मंगळवार, ७ एप्रिल, २००९

सोनमोहोर.....

(खार (प.) इथल्या जैन मंदिराजवळ फुललेला सोनमोहोर)

आज सकाळी ऑफिसला निघालो होतो. एक ओळखीचा सुवास आला. कळेना कुठून येतोय. पण लहानपणी या वासाने मनात घर केलं होतं. वर पाहिलं..... सोनमोहोर घमघमत होता. त्याची इवलीइवली पिवळीजर्द फुलं पाहिली आणि लहानपणच्या आठवणी मनात फेर धरून नाचू लागल्या.
लहानपणी आम्ही ज्या घरात भाड्याने राहत होतो तो एक मोठा वाडा होता. वाड्यात अशोक, औदुंबर, कडूलिंब अशी भरपूर झाडं होती. त्यामुळे खान्देशातल्या भर उन्हाळ्यातही वाड्यात थंडावा राहत असे. उन्हाच्या झळा फारशा जाणवत नसत. आम्ही मुलं शाळेतून आलो की दिवसभर वाड्यात खेळत असू.
तेव्हा आमच्या घराला मोठं अंगण होतं. अंगणात भरपूर सावली असे. उन्हाळ्यात रात्री आम्ही घरातले सर्वजण अंगणात झोपत असू. रात्रभर छान हवा चालत असे. त्या झोपेचं सुख आता शब्दात पकडताच येणार नाही. मी एकटा (दिडशहाणा) सोनमोहोराच्या झाडाखाली खाट टाकून त्यावर झोपत असे. सकाळी खाटेवर आणि आजूबाजूला त्याच्या छोट्या छोट्या पिवळ्याशार फुलांचा इतका सडा पडत असे की जमिन पण दिसायची नाही. त्या फुलांचा एक मस्त घमघमाट सुटलेला असायचा. तो वास श्वासात भरून घेत, सकाळच्या थंडगार हवेत चादर अंगावर ओढून घेत लोळत पडण्यात जे सुख होतं, ते आज ए.सी. मधे नाहीये. ते क्षण परत जगायला आज मी वाट्टेल ती किंमत द्यायला तयार आहे. (पण गेलेले क्षण परत विकत घेता येण्याइतका अजून तरी कोणीच श्रीमंत नाहीए).
सकाळी आई उठवायला यायची. तेव्हा चादरीतून डोकं बाहेर काढून पाहिलं की आपण एकदम राजे आहोत आणि फुलांच्या सिंहासनावर बसलेलो आहोत असं वाटायचं. सर्व अंगणभर फुलंच फुलं! उठून घरात येताना फुलांवर पाय देणं जिवावर यायचं.
घरात आल्यावर (जबरदस्तीने.... आई ओरडल्यामुळे) आंघोळ, नाश्ता वगैरे आटोपून आम्ही परत वाड्यात खेळायला मोकळे ते पार जेवणाची वेळ टळून जाईपर्यंत! आई आम्हाला ओरडून ओरडून थकून जायची पण आम्ही काही ऐकायचो नाही. माझे मामेभाऊ वगैरे त्यांची परिक्षा झाल्यावर आले की मग काही विचारायलाच नको. आमचं दिवसभर लपाछपी खेळणं चालायचं.मी लपण्यासाठी एकदम खास जागा शोधून काढली होती. ती म्हणजे सोनमोहोराचं झाड! मी झाडावर चढून दाट फांद्यांआड लपून बसत असे आणि सर्वजण मला शोधत असत. ते झाड इतकं दाट होतं की अगदी बारकाईने बघितल्याशिवाय त्यावर काय आहे हे दिसत नसे.
त्या सोनमोहोराच्या शेंगा फोडून आम्ही त्यातल्या बिया काढायचो आणि जागा मिळेल तिथे पेरायचो. पावसाळ्यात इवली इवली रोपं वर आली की एकदम छान वाटायचं........
मी अकरावीत असताना आम्ही आमच्या स्वत:च्या घरात राहालया गेलो. कित्ती दिवस आम्हाला झाडांवाचून चैन पडत नव्हतं. पण हळूहळू नविन घरात रुळलो. माझ्या जिवलग मित्राची, सोनमोहोराची आठवण हळूहळू कमी होत गेली..... पण मी त्याला विसरलेलो नव्हतो.आजही माझ्या बालपणीच्या फुलपंखी आठवणींमधे त्याला हक्काचं स्थान आहे...
आज सकाळी पाहिलेल्या सोनमोहोराने मला त्या सोनेरी दिवसांमधे परत नेलं... त्याचा मी कायम ऋणी राहीन..

-आदित्य चंद्रशेखर.