!"

"चालेल!" (आणि मनात, च्यायला दोन-तीनशे रुपये गेले तरी चालतील, नवीन मोबाईल कुठुन घेऊ? आपण काय लॅंडलॉर्ड नाहीये!) असं चालायचं. यातलं सॉफ्टवेअर म्हणजे सी-मॉस असायचं. फोनवर तोपर्यंत चालनप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) आलेली नव्हती.

       त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम्स आल्या. त्याबद्दल सविस्तरपणे स्वतंत्र पोस्ट टाकेनच.

          त्यानंतर हळूहळू रंगीत स्क्रीन्स आल्या. पण त्यांची रंगांची क्षमता मर्यादित होती. पण लोकांना त्या आवडल्या. त्यावर गेम्ससाठी मागणी होऊ लागली. जेव्हा ’सन मायक्रोसिस्टिम्स’ ने जेटूएमई (झ२ंऎ) ही ’जावा’ चा भाग असलेली प्रोग्रामिंग लॅंग्वेज बाजारात आणली तेव्हा ख-या अर्थाने गेमिंगला चालना मिळाली. अनेक कंपन्यांनी यात बराच फायदा आहे हे ओळखून छोटे छोटे मोबाईल गेम्स बाजारात आणायला सुरुवात केली. अनेक जण जेटूएमई शिकून स्वत:च गेम बनवायला लागले आणि विकूही लागले. अनेक परंपरागत गेम्स, जे आपण वर्गात मागच्या बाकावर शिक्षकांचं लक्ष चुकवून खेळायचो ते मोबाईलवर यायला लागले(उदा. फुली गोळा). यात आपला दुसरा भिडू म्हणजे मोबाईल असायचा. त्यात असा प्रोग्राम बसवलेला असायचा जो आपल्या चालीवर पुढचा निर्णय स्वत: घ्यायचा! ही ’आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ ची सर्वसामन्यांना झालेली ओळख होती.

        कितीतरी दिवस असे गेम्स चालले. सोनी एरिक्सनने मोबाईल गेमिंगच्या क्षेत्रात खूप भर टाकली.त्यांनी त्यांच्या एस.डी.के.(एस.डी.के. म्हणजे असं एकत्रित पॅकेज ज्यात प्रोग्रामिंगचे वेगवेगळे टूल्स, त्यांची माहिती, ते कसे वापरायचे याची उदाहरणं आणि नोंदी असतात) अशा खूप गोष्टी दिल्या ज्यामुळे मोबाईल गेम बनवणं सोपं झालं. तशीच भर नोकियानेही घातली. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व टूल्स मोफत उपलब्ध होते. त्यामुळे ह्या क्षेत्राची वाढ तेव्हा फार मोठ्या प्रमाणात झाली. आंतरजालावर असे गेम्स बनवणा-यांचे गट बनू लागले. वेगवेगळ्या साधकबाधक चर्चा झडू लागल्या. नवीन लोकांना बरंच मार्गदर्शन मिळू लागलं. अनेक कंपन्यांनी ’मोबाईल गेम्स’ असा विभागच चालू केला. अनेक फक्त मोबाईल गेम्स बनवणा-या कंपन्या अस्तित्वात आल्या. त्यातल्या मोजक्या कंपन्या मोठ्या झाल्या तर खूप सा-या बंद पडल्या. कारण लोकांना नेहेमी काहीतरी नवीन हवं असतं की जे त्यांना गुंगवून ठेवेल, ते देण्यात त्या कंपन्या कमी पडल्या.

       पुढील भागांमधे आपण गेम्स बनवणा-या कंपनीचं काम कसं चालतं, एका गेममागे किती लोकांची मेहनत असते, प्रत्येकाच्या कामाचं नेमकं स्वरुप काय, गेम्सचे किती प्रकार अस्तित्वात आहेत, मोबाईलवर कुठल्या चालनप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम्स) उपलब्ध आहेत, त्यासाठी नेमके कुठल्या प्रकारचे गेम्स बनतात, त्या चालनप्रणालींचं वैशिष्ट्य काय यावरील लेख बघूयात.

        आपल्या सूचना आणि प्रश्नांचं स्वागतच आहे.



(सर्व चित्रे आंतरजालवरुन साभार)

मंगळवार, २९ मार्च, २०११

मोबाईल आणि गेम्स

       नवीन तंत्रज्ञान आलं की आधी कुतुहुल म्हणून, नंतर हौस म्हणून , कधीकधी ’ऑड मॅन आऊट’ या भीतीपोटी आणि शेवटी गरज म्हणून माणूस ते वापरुन बघायला लागतो. नंतर त्याला त्याचं व्यसनच जडतं. सोशल नेटवर्किंग साईट्स नव्हत्या तेव्हा आपलं काय अडायचं? काहीच नाही! आज जर सगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्स बंद झाल्या तर काय होईल? कल्पना करून बघा! सगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्स चालण्याचं एक बेसिक तत्त्व आहे, ते म्हणजे,’माणसाला आपल्या आयुष्यापेक्षा दुस-यांच्या आयुष्यात जास्त रस असतो.’ जाऊ द्या मुद्दा भरकटतोय! तर मी आज मोबाईलबद्दल सांगणार होतो. नाही नाही ’मोबाईलचा इतिहास’ हा या पोस्टचा विषय नक्कीच नाहीये! पण मोबाईल तंत्रज्ञान, विशेषत: गेमिंग कुठपर्यंत गेलंय हे गेमिंग अगदी बेसिक असल्यापासून बघतोय.

        मी माझ्या करिअरची सुरुवात ’मोबाईल गेम पोर्टर’ म्हणून केली. पोर्टर म्हणजे शब्दश: हमाल नाही! तर एका मोबाईलसाठी बनवलेला गेम इतर मोबाईल्सवर चालतो आहे की नाही ते बघणे आणि तो नीट चालण्यासाठी त्या कोडमध्ये योग्य ते बदल करणे हे माझं काम होतं. याला गेमिंगच्या भाषेत ’पोर्टिंग’ म्हणतात. तर माझ्या सुरुवातीच्या कंपनीत आम्ही सपोर्ट करत असलेले फोन्स होते तब्बल साडेसातशे आणि आम्ही पोर्टर होतो फक्त तीन! तेव्हा आम्हाला बहुतेक फोन्सचे वैशिष्ट्य पाठ झाले होते आणि त्यांच्या खोड्याही! आमच्याकडे तेव्हा एक एक्सेलशीट असायची त्यात प्रत्येक फोनची स्र्कीनसाईज, डेन्सीटी आणि इतर वैशिष्ट्य नमूद केलेले असायचे. आम्ही ती फाईल ’पोर्टिंग गाईडलाईन’ म्हणून वापरायचो. आहाहा... काय दिवस होते ते! नॉस्टेल्जिक व्ह्यायला होतंय! आम्ही एकमेकांना सांगायचो, "अरे, एखादा १७६ बाय २०८ फोन दे रे! मला टेस्ट करायचाय हा कोड!" इथे १७६ बाय २०८ ही त्या फोनची स्क्रीनसाईज असायची. असा फोन म्हणजे नोकिया ६६००. असे बरेच फोन्स होते. तेव्हा आमची भाषा म्हणजे १७६ बाय २०८, १७६ बाय २२०, १२८ बाय १२८, २४० बाय ३२० अशीच होती.


       एखाद्या पोर्टरला मोठ्या स्क्रीनसाईजचं काम मिळालं की पठ्ठ्या खूष! कारण एकतर अशा फोन्सची इंटर्नल मेमरी जास्त असायची, त्यामुळे त्यावर गेम्स मस्त चालायचे. त्याला पोर्टींगमधे कमीतकमी अडचणी यायच्या! साधारणपणे नवीन पोर्टरला असे फोन द्यायचे. छोटे फोन्स जसा नोकिया ३१०० (जुना) यावर अनुभवी लोक काम करायचे, कारण त्यांना या फोन्सला येणारे प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे हे पाठ झालेलं असायचं.

