सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

तळेगाव गणपती-शिरगाव-देहू

               आठ दिवसांपूर्वी सहज ’चेहेरापुस्तिका’ (फेसबुक) चाळत बसलो होतो. एका मित्राने त्याचा एका मोठ्ठ्या गणपतीजवळचा फोटो डकवला होता. मस्त ठिकाण वाटत होतं, म्हणून त्याला विचारलं की हे ठिकाण कुठलं आहे? त्याने सांगितलं, हा तळेगावजवळचा ’उघडा गणपती’! रस्त्यावरच आहे! झालं! ठरवून टाकलं, हा शनिवार या सत्कारणी लावायचाच! हा गणपती पुण्याहून मुंबईला जाताना रस्त्यावरुन दिसतो, रेल्वेमधूनही आणि रस्त्याने जातानाही!


                शनिवारी सकाळी लवकरच पुण्याहून निघालो. मुंबई-पुणे हायवेला लागलो आणि अर्ध्या तासातच सोमाटणे फाटा पार करुन गणपतीच्या पायथ्याशी पोचलो. शनिवार असल्याने मुंबई-पुणे हायवेला फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे अगदी रमतगमत गाडी चालवूनही अर्ध्या तासात पोचता आलं. पायथ्याशी गाडी पार्क करुन पाय-या चढून वर आलो. सकाळचे पावणेदहा- दहा वाजत होते, त्यामुळे तिथेही गर्दी नव्हतीच. आरामशीर दर्शन झालं. दोन-चार लोक दर्शनाला आले होते. सकाळ असली तरी पितृपक्षाचं ऊन पायाला चटके देत होतं. तिथल्या सिक्युरिटी गार्डकडूनच आमचे फोटो काढून घेतले. वरुन अवतीभवतीचा परिसर खूप छान दिसत होता. नुकताच पावसाळा संपल्याने सगळीकडे हिरवंगार गवत उगवलेलं होतं. त्या गवतात काही छोटी छोटी फुलंही उलमलेली होती. एकंदर मस्त मूड बनवणारं वातावरण होतं. खूप दिवसांनी असं मस्त "फ्रिक आऊट" वाटत होतं. रोजरोजच्या त्याच त्या कामाला उबगून गेल्यावर अशा ठिकाणी मस्त एनर्जी मिळते. आज हा एकदम स्वत: बाहेर जायला कसा तयार झाला या विचाराने बायकोही आश्चर्यचकित झाली होती!

                      (रस्त्यावरुन दिसणारा हिरवागार डोंगर)

                               तिथल्या सिक्युरिटी गार्डला विचारलं की इथून शिरगाव, ज्याला प्रतिशिर्डी म्हणतात ते किती लांब आहे? तिथून शिरगाव फक्त दोनच किलोमिटर होतं. मग काय! चलो शिरगाव! शिरगावला पोचलो. साईमंदिरात फार गर्दी नव्हती. छान दर्शन झालं. तितक्यात बायकोला चिंचांची कॅंडी विकणारा माणूस दिसला! मग काय! "अहो....!!!" कँडी घेतल्या. तिथून परतीच्या प्रवासाला लागलो.




               गणपतीला जाताजाता रस्त्याच्या उजव्या बाजूला आधीच देहू फाटा बघितला होता. बायकोला म्हटलं, काय जायचं का देहूला? ती म्हणे चला! मग तिथून देहू! देहूमधे शिरल्याशिरल्या तिथलं वातावरण बघून आपोआप अंगात वारकरी शिरला! आहाहा... काय मस्त वाटतं सांगू! विठ्ठल मंदिरात दर्शनाला गेलो तो हातातली फुलं आणि तुळशी तिथल्या पुजा-याच्या हातात दिली. पुजारी म्हणाला, "अहो वाहा ना तुम्हीच!" खरंच छान वाटलं. आपण नेहेमी जेव्हा इतर मंदिरात जातो तेव्हा पुजारी आपल्या हातातून खसकन पूजासाहित्य ओढून घेतात आणि एक प्रसादाचा दाणा हातावर टेकवून पुढे ढकलून देतात. मी इथेही हीच अपेक्षा केली होती. पण इथे आम्हाला स्वत:च्या हाताने विठ्ठलाची पूजा करायला मिळाली. नेमकं कसं वाटलं नाही सांगता येणार, पण खूप अंतर्मुख झाल्यासारखं वाटलं. योगायोगाने त्या दिवशी एकादशी होती. ठरवूनही एकादशीच्या दिवशी मंदिरात न जाणारा मी, त्या दिवशी कसाकाय देहूत पोचलो देव जाणे!
                देहूवरुन निघालो तो न थांबता सरळ घरी! फक्त तीन तासात आम्ही तीन ठिकाणी फिरुन आलो. आता ही एनर्जी बरेच दिवस पुरेल! परत डाऊन वाटायला लागलं की परत असंच एखादं ठिकाण एनर्जीसाठी!

बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

अ‍ॅन्ड्रॉईड



      अ‍ॅन्ड्रॉईड ही मोबाईल्ससाठी असलेली चालनप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) आहे. ती खास करुन स्मार्टफोन्स आणि टॅब्लेट पीसींसाठी बनवलेली आहे. तिचा विकास ’ओपन हॅन्डसेट अलायन्स’ ने गुगलच्या नेतृत्वाखाली केला. अ‍ॅन्ड्रॉईड नावाची मूळ कंपनी गुगलने ५ नोव्हेंबर २००७ ला खरेदी केली आणि नंतर वाढवली. अ‍ॅन्ड्रॉईड ही ’ओपन सोर्स सिस्टीम’ आहे. ओपन सोर्स म्हणजे तिचा सोर्स कोड सर्वांना उपलब्ध आहे. त्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. मायक्रोसॉफ्टची विंडोज जशी आपल्याला विकत घ्यावी लागते आणि आपल्याला तिचा फक्त सेट अप मिळतो तशी अ‍ॅन्ड्रॉईड नाही. त्यामुळे अ‍ॅन्ड्रॉईड वाढवण्यासाठी कुणीही त्यात भर घालू शकतं.अ‍ॅन्ड्रॉईड ही लिनक्स कर्नेल वर चालते. कर्नेल म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरचं हार्डवेअर आणि तुम्ही स्थापित (इंन्स्टॉल) केलेले प्रोग्राम्स यातील दुवा.
आज बाजारात अनेक प्रकारचे अ‍ॅन्ड्रॉईड फोन्स उपलब्ध आहेत. ते सर्व मुख्यत: बिझनेस फोन्स किंवा टॅब्लेट पीसी आहेत. त्यावर आपण स्वत: बनवलेले अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन्स टाकू शकतो.

      अ‍ॅन्ड्रॉईडची वैशिष्ट्ये:
      १) हॅन्डसेट लेआऊट्स:
      अ‍ॅन्ड्रॉईड फोन्सची स्क्रीन साईज ब-यापैकी मोठी असते. त्यावर आपण टू डी, थ्री डी अ‍ॅप्लिकेशन्स आरामात वापरु शकतो. (जसे थ्री डी गेम्स.)
      २) स्टोरेज:
      अ‍ॅन्ड्रॉईडमधे स्वत:चा डेटाबेस आहे. त्याला एस्क्युलाईट म्हणतात.
      ३) कनेक्टिव्हीटी:
      अ‍ॅन्ड्रॉईड विविध पद्धतींनी कनेक्ट होऊ शकतो जसं GSM/EDGE, IDEN, CDMA, EV-DO, UMTS, Bluetooth, Wi-Fi, LTE, NFC आणि WiMAX
      ४) भाषा सहाय्य:
      अ‍ॅन्ड्रॉईड वेगवेगळ्या मानवी भाषांमधे काम करु शकतो.
      ५) वेब ब्राऊजर:
      अ‍ॅन्ड्रॉईडकडे चांगला वेब ब्राऊजर आहे.
      ६) जास्तीचा (अ‍ॅडिशनल) हार्डवेअर सपोर्ट
     अ‍ॅन्ड्रॉईड व्हिडिओ/स्टील कॅमेरा वापरु शकतो तसेच टचस्क्रीन, जीपीएस, अ‍ॅक्सिलरोमीटर, गायरोस्कोप,मॅग्नेटोमीटर, डेडिकेटेट गेमिंग कन्सोल, प्रेशर सेन्सर तसेच थर्मोमीटर अशी वैशिष्ट्ये त्यात आहेत.
           याव्यतिरिक्त जावा सपोर्ट, सर्व प्रकारचा मिडिया सपोर्ट (एमपीथ्री/फोर फाईल्स आणि इतर), स्ट्रिमिंग मिडिया सपोर्ट, मल्टिटच, ब्ल्युटूथ, व्हिडिओ कॉलिंग, मल्टिटास्किंग, व्हॉईस इनपुट, टिथरिंग,स्क्रीन कॅप्चर अशी अनेक वैशिष्ट्ये अ‍ॅन्ड्रॉईडची आहेत.

अ‍ॅन्ड्रॉईडवर बाजारात कायकाय उपकरणे उपलब्ध आहेत बघा जरा:

      वापर:
      अ‍ॅन्ड्रॉईडचा वापर प्रामुख्याने स्मार्टफोन्स, नेटबुक, टॅब्लेट कॉम्प्युटर्स, गुगल टीव्ही इत्यादीत होतो. गुगल टीव्ही प्रामुख्याने अ‍ॅन्ड्रॉईडची एक्स८६ ही आवृती वापरते.

अ‍ॅन्ड्रॉईड आवृतींचा इतिहास:

ऑक्टोबर २००३: अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातल्या पाउलो अल्टो येथे अ‍ॅन्डी रबिन, रिक मायनर, निक सिअर्स आणि ख्रिस व्हाईट यांनी अ‍ॅन्ड्रॉईडची मुहुर्तमेढ रोवली.

ऑगस्ट २००५: गुगलने अ‍ॅन्ड्रॉईड कंपनी विकत घेतली.

५ नोव्हेंबर २००७: ’ओपन हॅन्डसेट अलायन्स’ ची स्थापना झाली.

१२ नोव्हेंबर २००७: अ‍ॅन्ड्रॉईडची बीटा आवृती बाजारात आली.

२३ सप्टेंबर २००८: पहिला अ‍ॅन्ड्रॉईड फोन, एच.टी.सी. ड्रीम अ‍ॅन्ड्रॉईडच्या पहिल्या(१.०) आवृतीसह बाजारात आला.यात खालील वैशिष्ट्ये होती.
१) गुगलच्या विविध सेवांबरोबर आदानप्रदान
२) एचटीएमएल, एक्सएचटीएमएल, अनेक एचटीएमएल पेजेसला सहाय्य करणारा वेब ब्राऊजर.
३) अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट वरुन अ‍ॅप्लिकेशन्स उतरवून घेणे (डाऊनलोड करणे) आणि अद्ययावत (अपग्रेड) करणे.
४) मल्टीटास्किंग, इन्स्टंट मॅसेजिंग, वाय-फाय आणि ब्लुटूथ सहाय्य.

९ फेब्रुवारी २००९: फक्त टी-मोबाईल जी१ साठी अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती १.१ बाजारात आली.

३० एप्रिल २००९: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती १.५ बाजारात आली, जी कपकेक या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) अधिक वेगवान कॅमेरा, आणि वेगवान फोटो कॅप्चर
२) अधिक वेगवान जी.पी.एस. यंत्रणा
३) स्क्रीनवरचा की-बोर्ड
४) यातून व्हिडिओ सरळ तूनळी (यूट्यूब) आणि पिकासावर चढवता (अपलोड करता) येत होते.

१५ सप्टेंबर २००९: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती १.६ बाजारात आली, जी डोनट या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) वेगवान शोध यंत्रणा, व्हॉईस सर्च
२) एका क्लिकवर व्हिडीओ आणि फोटो मोडमधे चेंज करता येऊ शकणारा कॅमेरा
३) बॅटरी वापर दर्शक
४) CDMA सपोर्ट
५) अनेक भाषांमधील टेक्स्ट टू स्पीच


२६ ऑक्टोबर २००९: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती २.० बाजारात आली, जी इक्लेअर या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) अनेक ईमेल अकांऊंट्स
२) ईमेल अकांऊंट्ससाठी मायक्रोसॉफ्ट एक्स्चेंजचं सहाय्य
३) ब्ल्युटूथ २.१ सहाय्य
४) नविन ब्राऊजर जो एच.टी.एम.एल. ५ ला सहाय्य करतो.
५) नविन कॅलेंडर

३ डिसेंबर २००९: अ‍ॅन्ड्रॉईडची एस.डी.के आवृती २.०.१ बाजारात आली.

