बुधवार, ९ जून, २०१०

देशमुख गुरुजी

                देशमुख गुरुजी म्हणजे एक अवलिया व्यक्तिमत्व होतं. पाच फुटांच्या आतबाहेर उंची, गोल गरगरीत अंगकाठी, आणि कायम पांढराशुभ्र शर्ट-पायजमा! चेहेरा कायम हसतमुख! गुरुजी आणि त्यांच्या मिसेस नगरपालिकेच्या शाळेत शिक्षक होते. त्यामुळे गुरुजी सगळ्या गल्लीचेच गुरुजी होते, आणि त्यांच्या मिसेस बाई!
                गुरुजींचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते गल्लीतल्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेत असत, मग ते कुणाचं लग्न असो, मृत्यु असो, गणपती असोत की नवरात्र, प्रत्येक ठिकाणी गुरुजी पुढे! अशा वेळी त्यांच्यातला शिक्षक जागा होत असे. मग सगळी गल्ली विद्यार्थी! कुणी विचारो ना विचारो, आपण आपली देशमुखी सुरु ठेवायची हा त्यांचा खाक्या! नवरात्र असलं की बाप रे बाप! आम्ही सगळी लहान मुलं कंटाळून जात असू. कारण गुरुजींच्या एकापाठोपाठ एक अशा ज्या आरत्या सुरु होत, त्या तास दोन तास तरी थांबत नसत. हातात आरत्यांचं पुस्तक आणि वर्गात शिकवत असल्यासारखं आरत्या चालूच! आम्हाला तर असं वाटायचं की ते देवीला आरत्या शिकवताय. आम्ही आपले आता आरत्या संपतील, तेव्हा संपतील याची वाट पाहत टाळ्या वाजवतोय, पण आरत्या काही थांबायचं नाव नाही. आमचं म्हणजे सगळ्या चिल्लर पार्टीचं सगळ्यात जास्त लक्ष असायचं ते आरतीनंतर मिळणा-या प्रसादावर! म्हणून आम्ही आपले टाळ्या वाजवतोय,वाजवतोय! शेवटी अगदी हात लालेलाल झाले आणि गुरुजींचं आरत्यांचं लेक्चर संपलं की मोठ्ठी मंत्रपुष्पांजली, मग अजून काय काय श्लोक म्हणून आरतीपर्वाचा शेवट व्हायचा!
आमच्या गल्लीच्या टोकाला एक दूध केंद्र होतं. गल्लीतले बरेचसे लोक सकाळी तिथून दूध आणत असत. देशमुख गुरुजींचं घर त्या रस्त्यावरच होतं. सकाळी गुरुजींची शाळेत जायची तयारी चाललेली असायची. गुरुजी इतके तल्लीन होऊन दात घासत असायचे की विचारता सोय नाही. त्यांचा घसा साफ करण्याचा आवाज अर्ध्या गल्लीला ऐकू यायचा. त्यांच्या घराजवळून येणारा जाणारा प्रत्येक जण कानावर हात ठेवूनच पुढे जात असे. सकाळी सकाळी तो किळसवाणा आवाज नकोसा वाटे. बरं तेही अगदी तालासुरात चांगला अर्धा तास घसा साफ करत असत.अशा वेळी खरं तर कुत्री इमानदारीने भुंकतात, पण हा आवाज त्यांच्याही अंगवळणी पडला होता. ती पण सारी गुरुजींचं संगीत नाटक आटोपेपर्यंत सुस्तावून बसून राहत. गुरुजींचा हा आवाज म्हणजे गल्लीला "वेक अप कॉल" असायचा.
                काळ उलटला तसे गुरुजी आणि बाई नोकरीतून निवृत्त झाले. एक एक करून तिन्ही मुलींची लग्न झाली. मुलगा नव्हताच. त्यांनी जाणिवपूर्वक मुलींकडे राहायला जाणं टाळलं होतं. ते म्हणायचे, आमचं म्हातारा म्हातारीचं काय व्हायचं ते इथेच होईल. आणि दुर्दैवाने तसंच झालं. बाई हार्ट ऍटॅकने वारल्या.गुरुजी एकटे पडले. मुलींच्या आग्रहावरून काही दिवस त्यांच्याकडे राहायला गेले पण एकतर तिथे मिळणा-या वागणुकीमुळे किंवा इतक्या वर्षांच्या सवयीमुळे ते गावी परत आले. तेव्हा ते सांगायचे, गड्या आपला गावच बरा! बाई गेल्या आणि गुरुजींचं घर भकास झालं. आधी गुरुजी स्वत: स्वयंपाक करत. मग त्यांनी डबा लावला. हळूहळू गुरुजी घराबाहेर पडेनासे झाले. आठवड्यातून एखादे वेळेस दिसत. कपड्यांना पिवळी झाक चढली. आजा-यासारखे दिसू लागले. मुली मात्र वर्षाकाठी एकदा यायच्या आणि बापाला यथेच्य लुबाडून जायच्या. मात्र त्या भेटल्याच्या आनंदात गुरुजींचे चार दिवस अगदी दिवाळीसारखे निघून जात. पण तितकेच दिवस! नंतर परत गुरुजींची परिस्थिती जैसे थे! ज्यांनी आयुष्यभर मुलांवर संस्कार केले, त्यांना चांगले गुण शिकवले, त्यांच्यावरच उतारवयात स्वत:च्या मुलांचे धक्के खायची वेळ आली!
                नंतर आम्हीपण त्या गल्लीतलं घर सोडून नवीन घरात रहायला गेलो. गल्लीतल्या लोकांशी हळूहळू संपर्क कमी झाला. अधेमधे भेटणा-या कुणाकुणाकडून गुरुजींची माहिती कळत होती. एकदा कळालं की गुरुजी भ्रमिष्ट झालेत. त्यांच्या मुलीने त्यांना फसवून त्यांचे पी.एफ.चे पैसे काढून घेतले आणि आता ती म्हाता-याला विचारायला तयार नाही. गुरुजी ज्याला त्याला "माझे पैसे मिळतील का हो?" असं विचारत असत.सगळे लोक हळहळण्यापलिकडे काहीच करू शकत नव्हते.
                आणि एक दिवस गुरुजी रस्त्यातच बेवारस मेलेले सापडले.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा