शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २००८

एक आदरांजली

आहे-नाही असा पाऊस, ओली कातर संध्याकाळ,
क्षितिजादूर तारेवर, आठवणींची मोहनमाळ!
जवळचेही जग दूर, असा एक-एकटा क्षण,
वणव्यामध्ये व्यवहाराच्या, तगमगणारे द्विधा मन..
अशा वेळी आधाराचा एक हात अलगद येतो,
घसरणा-या वाटेवरती, अगदी सहज सावरुन घेतो,
पुन्हा समोर येते शाळा..... खडू, फळा, पुस्तक, वही.
कठोर कधी, कधी मृदु, समासातली तुमची सही..
केव्हा वत्सल शाबासकी, तर कधी कडक उठाबशा,
हातावरच्या वळांनी तर, हाती दिल्या नव्या दिशा.
पुस्तकाची खिडकी उघडून, पंख दिलेत आकाशाचे,
अक्षराच्या मुळात तुम्ही, बळ दिलेत आयुष्याचे.
कधी आई, कधी ताई, कधी चक्क मित्र झालात,
जेव्हा काळोख धाक घाली, तेव्हा प्रेमळ ज्योत झालात.
त्याच प्रकाशात बाई, चालतो आहे पाऊलवाट,
आठवणींच्या जगामधून, सोबत दावी तुमचा हात.
वादळवारा, काटेकुटे, कुठले म्हणून भय नाही.
जपून ठेवली आहे मनात, ती वही, ती सही........!
- प्रविण दवणे

तू मला.... मी तुला...... हात हाती दिला

तू मला.... मी तुला...... हात हाती दिला
शोधण्या नभ निळे, हा फुलांचा झुला
वाळवंटातुनी चाललो....चाललो
मेघ हा सावळा, पेरण्या जागलो
हाय मॄत्युस मी, श्वास माझा दिला.
तू मला.... मी तुला...... हात हाती दिला.
वाहत्या आसवांना, जरा हासवू,
पांगल्या सावल्यांना, इथे बोलवू
मी उन्हाला तुझ्या, चंद्र माझा दिला.
तू मला.... मी तुला...... हात हाती दिला.
सांज आली शिरी, क्षितीज हे अंजिरी
धावता धावता, थांब रे मंदिरी,
प्रार्थनेचा दिवा, अंतरी थांबला,
तू मला.... मी तुला...... हात हाती दिला.
- प्रविण दवणे
पडत्या पावसाला पाहून तुम्ही आतून भिजला नाहीत तर स्वत:च्या कोरडेपणाची तारीफ करू नका; तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत.

मंगळवार, १८ नोव्हेंबर, २००८

कधी वाटते असे मनी की

कधी वाटते असे मनी की,
असे काहीसे अवचित व्हावे
तुझ्या नि माझ्या एकसुराने
जीवनगाणे आकारा यावे...
दवात भिजल्या तृणपात्यावर,
रंग खुलावे प्रणयाचे,
धुंद तराणे गाताना
भान नसावे समयाचे..
झोकून द्यावे बेहोषीने
आनंदाच्या लाटेवरती
उधाण यावे आयुष्याला,
अन प्रेमाला यावी भरती...
स्वच्छंदी पाखराप्रमणे
गात फिरावे गीत रानभर
अन उमटावी तुझ्या मनीही
गीतामधली अबोल थरथर...
कधी वाटते असे मनी की,
असे काहीसे ठरवून व्हावे,
तुझ्या नयनीच्या डोहामध्यए,
मी कायमचे बुडून जावे...

-आदित्य चंद्रशेखर

बरसतेस तू प्राजक्तासम......

बरसतेस तू प्राजक्तासम,
इथे वेचता त्रेधा उडते,
गूज मनीचे ये ओठांवर,
ओठांवरुनच परत फिरते...
कुंदकळ्यांसम धवल कांती तव,
नयनामधला बाण रुपेरी,
प्रेमबनाच्या ह्या मॄगयेतील,
सावज मी अन तू शिकारी
बोलतेस तू शब्दांवाचून,
शब्दांवाचून मज कळते सारे,
श्वासातून तव फुले मोगरा,
मला सांगती खट्याळ वारे.....
गोंदून ठेवीन हॄदयावरती,
भास तुझे अन तुझेच विभ्रम,
धावत येऊन स्वीकार मला तू,
दूर कर हा माझा संभ्रम.....
-आदित्य चंद्रशेखर