     साधारणपणे सहा महिने वगैरे तुम्ही पोर्टर म्हणून काम केलं की तुम्हाला नवीन गेम बनवायला द्यायचे! कारण तोपर्यंत गेम्स कसे बनतात याचं प्राथमिक ज्ञान तुम्हाला आलेलं असायचं. काही प्रॉब्लेम्स आले तर मदतीला सिनिअर्स असायचेच! तुम्ही एक छोटंसं मॉडेल बनवलेलं चालतांना बघून जो आनंद व्हायचा ना, जसं आपल्या बाळाने पहिलं पाऊल टाकलं की आईच्या डोळ्यात दिसतो.(असंच काही काही!)

          नोकिया, सोनी एरिक्सनवर काम करायला मिळालं तर सगळ्यांना खूप आनंद व्ह्यायचा! कारण हे फोन अगदी आज्ञाधारकपणे काम करायचे. सोनी तर गेमिंग फोन्सचा बादशहा होता! सॅमसंगचे फोन म्हणजे लहरी मोहम्मद! चालले तर असे चालतील नाहीतर बश्या बैलासारखे तिथल्या तिथे! बर सेम कोड एका सेम फोनच्या एका पीसवर चालला तर दुस-या पीसवर लगेच हे राम म्हणायचा! त्यामुळे सहसा कुणी त्या फोन्सवर काम करायला राजी नसायचं! एखादा त्या प्रॉब्लेमला शिंगावर घ्यायचा! "च्यायला... का होत नाहीये! बघतोच आता!" म्हणून तो जो त्या फोनच्या मागे लागायचा तो तो प्रॉब्लेम सोडवूनच दम घ्यायचा!

          मी स्वत: हे सगळं अनुभवलंय. जवळजवळ सगळ्या कंपन्या आंतरजालावरुन कल्पना उचलायच्या आणि त्यांच्यावर आधारित गेम्स बनवायच्या! त्यावरुनही भांडणं व्हायची, आमची कल्पना तुम्ही उचलली म्हणून! बरं गेम्सचं आयुष्य काही मोठं नसतं. थोडे दिवस आपण खेळतो आणि नंतर ते फोल्डर उघडूनही बघत नाही! तुम्हीच बघा ना! नवीन फोन घेतल्यानंतर काही दिवस तुम्ही अगदी उत्साहाने त्यातले गेम्स खेळता आणि आठवड्याभराने, महिनाभराने, (व्यक्तिसापेक्ष) तुमचा रस कमी कमी होत जातो. तुम्ही गेम्स अ‍ॅडिक्ट असाल तर गोष्ट वेगळी. कालांतराने आपल्या मोबाईलमधे असा गेम आहे हेसुद्धा तुम्ही विसरुन जातात. त्यामुळे गेमिंग कंपन्या कायम नवनवीन गेम्स बाजारात आणत असतात. गेम्सचा व्यवसाय चित्रपटसृष्टीसारखा आहे, कारण ब-याचदा तुम्ही एखादा फ्लॉप गेलेला चित्रपट बघत असतांना तुम्हाला वाटतं की हा चित्रपट का चालला नाही? खरंच छान बनवलाय! मग का नाही चालला? तो चित्रपट जरी तुम्हाला चांगला वाटत असला तरी खूप मोठ्या प्रमाणात लोकांना तो आवडलेला नसतो. त्यामुळे तो फ्लॉप होतो. गेमचं पण तसंच आहे. तुम्ही खूप मेहनत घेऊन, रात्रंदिवस एक करुन गेम बनवता, बाजारात आणता आणि तुम्हाला मिळालेला प्रतिसाद बघता ’हेची फळ काय मम तपाला..’ असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर येते. आज तुम्ही आठवा बरं एखाद्या साताठ महिन्यांपूर्वी रिलिज झालेल्या चित्रपटातलं गाणं! सहज आठवणार नाही! गेम्सचं पण तसं आहे. मुळात डेव्हलपरसुद्धा गेम बाजारात आणायच्या वेळी त्या गेमला कंटाळून गेलेला असायचा, कारण गेल्या दोन-तीन महिन्यापासून तो जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तेच बघत असायचा. त्यामुळे कधी एकदा ह्या गेमला बाजारात उतरवतोय आणि कधी दुसरी गेमची कल्पना प्रत्यक्षात आणतोय असं त्याला झालेलं असायचं.


        चित्रपटांच्या पायरसीप्रमाणे गेम्सची पायरसी ही त्या काळात मोठीच डोकेदुखी होती. आज जर तुम्ही गेम विकत घ्यायला गेलात तर तुम्हाला सहज एका डॉलरमधे गेम मिळून जातो. क्वचित दोन डॉलर लागतात. तीनेक वर्षांपूर्वी एका गेमची किंमत सात-आठ डॉलर असायची. बरं गेमची फाईलपण सहजपणे इकडून तिकडे या मोबाईलवरुन त्या मोबाईलवर फिरु शकत होती. बरेच जण आपण विकत घेतलेला गेम सहज फ्री डाऊनलोडसाठी उपलब्ध करुन द्यायचे. त्यामुळे कंपन्यांचे पैसे बुडायचे. हा वेगळाच ताप होता. गेम्स डाऊनलोड करण्यासाठी एकमेव असं अधिकृत ठिकाण नव्हतं. ’एक ढूंढो हजार मिलेंगे’ अशा खूप साईट्स होत्या ज्यावर गेम्स फुकट उपलब्ध असायचे.


             ह्या क्षेत्रात खरी क्रांती झाली ती जेव्हा अ‍ॅपलचा आयफोन आणि गुगलचं अ‍ॅंन्ड्रॉईड बाजारात आलं! गुगल आणि अ‍ॅपलने जास्त क्षमतेचे आणि जास्त सुविधा असलेले फोन्स बाजारात उपलब्ध करुन द्यायला सुरुवात केली आणि गेमिंग जगताने खरी दिवाळी साजरी केली. त्याआधी गेमिंगमधे ’टचस्क्रीन’ची संकल्पना फारशी वापरात नव्हती. फार फार तर पाच टक्के गेम्सना ’टचस्क्रीन सपोर्ट’ असायचा. असे गेम्स बनवणंही किचकट काम असायचं. आता ’कीज’ जवळपास हद्दपारच झाल्या आहेत. सगळं टचस्क्रीन! आज बाजारात वेगवेगळ्या प्रकारे ’नेव्हीगेशन’ करता येऊ शकणारे गेम्स उपलब्ध आहेत. ’ग्रॅव्हीटेशनल सेन्सर्स’ वर चालणारे गेम्स त्याचं एक उदाहरण आहे. एकदम मोठ्या प्रमाणात फोन्सची उपलब्धता आणि फोन वापरण्याच्या बदललेल्या संकल्पना, यामुळे या क्षेत्रात आज प्रचंड संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचबरोबर अनिश्चितता खूपच वाढली आहे. तुमचा एक छोटासा गेम बाजारात चालला नाही तर कंपनीतून तुमची हकालपट्टी होऊ शकते. हे आजचं गेमिंग क्षेत्रातलं वास्तव आहे. कोडिंग खूप सहज झाल्याने खूप लोक या क्षेत्राकडे वळताहेत. ख्रिसमसच्या काळात तर अ‍ॅंन्ड्रॉईड मार्केट आणि अ‍ॅपस्टॉअर वर छोट्या छोट्या गेम्सचा महापूर येतो. त्यातले बरेचशे तर असे असतात की त्यांना गेम का म्हणावं हा प्रश्न असतो.

                ’नवनिर्मिती’ हे तुमचं ध्येय असेल, तुम्हाला नेहेमी नव्यानव्या कल्पना सुचत असतील तर गेमिंग क्षेत्रात तुम्ही किती पुढे जाल याला मर्यादा नाही!