१२ जानेवारी २०१०: अ‍ॅन्ड्रॉईडची एस.डी.के आवृती २.१ बाजारात आली.

२० मे २०१०: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती २.२ बाजारात आली, जी फ्रोयो या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) विजेट्स सहाय्य: विजेट्स म्हणजे छोटे छोटे प्रोग्राम्स असतात जे होमस्क्रीनवर डकवता येतात. उदा: आजपासून ख्रिसमसला किती दिवस बाकी आहेत याचा प्रोग्राम, तापमान दर्शक, येण्या-या महिन्यात तुमच्या फोनबुकमधे असलेल्या कुणाचा वाढदिवस आहे हे सांगणारा छोटासा प्रोग्राम इत्यादी.
२) सुधारीत आदानाप्रदान सहाय्य.
३) हॉटस्पॉट सहाय्य.
४) अनेकविध भाषांमधील की-बोर्ड.
५) अ‍ॅडोब फ्लॅश आवृत्ती १०.१ सहाय्य.

६ डिसेंबर २०१०: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती २.३ बाजारात आली, जी जिंजरब्रेड या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) सुधारित युजर इंटरफेस.
२) जलदगतीने टाईप करता यावं म्हणून सुधारीत की-बोर्ड.
३) एका क्लिकवर सिलेक्ट करता येण्याजोगं टेक्स्ट आणि कॉपी/पेस्ट.
४) जवळील क्षेत्रातील आदानप्रदान (निअर फिल्ड कम्युनिकेशन).
५) इंटरनेट कॉलिंग.

२२ फेब्रुवारी २०११: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती २.३.३ बाजारात आली, तसेच टॅब्लेट पीसींसाठीची अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती ३.० बाजारात आली, जी हनिकोंब या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) ही आवृत्ती खासकरुन टॅब्लेट पीसींसाठी आणि मोठ्या स्क्रीनच्या फोन्ससाठी बनवली गेली.
२) सुधारीत मल्टीटास्किंग, बदलता येण्याजोगी होमस्क्रीन आणि विजेट्स.
३) ब्लुटूथ टिथरींग
४) चित्रे/व्हिडीओ पाठवण्याची अंतर्गत सोय.

१०-११ मे २०११: गुगलने अ‍ॅन्ड्रॉईडच्या ’आईस्क्रीम सॅंडविच’ आवृत्तीची घोषणा केली.

१८ जुलै २०११: अ‍ॅन्ड्रॉईडची एस.डी.के आवृती ३.२ बाजारात आली.

असा अ‍ॅन्ड्रॉईडचा इथपर्यंत प्रवास झाला. आता आपण अ‍ॅन्ड्रॉईडचा बाजारपेठेतला हिस्सा पाहूया.

बाजारपेठेतला हिस्सा:
१२ नोव्हेंबर २००७: अर्धा टक्का.
३ डिसेंबर २००९: ३.९ टक्के.
२० मे २०१०: १७.७ टक्के.
१०-११ मे २०११: २२.२ टक्के.

ही अ‍ॅंन्ड्रॉईडची फक्त तोंडओळख आहे.

संदर्भ: http://www.xcubelabs.com/

रविवार, ११ सप्टेंबर, २०११

मीमराठी.नेट कविता स्पर्धा (द्वितीय क्रमांक) कविता

        १ एप्रिल २०११ ते १५ मे २०११ या कालावधीत मी मराठी.नेट ने कविता स्पर्धा २०११ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल १५७ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
       काल दिनांक १०/९/२०११ रोजी जाहीर झालेल्या निकालात माझ्या खालील कवितेला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

       कधीतरी लहर लागली म्हणून चार ओळी खरडणा-या, साहित्याचा आणि व्यवसायाचा दुरान्वयेही संबंध नसलेल्या माझ्यासारख्या एका साध्या माणसाला या निकालाने एक नविन आत्मविश्वास दिला आहे, त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी मीमराठी.नेटचे संचालक श्री. राज जैन, माझा उत्साह वाढवणारे मायबाप वाचक आणि परिक्षक श्री. प्रदीपजी निफाडकर यांचा मनापासून आभारी आहे.

               खूप झालं!

मी चंद्र-तारे आणायच्या गोष्टी करत नाही,
डाळ-तांदूळ आणता आले, खूप झालं!
                तू नाही दिसत ऐश्वर्यासारखी! हरकत नाही,
                पण एकदम आवडलीस, खूप झालं!
काचेचं शमादान मी नाही लावू शकत छताला,
पावलापुरता प्रकाश येतोय,खूप झालं!
                नको करूस पक्वान्न पंचतारांकीत हॉटेलमधली,
                दोन वेळचं रांधता येतं तुला? खूप झालं!
मला नाही जमणार तुला न्यायला लॉंग ड्राईव्हला,
ऑफिसपर्यंत सोडता आलं, खूप झालं!
                तुला नाही समजली माझी कविता? चालेल!
                हिशोब समजतोय ना? खूप झालं!
नसू आपण रोमिओ-ज्युलिएट, वा नसू शिरी-फरहाद,
दोन श्वास, एक प्राण? खूप झालं!
                -आदित्य चंद्रशेखर

-पूर्वप्रकाशित: http://mimarathi.net/node/6228

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०११

गणपती... एक पाहणे

"अहो, आपण गणपती बघायला जाऊयात ना!" इति सौ. उवाच.
"जाऊ ना, आपल्या एरियात खूप सारे गणपती आहेत. चालत चालत बघितले तरी तासाभरात आटोपतील".
"इथले नाही काही, पुण्यातले! आपल्या सांगवीत असून असून किती गणपती असणारेत?"
     "पुण्यातले? शक्य आहे का?"
     "का, काय झालं? पुण्यात गणपती नाहीयेत का?"
     "आहेत ना, पण मरणाची गर्दी आहे!"
     "मग काय झालं? आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी गाडी पार्क करु आणि बघू गणपती!"
     "थांब मला विचार करु दे!"
     "तुम्ही नंतर विचार करत बसा, आधी जायचं की नाही ते सांगा!"
     "बरं जाऊ!"
             मला आठवायला लागलं आम्ही लहानपणी गणपती बघायला जायचो ते. बाबांना ते सकाळी ऑफिसला निघाले असतील तेव्हाच आठवण करुन द्यायची,"बाबा, संध्याकाळी लवकर याल ना? आपल्याला गणपती बघायला जायचंय!" बाबांचा चेहेरा क्षणभर विचारमग्न व्ह्यायचा! पण लगेच ते म्हणायचे,"चालेल, मी येतो लवकर, पण तयार रहा हं, लगेच निघूयात!" इतका आनंद व्हायचा सांगू! तेव्हा वाटायचं की बाबा इतका कसला विचार करतात हो म्हणायला, आता कळतंय, की आज जर लवकर यायचं तर ऑफिसमधल्या कामाची संगती कशी लावायची याचा ते विचार करत असायचे. बिचारे अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी दुस-या दिवशी लवकरच ऑफिसला जायचे. आमच्या चेहे-यावरचा आनंद लोपू नाही म्हणून ते काहीही करायला तयार असायचे.
             संध्याकाळी पाच-साडेपाचला आम्ही शाळेतून आलो की आई म्हणायची, "लवकर आटपा रे, आत्ता बाबा येतील!" आम्ही पटापट हातपाय धुवून मस्तपैकी नवे कपडे घालून पटकन तयार व्हायचो. आमची तयारी झाल्याझाल्या बाबा आले नाहीत तर लगेच आमची टकळी चालू, "आई.... बाबा केव्हा येतील? आम्हाला तयारी करुन ठेवायला सांगीतली आणि अजून स्वत:च आले नाहीत!"
आई सांगायची, "येतील रे पाच मिनिटात, काही काम आलं असेल!"
"नाही काही, त्यांनी लगेच यायला हवं!"
"अरे काम असतं ना ऑफिसात, येतीलच इतक्यात!"
             तेवढ्यात बाबा पोचायचेच! आम्ही लगेच, "बाबा चलायचं ना!"
"अरे हो, बाबांना हातपाय तर धुवू देशील!" आम्ही नाखूषीनेच बाबांच्या तयारीची वाट बघत बसायचो.
लगेच आम्ही घराला कुलूप लावून निघायचो! निघतांना चेहे-यावर असा आनंद असायचा की जसं आम्ही वर्ल्डकप जिंकून आणलाय!
             "बाबा, आज साता-यातले बघू ना! (सातारा हे आमच्या गावातल्या एका भागाचं नाव आहे) जामनेर रोडचे उद्या बघू!" बाबांचे कितीही पाय दुखत असले तरी त्याची पर्वा न करता आम्ही दोघं भाऊ आपले त्यांना ओढतच साता-यात घेऊन जायचो. रस्ताभर नुसते गणपती बघणारे लोक सांडलेले असायचे. कुणी गाडीवरुन अख्ख्या फॅमिलीला फिरवत असायचे,(मी विचार करायचो, इथे इतक्या गर्दीत चालता येत नाहीये, आणि हे लोक गाडीवरुन कसे काय फिरु शकतात? चालवणा-याचीही कमाल आहे. गावातले रस्ते असून असून किती रुंद असणारेत?)कुणी पायीच फिरत असायचे. आमच्यासारख्या पोराटोरांचा आनंद तर गगनात मावत नसायचा! हा गणपती बघू की तो, असं व्हायचं. ब-याच ठिकाणी कापडी गुहा केलेली असायची. त्यात आत जाऊन गणपतीचं दर्शन घ्यावं लागायचं. तिथेही रांग असायची. आतलं डेकोरेशन मात्र खरंच डोळ्याचं पारणं फेडणारं असायचं. काही ठिकाणी ट्रीक सीन्स असायचे, जसं एखाद्या मुलाचं फक्त मुंडकच दिसायच, बाकी शरीर गायब! नळातून जोरात पाणी वाहतांना दिसायचं पण फक्त नळ दिसायचा, बाकी जोडणी दिसायचीच नाही! पूजेच्या ताटातून फक्त पंजापर्यंतचा हात वर यायचा, ते ताट एखाद्या स्टूलावर ठेवलेलं असायचं, पण तो हात कुणाचाय हे दिसायचंच नाही! असे अनेक ट्रीक सीन्स असायचे. आम्ही ते बघतांना अगदी दंग होऊन जायचो. काही ठिकाणी कठपुतळ्यांचा खेळ असायचा. त्यांचा नाच बघून खूप खूप हसू यायचं. जिथे आम्हाला काही दिसायचं नाही तिथे बाबा आम्हाला कड्यावर घेऊन डेकोरेशन दाखवायचे. सगळीकडे अगदी जत्रेसारखं वातावरण असायचं. बाबांच्या मागे लागून एखादा फुगा, बासरी असं काहीबाही आम्ही विकत घ्यायचोच! बासरी म्हणजे माझा जीव की प्राण होती. लहानपणी किती बास-या घेतल्यात त्याची गणतीच नाही. कालच विकत घेतलेली बासरी दुस-या दिवशी माझाच पाय पडून चकनाचूर व्हायची, आणि मी पायात काच घुसल्यासारखा भोंगा ताणायचो!
             गणपती बघून आम्ही रात्री साडेनऊ-दहाच्या आसपास घरी पोचायचो. येताना पूर्ण रस्ताभर कुठला गणपती छान होता आणि कुठलं डेकोरेशन मस्त होतं यावर चर्चा चालत असे. घरी आल्यावरही तेच. आई जबरदस्तीने आम्हाला जेवायला उठवायची. जेवण करुन आम्ही गणपतीबद्दल गप्पा करत झोपून जायचो.
             सकाळी शाळेत मुलं एकमेकांना फुशारक्या मारत सांगत आम्ही काल असा गणपती पाहिला आणि तसा गणपती पाहिला. एखादा भारी वर्णन करु लागला तर बाकीचे त्याच्याकडे कौतुकमिश्रित आश्चर्याने बघायचे. मग सांगणा-यालाही चेव चढायचा. तोही असं अतिरंजित करुन वर्णन करायचा. पूर्ण दहा दिवस शाळेत मुलांना गप्पांना दुसरा विषय नसायचा.
             लहानपणी गणपती बघायला जाताना जो आनंद असायचा तो हळूहळू कमी होत गेला, पण जेव्हा केव्हा काही वर्षांनी माझी मुलं मला म्हणतील,"बाबा, आज लवकर याल ना? आपल्याला गणपती बघायला जायचंय!", तेव्हा मीसुद्धा मनाने माझ्या बालपणात जाऊन येईन आणि परत एकदा "गणपती बघायला" जाऊन येईन!

