बुधवार, २४ डिसेंबर, २००८

जेष्ठ कवयित्री पद्मा गोळे यांची एक अप्रतिम कविता इथे देतोय.

पांढरे निशाण उभारण्याची,
घाई करु नकोस,
मूठभर हृदया,
प्रयत्न कर,
तगण्याचा, तरण्याचा,
अवकाश भोवंडून टाकणा-या,
या प्रलयंकारी वादळाचाही,
एक अंत आहे,
काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत,
लढत रहा,
तुझ्या नाजुक अस्तित्वानिशी,
वादळे यासाठीच वापरायची असतात,
आपण काय आहोत,
ते तपासण्यासाठी नव्हे,
काय होऊ शकतो,
हे आजमावण्यासाठी..
-पद्मा गोळे.

मंगळवार, २ डिसेंबर, २००८

मनातलं गाणं मनातच गात गेलो..

पावसात आठवणींच्या मी न्हात गेलो,
मनातलं गाणं मनातच गात गेलो..
तू दिलेल्या जखमा आता भळभळतात,
मित्र म्हणवणारे मग खोटे हळहळतात,
तालात गायलो पण आयुष्याच्या सुरात गेलो,
मनातलं गाणं मनातच गात गेलो..
केव्हातरी जाग यायचीच होती,
केव्हातरी पहाट व्हायचीच होती,
मग कशासाठी आठवणींच्या धुक्यात गेलो?
मनातलं गाणं मनातच गात गेलो..
पहाटेच्या दवासारखे उडून गेलेत क्षण
मनाचा चटका आता जाळतो कण कण
शेवटी अश्रू बनून तुझ्या डबडबल्या डोळ्यात गेलो
मनातलं गाणं मनातच गात गेलो..
-आदित्य चंद्रशेखर