(सर्व चित्रे आंतरजालावरुन साभार.)

शुक्रवार, २५ मार्च, २०११

दे घुमा के... वर्ल्डकपच्या बाहेर!



अफलातून.... आज शब्दच सापडत नाहीये भारताच्या विजयाचं वर्णन करायला! त्य हलकट ऑस्ट्रेलियाला सरळ उचलून वर्ल्डकपच्या बाहेर फेकून दिलं हे फारच छान झालं. पॉंन्टिंगची अवस्था तर बघवत नव्हती. प्रत्येक बॉलगणिक त्याच्या चेहे-यावरचा त्रागा वाढत होता. सगळा चिडीरडीचा डाव खेळूनसुद्धा जिंकता येत नाही म्हणजे काय? सचिनचा कॅच आपण टप्पा पडल्यानंतर पकडला आहे हे त्या मूर्खाला कळत नव्ह्तं का, की त्याने रेफरलची मदत मागितली? टेक्नॉलॉजीला मूर्ख समजतोय का हा? उगीच एक रेफरल वाया घालवला! जाऊ द्या, संतापात माणूस असंच काहितरी करत असतो...असंबद्ध!
पण हे फार छान झालं की ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपच्या बाहेर! पॉन्ट्याने कधी कल्पना तरी केली होती का? जिओ टीम इंडिया!
आणि अजून ... देवाच्या १८००० धावा पूर्ण झाल्या! त्यापण जगातल्या सगळ्यात हलकट टीमविरुद्ध!

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०११

ब्लॅक फ्रायडे (भाग ७ : अंतिम)

"तुला माहितीये मी काय आणि कशाबद्दल म्हणतोय ते!" राहुलने सुहासकडे रोखून पहात विचारलं. तसा सुहास सटपटलाच.
"तू कशाबद्दल म्हणतोयेस मला नाही कळत!" -सुहास नजर चुकवत बोलला.
"मग नजर चुकवत का बोलतोयेस?" -राहुल्याचा स्ट्रेट ड्राईव्ह!
"बघ राहुल, मी नजर चुकवत बोलायचा प्रश्न नाहीये! तू स्पष्ट बोलल्याशिवाय मला कसं कळेल की तू कशाच्या बाबतीत बोलतोयेस?" -सुहास.
"ऐकायचय! का कुणास ठाऊक, पण तुझ्याकडे इन्टर्नलचे पेपर्स आहेत अशी मला शंका आहे. मी कधीची स्वत:चीच समजूत काढत होतो की नाही, सुहाससारखा सरळमार्गी मुलगा असं करणं शक्यच नाही! तो स्वत:च्या अभ्यासाने पुढे जाणारा आहे. त्याला अशा कुबड्यांची गरजच नाही. सरळमार्ग सोडून जाणा-यांमधला सुहास नाही. पण तू गेल्या काही दिवसांपासून काहीतरी लपवतोयेस माझ्यापासून असं मला जाणवतंय! सांगायचं नसेल तर नको सांगूस! तू समजो अथवा न समजो, मी तुला एक चांगला मित्र समजतो, तुला समजण्यात बरेच जण चूक करतात. आपल्याला सिद्ध करायचंय की तू चूक नाहीयेस. तू मिळवत असलेले मार्क्स हे तू मेहनतीने मिळवलेले आहेत. त्याकरता तू कुठल्याही लांड्यालबाड्या केलेल्या नाहीयेस. बरोबर आहे ना? " -राहुल्या वरवर साधं वाटणारं, पण सुहासला डिवचणारं बोलला. एका परीने तो अंदाज घेत होता, सुहास काही सांगतो का याचा!
शेवटी अपेक्षित परिणाम झालाच. सुहासने एक क्षण राहुलकडे टक लावून पाहिलं आणि डोळे बारीक करत तो म्हणाला, "दोस्त, तुला अशी शंका येण्याचं कारणच काय?"
"काही नाही रे, माझं आणि सम्याचं याच विषयावरुन तर भांडण झालं. तो म्हणत होता सुहासकडे पेपर्स आहेत आणि मी म्हणत होतो शक्यच नाहीये! सुहाससारख्या मुलावर आरोप करतांना तुम्ही विचार करुनच बोला. त्यावर ते सगळे म्हणे तुला जर त्याच इतकाच पुळका आला असेल तर त्याच्याकडेच जा! आमच्याशी कॉन्टक्ट ठेवण्याची गरज नाहीये! मीही ठणकावून सांगितलं, मी तुमच्या नाही तर सत्याच्या बाजूने आहे, सुहासची बाजू सत्य आहे त्यामुळे मी त्याच्या बाजूला आहे. जळतात स्साले तुझ्यावर रे!" राहुलने अगदी वर्मावर बोट ठेवलं.
"काय सांगू यार, मलापण चुकीचं वाटत होतं पण...", सुहासने एक मोठ्ठा पॉज घेतला. क्या करे क्या ना करे अशी त्याची परिस्थिती झाली होती. राहुलला हाच पॉज हवा होता. "काय सुहास, थांबलास का? बोल ना!" -राहुलने अंदाज घेत विचारलं.
"पण यार माझ्याकडे खरंच क्ल्यू आहे क्वेश्चन पेपर्सचा!" सुहासने मान खाली घालत सांगीतलं.
"क्काय? सांगतोस काय? यार तू सुद्धा माझ्या विश्वासाला तडा दिलास! मला हे अपेक्षित नव्हतं!" राहुल्याने अगदी अविश्वास दाखवल्यासारखं म्हटलं. सुहास गप्पच होता.
"तुला अशी काय गरज पडली होती रे! तू शेवटी सिद्धच केलंस की सगळेच पाय मातीचे असतात. तुला काहीच कसं वाटत नाही रे!" राहुल्याचा आवाज आता चढलेला होता. सुहास खाली मान घालून ऐकत होता. त्याची सिट्टीपिट्टी गूल झाली होती.
"राहुल, माझ्याकडे क्वेश्चन पेपर्स नाहीयेत रे! कायकाय क्वेश्चन्स येऊ शकतात याची आयडिया आहे. राहुल, तू कुणाला सांगणार नसलास तर मी तुला सांगतो की हे कसंकाय जमून आलं."
"तुझी इच्छा!" राहुल मानभावीपणे बोलला.
"खरं सांगायचं तर मी काळेसरांना लाडीगोडी लावून ह्या टिप्स मिळवल्यात. त्याकरतापण मला पैसे मोजावे लागले आहेत. एका पेपरसाठी हजार रुपये घेतले त्यांनी! तुम्ही म्हणजे तुमचा ग्रुप सगळ्यात पुढे होता ना, मी जळायचो रे तुमच्यावर! मला कसंही करुन तुमच्या पुढे जायचं होतं, कुठल्याही प्रकारे! म्हणून मी हा मार्ग पत्करला. प्लीज कुणाला सांगू नकोस! नाहीतर मी उगाच गोत्यात येईन. काळे सरांना जर याबाबत काही कळलं ना, तर माझी काही खैर नाही. तू माझ्यावर इतका विश्वास दाखवलास म्हणून मी तुला सांगतोय. प्लीज प्लीज कुणाला सांगू नकोस! मी तुझ्याकडून पैसे घेणार नाही पण तुला हिंट्स देऊ शकतो!" सुहास बोलला. आता लपवालपवी करण्यात काही अर्थ नाही हे समजून तो बोलत होता. त्याचं सगळं लक्ष आता राहुल काय बोलतो याकडे लागलेलं होतं.
"जाऊ दे, मला क्वेश्चन पेपर्स नकोयेत. काय सांगता येतं की ते खरे असतील की नाही. काळे सर तुलाही बनवत असतील. ऐन परिक्षेच्या वेळेस वेगळेच क्वेश्चन्स येऊ शकतात आणि याबद्दल तू काळे सरांना जाबपण विचारु शकत नाहीस. सगळंच इल्लिगल आहे!" -राहुल्याने उगाच त्याच्या डोक्यात संशयाचं एक पिल्लू सोडून दिलं. सुहास खरंच विचारात पडला. "खरंच यार, खरंच असं असलं तर? आपण काहीही करु शकत नाही. गेले पैसे! कशाच्या नादात आपण काय करुन बसलो. पैसे तर गेलेच, अभ्यासाचा पण बट्याबोळ झाला. मागच्या दोन वेळेपासून सर बरोबर टिप्स देतायेत पण आतापण बरोबरच असतील कशावरुन?" विचार करकरुन सुहासचं डोकं फिरायची वेळ आली होती. राहुल मस्त माईंड गेम खेळत होता आणि सुहास त्यात बरोबर अडकत चालला होता. असं डोकं शांत ठेवून आपण सुहासला बरोब्बर लाईनवर आणू शकतो हे राहुलला पूरेपूर उमगलं होतं.
"राहुल, कॉलेजची लॅब..." इतकंच सुहास बोलला. राहुल मनातल्या मनात काय ते समजला. पण वरकरणी तसं न दाखवता तो म्हणाला, "काय लॅबचं?"
"काही नाही रे, असंच.. मी म्हणत होतो प्रॅक्टिकल्स आहेत ना आता आपले, तर लॅब अपडेट करतील बहुतेक!" -सुहासने वेळ मारुन नेली. पण राहुलला क्ल्यू मिळाला होता.

रात्री राहुलने ग्रुपला पूर्ण हकिकत कथन केली. बरीच चर्चा झाली. सम्या म्हणाला,
"राहुल्या, त्या सुहासचा विषय सोड आता! आपल्याला लॅब हा क्ल्यू तर मिळालेला आहे! आता शुक्रवारच्या प्रॅक्टिकलला काय काय करायचं ते ठरवू. रव्या, तू आणि पश्याने सरांना बोलण्यात गुंतवायचं. निल्या, तू एका कॉम्प्युटरवर बसून लॅनमधून सगळे कॉम्प्युटर्स स्कॅन करायचे. पेपर्स सापडले की तू ते फोल्डर मिनिमाईज करुन ठेवायचं आणि तिथून उठून जायचं. उठताना मला खूण करायची. मी पासवर्ड्स असतील तर तोडून ठेवेल आणि एका ठिकाणी कॉपी करुन ठेवेल. त्या कॉम्प्युटरवर प्रॅक्टिकलची फाईल ओपन करुन ठेवायची, म्हणजे कुणाला काही शंका येणार नाही. मग राहुल्या, मी तुला माझा एक प्रॉब्लेम सोडवायला बोलवेन, तू फ्लॉपी ड्राईव्हमधे फ्लॉपी टाकून ठेवायची आणि मला तुझ्या सिस्टिमवर बोलवायचं, सांगायचं की तिकडे ये मी तिकडे सांगतो. निल्या, मग तू त्या सिस्टिमवर बसायचं आणि सगळे क्वेश्चन पेपर्स फ्लॉपीमधे कॉपी करायचे. लक्षात ठेव,हे काम एकदम बिनबोभाट व्हायला हवं. सापडलो तर आपली खैर नाही हे लक्षात ठेवा. एकही चूक खूप महागात पडू शकते. तेव्हा बी अलर्ट! आता...मिशन फ्रायडे! "


शुक्रवार... शुक्रवार ठरला होता. साळसूदपणे सगळे त्यादिवशी प्रॅक्टिकलला आले. शांतपणे सरांकडून स्लिप्स घेऊन सोडवायला लागले. आणि एका बाजूला शांतपणे मिशनपण सुरु होतं. सहाचे सहा पेपर्स कॉपी झाले होते, फक्त फ्लॉपी बाहेर काढायची होती, पण पाटील सरांचं कसंकाय लक्ष गेलं कुणास ठाऊक, त्यांनी निल्याला फ्लॉपी घेऊन बोलवलं आणि सगळं कामच आटोपलं. त्याक्षणी सगळ्यांना आपल्याला धरणी पोटात घेईल तर बरं असं वाटत होतं. सर्वजण माना खाली घालून लॅबच्या बाहेर निघाले. रव्या म्हणाला, "यार मिशन फ्रायडे तर आपल्यासाठी ’ब्लॅक फ्रायडे’ ठरला यार! आत्ता काय करायचं?"
"गप बे! प्रत्येक वेळी बोललंच पाहिजे का? शांत बैस जरा. विचार करु दे ना!" -मन्या बोलला.
"चला आधी एक एक कटिंग मारु! त्याशिवाय डोकं चालणार नाही !" विज्या बोलला आणि सगळेच शिवाच्या चहाच्या टपरीकडे चालायला लागले.
चहा घेता घेता राहुल्या म्हणाला, "साले पेपर्सपण गेले आणि इज्जतपण! बरं हे पण माहीत नाही की ते खरे की खोटे! सगळंच संपलं सालं! नशिबच ख्रराब आहे यार!"
"नशिबाला दोष नको देऊ! प्लॅन फसलाय फक्त! आणि महत्वाचं म्हणजे घाबरु नका. पाटील सरांनी जरी तक्रार केली तरी आपण कॉपी करत होतो याचं त्यांच्याकडे काहीच प्रूफ नाहीये. होतं ते त्यांनी त्यांच्याच हाताने मिटवलंय. फ्लॉपीच फॉरमॅट केलीये! आणि मला नाही वाटत हे प्रकरण काळे सरांकडे जाईल! गेलं तरी काळे सर विश्वासच ठेवणार नाहीत. आपली आधीची पुण्याई कधी कामास येणार मग?" -सम्या गालातल्या गालात हसत बोलला. हा विचार येताच सगळे रिलॅक्स झाले.
"आता इंटर्नल एक्झाम तर पुढच्या आठवड्यात आहे. अभ्यास तर बोंबललेलाच आहे! काय करायचं काय आता?" -निल्या.
"चिल मार यार! उगाच टेन्शन घेतलं तर आपण काहीच करु शकणार नाही! चिल मार!" -रव्या.

...अचानक काहीतरी सुचून निल्या म्हणाला "राहुल्या, अरे तुझा भाऊ एम.ई. करतोय ना पुण्याला?"
"आता माझा भाऊ कुठे आला मधेच?" -राहुल्या.
"अबे ऐक तर खरं, तुला माहीतीये का ’सी’ लॅन्ग्वेजमधे गेलेला डेटा परत मिळवायचा प्रोग्राम लिहिता येतो."-निल्या.
"मग? त्याचाही काय संबंध?" -राहुल्या.
"अरे मठ्ठ माणसा, फ्लॉपी कुठेय? त्यातला डेटा परत आणता येईल ना!" -निल्या चित्कारलाच!
"हा यार! हे कुणाच्या डोक्यातच आलं नव्हतं!" -सम्या.
"सो गाईज..... काय करायचं?" सम्या म्हणाला सगळेच हसायला लागले.

(समाप्त)



गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

ब्लॅक फ्रायडे (भाग ६)

दुस-या दिवसापासून राहुल्या आणि सम्या एकमेकांना पाठीमागे शिव्या द्यायला लागले. कुणालाच कळत नव्हतं की हा ग्रुप असा का वागतोय, कालपरवापर्यंत गळ्यात गळे घालून फिरणारे आज एकदम एकमेकांचं तोंडही बघायला तयार नाहीयेत... हे काय गौडबंगाल आहे? पण असं चाललं होतं खरं! आता सम्या आणि सुहास, राहुल्या आणि नेहा अन बाकीची मुलं असे सरळसरळ तीन ग्रुप पडले होते.
      .. पण रोज रात्री सम्या, राहुल्या आणि मंडळी भेटतच होती आणि आज काय काय घडलं त्याचे अपडेट्स घेत होती आणि दुस-या दिवशीचे प्लॅन्स ठरवत होती.
असाच आठवडा गेला. रोज मिळणा-या माहीतीचं विश्लेषण करुन,सगळ्या शक्यता आणि गॄहितकं लक्षात घेऊन ते या निष्कर्षापर्यंत आले की हे इंटर्नलचे क्वेश्चन पेपर्स फुटले आहेत आणि वर्गातल्या मोजक्या मंडळींकडे ते आहेत. ते आपल्याला हवेत की नको हा मुद्दाच आतापर्यंत चर्चेत आला नव्हता!
पण त्या दिवशी रात्री रव्या म्हणाला,

"राहुल्या, ते पेपर्स आपल्याला हवेत!"

"का? आपल्याला कन्फर्म माहीत आहे का की तेच पेपर्स आहेत? अरे आपल्याला जर अशी खात्री झाली ना की तेच पेपर्स आहेत तर आपण फक्त त्याचाच अभ्यास करु, बाकीचा काहीच अभ्यास करणार नाही! कशावरुन आपल्याला कुणकुण लागली आहे ते सुहासने काळे सरांना सांगितलं नसेल? कशावरुन काळे सर शेवटच्या क्षणी पेपर्स बदलणार नाहीत? आता हे नको सांगूस की सुहास मागच्या वेळीही तसाच टॉपर आला. आणि समजा मागच्या वेळी असाच किस्सा असला तरी आपल्याला कुणकुण नव्हती. अरे बाकीच्या पब्लिकला धूर दिसतोय म्हणजे आग असणारच कुठेतरी! यावेळेस ऐनवेळी क्वेश्चन पेपर्स बदलण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तुला काय वाटतं, काळे सरांना काहीच कल्पना नसेल? अरे, महा पाताळयंत्री माणूस आहे तो! कुठलंही खोटं कारण काढून ते आपलं करिअर बरबाद करु शकतात. केली खोटी कॉपी केस आपल्या सगळ्यांवर मग? त्यांच्या उपद्व्यापामुळं समजा आपल्याला भरारी पथकानं डिबार केलं, काय करशील? झाला ना एका मोहापायी आयुष्याचा सत्यानाश? आपल्याला काय सिद्ध करायचंय? आम्ही यांच्या पुढे जाऊ शकतो हे? ही स्पर्धा डबक्यातल्या बेडकांची स्पर्धा आहे असं नाही वाटत तुला? मला दुस-यापेक्षा एखादा मार्क जास्त मिळाला तर मी यशस्वी ठरतो का? ही स्पर्धा मार्कांची न होता इगोंची आहे! अरे शेवटच्या क्षणी आपण ते पेपर्स मिळवण्याच्या मागे आपली शक्ती वाया घालवू नये असं मला वाटतं. आतापर्यंत अभ्यास करुन आपल्याला कमी मार्क्स मिळाले आहेत का? सांग ना आपलं काय नुकसान झालं आहे ते? आतापर्यंत आपल्याला कधीच गरज पडली नव्हती ती आज का पडतेय?" -राहुल्या.

       दूरवर बघत सम्या बोलला,

"राहुल्या, एका सिच्युएशनचा विचार कर, तुला माहीतीये की एखाद्याने, सुहासच घे ना, समज त्याने कॉपी करुन मार्क्स मिळवले आणि त्याला फर्स्टक्लास मिळाला आणि तुझा फर्स्टक्लास एका मार्काने गेला, आणि आपल्या कॉलेजला कँपसला एक चांगली कंपनी आली, तिने फक्त फर्स्टक्लास असलेल्यांना अ‍ॅप्टिट्यूड एक्झामला बसायची परवानगी दिली, कसं वाटेल तुला? सालं आपण इतका प्रामाणिकपणा करुन शेवटी हेच फळ मिळालं ना असंच वाटेल ना? त्या क्षणापुरतं तरी हा प्रामाणिकपणा काहीच कामाचा नाहीये असंच वाटेल ना तुला? मी अप्रामाणिकपणाचं समर्थन करत नाहीये, पण एक परिस्थिती तुझ्यासमोर मांडतोय! विचार कर, खरंच असं झालं तर? त्या क्षणी तुला वैताग येणार नाही? भाई, बाहेर तुला हे कुणीच विचारणार नाही की तू मार्क्स कसे मिळवलेत, किती मिळवलेत हेच विचारतील.अरे आपल्या फिल्डमधे एन्ट्री महत्त्वाची असते रे! तुला कितीही येत असलं, तू आपल्या फिल्डमधे कितीही मास्टर्स असलास तरी जोपर्यंत तुला प्रवेश मिळत नाही तोपर्यंत तू स्वत:ला सिध्द करु शकत नाहीस! तुला फक्त एन्ट्री करायचीये आणि ती कशीही झाली तरी चालेल. ऐक, जब घी सीधी उंगलीसे नही निकलता तो फिर डब्बाही उल्टा करना पडता है! आणि आपल्याला तो करायचाच आहे! मी असं नाही म्हणत की आपण त्यावरच विसंबून राहू, पण क्वेश्चन्स खरे असले तर हातातून जायला नको असं मला वाटतं. शेवटी येनकेनप्रकारेण आपल्याला मार्क्स हवे आहेत. बाय हूक ऑर बाय क्रूक! काय वाटतं?"

     सम्याच्या या युक्तिवादावर सगळेच विचार करत होते. युक्तिवाद तर बिनतोड होता. जर मार्क्स हवे असतील तर पटो अथवा न पटो, भलेबुरे सगळे मार्ग तर अबलंबावेच लागणार होते. कुणाचंही नुकसान न करता जे जे करणं शक्य आहे ते ते करायलाच हवं असं सम्याचं मत होतं. आत्ता प्रश्न होता ते क्वेश्चन पेपर्स मिळवण्याचा!
...सम्याच्या डोक्यात त्याचीही योजना आकार घेत होती.


    एक दिवस राहुल्याने सुहासला सांगितलं," सुहास, तुला एक गोष्ट सांगायचीये! तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव , तो तुझा प्रश्न आहे, पण सम्या आणि त्याची गॅंग तुझ्या वाईटावर टपलेले आहेत! तुला कुठेकुठे आणि कसंकसं गोत्यात आणता येईल याच्यावर त्यांचा विचार चाललेलाय. मला एक मित्र म्हणून असं वाटतं की तू कुठल्याही प्रॉब्लेममधे येऊ नये! आणि हो... फोकसमधेही!"

राहुल्याने "फोकसमधे" अशा स्टाईलमधे आणि पॉज घेऊन म्हटलं की क्षणभर का होईना, पण सुहासच्या काळजात कळ उठली. त्याला वाटायला लागलं की हा तर असं सांगतोय की जसं याला सगळं माहितीये! याला खरंच तर माहीत नसेल? तो इतका घाबरला की राहुल्याच्या म्हणण्याची सत्यासत्यता तपासून बघण्याचंही त्याला सुचलं नाही. माणूस घाबरला की चुकांवर चुका करायला लागतो. त्याकरता त्याने त्याची शांतपणे विचार करण्याची शक्ती घालवायची असते. घाबरल्यावर जर ही शक्ती घालवली, तर माणूस नक्की चुका करतो. आणि या क्षणी राहुलला नेमकं हेच हवं होतं. राहुल्याच्या जाळ्यात तो अलगद सापडत होता.

      "तुला...काय म्हणायचंय काय राहुल?" -सुहासने सावधपणे विचारलं. सावधपणापेक्षा त्याच्या चेहे-यावर भीती स्पष्ट दिसत होती. राहुलच्या ते लक्षात येत होतं, पण तो तसं दाखवत नव्हता. तो आपण अगदी अनभिज्ञ असल्याचं दाखवत होता. नाहीतरी त्याला सुहासला हळूहळूच रिंगणात घ्यायचं होतं.


(क्रमश:)

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०११

ब्लॅक फ्रायडे (भाग ५)

     ढाब्यावर येऊन ते बसले. चहा येईपर्यंत कुणीच एकमेकांशी बोललं नाही. नाहीतरी सम्याला घाई करायचीच नव्हती. तो अगदी शांत बसला होता,वरुन अगदी नॉर्मल असल्यासारखा दाखवत असला तरी त्याच्या मनात आत्ता प्रचंड उलथापालथ चाललेली होती. सुहासच्या प्रत्येक प्रश्नाला कसं उत्तर द्यायचं याची जुळवाजुळव तो कॉलेजमधून निघाल्यापासून करत होता.

     सुहासच्या मनातही चलबिचल होत होती. "सांगावं का याला? बरं सांगावं तरी का सांगावं? आणि काय सांगावं? हा बाकीच्यांना सांगणार नाही कशावरुन? आणि याने जर का सांगितलं तर आपण जमवून आणलेली सगळी भट्टी बिघडून जाईल. तसा चांगलाय हा! आपली आणि त्याची अशी काही दुष्मनीपण नाहीये! याला जर आपण आपल्या बाजूला ओढलं तर आपला फायदाच फायदा आहे! ते क्वेश्चन खरेच आहेत कशावरुन? एक गोष्ट आहे, स्वार्थ दिसायला लागला की माणूस आंधळा होतो. हा काही देव नाहीये! याचा फायदा होत असेल तर दोस्ती गेली अक्कलखाती! फक्त ही गोष्ट याला पटवून द्यायला हवी! आत्ताच... हीच वेळ आहे सम्याला राहुल्यापासून दूर करण्याची. राहुल्यावर सूड उगवण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. साला नेहाला माझ्यापासून दूर करतो काय? बघ राहुल्या मी तुझं कसं नुकसान करणार आहे! तुला कळणार पण नाही की तू गेलायेस! हीच वेळ आहे एका दगडात दोन पक्षी मारण्याची! नेहाबद्दल पण सम्याचं मत तसं चांगलं नाहीये! आता मरा, नेहा अन राहुल्या!" सुहास स्वत:वरच खुष झाला.

त्याला गालातल्या गालात हसतांना पाहून सम्या म्हणाला,
"काय रे एकटाच हसतोयेस? काय झालं?" अर्थात सम्याला अंदाज होताच की हा काय विचार करत असेल!

"कशी गम्मत असते ना दोस्त! आता बघ ना, तू त्या राहुल्याला इतकं समजावलं, पण ऐकलं का त्याने तुझं? तुझ्या दोस्तीची काही कदर आहे का त्याला? साला हा राहुल्या आधीच कुठूनतरी क्वेश्चन पेपर्स मिळवत असेल! आपण आपलं घासतोय! गेला ना तुम्हाला सोडून! त्याला काय गरज नाही आता आपल्या सगळ्यांची!" -सुहास.

रागाने सम्याच्या मुठी आवळल्या जात होत्या. सुहाससारख्या हलकटाने राहुल्याबद्दल असं बोलावं हे ऐकूनच त्याच्या डोक्यात तिडिक गेली होती. आणि "आपण"? हा कधी "आपल्यात" होता? साला स्वत: क्वेश्चन पेपर्स काढतोय आणि राहुल्याचं नाव बदनाम करतोय! पण आपल्याला आत्ता राग आलाय हे दाखवून चालणार नव्हतं. प्लॅन पार फिसकटला असता.

"जाऊ दे यार सुहास, होत असतं असं आयुष्यात! चालूच असतं! सोड!" - सम्या समजावणीच्या सुरात बोलला.
पण सुहास भडकला. सम्यालाही हेच हवं होतं. रागाच्या भरात माणसाच्या तोंडून ब-याचदा खरं निघूनही जातं.

"अरे काय जाऊदे! काही वाटतं का त्या राहुल्याला? साला खुशाल दोस्तीचा गळा घोटतो! ती नेहा पण तशीच! आज एकदम कसाकाय राहुल्या आठवला काय माहीत! तुला सांगतो सम्या, हा राहुल्या एकदम नीच आहे रे! नेहा माझ्याशी बोलायची ना तर किती जळायचा तो! जाऊ दे, ती पण तशीच निघाली, हलकट!" -सुहासचा संताप संताप होत होता. सम्याला जाणवलं, गाडी रुळावर यायला सुरुवात झालीये!

     "पण झालं काय रे तुमचं भांडण व्ह्यायला?" - सम्याने पाचर टाकली. आता तो अपेक्षीत परिणामाची वाट बघत होता... आणि... परिणाम झाला! ज्या बेसावध क्षणाची सम्या वाट बघत होता तो क्षण येऊन ठेपला होता.

    

.... रात्री अकरा वाजता "साकी" मधे सगळे जमलेले होते. सम्या, रव्या, निल्या, मन्या, पश्या आणि.... राहुल्याही!
"राहुल्या, आपला पहिला पार्ट तर एकदम सक्सेसफूल! थ्री चिअर्स!" - सम्या चित्कारला! "पण साला तुला शिव्या घालत होता रे! माझा संताप होत होता, त्याला विश्वास बसावा म्हणून मी पण घातल्या दोन-चार शिव्या तुला! सॉरी यार!"

"जाउ दे रे! तुझ्या काय शिव्या लागणार आहेत का? साल्या सॉरीबिरी जाऊ दे, काय झालं ते सांग!" -राहुल्या.

सम्या सरसावून बसला.
"काय सांगू यार, आपल्याला जे हवं होतं ते मिळालंय!" -सम्या.

"अबे झालं काय होतं, सांग ना पटकन!" सम्या सोडून उरलेले वीस कान जीव गोळा करुन ऐकू लागले.

सम्या बोलू लागला,

"अरे, हा सुहास आधी बोलतच नव्हता, पण मी त्याला विश्वास पटवून दिला की मी राहुल्याचा किती तिरस्कार करतो! मन पोपटासारखं बोलायला लागलं बेणं! अरे त्याला काळे सरांनी काही टिप्स दिल्या आहेत, हेच क्वेश्वन इंटर्नल एक्झाममधे येतील म्हणून! साला आधी सांगतच नव्ह्ता. पण मग म्हणे यार तू तुझा फायदा बघ! मी देतो तुला क्वेश्चन्स! फक्त एक अट आहे, कुणालाच कळू देऊ नकोस! मी म्हणालो, बिलकूल नाही! साला माझ्या ग्रुपने माझ्या जीवावर आतापर्यंत उड्या मारल्या, आता लै झालं. साले कॉलेज संपल्यावर मला विचारणार पण नाहीत! जाऊ दे सगळ्यांना खड्ड्यात! मला काहीच कुणाशी घेणंदेणं नाहीये! अन तुला कुठून मिळाल्या विचारलं तर म्हणे यार तुला माहीत नाही का, पैसा फार मोठी चीज आहे! काळे सर पण माणूसच आहेत. राग,लोभ,हाव सगळं त्यांनाही लागू आहेच ना! बस, पैसा फेको, इस दुनिया मे सब कुछ मिल जाता है! मग मी विचारलं की नेहाशी तुझं भांडण का झालं? तर म्हणे तिला कुठूनतरी वास लागला की माझ्याकडे क्वेश्चन प्र्पर्स आहेत, तिने कदाचित माझी बॅग चेक केली असेल! मी लगेच त्याला उचकवला, साल्या तू इतका जवळ का येऊ देतोस कुणाल की ती व्यक्ती तुझी बॅगही चेक करू शकते! तर म्हणे की यार मी तिला चांगली दोस्त समजत होतो. अन मी तिला सांगितलं की असं काही नाहीये, तर डायरेक्ट भांडायलाच लागली. मला म्हणे मी सगळ्यांना सांगेन, तिला म्हटलं सांग, कुणी कसा विश्वास ठेवेल तेच बघतो मी! मी तिच्याबद्दल असं काही सगळ्या मुलामुलींमधे पसरवलं आहे की कुणीच तिच्याशी साधं बोलतही नाही! माझ्याविरुद्ध जाणं म्हणजे काय असतं ते तिला आता कळालंच असेल. बरं ती काळे सरांकडे पण जाऊ शकत नाही, हे तर चोराकडेच चोरीची तक्रार करण्यासारखं झालं! काळे सर तर तिला उभं पण करणार नाहीत! गेली ना आता दोन्ही बाजूंनी!"