सोमवार, ५ सप्टेंबर, २०११

सुफी गीते...

               सुफी हा इस्लाम धर्मातला एक पंथ आहे. त्यांची तत्वे परंपरागत इस्लाम धर्मापेक्षा खूप वेगळी आहेत. त्यामुळे हा पंथ मूळ इस्लाम धर्मापासून थोडासा तुटलेला आहे. सुफी पंथात ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींसारखे अनेक महान संत होऊन गेले.आजही अजमेरला त्यांच्या दर्ग्यावर सर्वधर्मींयांची रीघ लागलेली दिसून येते.
                          या सर्व संतांनी समाजाला दिलेली अनमोल देणगी म्हणजे त्यांच्या गीतरचना! ईश्वराला आळवण्यासाठी त्यांनी अनेक चांगल्या चांगल्या रचना रचल्या, जसे आपल्या हिंदू संतांनी अभंग रचलेत. आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाण्यांमधे त्यांच्या गीतांचा वापर केला गेलेला आहे. काहीही असो, कुणीही लिहिलेली असोत,पण ही गीते कानाला खूप सुमधुर वाटतात. ही गीते ऐकतांना मनावर एक धुंदी चढते आणि गाणं संपल्यावरही ही धुंदी कित्येक तास मनावर असते. उदाहरणादाखल खालील गीते बघा... नक्कीच ही तुमची आवडती गीते असतील.
१) मौला मेरे मौला
२) ख्वाजा मेरे ख्वाजा दिल मे समा जा
३) पिया हाजी अली
४) तेरी दिवानी
५) आफ़्रीन आफ़्रीन
६) दमा दम मस्त कलंदर
७) धागे तोड लाओ चांदनी से नूर के
८) बुल्ला की जाना मै कोन
९) मै जहाँ रहू... मै कहीभी हूँ
१०) अल्ला के बंदे हस दे
११) ओ रे पिया
१२) लागी तुमसे मन की लगन...
१३) जिया धडक धडक जाये
१४) रूठे यार नु मना ले
१५) छन से जो टूटे कोई सपना
१६) झुले झुले लाल
१७) किन्ना सोना तेनु रब ने बनाया
१८) आज मेरा जी करदा
१९) लंबी जुदाई
                          अजूनही बरीच गाणी आहेत. मला कधीकधी खूप उदास वाटत असलं की मी ही गाणी ऐकतो, मन अगदी प्रसन्न होऊन जातं. तुम्हीही अनुभव घेऊन बघा!

गुरुवार, १ सप्टेंबर, २०११

गणपती बाप्पा मोरया!



बाप्पा, आज तुम्ही आलात. मागच्या वर्षी तुम्हाला "पुनरागमनायच" म्हटल्यापासून या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पहात होतो. दरवर्षी आम्ही आनंदाने तुम्हाला घरी आणतो, दहा दिवस तुमची बडदास्त ठेवण्यात कसे निघून जातात हेसुध्दा कळत नाही. या दहा दिवसात तुम्हाला आम्ही आमच्यातलं प्रेम, माणुसकी, हेवेदावे कसे आहेत ते सगळं सगळं दाखवतो आणि साकडं घालतो की हे गणराया, आम्हाला सुबुद्धी दे, हे दे, ते दे आणि काय काय दे. पण परत तुम्ही पुढच्या वर्षी बघता की आमच्यात तसूभरही फरक पडलेला नसतो. देवा, आम्हाला माहीतीये की आम्ही सुधारायचं मनावर घेतल्याशिवाय परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही. पण बाप्पा, ’कळतं पण वळत नाही’ अशी आमच्या सर्वांची अवस्था आहे. तेव्हा बाप्पा, यंदा तरी आम्हाला कळालेलं वळायची बुध्दी दे हेच मागणं आहे!

गणपती बाप्पा मोरया!



(चित्र आंतरजालावरुन साभार)