जुनेच शोधू पुन्हा नव्याने

अतीव सुंदर अतीव देखणी,आयुष्याची काही वळणे,
जरा थबकुनि या वळणांवर,जुनेच शोधू पुन्हा नव्याने
वेळेवाचुन सुटलेले क्षण,पुन्हा जगुया पुन्हा नव्याने,
मनामनातील अपूर्ण घरटी, पुन्हा बांधू पुन्हा नव्याने
धुंद भरोनि श्वासात मोगरा, धुंद होऊया पुन्हा नव्याने
हलकेच मग ओठांवर यावे, जुनेच गाणे नव्या सुराने
वळिवाचा तो पाऊस पहिला, पुन्हा झेलूया पुन्हा नव्याने
मृदगंधाचे अत्तर लेणे, श्वासात जपूया पुन्हा नव्याने
वेडे होतो कधी कशास्तव,वेड लागावे पुन्हा नव्याने
एकमेकांची अस्फुट ओळख, पुन्हा शोधूया पुन्हा नव्याने....
-आदित्य चंद्रशेखर

खूप झालं!

मी चंद्र-तारे आणायच्या गोष्टी करत नाही,
डाळ-तांदूळ आणता आले, खूप झालं!
तू नाही दिसत ऐश्वर्यासारखी! हरकत नाही,
पण एकदम आवडलीस, खूप झालं!
काचेचं शमादान मी नाही लावू शकत छताला,
पावलापुरता प्रकाश येतोय,खूप झालं!
नको करूस पक्वान्न पंचतारांकीत हॉटेलमधली,
दोन वेळचं रांधता येतं तुला? खूप झालं!
मला नाही जमणार तुला न्यायला लॉंग ड्राईव्हला,
ऑफिसपर्यंत सोडता आलं, खूप झालं!
तुला नाही समजली माझी कविता? चालेल!
हिशोब समजतोय ना? खूप झालं!
नसू आपण रोमिओ-ज्युलिएट, वा नसू शिरी-फरहाद,
दोन श्वास, एक प्राण?? खूप झालं!
-आदित्य चंद्रशेखर

सोमवार, १७ नोव्हेंबर, २००८

आठव सखे...

आठव सखे, ते क्षण सांडलेले
आठव दिन, न बोलता भांडलेले...
आठव ओंजळ स्वप्नांची, मी तुला दिलेली,
ओंजळीतुनी जरासे, चांदणे सांडलेले..
आठव ती धून, तू छेडलेली
आठव ती सांज, विभ्रमांनी वेढलेली.
आठव ते शब्द, मुक्याने बोललेले
आठव ते वादळ, मी श्वासावरी पेललेले.
आठव ते धुके, नयनी दाटलेले
आठव ते ओघळ, भावनांचे फुटलेले.
आठव त्या रात्री, मी जागलेल्या
अर्ध्या तरी चांदण्या, मी मोजलेल्या.
आठव ते प्रेम अव्यक्त, मनी दाटलेले
आठव मम हृदयीचे, ते रक्त आटलेले.
आठव ते पाणी तुझ्या, नयनी दाटलेले
आठव ते पदर स्वप्नांचे, आता फाटलेले....
..... आठवलं का?

-आदित्य चंद्रशेखर

प्रवाहित...

गंधित धुंदित मंद सुगंधित,
प्रिये अशी तू, चंदनगंधित
तू फुलराणी, हृदयविराजित
तुजसमोर मी, सदा पराजित.....
सदा सदा तू हृदयस्वामिनी,
मनी मानसी तूच मानिनी,
श्वासामधुनि,तूच रागिणी
माझ्या मनीचे, तूच मनोगत....
तूच रोहिणी, ह्या चंद्राची,
तूच तारिणी, मम आत्म्याची,
तूच जान्हवी, जीवनसरिता,
जीवनपुष्प हे, तुला समर्पित.....
श्वास चालतो, तुझ्या जपाने,
वदन बोलते, तुझेच गाणे,
नयनी केवळ,तुझेच दिसणे
सुहास्य करते, सदैव मोहीत......
प्रिये सदा तू, हसत रहावे,
अश्रू तुझ्या ना, लोचनी यावे,
अशीच यावी लाट तुझी की,
मी ही करावे, मला प्रवाहित......

-आदित्य चंद्रशेखर