सोमवार, २० डिसेंबर, २०१०

सप्त्या...


आमच्या गावाकडे ’सप्त्या’ हा एक खरंच छान कार्यक्रम असतो. ’सप्त्या’ म्हणजे ’भागवत सप्ताह’! त्याचा "सप्त्या" नेमका कधी झाला हे आमच्या आधीच्या तीन पिढ्यांनाही सांगता येणार नाही. पण झाला तो अपभ्रंश!

सर्वसाधारणपणे बरेच दिवसापासून गावात काही कार्यक्रम झालेला नसला,म्हणजे कुणाचं लग्न वगैरे, तेव्हा कुणाच्या तरी डोक्यातून सप्त्या बसवायची भन्नाट कल्पना निघते. किंवा ब-याचदा चातुर्मासात सप्त्या बसवला जातो. सप्त्या बसवायचा हेतू नि:संशय चांगला असतो की निदान त्यनिमित्ताने का होईना, पण देवाचं नामस्मरण व्हावं, चार चांगले शब्द कानावर पडावेत.. पण होतं काय, की सप्त्या शेवटी टिंगलीचा विषय ठरतो. आमच्या भागातले बहुतेक लोक वारकरी आहेत. दरवर्षी न चुकता वारीला जातात. कितीतरी ओव्या, अभंग त्यांना तोंडपाठ आहेत. त्यांचा सप्त्या बसवण्यात पुढाकार असतो.

सप्त्याची सुरुवात एकदम मजेदार असते. आधी सप्त्याबद्दल ठिकठिकाणी पोस्टर्स लागतात. त्यावर कोणता ’ब्वा’ बोलणार आहे त्यांचा मोठ्ठा फोटो असतो. खाली आयोजकांची नावं असतात. वेळ आणि पूर्ण कार्यक्रमपत्रिका दिलेली असते. ’ब्वा’ ही फार महत्वाची गोष्ट असते सप्त्यामधे! साधारणपणे आपण त्यांना महाराज वगैरे म्हणतो, पण आमच्याकडे सरळसरळ ’ब्वा’ म्हणतात! बरं ’ते ब्वा’ असं पण नाही, ’तो ब्वा’!

"कुढला व्बा हाय बे?"
"किशोर महाराज उचंदेकर!"
"आय ह्याय! येले कुढून पकडी आनला... तेले तं काहीबी बोलता नी येत! त्या तढी काय्बी बोली राहालता!"
"जाऊदेनं बे, लोकायले चाली राहाला ना, नं आपल्याले बी इतलंच परोडी राहालं. बाकीच्या ब्वाचे पैशे परोडतीन का आपल्याले?"
"हा भो ते बी बरोबरे!"
असले अगदी जनरल संवाद आहेत ’ब्वा’ च्या निवडीवर!
पहिल्या दिवशी मंडपात अगदी कुणीच नसतं. उगाच ब्वाला एकटं वाटू नाही म्हणून काही दोन-चार डोकी असतात तेव्हढीच! बाकीच्यांचं मत म्हणजे "जाऊनं बे, बारे पूरा हप्ता पडेले!".
मग दुस-या दिवसापासून ज्या ज्या घरात म्हातारी माणसं आहेत, त्यांना आंजारुन-गोंजारुन, समजवून, प्रसंगी त्यांच्या अंगावर खेकसून त्यांना ’सप्त्या’ला पाठवलं जातं. "आढी बशीसन काय करी राहाले, तढी जा सप्त्यात! तो ब्वा काय सांगी राहाला जरा ऐका! तितलंच देवाचं नाव घेनं व्हतं! आढी घरी बशीसन निस्ते डोकं खाता!" अशा ’प्रेमळ’ संवादांनी घरातल्या म्हाता-यांना मंडपात पाठवलं जातं. हजारात एखादा तरुण मंडपात दिसतो. बरेच जण तर शेवटच्या दिवसापर्यंत मंडपात फिरकत नाहीत.

’सप्त्या’ सेशन्समधे चालतो. सकाळी आधी भागवतग्रंथाची आरती होते. मग ’ब्वा’ निरुपणाला बसतात. भागवतातला एक श्लोक घेऊन ते त्याचा अर्थ सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत उलगडून सांगतात... ते बोलतांना कधीच हाय बाऊंसर शब्दांचा वापर करत नाहीत. लोकांमधले एक होऊन, त्यांना त्यांच्या भाषेत ते अर्थ सांगतात. करता करता जेवणाची वेळ होते. जेवण करुन आल्यावर परत संध्याकाळपर्यंत निरुपण चालतं. असं करत करत ’ब्वा’ बरोबर आठवडाभरात सगळा भागवत सांगून संपवतात.(शाळेचा पोर्शन पण इतक्या लवकर पूर्ण होत नाही! भागवत कसा काय संपतो तो देव जाणे!)

भागवत ऐकायला आलेल्या म्हाता-या बायका हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. कथेकडे त्यांचं लक्ष फक्त १ टक्का असतं. बाकी सर्व वेळ याच्यात्याच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यात जातो. "तुले काय सांगू माय, मह्यी वाहारी अशी करी राहाली"! "आय ह्याय वं माय! मह्या ल्योक बी तिचंच आयकतो!" "ते अमुक अमुकचा डोया काहाडला तिले पाह्याले जानंय बारे!" असे संवाद! ’ब्वां’ना मग त्यांना परत परत ओढून कथेकडे परत आणावं लागतं. "बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल!" असा जोरात जयघोष करून ’ब्वा’ त्यांना परत कथेत आणतात. पाच मिनिट झाले, की परत यांचं सुरुच!
भागवताबद्दल आणि सांगणा-या ’ब्वा’ बद्दल नितांत आदर हे या बायकांचं वैशिष्ट्य! रोज कथेला येतांना त्या वाटीभर का होईना, पण शिधा घेऊनच येतात. आरती झाली, की भागवताला शिधा वाहिला जातो आणि भक्तिभावाने ’ब्वा’ च्या पायावर डोकं टेकवलं जातं. खरंच सांगतो, इतका आदर आणि इतका सन्मान मी अजून कुणालाच मिळालेला बघितला नाहीये!

करता करता भागवताचा शेवटचा दिवस जवळ येतो. आधीच वर्गणीप्रमाणे कुणी तूरडाळ दिलेली असते तर कुणी तूप, कुणी गहू देतं, कुणी भाजी स्पॉन्सर करतं. ज्या दिवशी भागवताचं पारणं असेल, त्याच्या आदल्या दिवशी गल्लीतल्या चक्कीवाल्याकडे गहू नेऊन दिला जातो. तो रात्रभरात तो दळून ठेवतो. सकाळी खेड्यावरुन भरताच्या वांग्यांचे पोते, मिरचीचं आणि आल्याचं पोतं,कांद्याची पात आणि केळीच्या पानांचे गठ्ठे येतात. सकाळी दळून आणलेला गहू , म्हणजे कणीक लोटगाडीवर लादून आपल्या विभागातला प्रत्येक घरात अडीच-तीन किलो कणीक पोचवली जाते. सकाळी ११ वाजायच्या आत घराघरातल्या बायका त्याच्या पोळ्या लाटून ठरलेल्या ठिकाणी, म्हणजे सप्ताहाच्या मंडपाजवळ कुणाच्यातरी घरात पोचवून देतात. काही लोक कणीक वाटायला गेलेले असतात तोपर्यंत १०-१२ लोक वांगे चिरायला बसतात. १०-१२ पोते वांगे चिरून त्याची "घोटेल भाजी" (घोटलेली भाजी) बनवली जाते. तिच्यात आलं, लसूण टाकलं जातं. भाजी इतकी घोटलेली असते की तिच्यात वांग्याची एक फोडही शिल्लक राहत नाही. पूर्वी लोक कमी होते तेव्हा मोठ्या रवीने हातानी भाजी घोटली जायची, पण आता जी रस्ता फोडायची ड्रील असते (जेसीबी ड्रील) तिच्या टोकाला मोठी रवी बांधून त्याने भाजी घोटतात. तोवर दुसरीकडे चुलीवर (खरंतर रहाडीवर, रहाड म्हणजे जमिनीवर एक चर खोदून त्यात लाकडे टाकतात व त्यावर विटा ठेवून त्याचा उपयोग चुलीसारखा करतात.) वरण शिजत असतं. जेवणाचा मेनू एकदम साधा म्हणजे, वरण-पोळी आणि ही वांग्याची घोटलेली भाजी असा असतो. क्वचित शिरापण केला जातो.भागवताच्या शेवटच्या आरतीला मात्र सगळेजण उपस्थित असतात. आरती झाली रे झाली, की लगेच सगळे जेवायला बसतात. हे जेवण जेवण्याची पण एक विशेष पद्धत आहे. केळीच्या पानावर पोळी बारीक कुस्करुन तिचं आळं केलं जातं त्यात वरुन वरण ओततात, वरण एकदम पातळ असतं.घट्ट वरण केलं तर ते नीट मिक्स होऊ शकत नाही.म्हणून वरण पातळच करतात. त्यावर भरपूर तूप ओततात. आणि ते मधलं मधलं कालवून खाल्लं जातं. जेवण पूर्ण होईपर्यंत आळं मोडलं जात नाही. आळयाच्या बाजूबाजूचं आत घेत जाऊन जेवण केलं जातं. या जेवणाला आमच्याकडे मजेने "कॉंक्रिट जेवण" पण म्हणतात. कारण जेवण झाल्यावर ते पोटात कॉंक्रिटसारखं घट्ट बसतं.इथल्या जेवणाला जी चव असते ती मी छातीठोकपणे सांगू शकतो जी जगातल्या कुठल्याही जेवणाला नसेल! काय त्या भाजीची अप्रतिम चव! कायम जिभेवर रेंगाळत असते! दुपारी बारा वाजेपासून सुरु झालेल्या पंगती चार-पाच वाजेपर्यंत सुरु असतात.लोकवस्तीप्रमाणे सरासरी चार-पाच हजार लोक भागवताचं दर्शन घेऊन आणि जेवून जातात.नव्वद टक्के लोक भागवताला आणि ’व्बा’ ला नमस्कार केल्याखेरीज जात नाहीत. हळूहळू उन्हं कलायला लागतात. ’ब्वां’ची निघण्याची लगबग सुरु होते. बिदागी घेऊन आणि सगळ्यांचा निरोप घेऊन ’व्बा’ निघून जातात. हळूहळू लोकही कमी व्हायला लागतात. वाढून वाढून दमलेले हात मग जेवायला बसतात. त्यांची पंगत संपते तोवर बाकीचे भांड्याकुंड्यांची आवराआवर करण्यात मग्न होतात. सगळयांची जेवणं झाली की दोन-चार जण तुरखाट्यांचा (तुरीच्या झाडाच्या काड्या) खराटा बनवतात, आणि परिसर झाडायाला सुरुवात करतात. पाणी मारुन जेवण झालेली जागा लख्ख केली जाते. पुढच्या ’सप्त्या’ची वाट पाहत एक मोठ्ठा अध्याय संपतो.

काही शब्दांचं स्पष्टीकरण:
आढी : इथे
तढी: तिथे
वाहारी : सून
डोया काहाडला : डोळ्याचं ऑपरेशन झालं.