       ... इतकं सगळं एकाच दमात बोलून सम्याला धाप लागली होती. त्याने पाण्याचा घोट घेतला आणि म्हणाला,"इंटर्नलचे पेपर्स फुटताहेत ही बातमी तर खरी आहे! आता आपण काय करायचं यावर परत विचार करावा लागणार आहे!"

सगळ्यांच्या डोळ्यात सुहासबद्दल घृणा दाटली होती. माणूस इतका खालच्या पातळीला जाऊ शकतो? आपण जर बलवान नसू तर एखाद्या बलवानाचं नुकसान पाहुन आनंद होऊ शकण्याइतका? अर्थात या ग्रुपचं काहीही नुकसान झालं नव्हतं. आणि काळे सर? एच.ओ.डींनीच असं केलं तर दाद कुणाकडे मागायची? हातात पूर्ण पुरावा असल्याशिवाय प्रिन्सीपॉल सरांकडे जाऊन पण उपयोग नव्हता! बरं ते काही अ‍ॅक्शन घेतीलच याची खात्री काय? आपल्या कॉलेजची नाचक्की होऊ नये म्हणून त्यांचा कल हे प्रकरण दाबून टाकण्याकडेच राहील ना? आणि एच.ओ.डींना कळालं की आपण त्यांची तक्रार केली आहे तर आपलं कॉलेज काय, पण करिअरही बरबाद होऊ शकतं! काय करावं बरं? सगळेच विचार करत होते.

एकदम सम्या म्हणाला, "अरे राहुल्या ती नेहा काय म्हणाली आज? तिथून काय अपडेट्स?"

"हाँ... अरे हीच गोष्ट तिने मला पण सांगितली की तिला अशी अशी शंका आहे! म्हणत होती, सुहास मला म्हणायचा की तू माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस, मग त्याने का केलं असेल रे असं? आणि नेहेमीप्रमाणे रडायला लागली!"

"डन इट! काय चालू आहे ते तर कळालं! पण सगळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला हे नाटक हे सेमीस्टर संपेपर्यंत असंच चालू द्यावं लागणार आहे. आता याचा पूर्ण सोक्षमोक्ष लावावाच लागेल. सुहासला म्हणा किंवा नेहाला म्हणा, अजिबात सुगावा लागता कामा नये! आणि मन्या, तू जास्त काळजी घे! साल्या तू ऑलरेडी सेंटी आयटम आहेस! लगेच विरघळतो!" -सम्या.

"नाही बे, साल्या तुमची साथ सोडेन का मी?" -मन्या.




...अर्धी लढाई तर जिंकलेली होती.



(क्रमश:)

ब्लॅक फ्रायडे (भाग ४)

       ... लायब्ररीत नेहा त्याची वाटच पहात होती. पश्चात्तापाने तिचा चेहेरा झुकलेला होता, निदान राहुलला तरी असंच वाटत होतं. तिचा पश्चात्ताप कितपत खरा होता देव जाणे! त्याचं उत्तर तर काळाच्या पोटातच दडलेलं होतं.

"राहुल, मला असं वाटतं की मी कळत-नकळत तुझ्यावर अन्याय केला!" -नेहा.

"ते जाऊ दे, कुठला टॉपिक समजला नाहीये तुला?" - राहुल्याने तिला एकदम जमिनीवर आणत म्हटलं.
तिचा एकदम भ्रमनिरास झाला, पण ती काहीच बोलली नाही. पुढचे दिड-दोन तास राहुल्या तिला न समजलेला टॉपिक समजवण्यात दंग होता. मागच्या आठवणींचा मागमूसही त्यानं चेहे-यावर दाखवला नव्हता.लेक्चर्सची वेळ झाल्यावर तो सरळ रुमवर निघून आला. खूप मानसिक थकवा आला होता त्याला! मनावर इतकं ओझं घेऊन लेक्चर्सला बसणं शक्यच नव्हतं आज! रुमवर आल्यावर तो जरा आडवा झाला आणि दोन वर्षांपूर्वीचे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागले.

       ... तेव्हा कॉलेज नुकतंच सुरु झालेलं होतं. आत्ताचा ग्रुप पण बनलेला नव्हता. तेव्हा कॉलेजच्या ऑफिसमधे तिची अन त्याची ओळख झाली होती. त्यानंतर सगळं व्यवस्थित होतं पण ऐन परिक्षेच्या वेळेस ती आजारी पडली. तेव्हा तिचा बुडालेला अभ्यास भरुन काढायला तिला राहुलनेच मदत केली होती. खरं तर त्याच्यामुळेच ती त्या वर्षी पास झाली होती. नंतर जसा राहुलचा हा ग्रुप बनत गेला तशी तिच्यात आणि राहुलमधे दरी पडत गेली. तू कायम माझ्याचबरोबर असायला हवं असा तिचा हट्ट होता. राहुलने तिला बरंच समजवलं की असं कसं शक्य आहे? ते माझे रुमपार्टनर्स आहेत, माझे मित्र आहेत. मी तुझ्याशी बोलतोय ना? मग इतका पझेसिव्हनेस का? तिला पझेसिव्हनेस म्हटल्याचा खूप राग आला. त्यावरुन ती राहुलशी खूप भांडली. त्यानंतर तिने त्याला टाळणंच सुरु केलं. त्यात सुहास म्हणजे बोलबच्चन! राहुलला फारसं बोलणं नव्हतं. अर्थात त्याचं म्हणा, किंवा तिचं म्हणा वय हे स्तुतीला भुलणारंच होतं. त्यामुळे सुहासने केलेल्या स्तुतीला ती भुलली आणि कायम सुहासच्याच संपर्कात राहू लागली.करता करता दोन वर्ष कसे निघून गेले कुणालाच कळलं नाही. या दोन वर्षात ती राहुलशी बोटावर मोजण्याइतक्या वेळेस बोलली असेल. राहुलला मात्र मनातून ती आवडत होती. त्याने ही गोष्ट फक्त सम्याला सांगितली होती, खरं तर ही गोष्ट सम्यानेच त्याच्याकडून काढून घेतली होती. तेव्हाच सम्याने त्याला सल्ला दिला होता.

    "राहुल्या, हे कॉलेजमधलं प्रेमबिम आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी नसतं! तुझ्या किंवा माझ्या बापाचा काही मोठ्ठा बिझनेस नाहीये की संपलं कॉलेज की बसले लगेच खुर्चीत! अजून आपल्याला शून्यातून आपलं विश्व निर्माण करायचंय! करण्यासारखं बरंच काही आहे आपल्याला अजून आयुष्यात! मला नाही वाटत की शी इज सुटेबल फॉर यू! म्हणजे तुझा व्ह्यू कसा आदर्शवादी आहे ना, तिचा तसा नाहीये, शी इज परफेक्ट एक्झाम्पल ऑफ रिअलिस्टीक व्ह्यू! हवेनुसार दिशा बदलणारी आहे रे ती! तिला जेव्हा जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा तेव्हा तिला तू आठवायचास. काम संपलं की तू कोण आणि मी कोण! ती तुला एक मित्र म्हणून पण मानत नाही रे!तू उगाच तिच्या बाबतीत स्वप्न बघतोयेस! काढून टाक हा विषय डोक्यातून!"

"तू म्हणतो तसं असेलही सम्या, पण ती तशी वागत असेल तर आपणही तसंच वागलं पाहिजे असं कुठेय? असं असेल तर तिच्यात अन आपल्यात फरक काय राहीला?" - राहुल्याचा युक्तिवाद!

"काये राहुल्या, आपण सगळ्यांशी, अगदी आपल्याशी ठरवून वाईट वागणा-यांशीही कायम चांगलेच वागत राहीलो तर काय होतं माहीतीये? आपण चांगलंच वागायला हवं असं लोक गृहीत धरायला लागतात. आणि आपण कितीही वाईट वागलो तरी हा आपल्याशी चांगलाच वागेल असं जेव्हा कुणी गृहीत धरायला लागतं ना, तो आपला मोठ्ठा पराभव असतो. कुणाला आपली किंमत कळत नाही रे अशाने! मग अशा वेळी आपली किंमत दाखवून द्यावीच लागते!"
या उत्तरावर मात्र राहुल गप्प बसला.

      दुस-या दिवशी जेव्हा राहुल्या नेहाला भेटला तेव्हा त्यानं नेहाला सांगितलं,
"नेहा, मला माफ कर! मी तुझ्या मैत्रीला ओळखू शकलो नाही! आज मी सगळ्या रुमपार्टनर्सचा खरा चेहेरा पाहिलाय. सगळे फक्त कामापुरते गोड वागत होते माझ्याशी! केसाने गळा कापत होते माझा! अरे मी यांच्यासाठी काय काय केलं नाही, पैसे उधार देण्यापासून कर्जाला जामीन राहण्यापर्यंत केलं! पण... पण.. मी आज रुममधे येत होतो तेव्हाच सम्याला रव्याला सांगतांना ऐकलं की हा राहुल्या कसा पुढे जातो तेच मी बघतो. मीच त्याचा वेळ बरबाद करणार आहे, मग बघू, त्याला अभ्यासाला कसा वेळ मिळतो ते! मी खूप खूप साधा राहिलो गं! कळालंच नाही मला! तू बरोबर सांगत होतीस! तेव्हा तुझं ऐकलं नाही ना मी! मी एकदम रुममधे आलो तसं सगळे एकदम चिडिचूप! मी आल्यामुळेच ते एकदम शांत झालेत हे मला कळलं पण मी तसं दाखवलं नाही! मला आता त्यांच्यातच राहून सिद्ध करायचंय की ते माझं काहीही नुकसान करु शकत नाहीत! मी त्या सगळ्यांच्या पुढे जाऊन दाखविन! पण का गं असं? जर स्वत:ला पुढे जाता येत नसेल तर दुस-याचे पाय तरी का ओढावे माणसाने? का असे वागले असतील माझ्याशी?" - राहुल्याच्या चेहे-यावर राग आणि विश्वासघात केल्याची भावना स्पष्टपणे दिसून येत होती.

"जाऊ दे रे राहुल! कुणी कसं वागावं हे आपल्या हातात नाहीये ना! तू खरंच खरंच खूप खूप मोठ्या मनाचा आहेस! मी तुझ्याशी इतकी वाईट वागूनही तू माझ्याशी चांगलाच वागतोयेस! मी खरंच चुकले रे तेव्हा! मला कळालंच नाही तेव्हा रे!" -नेहा डायरेक्ट रडायलाच लागली.

"जाऊ दे नेहा, झालं गेलं सगळं विसरून जा!" - राहुल्याने आश्वासकपणे तिच्या खांद्यावर हात ठेवला.


      दुस-या दिवशी वर्गात कुजबुज सुरु झाली, राहुल्या सम्याच्या ग्रुपमधून बाहेर पडलाय... आणि ही बातमी एकशे एक टक्के खरी आहे! सगळा वर्गच बघत होता ना, की राहुल्या एकटाएकटाच राहतोय, कुणातच मिसळत नाहीये, आणि सम्याकडे तर तो ढूंकुनही बघत नाहीये! आता सुहासला चेव चढला. शेवटी हा ग्रुप फुटल्याचा त्याला आसुरी आनंद झाला होता. फक्त एका गोष्टीचं त्याला वाईट वाटत होतं की नेहा आता आपल्याला काहीच विचारत नाहीये, ती बोलली तर फक्त राहुल्याशी बोलते, नाहीतर बाकीच्या मुलींशीही नाही. आपण तिच्याशी स्वत:हून भांडलो होतो, त्यामुळे आपण जर तिला परत मनवायला गेलो आणि तिने भर वर्गासमोर आपल्या इज्जतीच पंचनामा करुन ठेवला तर काय घ्या, म्हणून तो गप्प बसला होता. तो आपला सहज गेल्यासारखा सम्याकडे गेला आणि म्हणाला,

"और दोस्ता, काय चाललंय, तुमच्यासारख्या भल्या माणसाशी लोक कसंही वागायला लागलेत! आपल्याच माणसानी धोका देण्यासारखं दु:ख नसतं रे! काय पण असं झालं काय की चक्क राहुल्या एकटाएकटा रहायला लागला! एकदम एकता ते एकटा! काय चांगलं नाय राव हे! आपण तर असं नसतं केलं. दोस्ती दुनियादारीत काय भांडणं होत नाहीत का? दोस्तीच्या खात्यावर जमा असतात ते! त्याचा काय इश्यू नसतो करायचा! तसा राहुल्या चांगलाय रे! सध्या कोणीतरी त्याला भडकवलंय! तुला कळू शकतं, नाही का?" - सूचकपणे सुहास बोलला!
       खरं म्हणजे सम्या आणि राहुल्यात कशामुळे बेबनाव झाला होता याबाबत कुणीच ठोस कारण देऊ शकत नव्हतं. असं असं हा हा बोलला, मग तसं तसं तो तो बोलला, असंच काहीसं मुलांमधे चाललेलं होतं. पण सगळ्यांना दिसत होतं की राहुल्या आणि सम्यामधे नक्कीच कशावरुन तरी जोरदार भांडण झालेलं आहे. इतकंच काय, राहुल्या ग्रुपमधल्या बाकीच्या मुलांशीही बोलत नाहीये!

सम्या सुहासकडे बघून फक्त छ्द्मी हसला.
"काये सुहास, तू म्हण की मी म्हण, एकाच नावेतले प्रवासी आहोत रे! तुलापण कुणी तुझ्याशी असं वागलं तेव्हा कसं वाटलं असेल हे मी समजू शकतो! मी सहानुभुती दाखवत नाहीये हं! ती सहवेदना मलाही जाणवतेय!"
सम्याचा रोख स्पष्ट होता.... नेहाकडे! नेहा आणि सुहासचं भांडण झालंय हे सम्याला माहीत होतं. पण त्यानं आपल्याला ही गोष्ट माहीतीये असं सुहासला अजिबात जाणवू दिलं नाही.

"चल यार मला जरा पुस्तकं घ्यायचीयेत सीटीतून! चल माझ्याबरोबर!" - सुहास म्हणाला.
याला पुस्तकंबिस्तकं काही घ्यायची नाहीयेत तर याला काहीतरी बोलायचंय हे सम्याच्या लक्षात आलं.

"चल."

सुहासने गाडीला किक मारली आणि ते गावाबाहेरच्या ढाब्याकडे वळाले.

"अरे इकडे कुठे? इकडे तर हायवे आहे!" -सम्या.

"अबे पुस्तकं कुणाला घ्यायचेत! मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी!" -सुहास.

       ...शेवटी.... आ गया उँट पहाड के नीचे! सम्या मनातच हसला. प्लॅन बरहुकुम चाललेला होता.


(क्रमश:)